चालू घडामोडी - २५ मे २०१८

Date : 25 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सेट परीक्षेचा निकाल जाहीर :
  • पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सहायक प्राध्यापक पदांसाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. एकूण ४ हजार ६७ विद्यार्थी पात्र ठरले असून, परीक्षेचा निकाल ६.५२ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात २.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

  • महाराष्ट्र व गोव्यामध्ये दि. २८ जानेवारी रोजी सेट परीक्षा घेण्यात आली. दोन्ही राज्यांतून एकूण ६२ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यांपैकी ४ हजार ६७ विद्यार्थी सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. मागील वर्षी या परीक्षेचा निकाल ३.९२ टक्के लागला होता.

  • या वर्षी त्यामध्ये २.६० टक्क्यांची वाढ झाली असून ६.५२ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षेचा पॅटर्न बदलल्याने निकाल वाढला आहे.

  • परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ६ टक्के विद्यार्थी पात्र करण्याचे धोरण स्वीकारले आहे. तसेच, तिन्ही पेपरना उत्तीर्णतेची अट बदलण्यात आली असून सरासरी उत्तीर्णतेएवढे गुण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.

मार्क्सच्या हस्तलिखिताचा ५ लाख डॉलरना लिलाव :
  • बीजिंग : कार्ल मार्क्सच्या ‘दास कपिताल’ या सुप्रसिद्ध ग्रंथांच्या सुरुवातीच्या कच्च्या हस्तलिखित मसुद्यातील एक पान मंगळवारी येथे झालेल्या लिलावात ५.२३ लाख डॉलरना (३.३४ दशलक्ष युआन) गेले.

  • यंदा कार्ल मार्क्सचे २०० वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्त फेंग लुन या चिनी उद्योजकाने मार्क्सचे हे हस्तलिखित लिलावास उपलब्ध करून दिले होते. मार्क्सने १८५० ते १८५३ या काळात १,२५० पानी हस्तलिखित टिपणे लिहिली व त्यातून ‘दास कपिताल’ हा ग्रंथ आकाराला आला.

  • ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’चे सहलेखक फ्रेडरिक एन्जल्स यांचेही एक हस्तलिखित या लिलावात १.६७ युआनला विकले गेले. एंजल्स यांनी १८६२ मध्ये एका जर्मन वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाचे ते हस्तलिखित होते. 

तृतीयपंथी लढविणार पाकमध्ये निवडणूक :
  • इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच तृतीयपंथी उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. एकूण १३ तृतीयपंथी याची तयारी करीत असून, त्यापैकी दोन संसदेची तर इतर प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका लढविणार आहेत.

  • तृतीयपंथींना निवडणूक लढविणे सुलभ व्हावे यासाठी ‘पाकिस्तान ट्रान्सजेंडर इलेक्शन नेटवर्क’ नावाची स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली आहे. ही संस्था व निवडणूक आयोगाने यावर सांगोपांग चर्चा केली. पाकिस्तानात यंदा आॅगस्टमध्ये जनगणनेत प्रथमच तृतीयपंथींची स्वतंत्रपणे नोंद झाली. त्यानुसार पाकिस्तानच्या एकूण २० कोटी ८० लाख लोकसंख्येत १०,४१८ तृतीयपंथी व्यक्ती आहेत.

  • गेल्या निवडणुकीत चार तृतीयपंथींनी उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु अनुभव व साधनांअभावी त्यांना नीट प्रचार करता आला नव्हता. आता ट्रान्सजेंटर नेटवर्क त्यांना संघटितपणे निवडणूक लढविण्यास मार्गदर्शन व मदत करणार आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने २५ ते २७ जुलै दरम्यान देशात सार्वत्रिक निवडणूक घेण्याचा प्रस्ताव केला आहे. मतदानाची नक्की तारीख नंतर ठरेल. 

अमेरिकेचा झटका! डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग उन बैठक रद्द :
  • उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन बरोबरची १२ जूनला सिंगापूरमध्ये होणारी नियोजित बैठक रद्द केली आहे. ट्रम्प यांनी अचानक घेतलेली माघार हा एक मोठा झटका आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीकोनातून ही बैठक होणे महत्वाचे होते.

  • मला तुम्हाला भेटण्याची भरपूर इच्छा होती. पण अलीकडची तुमची विधाने बघितली तर त्यामध्ये संताप आणि वैरभावना दिसते. त्यामुळे तुम्हाला भेटण्यासाठी ही वेळ मला अयोग्य वाटते असे व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

  • उत्तर कोरियाने गुरुवारी त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला. कोणाच्याही मनात संशय राहू नये यासाठी खास परदेशी पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते. गुरुवारी पत्रकारांच्या उपस्थितीत स्फोट घडवून उत्तर कोरियाने त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन पुढच्या महिन्यात सिंगापूरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल होते.

  • उत्तरपूर्वेला डोंगररांगांमध्ये उत्तर कोरियाचा हा चाचणी तळ होता. उत्तर कोरियाच्या अणवस्त्र चाचण्या संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय होत्या. मागच्या काही वर्षात उत्तर कोरियाने सातत्याने अणवस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्याने जागतिक तणाव निर्माण झाला होता.

कर्नाटक: मुख्यमंत्री कुमारस्वामी आज बहुमत सिद्ध करणार :
  • बंगळुरु: कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात भाजपला अपयश आल्यानंतर, आता काँग्रेस-जेडीएस सरकारची बहुमत चाचणी होणार आहे.

  • मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना आज दुपारी तीन वाजता बहुमत सिद्ध करायचं आहे.

  • दोन दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी शपथ घेतली. त्यांना 15 दिवसात बहुमत सिद्ध करा, असं राज्यपाल वाजूभाई वाला यांनी सांगितलं. पण कुमारस्वामी यांनी दोनच दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • काँग्रेसचे 78 आणि जेडीएसचे 38 असे 116 तसंच एका अपक्षासह 117 आमदार असल्याचा दावा काँग्रेस-जेडीएस आघाडीने केला आहे.

  • 15 मे रोजी निकाल लागल्यापासून 9 दिवस दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल आणि रिसॉर्टमध्येच ठेवले आहे.

दिनविशेष :
  • आफ्रिकन मुक्ती दिन

महत्वाच्या घटना 

  • १६६६: शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.

  • १९५३: अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून अधिकृत पाने प्रसारण सुरू झाले.

  • १९५५: कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्‍च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.

  • १९६१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.

  • १९६३: इथिओपियातील आदिसाबाबा येथे ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापनाझाली.

  • १९८१: सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.

  • १९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्‍या लाखो वारकर्‍यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.

  • २०१२: स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.

जन्म 

  • १८८६: क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९४५)

  • १८९५: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६३)

  • १८९९: स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट१९७६)

मृत्यू 

  • १९५४: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १८७८)

  • १९९८: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)

  • १९९९: संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक यांचे निधन.

  • २०१३: भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा यांचे निधन. ( जन्म: ५ ऑगस्ट १९५०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.