चालू घडामोडी - २५ डिसेंबर २०१८

Date : 25 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'नासा'च्या कॅलेंडरमध्ये महाराष्ट्राच्या मुलांना मानाचं पान; कव्हर पेजवर भारतीय सुकन्येला स्थान :
  • वॉशिंग्टन: नासाच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये भारतीय मुलांनी मानाचं स्थान पटकावलं आहे. कमर्शियल क्रू कार्यक्रमाच्या अंतर्गत नासानं नववर्षासाठी कॅलेंडर लाँच केलं आहे. यातील सर्व चित्रं लहान मुलांनी रेखाटली आहेत. विशेष म्हणजे या कॅलेंडरच्या कव्हर पेजवर भारतीय कन्येनं रेखाटलेल्या चित्राला जागा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दोघांनी काढलेल्या चित्राचादेखील या कॅलेंडरमध्ये समावेश आहे. 

  • नासाचं यंदाचं कॅलेंडर अवकाशातील जीवन या विषयाला वाहिलेलं आहे. या कॅलेंडरचं कव्हर पेजवरील चित्र उत्तर प्रदेशातील नऊ वर्षांच्या दीपशिखानं रेखाटलं आहे. याशिवाय या कॅलेंडरमध्ये आणखी तीन भारतीय विद्यार्थ्यांची चित्रं आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यातील दोघेजण महाराष्ट्राचे आहेत.

  • राज्यातील 10 वर्षांच्या इंद्रयुद्ध आणि 8 वर्षांच्या श्रीहन यांनी एकत्रितपणे तयार केलेलं चित्र या कॅलेंडरमध्ये आहे. अंतराळातील जीवन आणि तिथं चालणारं काम या विषय केंद्रस्थानी ठेऊन दोघांनी चित्र रेखाटलं आहे. 

  • तमिळनाडूत राहणाऱ्या 12 वर्षांच्या थेमुकिलिमनच्या कलाकृतीलादेखील कॅलेंडमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यानं रेखाटलेलं चित्र अंतराळातील खाद्य यावर आधारित आहे. कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आलेली चित्रं अंतराळ विज्ञानाशी नातं सांगणारी आहेत, असं नासानं प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे. अंतराळस्थानकात वास्तव्यात असणाऱ्या अंतराळवीरांचं आयुष्य, त्यांचं काम मुलांपर्यंत पोहोचावं, या उद्देशानं कॅलेंडरची निर्मिती करण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे. 

३० वर्षे जुन्या चर्चची खरेदी; आता होणार मंदिराची उभारणी :
  • व्हर्जिनिया: अमेरिकेतील एका 30 वर्षे जुन्या चर्चच्या जागी आता मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. व्हर्जिनियाच्या पोट्समाऊथमधील चर्चच्या जागेवर आता स्वामीनारायण हिंदूमंदिराची निर्मिती केली जाणार आहे. या चर्चला आता मंदिराचं स्वरुप दिलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. 

  • स्वामीनारायण संस्थेकडून खरेदी करण्यात आलेलं हे अमेरिकेतील सहावं आणि जगातील नववं मंदिर असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. लवकरच या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर उभारण्यात येईल. व्हर्जिनियाच्या आधी कॅलिफोर्निया, लुधसविले, पेनिनसिल्वेनिया, लॉस एँजेलिस, ओहियोमधील चर्चच्या जागी मंदिरांची उभारण्यात करण्यात आली आहे. इंग्लंडमधील लंडन आणि बोल्टन, कॅनडातील टोरंटोमध्येही चर्चच्या जागी मंदिरं उभारण्यात आली आहेत. 

  • संस्थेचे आध्यात्मिक प्रमुख पुरुषोत्तमप्रियदास स्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेतील 30 वर्षे जुन्या चर्चच्या जागी मंदिराची उभारणी केली जाणार असल्याची माहिती महंत भगवतप्रियदास स्वामींनी दिली. व्हर्जिनियातील हे हरिभक्तांसाठीचं पहिलं मंदिर असेल. मंदिराची उभारणी करण्यासाठी फार बदल करण्याची गरज भासणार नाही. कारण चर्चमध्ये आधीपासूनच अन्य धर्मांसाठी आध्यात्मिक जागा उपलब्ध होती, असं भगवतप्रियदास स्वामींनी सांगितलं.

रामजन्मभूमी वादाबाबतच्या याचिकांची सुनावणी ४ जानेवारीला :
  • नवी दिल्ली : रामजन्मभूमी- बाबरी मशीदप्रकरणी जमिनीच्या दाव्यासंबंधी करण्यात आलेल्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय ४ जानेवारीला करणार आहे. हे प्रकरण सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. एस. के. कौल यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला ठेवण्यात आले आहे.

  • रामजन्मभूमीची २.७७ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांना समान विभागून द्यावी, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने चार दिवाणी दाव्यांमध्ये दिला होता. या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या १४ अपिलांच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांचे पीठ तीनसदस्यीय खंडपीठाचे गठन करण्याची शक्यता आहे.

  • रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ‘योग्य त्या’ खंडपीठासमोर होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबरला सांगितले होते. त्यानंतर, जानेवारीपूर्वी या प्रकरणाची तातडीने सुनावणी करावी यासाठी काही जणांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता, परंतु आपण यासंबंधी पूर्वीच आदेश पारित केला असल्याचे सांगून न्यायालयाने ही विनंती नाकारली होती.

  • अयोध्या प्रकरणातील मूळ पक्षकार असलेले एम. सादिक यांच्या कायदेशीर वारसांनी दाखल केलेल्या अपिलामध्ये एक प्रतिवादी असलेल्या अखिल भारत हिंदू महासभेने या खटल्याच्या जलद सुनावणीसाठी अर्ज केला होता.

मोदींचा मराठी नूर :
  • नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शंभर रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण झाले. संसदेच्या छोटय़ा सभागृहात सोमवारी झालेल्या छोटेखानी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वाजपेयींचे मित्र आणि सहकारीही उपस्थित होते.

  • ‘‘वाजपेयी आपल्यात नाहीत ही कल्पनाच करता येत नाही,’’ असे म्हणत मोदींनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम संपल्यावर मोदींचा मराठमोळा नूर वाजपेयींच्या जुन्या मित्रांना पाहायला मिळाला.

  • वाजपेयींच्या नाण्याचे अनावरण करून मोदी व्यासपीठावरून खाली उतरून आले. त्यांनी वाजपेयींचे पाच दशके स्वीय सचिव राहिलेल्या शिवकुमार पारिख यांच्याकडे जाऊन आपुलकीने विचारपूस केली.

  • वाजपेयींचे मानसपुत्र रंजन भट्टाचार्य यांच्या खांद्यावर थाप टाकत दिलखुलास गप्पा मारल्या. तेवढय़ात त्यांचे लक्ष वाजपेयींचे पन्नासच्या दशकापासूनचे जुने मित्र एन. एम. अर्थात अप्पाजी घटाटे यांच्याकडे गेले. मोदींनी घटाटेंशी मराठीत गप्पा मारायला सुरुवात केली. ‘‘घटाटेजी, कसे आहात? वैनी कुठे आहेत?.. गुजरातला जाऊन आलात का? सरदारांचा पुतळा एकदा बघून या’’.. अप्पाजी घटाटे आणि त्यांच्या पत्नी शीला घटाटे यांची वाजपेयींशी घनिष्ठ मैत्री होती.

  • अगदी वाजपेयींच्या शेवटच्या काळातही घटाटे कुटुंब वाजपेयींच्या संपर्कात होते. इंदिरा गांधींना वाजपेयींनी कधीच ‘दुर्गा’ म्हटले नव्हते आणि नेहरूंनी वाजपेयींना ‘भावी पंतप्रधान’ असे कधीच संबोधले नव्हते. या दोन्ही बाबी घटाटेंनीच पहिल्यांदा स्पष्ट केल्या होत्या. या मराठी घटाटे दाम्पत्याची मोदींनी आस्थेने चौकशी केली.

भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल वाहतुकीसाठी सज्ज :
  • अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला भारतातील सर्वात लांब रेल्वे रुळ अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या बोगीबील पूलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी लोकार्पण होणार असून हा देशातील सर्वात लांब रेल्वेच्या मार्गावरील पूल असेल असे सांगितले जात आहे. या पूलाची लांबी ४.९ किमी असून तो ईशान्य भारतात बांधण्यात आला आहे.

  • या पूलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचे सुमारे १० तास वाचणार आहेत. तब्बल २१ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या हस्ते या पूलाचे भुमिपूजन झाले होते. मात्र त्याचे काम पूर्ण होण्यास इतका मोठा कालावधी गेला.

  • आसाममध्ये असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल बांधण्यात आला असून त्याचे नाव बोगीबील असे ठेवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आणि सुशासन दिवसाच्या निमित्ताने या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

  • आतापर्यंत प्रवाशांना आसाम ते अरुणाचल प्रदेश असा प्रवास करायचा असेल तर बऱ्याच रेल्वे बदलाव्या लागत होत्या. तसेच यामध्ये खूप वेळही वाया जात होता. मात्र आता या पुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि प्रवास अतिशय सुलभ होणार आहे. भारतातील पायाभूत सोयीसुविधा सुधारण्याच्यादृष्टीने हा पूल उभारणे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या मेसेज, व्हिडीओवर राहणार सरकारची नजर; नवा कायदा येणार :
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकताच एका आदेशाद्वारे सर्व सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना लोकांच्या खासगी संगणकातील डेटावर नजर ठेवण्याचा, पडताळणीचा अधिकार दिला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कलम ६९ नुसार जर सुरक्षा एजन्सीला कोणत्याही संस्था अथवा व्यक्तीवर देशविरोधी कारवायांमध्ये सामिल असल्याचा संशय असेल तर ते त्यांच्या संगणातील उपलब्ध डेटाची पडताळणी करुन त्याच्यावर कारवाई करु शकतात.

