चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ सप्टेंबर २०१९

Date : 24 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमित शाहांचा पुन्हा 'एक का दम', एक देश, एक भाषेनंतर आता एकाच ओळखपत्राचा नारा :
  • नवी दिल्ली : देशाची 2021 सालची जनगणना ही डिजीटल पद्धतीने होणार असल्याचे संकेत गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. मोबाईल अॅपद्वारे जनगणना करण्याचे शाह यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सांगितले आहे. याशिवाय देशात सर्व कामांसाठी एकच कार्ड असावं असाही विचार त्यांनी मांडला.

  • या एकाच कार्डमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक खातं, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा (वाहनचालक परवाना) समावेश असणार आहे. दरम्यान सर्व ओळखपत्र एकाच ओळखपत्रात येणार असल्याने गोपनिय माहितीला धोका ठरु शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

  • देश डिजीटल होतोय मग देशाची लोकसंख्या मोजण्यासाठी जुनी पद्धत कशाला? यासाठीच 2021 ची जणगणना मोबाईल अॅपवरुन होईल असं गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं. जनगणनेसाठी जे अॅप असेल त्यातून लोकांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवली जाईल.

  • दरम्यान, हे अॅप देशाच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत कसं पोहोचेल. यातून येणारे आकडे कितपत खरे असतील, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • जनगणनेमुळे फक्त लोकसंख्याच कळते असं नाही तर लोकांचा आर्थिक तपशील आणि अनेक प्रकारची महत्त्वाची माहितीही गोळा केली जाते. याआधी सरकारने आधार कार्ड प्रणाली सुरु केली तेव्हा आधार कार्डमुळे प्रत्येकाची गोपनिय माहिती लीक होत असल्याचे सांगत अनेकांनी कोर्टापर्यंत धाव घेतली होती.

महाराष्ट्रातल्या हिंदी भाषकांसाठी भाजपचं उत्तर प्रदेशात खास कॉलसेंटर :
  • लखनौ: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचं उत्तर प्रदेश कनेक्शन समोर आलंय. हे कनेक्शन साधंसुधं कनेक्शन नसून फोन कनेक्शन आहे. फोन करणारे असतील महाराष्ट्रात विखुरलेले उत्तर प्रदेशी लोक आणि त्यासाठीचं कॉल सेंटर असेल ते चक्क उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखनौैतल्या घरात! मुंबईसह महाराष्ट्रातल्या उत्तर प्रदेशी लोकांच्या समस्या जाणून त्यांचं निराकरण करण्याच्यानिमित्तानं त्यांना पक्षाशी जोडण्याचं काम, या हेल्पलाईनद्वारे करण्यात येणार आहे.

  • महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक अशा शहरांत लाखो उत्तर भारतीय राहतात. त्यांच्यात उत्तर प्रदेशातून आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. या हेल्पलाईनद्वारे हे लोक आपली समस्या सांगतील, त्यांच्या गाऱ्हाण्यांना संबंधित विभागांपर्यंत पोहोचवलं जाईल शिवाय त्यांच्या तक्रारीचं काय झालं तेसुद्धा कळवलं जाईल.

  • केशव प्रसाद मौर्य यांना महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी बनवण्यात आलंय. भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेन्द्र यादव हेसुद्धा निवडणूक प्रभारी आहेत. राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम बघता मौर्य यांनी मुंबईतच लोअर परळ भागात घर घेतलंय. जिथे ते पक्ष कार्यकर्ता आणि सामान्य लोकांना भेटतील. एकट्या मुंबईतच काही लाख उत्तर प्रदेशी राहतात. यातील काही शारीरिक कष्टाची कामं तर काही अगदी बांधकाम व्यावसायिकसुद्धा आहेत. यूपीतल्या जौनपूरमधले हजारो लोक इथं रिक्षा आणि टॅक्सी चालवतात. नुकतेच काँग्रेस सोडलेले कृपाशंकर सिंह किंवा समाजवादी पार्टीचे अबु आझमी हे मूळचे यूपीचेच रहिवासी.

  • मौर्य यांच्यावर महाराष्ट्रातल्या उत्तर प्रदेशी लोकांशी संपर्काची जबाबदारी देण्यात आल्यावर त्यांनी हे कॉल सेंटर सुरू केलं. मौर्य यांन मुंबईत अनेक यूपीवासियांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. मुंबईत किंवा उत्तर प्रदेशमध्येही त्यांच्या मूळ गावात जमीन-जुमला, भांडण-तंटे अशा समस्या कुणीही ऐकून घेत नसे. यामुळेच ही हेल्पलाईन सुरू करत असल्याचं मौर्य यांनी सांगितलं.

