चालू घडामोडी - २५ जून २०१८

Date : 25 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताला मिळाला आणखी एक विश्वनाथ आनंद, अवघ्या १२व्या वर्षी प्रागू झाला ग्रँड मास्टर :
  • इटालीमधल्या ऑर्टीसेई येथे मास्टर लुका मोरोनीला नमवत आर प्रागनानंदा हा अवघा १२ वर्षांचा भारतीय मुलगा बुद्धीबळातला ग्रँड मास्टर झाला आहे. लहान वयात हा किताब मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. हा किताब मिळवणारा सगळ्यात लहान खेळाडू हा किताब हुकल्याबद्दल तुला खंत वाटते का असं विचारलं असता, असं अजिबात वाटत नाही असं उत्तर प्रागनानंद किंवा प्रागू यानं दिलं आहे.

  • मे २०१६ मध्ये प्रागू दहाव्या वर्षी सर्वात तरूण आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला होता. आत्तापर्यंतचा सगळ्यात लहान ग्रँड मास्टर सर्जेई कर्जाकिन असून (१२ वर्षे ३ महिने) त्याचा विक्रम प्रागू मोडेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र प्रागूनं हा किताब मिळवला तेव्हा आज तो १२ वर्षे १० महिन्यांचा आहे. त्यामुळे तो ग्रँड मास्टर होणारा दुसऱ्या क्रमांकाचा तरूण खेळाडू ठरला आहे.

  • अवघ्या काही महिन्यांच्या फरकानं त्याला पहिल्या क्रमांकानं हुलकावणी दिली असली तरी प्रागूचं यश कमी होत नाही. जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन ग्रड मास्टर झाला त्यावेळी त्याचं वय होतं १३ वर्षे ४ महिने. तर विश्वनाथ आनंदने हा सन्मान १८व्या वर्षी पटकावला. सगळ्यात तरूण भारतीय ग्रँड मास्टर आत्तापर्यंत परीमार्जन नेगी होता, ज्यानं हा किताब १३ वर्षे ४ महिन्याचा असताना पटकावला होता.

  • प्रागूवर कुठलंही दडपण येणार नाही व तो अत्यंत मोकळ्या मनानं खेळू शकेल याची आम्ही काळजी घेतल्याचं त्याचे प्रशिक्षक आर. बी. रमेश यांनी सांगितलं. रमेश स्वत: विसाव्या वर्षी ग्रँड मास्टर झाले होते.

जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिकांचा दावा :
  • वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर विकसित केल्याचा दावा केला आहे. हा कॉम्प्युटर फक्त ०.३ मिलीमीटर एवढा आहे आणि कॅन्सरचा शोध घेणे आणि त्यावर उपचारांसाठी नवे दरवाजे खुले करण्यासाठी हा मदत करु शकतो.

  • या कॉम्प्युटरमधील सिस्टीम २ बाय २ बाय ४ मिलीमीटरची आहे. यात बाहेरुन सपोर्ट नसला तरी प्रोग्रामिंग आणि डेटा कायम रहातो. वीज आल्यानंतर तो सुरु होतो आणि डेटाही कायम ठेवतो. पण, नव्या माइक्रोडिव्हाइसमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.

  • डिस्चार्ज झाल्यानंतर यातील प्रोग्राम आणि डेटा समाप्त होईल. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील प्र्रोफेसर डेव्हिड ब्लाऊ म्हणाले की, याला कॉम्प्युटर म्हणावे की, नाही याबाबत आम्ही संभ्रमात आहोत.

  • यात कॉम्प्युटरसारखे किमान फंक्शन आहेत की नाही याबाबत मतमतांतरे असू शकतात. या कॉम्प्युटरच्या सहाय्याने अनेक प्रकारची कामे केली जाऊ शकतात. हा कॉम्प्युटर बनविणाऱ्या टीमने याचा उपयोग तापमानाच्या मापदंडाच्या स्पष्टतेसाठी करण्याचा निश्चय केला आहे.  

  • नव्या कॉम्प्युटर उपकरणात रॅम आणि फोटो व्होल्टिक्सशिवाय प्रोसेसर अणि वायरलेस ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहेत. दृश्य प्रकाशाच्या साहाय्याने ते डेटा प्राप्त करतात. यात अधिक प्रकाश सहन करण्याची क्षमताही आहे. कमी विजेवरही हा कॉम्प्युटर चांगल्या प्रकारे चालतो. अध्ययनातून असे दिसून आले आहे की, ट्यूमर सामान्य उतीपेक्षा जास्त गरम होतात. या कॉम्प्युटरच्या साह्याने कॅन्सर उपचारासाठी मदत होऊ शकते.

कोलंबियाचा पहिला विजय, पोलंड गारद :
  • मॉस्को : कोलंबियाने पोलंडवर 3-0 ने मात करत यंदाच्या फिफा विश्वचषकात आपला पहिला विजय साजरा केला. कोलंबियाच्या येरी मीना, फाल्काव आणि युआन क्वाद्रादोनं प्रत्येकी एक गोल डागत कोलंबियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

  • मीनाने 40 व्या मिनिटाला पहिला गोल करत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 70 व्या मिनिटाला कर्णधार फाल्कावनं गोल करत संघाची आघाडी आणखी भक्कम केली. फाल्कावचा विश्वचषकातील हा पहिला गोल ठरला.

