चालू घडामोडी - २५ नोव्हेंबर २०१८

Date : 25 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशभरातील शेतकरी संसदेला घेराव घालणार :
  • मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने येत्या 29 व 30 नोव्हेंबर रोजी देशभरातील शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत. या ऐतिहासिक आंदोलनात महाराष्ट्रातून लाखो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले आहे.

  • खा. राजू शेट्टी यांनी संसदेत मांडलेल्या शेतकऱ्यांची 'संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक 2018' आणि 'शेतीमालाला मालाला दीडपट हमीभाव 2018' या दोन विधेयकांवर तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे या प्रमुख मागण्या आहेत.

  • 204 संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित - खा. राजू शेट्टी यांच्या अथक प्रयत्नातून देशातील शेतकऱ्यांच्या 204 संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित आल्या आहेत. यातूनच देशपातळीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा जन्म झाला.  शेट्टी आणि समितीच्या नेत्यांनी संपूर्ण देशभर दौरे करून विविध राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचा कर्जबाजारीपणा, देशभरात शेतकऱ्यांचे सुरू असलेले आत्महत्येचे सत्र यामागील कारणे व त्यावरील उपाय योजना याचा अभ्यास करून स्वाभिमानीचे नेते खा.

  • राजू शेट्टी यांनी ‘शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक 2018’ आणि ‘शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव 2018’ हे दोन विधेयक तयार करून ते लोकसभेत मांडले. या दोन्ही विधेयकावर व शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी समितीने केली आहे.

रोमहर्षक लढतीत आफ्रिदीचा संघ ठरला विजयी :
  • शारजा, टी-10 लीग : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अखेर शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पखतून्स संघाने विजय मिळवला. आंद्रे फ्लेचरची तडाखेबंद फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर पख्तून्स संघाने सिंधीस संघावर आठ धावांनी विजय मिळवला.

  • पखतून्स संघाचा सलामीवीर आंद्रे फ्लेचरने धडाकेबाज फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. फ्लेचरच्या या खेळीच्या जोरावर सिंधीस संघाविरुद्ध खेळताना पखतून्सला 20 षटकांत 6 बाद 137 अशी धावसंख्या उभारता आली.

  • पखतून्स संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिंधीस संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. पण कर्णधार शेन वॉटसनने 14 चेंडूंत 29 धावांची खेळी साकारत संघाचे आव्हान कायम ठेवले होते. शेन बाद झाल्यावर थिसारा परेराने फक्त 13 षटकांत सात षटकारांच्या जोरावर 47 धावा फटकावत सिंधीस संघाला विजयासमीप आणले होते. पण मोक्याच्या क्षणी परेरा बाद झाला आणि संघास पराभवाला सामोरे जावे लागले.

राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा :
  • कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा आणि राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला शनिवारी येथे दिले.

  • उद्धव ठाकरे पत्नी रश्मी, मुलगा आदित्य आणि निवडक समर्थकांसह दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. राम मंदिर बांधण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार असेल किंवा अध्यादेश काढणार असेल तर शिवसेना पाठिंबा देईल, असे उद्धव यांनी सांगितले.

  • दिवस, महिने, वर्षेही उलटली आणि पिढय़ाही सरल्या परंतु राम मंदिर उभे राहिले नाही. आणखी किती वर्षे प्रतीक्षा करणार, असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला. ‘अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. हा प्रश्न भावनेशी निगडित आहे. त्यामुळे रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याआधी केंद्र सरकारने कायदा करावा, असे उद्धव म्हणाले.

  • राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करणे अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत कठीण होते. परंतु आता केंद्रात भाजपचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे कायदा करा किंवा अध्यादेश काढा, शिवसेना पाठिंबा देईल, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

भारत-चीन यांच्यात सीमा प्रश्नावर चर्चा :
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी दोन्ही देशांदरम्यान नैऋत्य सिचुआन प्रांतात बोलणीची २१ वी फेरी सुरू केली आहे, असे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • सीमा तंटय़ाशिवाय दोन्ही अधिकाऱ्यांनी वुहान शिखर बैठकीनंतर भारत व चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात एप्रिलमध्ये वुहान येथे चर्चा झाली होती. डोवल व वँग हे सीमा प्रश्नी दोन्ही देशांचे प्रतिनिधी असून त्यांच्यात दुजियांग्यान या निसर्गसुंदर शहरात चर्चा सुरू झाली, ती शनिवारी संपण्याची शक्यता आहे. या वर्षांच्या सुरुवातीला यांग जेइशी यांची जागा घेतल्यानंतर वँग हे प्रथमच परराष्ट्र मंत्र्यापेक्षाही वरच्या दर्जाचे अधिकारी आहेत. 