  • त्याचबरोबर सरकार आता सुचना आणि माहिती अधिनियमनाच्या कलम ७९ नुसार, याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. इंडिअन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, हे कलम देशभरात वापरात असलेल्या सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मला लागू होईल. हा अधिनियम लागू झाल्यानंतर फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, शेअर चॅट, गुगल, अॅमेझॉन आणि याहू साऱख्या कंपन्यांना सरकारद्वारा विचारण्यात आलेल्या कोणत्याही मेसेजसंदर्भात संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

  • उदाहरणादाखल जर सरकारला कोणत्याही मेसेज, व्हिडिओ किंवा फोटोवर जर आक्षेप किंवा संशय असेल तर अशा मेसेजेसबाबत सरकार सोशल मीडिया कंपन्यांकडून माहिती मागवेल त्यानंतर या कंपन्यांना एंड टू एंड एन्क्रिप्शन तोडून मेसेजबाबत सरकारला पूर्ण माहिती द्यावी लागेल.

  • एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन हे एक सुरक्षा कवच आहे. त्यामुळे आपल्या मेसेजची माहिती केवळ आपल्याला आण ज्याला मेसेज पाठवला आहे त्यालाच असते. कलम ७९ लागू झाल्यानंतर बेकायदा स्वरुपात ऑनलाइन माहितीवर निर्बंध येतील. वृत्तानुसार, शुक्रवारी या संदर्भात एक बैठक झाली असून यामध्ये पाच पानांचा मसुदा मांडण्यात आला होता.

  • या बैठकीत सायबर लॉ डिव्हीजन, सुचना आणि प्रसारण मंत्रालय, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेचा एक अध्यक्ष, गुगल, फेसबूक, व्हॉट्सअॅप, अॅमझॉन, याहू, ट्विटर, शेअर चॅट आणि सेबीच्या प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात आले आहे.

आता १०० रुपयांचं नाणं, वाजपेयींच्या स्मरणार्थ मोदींनी केलं अनावरण :
  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०० रुपयांचं नाणं जारी केलं आहे. वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त २५ डिसेंबर हा दिवस केंद्र सरकारकडून ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. संसदेच्या अॅनेक्सी भवनात मोदींनी या नाण्याचं अनावरण केलं.

  • कसं आहे १०० रुपयांचं नाणं - १०० रुपयांच्या नाण्याच्या पुढील भागात अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिले आहे. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि रोमन अक्षरांत INDIA असं लिहिलं आहे. प्रतिक चिन्हाच्याखाली १०० असे नाण्याचे मुल्य लिहिले आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो आणि देवनागरी व रोमन लिपीमध्ये त्यांचे नाव लिहिलेले आहे. तसेच त्यांच्या जन्म आणि मृत्यूचे वर्ष १९२४ – २०१८ लिहिले आहे.

  • नाणं अनावरण करताना मोदी म्हणाले, आज काही जणांसाठी सत्ता ऑक्सिजनप्रमाणे आहे. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. मात्र वाजपेयी अधिकांश काळ विरोधीपक्षात होते पण त्यांनी त्यांच्या विचारधारेशी तडजोड कधीच केली नाही. लोकशाही बळकट व्हावी अशी वाजपेयींची इच्छा होती, त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करु, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.

ख्रिसमस निमित्त तयार करण्यात आला ७५० किलोंचा केक :
  • नाताळचा सण सेलिब्रेट करण्यास सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला. हा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अनेकांनी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या.

  • अहमदाबाद येथील का मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. सिक्रेट सँटा हा खेळ खेळण्याची प्रथा यादिवशी आहे. याच खेळात हा केक तयार करून आणण्यात आला. या 750 किलोच्या केकवर मोठ्या अक्षरात सिक्रेट सँटा असे लिहिण्यात आले होते. तसेच या केकवर सांताक्लॉज आणि आइसमन यांचीही चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

दिनविशेष :
  • नाताळ / चांगले शासन दिन / तुलसी पुजन दिन

महत्वाच्या घटना 

  • १९७६: आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.

  • १९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी.

  • १९९१: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

जन्म 

  • १६४२: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च१७२७)

  • १८२१: अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९१२)

  • १८६१: बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर१९४६)

  • १८७८: शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुन १९४१)

  • १९११: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९६ – पॅरिस, फ्रान्स)

  • १९१६: अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०१२)

  • १९१८: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९८१)

  • १९२४: भारताचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्म.

  • १९२७: सुप्रसिद्ध सारंगीये पं. रामनारायण यांचा जन्म.

  • १९३२: व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार प्रभाकर जोग यांचा जन्म.

  • १९३६: भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)

  • १९४९: पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा जन्म.

  • १९५९: भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९४९: वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४)

  • १९५७: साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८८६)

  • १९७२: भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८७८)

  • १९७७: अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८८९)

  • १९८९: रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१८)

  • १९९४: भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे निधन. (जन्म: ५ मे १९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.