चालू घडामोडी - २५ जानेवारी २०१८

Date : 25 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर :
  • नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ४४ व्यक्तींना आज (बुधवार) ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.

  • महाराष्ट्रातील राजेंद्र गुरव आणि भानुचंद्र पांडे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार प्रणय तांबे आणि प्रभाकर साठे यांना जाहीर झाला आहे.

  • देशातील ४४ नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ७ जणांना हे पुरस्कार  मरणोत्तर जाहीर झाले आहेत. ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ ७ जणांना, ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ १३ जणांना आणि ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ २४ जणांना जाहीर झाले आहेत.

  • पुरस्काराचे स्वरुप पदक, प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरुपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधित राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.(source abpmajha)

दावोसमधील पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे चीनने केले कौतुक :
  • दावोसमध्ये जागतिक अर्थ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची जगभरात चर्चा होत आहे. यामधील विशेष बाब म्हणजे भारताचा सर्वात मोठा विरोधक असलेल्या चीनने देखील अप्रत्यक्षपणे मोदींच्या भाषणाचे कौतुक केले आहे.

  • मोदींनी आपल्या भाषणात संरक्षणवादाला दहशतवादाप्रमाणेच धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर चीनने ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेला सक्षम करण्यासाठी भारतासोबत सहकार्य वाढवण्यावर जोर देणार असल्याचे सांगितले होते. मोदींनी आपल्या भाषणात दहशतवाद आणि जलवायू परिवर्तनाच्या आव्हानांवरही चिंता व्यक्त केली होती.

  • चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुवा चुनयिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षणवादाविरोधात बोलले आहेत. यावरुन हे लक्षात येते की, ग्लोबलायझेशन काळाची गरज आहे. तसेच यातच सर्व देशांचे हित आहे. संरक्षणवादाविरोधात लढण्याची आणि ग्लोबलायझेशनचे समर्थन करण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की, चीन ग्लोबलायझेशनची प्रक्रिया आणखी सक्षम करण्यासाठी भारत आणि इतर देशांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.

  • चीनच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या वक्तव्यापूर्वी माध्यमांनी देखील मोदींच्या या भाषणाचे कौतुक केले होते. जगातिल अनेक प्रतिष्ठीत माध्यमांनी मोदींचा फोटो पहिल्या पानावर छापला होता.(source :Loksatta)

नेट परीक्षेसाठी तीनऐवजी दोनच पेपर :
  • पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापकपदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (यूजीसी नेट) आता तीनऐवजी ३०० गुणांचे दोनच पेपर घेतले जाणार आहेत. ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीची वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आल्याचे परिपत्रक सीबीएसईकडून जाहीर करण्यात आली आहे.

  • नव्या नियमानुसार नेटची परीक्षा ८ जुलै २०१८ रोजी होणार आहे. ६ मार्च ते ५ एप्रिल २०१८ आॅनलाइन फॉर्म भरता येणार आहेत.

  • नेट परीक्षेत सीबीएसईकडून काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षा आता ३५० ऐवजी ३०० गुणांची असणार आहे. तसेच पूर्वी असणा-या तीन पेपरऐवजी आता दोनच पेपर असणार असून पहिला पेपर ५० प्रश्न व दुसरा पेपर १०० प्रश्न प्रत्येकी २ गुण, असे एकूण ३०० गुणांची परीक्षा होणार आहे.

  • परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १०० गुणांच्या (५० प्रश्न) पहिल्या पेपरसाठी १ तासाचा अवधी असणार आहे. तो सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत घेतला जाईल, तर दुस-या २०० गुणांच्या (१०० प्रश्न) पेपरसाठी दोनच तास वेळ असणार आहे. तो दुपारी ११ ते १ या वेळेत घेतला जाईल. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असणार आहेत.

  • ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीच्या वयाच्या अटीत बदललेल्या नियमांनुसार दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. खुल्या गटासाठी ३० वर्षांपर्यंत, तर मागास प्रवर्गासाठी ३५ वर्षे वयापर्यंत फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहेत.(source :Lokmat)

मारुति फेब्रुवारीत सादर करणार पहिली ईलेक्ट्रिक कार :
  • आधुनिक काळाची गरज ओळखत देशातील सर्वात बडी कार उत्पादक कंपनी मारुति सुझुकी पहिली इलेक्ट्रिक कार पुढील महिन्यात सादर करणार आहे. फेब्रुवारीमध्ये दिल्लीत होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये ई-सर्व्हायव्हर ही कन्सेप्ट कार सादर करण्यात येणार असल्याचे मारुतिने बुधवारी जाहीर केले.

  • इलेक्ट्रिक किंवा बॅटरीवर चालणाऱ्या या गाडीची संपूर्ण निर्मिती भारतात विकसित करण्याचा प्रयत्न असून यामध्ये सुट्या भागांचे उत्पादन, बॅटरी चार्ज करण्याची योजना आणि बॅटरींचा पुनर्वापर या बाबींचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

  • ई-सर्व्हाव्हयर ही छत नसलेली किंवा ओपन टॉप प्रकारातील गाडी असून टू सीटर स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल आहे. भविष्याचा वेध घेणारी कार अशी या गाडीची कन्सेप्ट असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

  • आणखी 12 वर्षांनी म्हणजे 2030 नंतर देशात केवळ इलेक्ट्रिक गाड्याच विकण्यात याव्यात असं महत्त्वाकांक्षी लक्ष्य भारत सरकारनं ठेवलं आहे. जर याला कार उत्पादकांनी पाठिंबा दिला नाही, तर आपण कार उत्पादकांशी बोलणार नाही तर बुलडोझर चालवू अशी धमकीच भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली होती. त्यामुळे अनेक कारउत्पादक गांभीर्याने ई-कार्सचा विचार करत असून मारुतिनं त्या दिशेने पाऊल उचलले आहे.