  • दोन्ही देशात सीमा चर्चा होणार असल्याचे २१ नोव्हेंबरलाच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी जाहीर केले होते. दोन्ही देशांनी संवाद व सल्लामसलतीतून मतभेद कमी केले असून सीमावर्ती भागात आता स्थिरता आहे असे त्यांनी सांगितले होते. आताच्या चर्चेच्या फेरीत सीमेवरील शांतता व दोन्ही देशातील व्यापार यातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

  • भारतात पुढील वर्षांत निवडणुका असल्याने यावेळी सीमा प्रश्नावर फार भर देण्यात आलेला नाही. पंतप्रधान मोदी व अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात वुहान येथे चर्चा झाली होती त्यानंतर भारताने दोन्ही देशातील ५१ अब्ज डॉलर्सची व्यापार तूट भरून काढण्याचा आग्रह संवादात धरला होता. या घटनाक्रमानंतर भारतातून चीनला  तांदूळ, साखर, औषधे यांची निर्यात वाढवण्यात आली आहे. त्याचा आढावा आताच्या बैठकीत घेण्यात आला. विशेष प्रतिनिधींमधील या चर्चेला दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टिकोनातून महत्त्व दिले जात आहे.

देश कठीण परिस्थितीतून जातोय, असहिष्णूता वाढली - प्रणब मुखर्जी :
  • देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मानवाधिकारांचे हनन, वाढती असहिष्णूता तसेच देशातील जास्तीत जास्त पैसा श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांची वाढलेली दरी यावरुन चिंता व्यक्त केली आहे. प्रणब मुखर्जी फाऊंडेशनद्वारे आयोजित एका संमेलनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • मुखर्जी म्हणाले, देश सध्या एका अवघड परिस्थितीतून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम आणि सहिष्णूतेचे धडे जगाला दिले आहेत. त्याच भूमी आता असहिष्णुतेत वाढ, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे चर्चेत आहे. सध्या सरकारी संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. या संस्थांच्या कामकाजाबाबत संशयाचे वातावरण आहे.

  • जेव्हा एखादे राष्ट्र बंधुभाव आणि सहिष्णुतेचे स्वागत करते तेव्हा ते विविध समाजाच्या सद्भावनेला प्रोत्साहित करतो. आपण परस्परांबद्दलच्या द्वेषाला दूर करतो आणि आपल्या रोजच्या जीवनातील ईर्ष्या आणि आक्रमकता दूर करतो तेव्हा तिथे शांती आणि बंधुभाव निर्माण होतो. सर्वाधिक चांगले वातावरण अशा देशांमध्ये असते जो देश आपल्या नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवतो. त्यांना सुरक्षा आणि स्वायत्तता प्रदान करतो.

ऑस्ट्रेलियन महिलांचा विश्वविजेतेपदाचा चौकार :
  • अंतिम सामन्यात इंग्लंड महिला संघाचा ८ गड्यांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने महिला टी-२० वर्ल्डकपवर चौथ्यांदा नाव कोरलं आहे. गार्डनसच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचा ८ गड्याने पराभव केला. गार्डनसने प्रथम गोलंदाजी करताना तीन फलंदाजांना बाद केले तर फलंदाजी करताना ३३ धावांचे योगदान दिले.

  • यजमान विंडीजला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियन महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर इंग्लंडने बलाढ्य भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे इंग्लंड महिला संघाचे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद १०५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन महिला संघाने १५.१ षटकांत १०६ धावा करत अजिंक्यपद आपल्या नावे केले.

  • इंग्लंड महिला संघाकडून डॅनिअल वेट आणि इंग्लिश कर्णधार हेदर नाईट यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला अपेक्षेनुसार कामगिरी करताना आली नाही. डॅनिअल वेटने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार नाईटने २५ धावांचे महत्वपुर्ण योगदान दिले. वेट आणि नाईट यांच्याशिवाय एकाही इंग्लिंश खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियन महिला संघातील गोलंदाजांनी टिच्चून मारा करत फलंदाजांना जखडून ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून गार्डनसने सर्वाधिक तीन फलंदाजांना बाद केले.

‘मन की बात’ सरकारी बात नाही - मोदी :
  • ‘मन की बात’ सरकारी बात नाही, ही सर्व समाजाची बात आहे. ‘मन की बात’ महत्वाकांक्षी भारताची बात आहे. भारताचा आत्मा राजकारण नाही तर समाजनीती आणि समाजशक्ती आहे, ही ‘मन की बात’ १३० कोटी भारतीयांची आहे. असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आजचा (रविवार) ‘मन की बात’ कार्यक्रम खास आहे.

  • २०१४ साली सुरू झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा आज ५० वा भाग आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. मोदी ‘मन की बात’मधून फक्त आपले मत व्यक्त करत नाहीत, तर लोकांनी पाठवलेल्या सूचना आणि त्यांचे विचार ऐकून घेतात. या सूचना आणि विचारांनासुद्धा या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जाते.

  • रेडिओ संवादाची तुलना कोणत्याही माध्यमाशी करता येणार नाही. रेडिओशी प्रत्येकजण जोडला गेला आहे; मला रेडिओच्या ताकदीचा अंदाज होता असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन

महत्वाच्या घटना 

  • १६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.

  • १९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.

  • १९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.

  • १९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.

  • १९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.

  • १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.

  • १८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)

  • १८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)

  • १८७९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)

  • १८८२: मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९६८)

  • १८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.

  • १९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

  • १९२६: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)

  • १९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.

  • १९३७: शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२२: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन. (जन्म: २० मे१८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)

  • १९६०: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)

  • १९७४: संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९०९)

  • १९८४: भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९१३)

  • १९९७: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.

  • १९९७: मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचे निधन. (जन्म: १४ मे १८९८)

  • १९९८: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)

  • २०१३: बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)

  • २०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९२०)

  • २०१६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.