चालू घडामोडी - २५ ऑक्टोबर २०१८

Date : 25 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान मोदींना सोल पीस प्राईज जाहीर :
  • सोल: भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा सोल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. सोल शांतता पुरस्कार सांस्कृतिक संस्थेनं बुधवारी याबद्दलची घोषणा केली. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक दरी कमी करण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचं संस्थेनं कौतुक केलं आहे. 

  • सोल शांतता पुरस्कारासाठी जगभरातील 100 हून अधिक व्यक्तींच्या नावाचा विचार झाल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष चो चुंग-हू यांनी दिली. या निवड समितीत 12 सदस्यांचा समावेश होता.

  • या पुरस्कारासाठी अनेक आजी-माजी राष्ट्राध्यक्ष, राजकीय नेते, उद्योगपती, अध्यात्मिक गुरु, पत्रकार, कलाकारा, खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या कामगिरीचा विचार झाला. यातून मोदींचं नाव पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आलं. मोदी यांची निवड अगदी योग्य असल्याचं निवड समितीनं म्हटलं. सोल शांतता पुरस्काराचे ते 14 वे मानकरी आहेत. 

अमेरिकेत राजकीय हिंसेला थारा नाही: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प :
  • अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, २०१६ मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन, सीएनएन वृत्तवाहिनीला टपालाने पाठवण्यात आलेल्या स्फोटकांसंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या घटनेचा तपास सुरु असून आपण सर्वांनी आता एकत्र येऊन अमेरिकेत राजकीय हिंसेला थारा नसल्याचा संदेश पोहोचवला पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • बुधवारी अमेरिकेत महत्त्वाच्या व्यक्तींना टपालाद्धारे स्फोटकं पाठवल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या वॉशिंग्टन येथील कार्यालयात, २०१६ मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या न्यूयॉर्कमधील निवासस्थानी आणि न्यूयॉर्कमधील सीएनएन या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात टपालाद्वारे स्फोटकं पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या तिन्ही ठिकाणी स्फोटकं पाठवणारी ही एकच व्यक्ती किंवा संघटना असावी, अशी शक्यता अमेरिकेतील तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.

  • या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमेरिकेतील नागरिकांची सुरक्षा ही माझ्यावरील सर्वोच्च जबाबदारी आहे. मी एफबीआय, गुप्तचर विभाग आणि अन्य यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अशा प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. अमेरिकेत राजकीय हिंसेला थारा नाही, हा संदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

सीबीआयमधील वादाचा नेमका मोदींशी संबंध कसा :
  • नवी दिल्ली : राजकारण्यांनाही लाजवेल असं राजकारण सध्या सीबीआयमध्ये घडत आहे. सीबीआयचे नंबर एक बॉस आलोक वर्मा आणि नंबर दोन राकेश अस्थाना यांच्या युद्धात आता सरकारही उतरलं आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून सरकारने एम नागेश्वर राव या तिसऱ्याच अधिकाऱ्याच्या हाती सीबीआयची सूत्रं दिली आहेत.

  • अस्थाना यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर आलोक वर्मा यांच्या आदेशाखाली कालपर्यंत सीबीआय धडक कारवाई करत होती. अस्थानांच्या टीममधला डीवायएसपी देवेंद्र वर्मा याला अटकही झाली. अस्थानांपर्यंत सीबीआयचे हात पोहोचतील अशी शक्यता निर्माण झालेली असतानाच, सरकारने आलोक वर्मांच्या ऐवजी नवा मोहरा सीबीआयमध्ये बसवला.

  • कालपर्यंत जे अस्थाना केसचा तपास करत होते त्या टीमचे डीएसपी अजय बस्सी यांनाही थेट पोर्ट ब्लेअरमधे पाठवण्यात आलं आहे. दरम्यान या सगळ्यात पहिल्यांदाच सरकारने आपली बाजू जाहीरपणे मांडली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये वाद आहेत, त्यामुळे निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणूनच हे करावं लागल्याचं अर्थमंत्री जेटली यांनी म्हटलं आहे. त्यातही केंद्रीय दक्षता आयोग अर्थात सीव्हीसीच्या आदेशानुसारच सरकारने हे पाऊल उचलल्याची पुस्ती त्यांनी जोडली आहे.

  • सरकारने ज्या पद्दतीने उचलबांगडी केली, त्याविरोधात आलोक वर्मा थेट सुप्रीम कोर्टात गेले आहेत. 26 ऑक्टोबरला त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दुसरीकडे आपल्या अटकेविरोधात राकेश अस्थाना ही दिल्ली हायकोर्टात गेले आहेत. त्याची सुनावणी सोमवारी होणार आहे.

भारत-विंडीज दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत :
  • विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय बरोबरीत सुटला आहे. विराट कोहलीच्या 37 वं शतक आणि 10 हजार धावांच्या विश्वविक्रमावर भारतीय गोलंदाजांनी पाणी फेरलं आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियानं विंडीजसमोर 321 धावांचा डोंगर उभारला होता.