  • क्वाद्रादोनं 75 व्या मिनिटाला तिसरा गोल करत कोलंबियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या सामन्यातील पराभवानंतर पोलंडचं मात्र विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं.

पाकिस्तानमधील सर्वांत श्रीमंत नेता, ४०० अरब संपत्ती :
  • मुजफ्फरगड : पाकिस्तानमध्ये आगामी निवडणुकीसाठी मुजफ्फरगडमधील एका अपक्ष उमेदवाराने 403 अरब रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. मोहम्मद हुसैन शेख असे या उमेदवाराचे नाव आहे. याचबरोबर, मुजफ्फरगड शहरातील जवळपास 40 टक्के जमिनीचा मालक असल्याचा दावा मोहम्मद हुसैन शेख यांनी केला आहे. 

  • पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तपत्र डॉन न्यूजच्या माहितीनुसार, मोहम्मद हुसैन शेख यांचा दावा आहे की, सुरुवातीला ही जमीन वादात होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने गेल्या काही दिवसांपूर्वी यावर निर्णय दिला असून या जमिनीवर मोहम्मद हुसैन शेख यांचा हक्क आहे. या प्रकरणाचा वाद गेल्या 88 वर्षांपासून सुरु होता. मोहम्मद हुसैन शेख यांनी सांगितले की, एकूण 403 अरब रुपयांच्या जमिनीचा मालक आहे. 

  • दरम्यान, मोहम्मद हुसैन शेख NA-182 आणि PP-270 या जागांसाठी निवडणूक लढत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या निवडणूक लढणारे मोहम्मद हुसैन शेख सर्वांत श्रीमंत उमेदवार आहे. याचबरोबर, मरियम नवाज शरीफ, बिलावल भुट्टो झरदारी आणि आसिफ अली झरदारी यांनी सुद्धा करोडो रुपयांची संपत्ती घोषित केली आहे.

  • तर, पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पार्टीचे आमिर मुकाम आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या उमेदवारांनी अरब रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. 

जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळणार, विद्यार्थ्यांना दिलासा :
  • मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात पडताळमी प्रमाणपत्र नसलं तरीही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

  • ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशाला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे.

  • या वर्षीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत मागासवर्गात आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. मात्र जात प्रमाणपत्र वैधता तपासणी समितीकडे मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज प्रलंबित आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार नाही.

  • यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2000 (2001 चा महा. 23), यात सुधारणा करण्यासाठी राज्यपालांना विनंती केली होती. त्यानुसार राज्यपालांनी या सुधारणेसाठी मान्यता दिली आहे.

चहा वाल्याची मुलगी हवाई दलात :
  • भोपाळ : आपल्या संपूर्ण जीवनात संघर्ष केल्यानंतर मुलं जेव्हा आश्चर्यकारक धक्के देतात तेव्हा त्याहून अधिक आनंदाची बाब कोणतीही नसते. अशीच एक प्रेरणादायी घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे.

  • एका चहा विकणाऱ्याच्या मुलीची भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रांच मध्ये निवड झाली आहे. आंचल गंगवाल हे या मुलीचे नाव असून आंचलला निवडीसाठी तब्बल 6 वेळा प्रयत्न करावे लागले.

  • तब्बल एक लाख मुले या परिक्षेत सहभागी झाले होते. यातून फक्त 22 मुलांची निवड केली गेली. यातलीच एक आंचल आहे.

  • आंचलचे वडील म्हणाले की त्यांच्या विभागातील लोक त्यांच्या चहाच्या दुकानाबद्दल माहिती देतात आणि मुलीच्या यशाबद्दल त्यांना अभिनंदन करतात. याचाच त्यांना अभिमान वोटतो.

दिनविशेष :
  • जागतिक कोड त्वचारोग दिन

महत्वाच्या घटना 

  • १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

  • १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

  • १९४०: दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.

  • १९४७: द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.

  • १९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

  • १९७५: मोझांबिक देशला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९९३: किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

जन्म 

  • १८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.

  • १८६९: चार्ल्स रँड यांची हत्या करणारे क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर* यांचा जन्म.

  • १९००: भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)

  • १९०३: इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)

  • १९०७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म.

  • १९११: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्यम हॉवर्ड स्टाईन यांचा जन्म.

  • १९२८: नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह यांचा जन्म.

  • १९३१: भारताचे ७वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)

  • १९७५: रशियन बुद्धीबळपटू व्लादिमिर क्रामनिक यांचा जन्म.

मृत्यू 

  • ११३४: डेन्मार्कचे राजा नील्स यांचे निधन.

  • १९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.

  • १९७१: स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइड ऑर यांचे निधन.

  • १९९५: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन.

  • १९९७: फ्रेंच संशोधक जॅक कुस्टेऊ यांचे निधन.

  • २०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.

  • २००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.