चालू घडामोडी - २४ नोव्हेंबर २०१८

Date : 24 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब करणार राजकीय सीमोल्लंघन :
  • मुंबई : इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्या दौरा करणार आहेत. अयोध्या दौऱ्याला उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही जाणार आहेत. ठाकरे कुटुंब आणि उद्धव यांचे विशेष सचिव मिलिंद नार्वेकर सकाळी 11 वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावरुन रवाना होणार असून दुपारी 2 वाजता फैजाबाद विमानतळावर उतरतील.

  • याआधी ठाकरे कुटुंबातून उत्तर भारतामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दोनवेळा गेले होते. एकदा कोर्टाच्या कामासाठी तर दुसऱ्यांदा 'सहारा'चे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या लग्नासाठी ते उत्तर प्रदेशात गेले होते. त्यानंतर पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने उत्तरेत जात आहे.

  • निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा राम मंदिराचा मुद्दा उचलला जात आहे. शिवसेनेनेही राम मंदिराचा मुद्दा उचलून धरल्याचं दिसत आहे. शिवसेनेने अयोध्येत रॅलीचं आयोजन केलं आहे. अयोध्येत उद्या (रविवारी) उद्धव ठाकरे सभेला संबोधित करतील.

ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया यांचे निधन :
  • बीड : ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया यांचे वयाच्या 81 व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 2 वाजता मानवलोक मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे.

  • राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनात राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचविले.

  • सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं  विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित व परित्यक्त्या महिलांना आधार दिला.

  • डॉ. द्वारकादास लोहिया यांचा परिचय
    नाव - डॉ. द्वारकादास शालीग्राम लोहिया
    जन्म दिनांक : - 7  सप्टेंबर 1938
    शिक्षण - जी. सी.ए.एम. (मुंबई), हिंदी साहित्य विशारद
    संस्थेचे नाव - मानवलोक (मराठवाडा नवनिर्माण लोकायत)

  • विशेष कार्य - मराठवाडा विकास आंदोलन 1972 चे दुष्काळ आंदोलन, अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग. या शिवाय भ्रष्टाचार विरोधी मोहिम, दुष्काळी परिस्थितीत हाताला काम पोटाला दाम, मंत्र्यांना गावात प्रवेशबंदी, भ्रष्ट पोलिसांना नजराना कार्यक्रम इत्यादी प्रकारच्या कार्यात 1962 ते 1975 या काळात पुढाकार व नेतृत्व म्हणून अनेकदा तुरुंगवास. 1975 च्या आणीबाणीत 18 महिन्यांचा तुरुंगवास.

१५४ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार :
  • मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील 154 मागासवर्गीय पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. गृहविभागाने 20 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नियुक्तीच्या आदेशाला संतोष राठोड यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली. मात्र अशाप्रकारे तातडीने नियुक्तीला स्थगिती देता येणार नाही, असं स्पष्ट करत हायकोर्टाने मॅट आणि गृहविभागाचा आदेश कायम ठेवला आहे. या प्रकरणावर आता 7 जून 2019 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण : पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची सरळ सेवा परीक्षा देऊन मागासवर्गीय 154 जण पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनतर नाशिकमध्ये 9 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेतले. एवढेच नाही तर 5 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या 154 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळाही संपन्न झाला होता. परंतु पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मॅटने या 154 पीएसआयची नियुक्ती रोखून त्यांना मूळपदावर पाठवलं होतं.

  • यानंतर संबंधित 154 जणांनी मॅटमध्ये फेरविचार याचिका दाखल केली. यावर पुन्हा सुनावणी घेत मॅटने 6 नोव्हेंबर रोजी 154 पीएसआयना दिलासा दिला आणि त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देणारी याचिका फेटाळली. त्यामुळे या 154 जणांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र तरीही या पीएसआयच्या नियुक्तीमध्ये अडथळे येत होते. अखेर 20 नोव्हेंबर रोजी गृहविभागाने 154 जणांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. जवळपास दीड महिन्यांच्या प्रयत्नांनंतर या सगळ्यांना नियुक्ती मिळाली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्याला हजेरी :
  • मेलबर्न : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद परदेशात आंतराष्ट्रीय सामन्याला हजेरी लावणारे पहिले भारतीय राष्ट्रपती ठरले आहेत. मेलबर्नमध्ये सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना सुरु आहे. या सामन्यावेळी राष्ट्रपतींनी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हजेरी लावत काही वेळ सामन्याचा आनंद घेतला.

  • यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनदेखील उपस्थित होते. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरुन याची माहिती देण्यात आली.

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलदाजी करताना 19 षटकांत सात बाद 132 धावांची मजल मारली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला.

  • त्यानंतर भारताला 11 षटकांत 90 धावांचं सुधारीत लक्ष्य देण्यात आलं. मात्र सततच्या पावसामुळे पंचांनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

  • १९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

  • १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.

  • १९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

  • १९५१: लिबीया हा देश ईटलीकडून स्वतंत्र झाला.

  • १९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

  • २०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.

जन्म 

  • १८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९)

  • १८६४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३४)

  • १८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)

  • १८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९५०)

  • १९१०: हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदींगर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८०)

  • १९२४: पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)

मृत्यू 

  • १९७३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)

  • १९७७: आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८९८)

  • १९८८: भारतीय लेखक जैनेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९०५)

  • १९९९: नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

  • २०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.