चालू घडामोडी - २५ जुलै २०१८

Date : 25 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शंभरच्या नव्या नोटांसाठी एटीएममध्ये बदलांची गरज :
  • नवी दिल्ली : रिझव्‍‌र्ह बँकेने शंभरच्या नव्या नोटा चलनात आणण्याचे जाहीर केल्याने आधीच अडचणीत असलेल्या बँकांपुढे नवा पेच उभा राहिला आहे. शंभरच्या नव्या आणि जुन्या नोटा एकाच वेळी चलनात राहणार असून त्यांचा आकार वेगवेगळा आहे. त्यामुळे एटीएम यंत्रांच्या फेररचनेची गरज असून त्यावर १०० कोटी रुपये खर्च होतील. नोव्हेंबर २०१६ मधील नोटाबंदीपासून हा असा तिसरा बदल असणार आहे.

  • हिताची पेमेंट सव्‍‌र्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक लोनी अँटनी यांनी सांगितले की, शंभर रुपयांच्या नव्या नोटा एटीएममधून वितरित करण्यासाठी यंत्रांमध्ये जो बदल करावा लागेल त्याला १०० कोटी रुपये खर्च येईल. देशात २.४ लाख एटीएम यंत्रे असून त्यांच्या फेररचनेसाठी १२ महिन्यांचा कालावधी लागेल. यापूर्वी चलनात आणलेल्या २०० रुपयांच्या नोटांसाठी एटीएम यंत्रांची फेररचना करण्याचे काम अद्याप संपलेले नाही.

  • त्यामुळे योजनाबद्धरीत्या अंमलबजावणी न केल्यास १०० रुपयांच्या नोटेसाठी पुन्हा तेच काम करण्यास आणखी वेळ लागेल. दोन्ही नोटांचा पुरेसा पुरवठा होईपर्यंत ग्राहकांना वाट पाहावी लागेल.  शंभरच्या नव्या नोटा सुरुवातीला बँकांच्या शाखांमधून वितरित केल्या जातील.

  • त्यांचा पुरवठा जसजसा वाढेल त्यानंतर एटीएमची फेररचना कधी करायची ते ठरवले जाईल, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले. शंभरच्या नव्या नोटांचा पुरेसा पुरवठा होईपर्यंत नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

१९ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने :
  • मुंबई : आशिया चषकातील गतविजेता भारतीय संघ यावेळच्या मालिकेत 19 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भिडणार आहे. या सामन्याच्या एक दिवस अगोदरच, भारतीय संघाच्या मालिकेची सुरुवात क्वालीफायर विरुद्धच्या सामन्याने सुरु होईल.

  • भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचं मालिकेत खेळणं निश्चित आहे. मात्र उर्वरित स्थानांसाठी यूएई, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हाँगकाँग यांच्यात लढत होणार आहे. क्वालीफायर सामन्यांनंतर या संघांपैकी कोण जागा मिळवतं, ते निश्चित होईल.

  • अ गटात भारत, पाकिस्तान, क्वालिफायर करणारा संघ आणि ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांना स्थान मिळालं आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला असेल.

  • प्रत्येक गटातील टॉपला असलेले दोन संघ सुपर चारसाठी क्वालीफाय होतील. त्यानंतर या सामन्यांमधील विजेत्या संघांमध्ये चषक विजयासाठी लढत होईल.

नरेंद्र मोदी, सीतारामन यांच्याविरुद्ध हक्कभंग :
  • नवी दिल्ली : फ्रान्सकडून खरेदी करायच्या राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीबाबत सभागृहाची हेतूपुरस्सर दिशाभूल केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस काँग्रेस पक्षाने मंगळवारी दिली.

  • काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खरगे यांनी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून ही नोटीस दिली व ती स्वीकारून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे सोपवावी, अशी विनंती केली.

  • मोदी सरकारने राफेल विमानांची किंमत चारपट वाढवून दिली आहे, असा काँग्रेसचा आरोप असून सरकारने विमानांची किंमत जाहीर करावी, अशी पक्ष सातत्याने मागणी करत आहे. लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेतही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही मागणी केली होती. मात्र मोदी व सितारामन यांनी फ्रान्ससोबत झालेल्या करारातील गोपनीयतेच्या कलमाचे कारण सांगून किंमत जाहीर करता येणार नाही, असे उत्तर दिले होते.

  • मात्र वस्तुत: त्या करारातील गोपनीयतेचे कलम विमानांच्या किंमतीला लागू नाही. तरीही मोदींनी त्या कलमाचा चुकीचा संदर्भ देऊन दिशाभूल केली, असा आरोप खरगे यांनी पत्रात केला आहे.

भारताला निर्बंधमुक्त करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव :
  • वॉशिंग्टन : रशियाच्या संरक्षण उद्योगाशी व्यवसाय करणाऱ्या देशांवर शिक्षा म्हणून लादलेल्या कठोर निर्बंधांतून भारतासारख्या देशाला दूर करण्याचा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेस समितीने मंगळवारी मांडला.

