चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ एप्रिल २०१९

Date : 25 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत लोकसभा उमेदवार, संपत्ती तब्बल :
  • मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेला क्रिकेटपटू गौतम गंभीरची संपत्ती समोर आली आहे. गंभीर हा दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरला आहे. गौतम गंभीरची संपती 147 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.

  • गौतम गंभीर भाजपच्या तिकीटावर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. गंभीरने 2017-18 साली भरलेल्या आयटी रिटर्न्समध्ये 12.40 कोटी रुपयांचं उत्पन्न दाखवलं आहे. गंभीरवर 34 कोटींपेक्षा अधिक रकमेचं बँकेचं कर्ज आहे. याच कालावधीसाठी त्याची पत्नी नताशाने भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये 6.15 लाख रुपयांचं उत्पन्न तिने दाखवलं आहे.

  • गंभीरने दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं, मात्र हिंदू कॉलेजमधील पदवी शिक्षण तो पूर्ण करु शकलेला नाही, असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. गंभीरच्या विकीपीडिया पेजवर मात्र तो पदवीधर असल्याची माहिती दिसते. गंभीरकडे पाच चारचाकी आणि एक दुचाकी आहे.

  • आपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार अरविंद सिंग लवली यांच्याविरोधात गंभीर निवडणूक लढवत आहे. लवली यांची संपत्ती 6.8 कोटी रुपये आहे. दिल्लीतून एकूण 349 उमेदवार लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात आहेत. गंभीरनंतर पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे महाबल मिश्रा हे दुसरे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 45 कोटींच्या घरात आहे.

  • दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी ईशान्य दिल्लीतून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची संपत्ती 4.92 कोटी रुपये आहे.

माझ्या दौऱ्यांमुळे जगात भारताची ओळख :
  • कामरपाडा (पश्चिम बंगाल) : सततच्या परदेश दौऱ्यांमुळे विरोधकांनी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मात्र या दौऱ्यांमुळे भारताची जगभरात ओळख झाली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

  • पाच वर्षांपूर्वी क्वचितच भारताच्या मताला जगात महत्त्व होते. मात्र आता परिस्थिती बदलल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. चहावाला परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त आहे अशी टीका ममतांनी केली होती. मात्र आता याच दौऱ्यांमुळे देशाला जगभरात वेगळी ओळख मिळाल्याचे बिरभूम जिल्ह्य़ातील प्रचारसभेत पंतप्रधानांनी सांगितले. या पूर्वी कच्चे तेल व वायू आपल्याला अव्वाच्या सव्वा भावाने तसेच दीर्घकालीन कराराने घ्यावे लागत होते. आमच्या सरकारने चर्चेतून पुन्हा वाटाघाटी केल्याचे मोदींनी सांगितले.

  • भारताची ताकद वाढल्याने परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना खटल्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांचा संदर्भ विजय मल्या व निरव मोदी यांच्याकडे होता. ताकद वाढल्याने अफगाणिस्तानमध्ये कामासाठी गेलेली बंगाली कन्या जुडिथ डिसूझा हिची सुटका करता आल्याचे सांगितले.

  • ‘विरोधकांची हार’ - लोहारडग्गा (झारखंड):  मतदान यंत्रात फेरफार आल्याचा आरोप करीत  ‘महामिलावटी’ विरोधकोंनी आता पराभव मान्य केला असून ते त्यासाठी कारणे शोधत आहेत. आतापर्यंत मतदानाच्या ज्या तीन फेऱ्या झाल्या त्यात विरोधकांना काहीच संधी मिळालेली नाही हे यातून स्पष्ट झाले आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 

  • येथील सभेत त्यांनी सांगितले की, पराभव मान्य करण्यावाचून आता विरोधकांकडे पर्याय राहिलेला नाही.  परीक्षेत चांगली कामगिरी झाली नाही की मुले वेगवेगळी कारणे सांगून बहाणे करतात, विरोधकांनी आता निवडणुकीतील त्यांच्या अपयशाचे खापर मतदान यंत्रांवर फोडण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या तीन टप्प्यात विरोधकांना काहीच हाती लागलेले नाही त्यामुळे आता त्यांच्यापुढे पराभव स्वीकारण्यावाचून पर्याय नाही.