  • सुझुकी टोयोटा यांच्या भागीदारीमधून हे तंत्रज्ञान विकसित झाले असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले होते. कारण मारुतिकडे स्वत:चे असे ई-कारचे तंत्रज्ञान नाहीये. या कार्सचा वापर करता यावा यासाठी चार्जंगच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचेही मारुतिने स्पष्ट केले आहे.(source :Losatta)

चारा घोटाळा : लालूंना आणखी पाच वर्षे शिक्षा - तिस-या प्रकरणातही दोषी :
  • रांची : कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याशी संबंधित तिस-या खटल्यातही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही ५ वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे.

  • चैबासा कोषागारातून १९९० मध्ये बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये ३७.६२ कोटी परस्पर काढल्याप्रकरणी यादव व मिश्रा यांना ५ वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा, तसेच लालू प्रसादना १० लाख रुपये, तर मिश्रा यांंना ५ लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. आधीच्या चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावल्यापासून लालू २३ डिसेंबरपासून तुरुंगात आहेत. दंड न भरल्यास लालू व मिश्रा यांना आणखी एक वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.

  • या प्रकरणात आणखी ३ माजी आमदार व १ मंत्री यांनाही दोषी ठरविले असून, त्यांनाही शिक्षा व दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय ३ माजी प्रशासकीय अधिकारीही दोषी ठरले आहेत. मात्र, पशुसंवर्धन विभागाचे दोन अधिकारी व चारा पुरवठादारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

  • या खटल्यात एकूण ७६ आरोपी होते. पैकी १४ जणांना मृत्यू झाला असून, २ आरोपींना साक्षीपुराव्याआधारे दोषी ठरविण्यात आले आहे, तर ३ आरोपी माफीचे साक्षीदार बनले आहेत. १ आरोपी अद्याप फरार आहे.(source : Lokmat)

ट्रम्प यांनी करुन दाखवलं! अमेरिकेचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक :
  • इस्लामाबाद - अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने दहशतवाद्यांचा बंदोबस्त करु असे अमेरिकेने म्हटले होते.  

  • पाकिस्तान दहशतवादाविरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याबद्दलही अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली होती. अमेरिकेने पाकिस्तानच्या फाटा भागात ड्रोन हल्ला केला आहे. यात हक्कानी नेटवर्कचे दोन कमांडर ठार झाले आहेत.

  • अमेरिकेची ही कारवाई पाकिस्तानसाठी एक ठोस संदेश आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा देणारे टि्वट केले होते. पाकिस्ताननं आम्हाला खोटी आश्वासनं आणि फसवणुकीशिवाय काहीही दिलेलं नाही. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. त्यांनी आमच्या नेत्यांना मूर्ख बनवलं आहे. 

  • मात्र यापुढे अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत करणार नाही. अमेरिकेनं पाकिस्तानला 2002पासून आतापर्यंत जवळपास 33 अब्ज डॉलर एवढी आर्थिक मदत केली आहे. तर ऑगस्ट 2017मध्ये अमेरिकेनं पाकिस्तानला देण्यात येणा-या 255 मिलियन डॉलरच्या मदतीवरही टाच आणली होती.(source :Lokmat)  

पद्मावत चित्रपट ‘या’ चार राज्यात प्रदर्शित होणार नाही; मल्टिप्लेक्स असोसिएशनचा निर्णय :
  • अनेक वादांमध्ये अडकलेल्या ‘पद्मावत’ सिनेमाचा वाढता विरोध अधिकच तीव्र झाला आहे. देशभरात ठिकठिकाणी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून हिंसक आंदोलने केली जात आहेत. अनेक सिनेमागृहांची तोडफोड करण्यात आल्याने हा सिनेमा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात प्रदर्शित न करण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशनने घेतला आहे. त्याचबरोबर राज्यात पंढरपूरातही पद्मावत सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला आहे.

  • पद्मावत सिनेमा उद्या, २५ जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. यापार्श्वभूमीवर हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात बुधवारी हिंसक आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी अनेक रस्ते अडवून ठेवले होते. तसेच अनेक बस गाड्याही पेटवून दिल्या.

  • दिल्लीतील एनसीआर भागातही मोठ्या प्रमाणावर वाहनांवर दगडफेक करण्यात आली. गुरुग्राममध्ये तर आंदोलकांनी एका स्कूलबसला टार्गेट करीत त्यावर दगडफेक केली. या बसमधून शाळेची मुले प्रवास करीत होती. या भागात रविवारपर्यंत सिनेमागृहांत २०० मीटर अंतरापर्यंत १४४ कलमांतर्गंत जमावबंदी करण्यात आली आहे.

  • मुंबईत विविध ठिकाणांहून आलेल्या करणी सेनेच्या ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच गुजरातमध्ये मंगळवारी अहमदाबादेत मल्टीप्लेक्समध्ये तोडफोड करण्यात आल्याने ५० लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मल्टिप्लेक्स एसोसिएशन ऑफ इंडियाने पद्मावत सिनेमा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था ७५ टक्के मल्टीप्लेक्स मालकांचे प्रतिनिधीत्व करते.(source :Loksatta)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

  • १९४१: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.

  • १९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

  • १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान.

  • १९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान.

  • १९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.

  • २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान.

जन्म

  • १६२७: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१)

  • १७३६: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १८१३)

  • १८६३: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.

  • १८७४: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५)

  • १८८२: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४१)

  • १९३८: नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म.

  • १९५८: पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.

मृत्यू

  • १६६५: सोनोपंत डबीर यांचे निधन.

  • १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.

  • १९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.

  • २००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.

  • २०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी१९२७ – हातकणंगले)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.