७८ ७८ ७८ २० २० डायल करा आणि वाचवा डेंग्युच्या पेशंटचे प्राण :
  • डेंग्युची लागण झालेल्यांची संख्या प्रचंड वेगानं वाढत असून शेवटी दरवर्षी खूपजणांना प्राणाला मुकावं लागतं. आणि आरोग्य क्षेत्र एकत्र येऊन ही प्राणहानी रोखण्यासाठी काही करतानाही दिसत नाहीये. दिल्लीनं अत्यंत वाईट अशा डेंग्युच्या लागणीचा सामना 2015 मध्ये केल्याला फार काळ लोटलेला नाही.

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार त्यावेळी डेंग्युनं घेतलेल्या बळींची संख्या 15 हजारांपेक्षा जास्त होती. डेंग्यू हा डास चावल्यामुळे होणारा व पसरणारा रोग असून गेल्या काही वर्षांमध्ये या लागणीचं रुपांतर साथीत झालेलं आहे. आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा 2009च्या डेटानुसार, 2009 मध्ये 60 हजारांना डेंग्युची लागण झाली होती. हा आकडा 2018 मध्ये 2,89,575 इतका म्हणजे तब्बल 500 टक्क्यांनी वाढला आहे.

  • गोदरेज हिटनं केलेल्या पाहणीमध्ये 94 टक्के नागरिकांना प्लेटलेटच्या क्रिटिकल लेव्हलची – म्हणजे यापेक्षा कमी प्लेटलेट असतील तर रक्त द्यावं लागतं – माहिती नसल्याचं आढळलं होतं. ही समस्या सोडवण्यासाठी गोदरेज हिटनं अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्यानं भारतातली पहिली ऑनलाइन प्लेटलेट डोनर कम्युनिटी स्थापन केली आहे. डोनर्सना व डेंग्युच्या पेशंट्सना एकत्र आणण्याचा या मागे उद्देश आहे. 

  • हिट प्लेटलेट हेल्पलाइन ‘7878782020’ चे 1.5 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत डोनर असून यामुळे केवळ रुग्णांचे प्राणच वाचलेले   नाहीत तर संबंधित कुटुंबांनाही प्रचंड सहाय्य मिळाले आहे. फक्त 2018 मध्येच या हेल्पलाइनमुळे पाच जणांचा प्राण बचावला आहे.

पोलिसांचा ‘फेसबुक’द्वारे जनतेशी संपर्क :
  • जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या सुविधेसाठी  मीरा रोड येथील नया नगर पोलिसांनी फेसबुक या समाजमाध्यमाचा वापर सुरु केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संपर्क ठेवणारे नयानगर हे मीरा-भाईंदरमधील पहिलेच पोलीस ठाणे आहे.

  • नयानगर पोलिस ठाण्याकडून  फेसबुक या समाजमाध्यमावर  खाते सुरु करण्यात आले आहे. समाजमाध्यमांचा वापर करून मैत्रीच्या नात्याने  सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य जनतेमध्ये पोलिसांबद्दल असलेली भीती आणि गैरसमज दूर करून पोलिस यंत्रणेचे  कामकाज कशाप्रकारे केले जाते हे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न समाजमाध्यमाच्या आधारे करण्यात येणार आहे. 

  • त्याचप्रकारे नयानगर  पोलीस ठाण्याकडून करण्यात येत असलेल्या दैनंदिन  कारवाया आणि विविध उपक्रमांची माहिती जास्तीतजास्त जनतेपर्यंत पोहचवण्याकरिता  समाजमाध्यमांचा वापर करण्यात येणार आहेच शिवाय प्रसारमाध्यमांना देखील या फेसबुकशी जोडण्यात येत असून माध्यम प्रतिनिधींना पोलीस ठाण्यात दाखल होत असलेल्या गुन्ह्यंची माहिती फेसबुकद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आता पर्यंत नागरिक  नया नगर पोलिस ठाण्याशी  फेसबुकच्या माध्यमातून जोडले गेले आहेत.