अर्ज भरण्याआधी नरेंद्र मोदींचं शक्तिप्रदर्शन - आज वाराणसीत सात किलोमीटरचा रोड शो :
  • वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून उद्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी आज मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यासाटी आज दुपारी मोदींचा सात किलोमीटर लांब असा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. मदनमोहन मालवियांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोदी रोडशोची सुरुवात करणार आहेत.  त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमारास मोदी गंगेकाठी आरती करतील.

  • पंतप्रधान मोदींची हा रोड शो बीएचयूपासून दशाश्वमेघ घाटापर्यंत असेल. मागील विधानसभानिवडणुकांच्या वेळीही मोदींनी याच ठिकाणापासून रोड शो सुरू केला होता. या रोड शो दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाराणसीत राहणारे वेगवेगळ्या राज्यातील लोक पारंपरिक पद्धतीने मोदींचे स्वागत करणार आहेत.

  • रोड शो दरम्यान गुलाबांच्या फुलांचा वर्षाव - नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो अस्सी मोड, मुमुक्षु भवन, आनंदमयी हॉस्पिटल, शिवाला तिराहा, सोनारपुरा, जगमबाडीमधून गोदौलिया पोहोचेल. या रोड शो साठी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेट्स लावले गेले आहेत. शहरात मोदींच्या स्वागताचे फलक जागोजागी लावले गेले आहेत. या रोड  शो दरम्यान गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जाणार आहे.

  • या सात किलोमीटरचा रोड शो काशी विश्वनाथ मंदिराच्या द्वाराजवळ संपेल. या रोड शोसाठी पाच लाख लोकांना बोलावण्याची तयारी केली आहे. वाराणसी शेजारील जिल्ह्यातील लोकांनाही या रोड शो साठी बोलावले आहे. या रॅलीसाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून वाराणसीत ठाण मांडले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह स्वतः वाराणसीत ठाण मांडून आहेत.

ट्रम्प-किम चर्चेच्या अपयशावर आता रशियात खलबते :
  • व्लादिवोस्तोक : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबरच्या शिखर बैठकीसाठी व्लादिवोस्तोक येथे दाखल झाले आहेत. पुतिन यांच्यासमवेत त्यांची पहिलीच शिखर बैठक होत असून बुधवारी त्यांचे येथे आगमन झाले.

  • उत्तर कोरियाने अमेरिकेबरोबर अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या संदर्भात सुरू असलेल्या पेचप्रसंगात रशियाचा पाठिंबा मागितला आहे. ही शिखर बैठक गुप्तपणे आयोजित करण्यात आली होती, पण अखेरच्या क्षणी त्याबाबत घोषणा करण्यात आली. पुतिन यांच्यासमवेत किम यांची ही पहिलीच बैठक असून त्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत हनोई येथे फेब्रुवारीत झालेल्या बैठकीतील वाटाघाटी व त्यातील अपयशाची कारणे याबाबत चर्चा करणार आहेत.

  • किम यांची चिलखती रेल्वे दुपारी झारच्या काळातील व्हादिवोस्तोक रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. नंतर किम यांचे शाही स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. आपली ही भेट यशस्वी होईल अशी आशा किम यांनी रशियन दूरचित्रवाणीशी बोलताना व्यक्त केली. त्यांची रेल्वे रशियाची हद्द ओलांडून खासान शहरात प्रवेश करीत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. कोरियन द्वीपकल्पातील प्रश्न सोडवण्यासाठी व द्विपक्षीय संबंधाबाबत आपण ठोस चर्चा करू शकू, असा विश्वास  त्यांनी व्यक्त  केला. पुतिन हे व्लादिवोस्तोक येथे गुरूवारी येणार असून नंतर बीजिंग येथील दुसऱ्या शिखर बैठकीसाठी रवाना होणार आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील आज राजकीय भूमिका स्पष्ट करणार :
  • शिर्डी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आज आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिर्डीत काल (24 एप्रिल) ससाणे यांच्या समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हजेरी लावली होती. या बैठकीत आपण आज भूमिका स्पष्ट करणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.

  • अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचं जागेचं मतदान झाल्यानंतर आता शिर्डी लोकसभा जागेसाठी हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे याना विरोध केला होता. त्यानंतर काल जयंत ससाणे समर्थकांनी बैठक घेतली आणि विशेष म्हणजे या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली.

