चालू घडामोडी - २५ मार्च २०१९

Date : 25 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पालघरच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणूक, आज निकाल :
  • पालघर : पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज हाती येणार आहे. 14 प्रभागांमधील 28 जागांसह एका नगराध्यक्षपदासाठी काल मतदान झालं. दिवसभरात अंदाजे 67 टक्के मतदान झाल्याचं जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

  • पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले आहेत. शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगला. 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी 30 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 22 जण बंडखोर उमेदवार आहेत.

  • आतापर्यंत पालघर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता होती, मात्र आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आयात उमेदवाराला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी बंडखोर म्हणून अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला.

  • काल सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालं. या मतदान प्रक्रियेसाठी 9 झोनल अधिकाऱ्यांसह 372 कर्मचारी 62 मतदान केंद्रांवर कैनात होते. कोणताही अपप्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली.

‘मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न मिळावा’; गोवा सरकार करणार शिफारस :
  • देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने याप्रकरणी वृत्त दिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. याबाबत अजून अधिकृत निर्णय घेतलेला नाही. पण अनौपचरिक चर्चा सुरू आहे.

  • मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी म्हटले की, पर्रिकर हे फक्त गोव्याचेच नव्हे तर भारताचे संरक्षण मंत्री म्हणूनही मोठे नेते होते. त्यामुळे या पुरस्कारासाठी तेच योग्य उमेदवार आहेत. याबाबतचा औपचारिक निर्णय पर्रिकर यांचे सर्वांत निकटचे सहकारी नूतन मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे घेतील.

  • यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाच्या प्रवक्त्या शायनी एनसी म्हणाल्या की, ज्या व्यक्तीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सामान्य व्यक्तींच्या हितासाठी प्रयत्न केले. अशा व्यक्तीला ही योग्य श्रद्धांजली असेल. त्यांनी सामान्य व्यक्तीला आपल्या कामांमुळे नेहमी प्रेरित केले आहे.

  • अद्याप हा निर्णय सहकारी पक्षांना औपचारिकपणे सांगण्यात आलेला नाही. परंतु, सहकारी पक्ष याला समर्थन देतील, असा विश्वास सरकारला आहे. भाजपाचा सहकारी पक्ष मगोपाने यापूर्वीच दक्षिण गोव्यातील नव्याने बांधण्यात येत असलेल्या ज्यूरी ब्रिजला पर्रिकरांचे नाव देण्याची मागणी केली आहे. बांधकाम मंत्री आणि मगोपाचे प्रमुख सुदीन ढवळीकर यांनी नवीन पुलाच्या दोन्ही स्तंभावर पर्रिकरांचे छायाचित्र असेल, अशी घोषणा केली आहे. पर्रिकर यांचे १७ मार्च रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले होते.

मुंबईची निराशाजनक सुरुवात, दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सचा ३७ धावांनी पराभव :
  • मुंबई : आयपीएलच्या बाराव्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सने 37 धावांनी पराभव केली आहे. दिल्लीने मुंबईविरुद्ध 20 षटकांत 214 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र मुंबईचा संघ अवघ्या 176 धावांत ऑलआऊट झाला.

  • मुंबईकडून युवराज सिंगने सर्वाधिक 53 धावांची एकाकी झुंज दिली. तर कृणाल पंड्याने 32, क्विंटन डिकॉकने 27, कायरन पोलार्डने 21 धावांची खेळी केली. सलामीला उतरलेल्या मुंबईचा कर्णधार रोहित शर्मामा नावाला साजेशी अशी कामगिरी करत आली नाही. रोहित अवघ्या 14 धावांवर बाद झाला. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि कॅगिसो राबाडाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर ट्रेन्ड बोल्ट, राहुल तेवातिया, अक्षर पटेल, आणि कीमो पॉलने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

  • त्याआधी प्रथम फंलदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 213 धावांचं आव्हान मुंबईसमोर ठेवलं होतं. दिल्लीकडून रिषभ पंतने तडाखेबाज फलंदाजी करत अवघ्या 27 चेंडूत 78 धावा कुटल्या. तर कॉलिन इनग्रामने 47 आणि शिखर धवनने 43 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून मिशेल मॅक्लेनघनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि बेन कटिंगने प्रत्येक एक विकेट घेतली.

घराणेशाहीवरून मोदींनी दिला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कठोर संदेश :
  • नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना घराणेशाहीवरून कठोर संदेश देते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादाला प्रोत्साहन देण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला तीव्र विरोध केला.

