चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ मे २०१९

Date : 25 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा, ३० तारखेला शपथविधी :
  • लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर देशात नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. रामनाथ कोविंद यांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. तसेच राष्ट्रपतींना त्यांनी १६ वी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारसही केली आहे.

  • नवीन सरकारच्या स्थापनेपर्यंत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने काम सुरू ठेवावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. या भेटी आधी पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत १६ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या लोकसभेचा कालावधी हा ३ जून पर्यंत आहे. आता १७ व्या लोकसभेची स्थापना ३ जूनच्या आधी केली जाणार आहे असेही समजते आहे. पुढील काही दिवसात मंत्रिमंडळाची स्थापना होईल.

  • तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी संध्याकाळी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील अशीही माहिती सूत्रांकडून मिळते आहे. २९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादला जाणार आहेत तिथे ते त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतील असेही समजते आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने गेल्या निवडणुकीचे आकडे मागे टाकून अभूतपूर्व यश मिळवलं. एकट्या भाजपाने ३०३ जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने ३५० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सर्वाधिक भारतीय गिर्यारोहकांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी :
  • काठमांडू : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सर्वाधिक भारतीय गिर्यारोहकांना संधी मिळणार आहे. ७८ भारतीय गिर्यारोहकांना नेपाळच्या पर्यटन खात्याने हे शिखर सर करण्याची परवानगी दिली आहे.

  • नेपाळने १४ मेपासून एव्हरेस्टवर जाण्यासाठीचा मार्ग खुला केला आहे. हे शिखर सर करण्यासाठी या वर्षी देश-विदेशातील ३८१ गिर्यारोहकांना परवानगी देण्यात आली असून, सर्वाधिक म्हणजे ७८ भारतीय गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे नेपाळच्या पर्यटन खात्याच्या संचालक मीरा आचार्य यांनी सांगितले. भारताच्या खालोखाल अमेरिकेच्या ७५ गिर्यारोहकांना परवानगी देण्यात आली आहे. मागील काही वर्षांत युरोपियन गिर्यारोहकांनी मोठय़ा प्रमाणात हे शिखर सर करण्याचे प्रयत्न केले होते, तर भारतीय गिर्यारोहकांची संख्या कमी होती, असेही आचार्य यांनी सांगितले.

  • या हंगामात जवळपास ६०० हून अधिक जणांनी एव्हरेस्ट सर केले आहे. यात विदेशी गिर्यारोहक, नेपाळी गिर्यारोहकांसह, शेर्पा आदींचा समावेश आहे.  १४ मेपासून मार्ग खुला केल्यानंतर आठ शेर्पाचा गट यशस्वीरीत्या हे शिखर सर करू शकला आहे. शनिवारी २४ मे रोजी सर्वाधिक म्हणजे २०० जण एव्हरेस्ट सर करण्यास प्रारंभ करतील. तर २७ मे रोजी १०० गिर्यारोहक शिखर सर करण्याचा प्रयत्न करतील. आतापर्यंत या मोहिमेत ८ भारतीय गिर्यारोहकांसह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

मेघालय उच्च न्यायालयाचे हिंदू राष्ट्राबाबतचे निरीक्षण रद्द :
  • पाकिस्तानने स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केले तसे भारतानेही स्वत:ला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावयास हवे होते, मात्र भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्रच राहिले, असे निरीक्षण डिसेंबर २०१८ मध्ये मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. सेन यांच्या एकसदस्यीय पीठाने नोंदविले होते, ते मेघालयचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद याकूब मिर आणि न्या. एच. एस. थंगखिइव यांच्या खंडपीठाने शुक्रवारी अमान्य केले.

  • न्या. सेन यांचे निरीक्षण कायदेशीरदृष्टय़ा दोषपूर्ण, घटनेतील तत्त्वांशी विसंगत आणि देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा अपमान करणारे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

  • न्या. सेन यांनी मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांच्या ‘माय पीपल अपरुटेड : दी एक्सोड्स ऑफ हिंदूज फ्रॉम इस्ट पाकिस्तान अ‍ॅण्ड बांगलादेश’ या पुस्तकाचा हवालाही दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारच केवळ याचे महत्त्व ओळखून त्यानुसार निर्णय घेईल याची आपल्याला खात्री आहे, असेही न्या. सेन यांनी म्हटले होते.

  • पकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील बिगर-मुस्लीम आणि खासीसारख्या आदिवासी समाजाला कोणत्याही मुदतीची अट न घालता भारतामध्ये वास्तव्याची मुभा द्यावी आणि कोणत्याही दस्तऐवजाविनाच त्यांना नागरिकत्व देणारा कायदा केंद्र सरकारने करावा, असे निरीक्षण न्या. सेन यांनी अधिवास प्रमाणपत्राबाबत करण्यात आलेली याचिका निकाली काढताना म्हटले होते. आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये चुका असल्याचेही न्या. सेन यांनी म्हटले होते. अनेक परदेशी नागरिक भारताचे नागरिक झाले आणि मूळ भारतीयांना बाहेर काढण्यात आले हे क्लेशदायक आहे, असेही सेन म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयात नियुक्त चार न्यायाधीशांना शपथ :
  • नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे ३१ झाली आहे.