  • मुंबई लगत असलेल्या  मीरा-भाईंदर परिसरातील लोकसंख्या १५ लाखांच्या घरात आहे.  याठिकाणी दोन  उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयासह  सहा  पोलिस ठाण्यांचा समावेश  आहे.  शहरातील कायदा व सुव्यवस्था  अखंडित राहण्याकरिता पोलिस विभागाकडून  सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात.  समाजमाध्यमांची वाढती लोकप्रियत लक्षात घेऊन नयानगर पोलिस ठाण्याकडून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

‘इंटक’ची काँग्रेसकडे सात मतदारसंघांची मागणी :
  • अकोला : काँग्रेसप्रणीत इंटकने (इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस) सात मतदारसंघांत कामगार संघटनेच्या नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली असून त्यात विदर्भातील सहा जागांचा समावेश आहे.

  • विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ व मित्रपक्ष ३८ जागा लढवण्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये कामगारांचे प्रमुख संघटन असलेल्या इंटकनेही आता सात जागांवर दावा केला. या संदर्भात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना इंटकचे राज्याचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी पत्र दिले. त्यामध्ये सात जागांवर इंटक नेत्यांची नावे सुचवली आहेत. डॉ. संजीव रेड्डी यांनीही बाळासाहेब थोरात यांना पत्र देत इंटकला प्रतिनिधित्व देण्याची विनंती केली.

  • इंटकने अकोला पश्चिम, नागपूर पूर्व किंवा दक्षिण, भंडारा जिल्हय़ातील साकोली किंवा तुमसर, वर्धा, यवतमाळ जिल्हय़ातील वणी, बुलढाणा जिल्हय़ातील मेहकर या विदर्भातील सहा व औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात उमेदवारी देण्याची मागणी केली.

भारताचे जीवाश्मरहित इंधनाचे लक्ष्य दुपटीहून अधिक :
  • संयुक्त राष्ट्रे : हवामान बदलाचा प्रश्न हाताळण्यासाठी वर्तणुकीतील बदल घडवून आणण्याकरिता ‘जागतिक जनचळवळ’ सुरू करण्यासाठी रणशिंग फुंकावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. भारतातील जीवाश्मविरहित इंधनाचे (नॉन- फॉसिल फ्युएल) लक्ष्य दुपटीहून अधिक वाढवून ४५० गिगाव्ॉट करण्याची प्रतिज्ञाही त्यांनी केली.

  • पॅरिस हवामान बदल कराराबाबत असलेल्या बांधिलकीचा भाग म्हणून भारत १७५ गिगाव्ॉट जीवाश्मविरहित इंधनाचे उत्पादन करेल, असे मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात सांगितले होते.

  • मोदी यांनी सोमवारी जागतिक हवामान परिषदेत केलेली घोषणा १७५ गिगाव्ॉटच्या निर्धाराची पातळी ओलांडणारी आहे. ह्य़ूस्टन येथे रविवारी झालेल्या एका भव्य कार्यक्रमात मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घनिष्ठ मैत्रीचे प्रदर्शन केल्यानंतर, तसेच दहशतवादाशी लढण्याबाबत समान दृष्टिकोन प्रदर्शित केल्यानंतर एका दिवसाने मोदी यांनी ही घोषणा केली आहे.

  • मात्र अमेरिका व भारत यांच्यात हवामान बदलाबाबत मतभिन्नता आहे. ट्रम्प यांनी २०१७ साली पॅरिस हवामान करारातून माघार घेतली होती आणि त्यांच्या निर्णयाचा दोष भारत व चीन यांना दिला होता. या करारामुळे या दोन देशांचा सर्वाधिक फायदा होणार असून, त्याची किंमत अमेरिकेला मोजावी लागणार असल्यामुळे तो अन्याय्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.

  • १८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

  • १९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.

  • १९४६: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.

  • १९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.

  • १९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.

  • १९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.

  • १९९४: सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.

  • १९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.

  • १९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.

  • २००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.

  • २०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.

जन्म 

  • १५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)

  • १५५१: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)

  • १८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)

  • १८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)

  • १८८९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)

  • १८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)

  • १९०२: इराणी धर्मगुरु आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९८९)

  • १९११: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९८५)

  • १९१५: चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म.

  • १९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)

  • १९२२: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८९)

  • १९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)

  • १९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)

  • १९३६: भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)

  • १९४०: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)

  • १९५०: क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९६: स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेरहार्ड डी गेर यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८१८)

  • १९३९: युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८६७)

  • १९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८)

  • १९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.

  • २००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.