  • शुक्रवारी रात्री भाजपाच्या मुख्यालयात मध्य प्रदेशातील लोकसभेच्या २९ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी मध्य प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीतच मोदी यांनी परिवारवादाला प्रोत्साहन देण्याच्या प्रवृत्तीवरून खडसावले. या बैठकीत कैलाश विजयवर्गीय यांचा थेट उल्लेख करून ते म्हणाले की, तुम्ही मुलाच्या उमेदवारीसाठी कसे डाव खेळलात, हे मी विसरू शकत नाही. तुमच्या या कृतीने मी कमालीचा नाराज आहे, असे खडे बोल सुनावले.

  • मोदी यांच्या परखड बोलाने भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत शांतता पसरली. या बैठकीला भाजपा अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, गोपाल भार्गव आणि मध्य प्रदेशातील भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

  • मध्य प्रदेशातील आपली विधानसभेची जागा आपल्या मुलासाठी कैलाश विजयवर्गीय यांनी सोडल्याचा विषय तसा जुनाच आहे. त्यांच्या मुलाला विधानसभेचे तिकीट देण्यात आले होते आणि ते विजयीही झाले; परंतु लोकसभेसाठी उमेदवार निवडण्यासाठी मध्य प्रदेशातील भाजपाचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी हा चार महिन्यांपूर्वीचा मुद्दा उपस्थित करून घराणेशाहीला तीव्र विरोध केला.

‘राजधानी’ने दिल्लीत पोहोचा अवघ्या १८ तासांत :
  • मुंबई : सीएसएमटी मुंबई ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या मध्य रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढला आहे. १५३५ कि.मी. अंतर कापण्यासाठी या गाडीला आता १९ तासांऐवजी १८ तासांचा अवधी लागेल.

  • मध्य रेल्वे प्रशासनाने शनिवारपासून राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांचा एका तासाचा वेळ वाचणार आहे. शिवाय राजधानी एक्स्प्रेसला कसारा-इगतपुरी हा घाट मार्ग पार करण्यासाठी बँकर इंजीनऐवजी पुश-पुल इंजीन लावल्यानेही वेळेची बचत होत आहे.

  • याआधी बँकर इंजीन जोडण्यासाठी आणि काढण्यासाठी अधिक वेळ खर्ची पडत होता. मात्र राजधानी एक्स्प्रेसच्या दोन्ही दिशेला पुश-पुल इंजीन जोडण्यात आल्याने घाट मार्ग ओलांडणे सोईस्कर झाले आहे. त्यामुळे गाडीचा घाट पार करण्याचा वेगही वाढला आहे.

सुषमा स्वराज-पाकिस्तानी मंत्र्यांमध्ये ट्विटरयुद्ध :
  • पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण, सक्तीने धर्मातर आणि त्यांचा बालविवाह लावल्याच्या वृत्तावरून दोन्ही देशांच्या वरिष्ठ मंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्धाला ट्विटरवर तोंड फुटले. दोनहिंदू मुलींचे अपहरण आणि सक्तीच्या धर्मातराबाबतचा तपशील भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील भारतीय राजदूतांकडे मागितल्यानंतर या वादाला तोंड फुटले.

  • या मुलींविषयीचे वृत्त कळताच स्वराज यांनी पाकिस्तानातील उच्चायुक्तांना याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिल्याचे ट्वीट केले. त्यांच्या ट्वीटला पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी यांनी प्रतिसाद देताना, हा आमचा देशांतर्गत मामला असल्याचे म्हटले. त्यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर देताना, सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘‘मिस्टर मिनिस्टर, मी दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण आणि सक्तीच्या धर्मातराविषयी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांकडे फक्त अहवाल मागितला. परंतु तुमची चिडचिड होण्यासाठी एवढे पुरेसे ठरले. यातून फक्त तुमचा सदोष विचार दिसतो.’’

  • स्वराज यांच्या या ट्वीटला चौधरींनी पुन्हा उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘मॅडम मिनिस्टर, भारतीय प्रशासनात अन्य देशांतील अल्पसंख्याकांच्या हक्कांची काळजी वाहणारे लोक आहेत, याबद्दल मला आनंद वाटतो. परंतु तुमचा विवेक तुम्हाला तुमच्या देशातील अल्पसंख्य समाजाच्या बाजूने- विशेषत: गुजरात आणि जम्मू-काश्मीरमधील- उभे राहण्याची परवानगी देईल, अशी आशा मी प्रामाणिकपणे व्यक्त करतो.’’

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

  • १८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

  • १९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

  • २०१३: मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना

  • २०१३: मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना.

जन्म 

  • १९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००१)

  • १९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.

  • १९४७: इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म.

  • १९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०)

  • १९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८६७)

  • १९९१: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)

  • १९९३: साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.