  • न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. ए. एस. बोपन्ना यांना न्यायालय क्रमांक १ च्या कक्षात सरन्यायाधीश गोगोई यांनी विद्यमान न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयातील ३१ न्यायाधीशात तीन महिला असून त्यात न्या. आर. बानुमती, न्या. इंदू मल्होत्रा, न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे. 

  • २००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या २६ वरून ३१ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रथमच न्यायालयात पूर्ण क्षमतेने न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार न्यायाधीशांच्या नेमणुकीस मान्यता दिली. न्या. बोस व न्या. बोपन्ना यांची नावे याआधी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडे परत पाठवली होती. प्रादेशिकता, सेवाज्येष्ठता हे मुद्दे त्यात होते. ८ मे रोजी न्यायवृंदाने ती पुन्हा पाठवली.

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर :
  • पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी राज्यभरातील ७ हजार ४० उमेदवार आले आहेत.

  • आयोगाने फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा घेतली होती. निकालासह कटऑफ गुणांची यादीही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यात खुल्या गटात सर्वसाधारण जागांसाठी १९८, महिलांसाठी १८०, खेळाडूंसाठी १४३ आणि अनाथांसाठी १४० कटऑफ आहे.

  • एसईबीसी आणि ओबीसी गटात सर्वसाधारण जागांसाठी १९७, महिलांसाठी १८०, खेळाडूंसाठी १४३ कटऑफ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.निवड झालेल्यांत पुणे (२ हजार ४९५), मुंबई (४१८), नगर (३९९), औरंगाबाद (३१२), जळगाव (१२२), कोल्हापूर (३८५), लातूर (१५९), नागपूर (१९९), नांदेड (१५१), नाशिक (३५२), नवी मुंबई (१८२) आदी जिल्ह्य़ातील उमेदवार आहेत. मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै दरम्यान होईल.

  • गट अ आणि ब पदांसाठी निश्चित केलेली क्रीडाविषयक अर्हता धारण करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीची क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालकांकडे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करणे, त्याची पोचपावती, मुलाखतीवेळी प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक  असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, असे आहेत बदल :
  • राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे पोलीस सहआयुक्तपदी रविंद्र शिसवे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर आयपीएस अधिकारी मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलीस सहआयुक्तपदी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. रविंद्र सेनगावकर हे पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त होते त्यांना पदोन्नती देण्यात आली असून रेल्वे मुंबई येथील पोलीस आयुक्तपद देण्यात आले आहे.

  • मकरंद मधुकर रानडे हे अपर पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त होते त्यांना पदोन्नती देण्यात आहे. आता मकरंद रानडे हे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. राजकुमार व्हटकर हे मुंबईतील अस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक महणून कार्यरत आहेत. त्यांना नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त हे पद बदलीनंतर देण्यात आलं आहे. निकेत कौशिक हे सध्या रेल्वे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. त्यांना कोकण आणि ठाणे भागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे पद देण्यात आले आहे.

  • ज्ञानेश्वर चव्हाण हे सध्या मुंबईच्या परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त आहेत. त्यांना मुंबईच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाचे अपर पोलीस आयुक्त असे पद देण्यात आले आहे. दिलीप सावंत हे मुंबईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपायुक्त आहेत. त्यांना मुंबई उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त हे पद देण्यात आले आहे. अशा प्रकारे या बदल्या करण्यात आल्याचे समजते आहे.

दिनविशेष :
  • आफ्रिकन मुक्ती दिन

महत्वाच्या घटना 

  • १६६६: शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.

  • १९५५: कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्‍च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.

  • १९६१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.

  • १९६३: इथिओपियातील आदिसाबाबा येथे ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापनाझाली.

  • १९८१: सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.

  • १९८५: बांगलादेशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.

  • १९९२: विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

  • १९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्‍या लाखो वारकर्‍यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.

  • २०११: द ओपराह विन्फ्रे शो चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.

  • २०१२: स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.

जन्म 

  • १८०३: अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८८२)

  • १८९५: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६३)

  • १८९९: स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट१९७६)

  • १९२७: अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च २००१)

  • १९५४: रतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट २००९)

  • १९७२: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक करण जोहर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९५४: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १८७८)

  • १९९८: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)

  • १९९९: संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक यांचे निधन.

  • २००५: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांचे निधन. (जन्म: ६ जून १९२९)

  • २०१३: भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा यांचे निधन. ( जन्म: ५ ऑगस्ट १९५०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.