  • या बैठकीत त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे विखे पाटील यांनी पुन्हा एकदा युतीच्या बाजूने भूमिका घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असून अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याची टीका विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.

"अब आएगा मजा, सबका हिसाब होगा" नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र :
  • सिंधुदुर्ग : राज्यातल्या राजकारणातलं प्रभावशाली व्यक्तीमत्त्व आता पुस्तकीरुपातून समोर येणार आहे. शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिणार आहेत. नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

  • “माझे वडील नारायण राणे हे आत्मचरीत्र लिहित असून लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. तर अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”, अशा प्रकारचं ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळेच नारायण राणेंच्या आत्मचरित्रात नेमकं काय असेल याची उत्त्सुकता सर्वांच लागली आहे.

  • आता नारायण राणे यांच्या आत्मचरीत्रात नेमका काय उल्लेख असेल, शिवसेनेबाबत ते आत्मचरीत्रात काय लिहिणार, आत्मचरीत्रात मोठ्या नेत्यांबाबत काही गौप्यस्फोट करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • नारायण राणेंनी 1972 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोंबर 1999 या काळात नारायण राणेंनी महाराष्ट्रराज्याचं मुख्यंत्रीपद भुषवलं होतं. आघाडीची सत्ता असताना 2005 साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली.

महाराष्ट्रात नेमक्या किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला :
  • मुंबई : देशभरात काल लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील चौदा मतदारसंघातील दोन कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदारांपैकी 62.08 टक्के म्हणजेच जवळपास एक कोटी 60 लाख 10 हजार 269 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

  • तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये हातकणंगले (70.76 टक्के) सर्वात अव्वल ठरलं. सुरुवातीला कोल्हापुरातील मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असल्याचं समोर आलं होतं. मात्र कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील टक्केवारीत फारशी तफावत नाही. कोल्हापुरात 69.73 टक्के मतदान झालं.

  • पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान झालं.

केरळमध्ये उच्चांकी ७७.६८ टक्के मतदान :
  • तिरुवनंतपूरम : केरळमध्ये गेल्या ३० वर्षांमधील उच्चांकी ७७.६८ टक्के इतके मतदान झाले. राज्यातील २० लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी माकर््सवादी कम्यूनिस्ट पक्ष प्रणित ‘लेफ्ट डेमॉक्रॅटीक फ्रंट’ (एलडीएफ) आणि कॉँग्रेस प्रणित ‘यूनायटेड डेमॉक्रॅटीक फ्रंट’ (यूडीएफ)यांच्यात मोठी चुरस होती.

  • २ कोटी ६१ लाख मतदारांनी मतदान केले. २४ हजार ९७० मतदान केंद्रांमध्ये मंगळवारी झालेल्या भरघोस मतदानानंतर मतदानाची टक्केवारी ७७.६८ टक्के झाल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी सकाळी जाहीर केले.

  • कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उमेदवारीनंतर वायनाड मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. येथे उच्चांकी, ८०.३१ टक्के मतदान झाले. अनेक दशकांपासून व्दिध्रुवीय निवडणुकांसाठी प्रसिध्द असलेल्या केरळमध्ये यंदाही ‘एलडीएफ’आणि ‘यूडीएफ’मध्ये ‘करो या मरो’ लढाई झाली. भाजप प्रणित ‘नॅशनल डेमॉक्रॅटीक अलायन्स’ ने तिरुवनंतपूरम, त्रिस्सूर आणि पट्टणमथिट्टा या मतदारसंघांमध्ये या दोन पारंपरिक पक्षांना चांगली झुंज दिली. 

दिनविशेष :
  • जागतिक मलेरिया दिन

महत्वाच्या घटना

  • १८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.

  • १९०१: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.

  • १९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.

  • १९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

  • १९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.

  • १९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.

  • २०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.

  • २०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.

जन्म 

  • १२१४: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)

  • १८७४: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९३७)

  • १९१८: हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)

  • १९४०: हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.

  • १९६१: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.

  • १९६१: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.

  • १९६४: भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.

  • २००२: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९९)

  • २००३: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)

  • २००५: भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.