  • सिनेट आणि हाऊस आर्मड सर्व्हिसेस कमिटीने नॅशनल डिफेन्स अ‍ॅथोरायझेशन अ‍ॅक्ट, २०१९ ला दिलेल्या आपल्या संयुक्त परिषद अहवालात कलम २३१ ला सुधारीत माफी सूचवली आहे. निर्बंध कायद्याच्या माध्यमातून अमेरिकेच्या शत्रूंना अंकुश लावला जातो. भारताला अमेरिकेच्या निर्बंधातून मुक्त करण्याचा त्या मागे हेतू आहे.

  • भारताची सुमारे ४.५ अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करून रशियाकडून पाच एस-४०० ट्रियुम्फ एअर डिफेन्स सिस्टीम्स विकत घेण्याची योजना आहे. त्या कायद्याचे सध्याचे स्वरूप पाहता सुधारीत माफीसाठी अध्यक्षांच्या दाखल्यांची गरज आहे. हे अध्यक्षीय दाखले अमेरिकेचे मित्र देश, लष्करी कारवाया आणि संवेदनशील तंत्रज्ञानाच्या संरक्षणासाठी बनवण्यात आले आहेत, असे सिनेट आर्मड सर्व्हिसेस कमिटीने निवेदनात म्हटले आहे. त्या आधी दोन समित्यांनी परिषद अहवालाचा तपशील जाहीर केला होता.

  • अशा आहेत नॅशनल डिफेन्स अ‍ॅथोरायझेशन कायद्यातील तरतुदी आर्थिक वर्ष २०१९ साठीच्या द जॉन मॅकेन नॅशनल डिफेन्स अ‍ॅथॉरायझेशन अ‍ॅक्ट अमेरिकेच्या मित्रदेशांनी आणि भागीदारांनी रशियाने उत्पादित केलेल्या प्रमुख संरक्षण साहित्याची खरेदी कमी करावी यासाठी हा कायदा प्रोत्साहन देतो. हा कायदा संरक्षण विभाग आणि राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रमांना निधी देण्याचे अधिकार देतो.

पाकमध्ये आज मतदान, प्रचंड बंदोबस्त
  • इस्लामाबाद : पाकिस्तानात बुधवारी नवा पंतप्रधान निवडण्यासाठी व एक नागरी सरकार दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्तेची सूत्रे सोपवण्यासाठी मतदान होत आहे. देशात प्रथमच मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने लष्करी जवान तैनात केले गेले आहेत.

  • पाकिस्तानच्या जन्मापासून नागरी सरकारकडून दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्ता हस्तांतर होण्याची ही फक्त दुसरी वेळ असेल. या निवडणुकीत सर्वशक्तिमान लष्कर लबाडी करील, असे आरोप झाले असून कट्टर इस्लामी मोठ्या संख्येने सहभागी असल्याबद्दल काळजी व्यक्त झाली आहे.

  • पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल असेम्ब्लीच्या २७२ जागा ३,४५९ उमेदवार लढवत असून चार प्रांतीय असेम्ब्लींच्या ५७७ सर्वसाधारण जागा ८,३९६ उमेदवार लढवत आहेत. देशात १०५.९६ दशलक्ष मतदारांची नोंद आहे.

  • देशभर मतदानासाठी तीन लाख ७० हजार लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच मतदानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लष्कर तैनात केले गेले आहे.

मोदींचा आफ्रिका दौरा, रवांडा देशाला २०० गायींची भेट :
  • रावंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी रवांडा देशातील कागली शहराला दोनशे गायी भेट दिल्या आहेत. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे यांनी कुपोषित बालकांसाठी सुरू केलेल्या उपाययोजनांना मदत करण्यासाठी मोदींनी ही अनोखी भेट दिली आहे.

  • प्रत्येक कुटुंबामागे एक गाय अशी योजना कागमे यांनी 2006 साली सुरू केली. रावंडातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि दुग्धव्यवसायाला बळकटी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.

  • मोदी रवांडामध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते वेरू मॉडेल गावामध्ये असताना एका सोहळ्यादरम्यान मोदींनी ही दोनशे गायींची भेट दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९४: पहिले चीन-जपान युद्ध सुरू.

  • १९०८: किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.

  • १९०९: लुई ब्लेरियो यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.

  • १९१७: कॅनडात आयकर लागू झाला.

  • १९७३: सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.

  • १९७८: जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.

  • १९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.

  • १९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त.

  • १९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर.

  • १९९७: के. आर. नारायणन भारताचे १०वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.

  • २००७: श्रीमती प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.

जन्म 

  • ११०९: पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म.

  • १८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)

  • १९१९: गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००२)

  • १९२२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)

  • १९२९: लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म.

  • १९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.

मृत्यू 

  • १४०९: सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन.

  • १८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८२८)

  • १९७३: कॅनडाचे १२वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन.

  • १९७७: महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापकचे कॅ. शिवरामपंत दामले यांचे निधन.

  • २०१२: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

  • २०१५: भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.