  • भारतीय गोलंदाजांच्या निराशजनक गोलंदाजीमुळे विराटच्या शतकाला विजयाचं सुख लाभलं नाही.. वेस्ट इंडिजकडून शाय होपनं झुंझार शतक झळकावलं. होपनं 134 चेंडूत 123 धावा ठोकल्या. तर शिमरॉन हेतमायरचं शतक अवघ्या सहा धावांनी हुकलं. हेतमायरनं अवघ्या 64 चेंडूंत 94 धावांची जलद तडाखेबाज खेळी केली.

  • शाय होपनं अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या चौकारानं वेस्ट इंडिजला विशाखापट्टणमची वन डे टाय करून दिली. या सामन्यात विंडीजला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. शाय होपनं पाचव्या चेंडूवर दोन धावा आणि सहाव्या चेंडूवर चौकार वसूल केला. त्यामुळं हा सामना बरोबरीत सुटला. विंडीजच्या या कामगिरीचं श्रेय शाय होपच्या शतकाला आणि शिमरॉन हेटमायरच्या 94 धावांना जातं.

  • भारताकडून उमेश यादवनं 10 षटकांत सर्वाधिक 78 धावा दिल्या. फिरकीपटू कुलदीप यादवने सामन्यात 3 विकेट घेतल्या, मात्र त्यासाठी त्याला 10 षटकांत 67 धावा खर्च कराव्या लागल्या.

१ एप्रिल २०२० पासून ‘ही’ वाहने होणार बंद :
  • वाहनांमधून होणारे प्रदूषण हे पर्यावरणाला हानिकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. १ एप्रिलपासून भारतात भारत स्टेज-४ म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या वाहनांना पर्याय म्हणून १ एप्रिल २०२० नंतर भारत BS-6 प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे.

  • एप्रिल २०१७ मध्ये BS-4 वाहनांची विक्री अनिवार्य करण्यात आली होती.  आताच्या BS-4 वाहनांची विक्री बंद झाल्यानंतर कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ही वाढ एक ते दिड लाखांपर्यंत होईल असे बोलले जात आहे.

  • BS-6 मुळे कार बनविण्याच्या खर्चात वाढ होणार आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात भारतात दिल्लीमध्ये BS-6 सुविधेच्या कारमध्ये इंधन भरण्याची सुविधा पहिल्यांदा दिल्लीत उपलब्ध झाली. मात्र या नव्या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्याला मोठा हातभार लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • कंपन्यांनी आता आपल्याकडे असलेला BS-4 चा स्टॉक लवकर क्लिअर करावा असे कंपन्यांना सांगण्यात आले आहे. जे ग्राहक आधीपासून BS-4 किंवा BS-3 च्या कार वापरतात त्यांना कोणत्या अडचणी येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

इस्त्रायल भारताला देणार घातक मिसाइल सिस्टिम, ७७७ मिलियन डॉलरचा करार :
  • रशिया पाठोपाठ भारताने इस्त्रायल बरोबर एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा खरेदी करार केला आहे. इस्त्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज ही सरकारी कंपनी ७७७ मिलियन डॉलरचे हे अतिरिक्त कंत्राट मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. भारतीय नौदलाच्या सात जहाजांवर इस्त्रायल एअरोस्पेसची एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा तैनात केली जाईल.

  • केंद्र सरकारच्या मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबरोबर हा करार करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या एअरोस्पेस इंडस्ट्रीजकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली. एलआरएसएएम सिस्टिम बराक ८ कुटुंबाचा भाग असून इस्त्रायली नौदलबरोबरच भारताचे नौदल, हवाई दल आणि भूदल या सिस्टिमचा वापर करते. या नव्या करारामुळे बराक आठ क्षेपणास्त्राच्या विक्रीचा व्यवहार ६ अब्ज डॉलरपेक्षा पुढे गेला आहे असे आयएआयकडून सांगण्यात आले.

  • आयएआयची गेल्या अनेक वर्षांपासून भारताबरोबर भागीदारी आहे. भारत आमच्यासाठी मोठी बाजारपेठ असून वाढती स्पर्धा लक्षात घेता आम्ही आमचे स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करु असे आयएआयकडून सांगण्यात आले आहे. भारत आणि इस्त्रायलचे अत्यंत दृढ संबंध असून संरक्षणाबरोबरच शेती आणि अन्य तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमीच इस्त्रायलने भारताला सहकार्य केले आहे.

  • अमेरिका आणि रशियाच्याबरोबरीने इस्त्रायलनेही भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आहे. बराक ८ ही जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. भारताने अलीकडेच रशिया बरोबर एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमचा खरेदी करार केला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.

  • १९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.

  • १९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.

  • २००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

जन्म 

  • १८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी१९२०)

  • १८८१: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)

  • १९३७: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै २०११)

  • १९४५: अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६४७: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १६०८)

  • १९५५: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२१)

  • १९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

  • १९८०: शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९२१)

  • २००३: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)

  • २००९: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९२३)

  • २०१२: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.