चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ एप्रिल २०१९

Date : 26 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महिलांचा सैनिक होण्याचा मार्ग मोकळा :
  • भारतीय लष्कराने गुरुवारपासून महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. लष्करातील ‘मिलिटरी पोलिस’ विभागासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी महिलांना लष्करात भरती करुन घेण्याची घोषणा केल्यानंतर चार महिन्यांनी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लष्कराने यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली असून भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज भरता येणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ८ जून असणार आहे.

  • भारतीय सुरक्षा दलांमध्ये महिलांना आजवर केवळ अधिकारी पदावर नियुक्त केले जात होते. वैद्यकीय, कायदा, अभियांत्रिक अशा लष्काराच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये महिलांना समाविष्ट करुन घेतले जात होते. मात्र आता तरुणींना थेट लष्करी जवान बनण्याची संधी उपलब्ध होणार असून करियरचा नवा पर्याय म्हणून याकडे पाहता येणार आहे.

  • महिलांना मिलिटरी पोलिस विभागात जवान म्हणून नियुक्त करण्याची कल्पना सर्वप्रथम लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी मांडली होती. सीतारामन यांनीही या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत महिलांना लष्करात जवान म्हणून संधी देण्यात येईल यासंदर्भातील घोषणा जानेवारी महिन्यात केली होती. ‘मिलिटरी पोलिस’ या विभागामध्ये टप्प्याटप्प्याने महिलांना सामावून घेण्यात येईल. या विभागामध्ये महिला जवानांचे संख्याबळ २० टक्क्यांपर्यंत नेण्याची संरक्षण खात्याची योजना असल्याचेही सीतारमन यांनी सांगितले होते.

टी20 मध्ये सर्वात वेगवान तीन हजार धावा करणारा केएल राहुल पहिला भारतीय :
  • मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुलने टी20 क्रिकेटमध्ये नवीन विक्रम नोंदवला आहे. राहुल हा टी20 मध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. 93 डावांमध्ये के एल राहुलने तीन हजार धावा पार केल्या.

  • के एल राहुल हा गेल्या दोन वर्षांत लिमिटेड ओव्हरच्या फॉर्मेटमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबतर्फे खेळणाऱ्या के एल राहुलने कालच्या सामन्यातही लौकिकाला साजेशी कामगिरी केली. कालच्या सामन्यात राहुलने 27 चेंडूंमध्ये 42 धावा ठोकत हा विक्रम आपल्या नावे केला. बंगळुरुने हा सामना जिंकल्याने राहुलची खेळी व्यर्थ ठरली.

  • टी20 क्रिकेटमध्ये तीन हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. गौतम गंभीरचा विक्रम मोडित राहुलने हा टप्पा सर्वात वेगाने पार केला. अवघ्या 93 डावांमध्ये त्याने तीन हजार धावांना गवसणी घातली. शॉन मार्श हा (85 डाव) जगात अव्वल स्थानी आहे.

  • विराट कोहलीने 40.91 च्या सरासरीने 8 हजार 305 धावांचा टप्पा टी20 क्रिकेटमध्ये ओलांडला आहे. 311 सामने खेळलेला धोनी हा 6 हजार 519 धावा ठोकत या यादीत तिसरा आहे.

भारताचे सहा बॉक्सर अंतिम फेरीत ; शिवा थापाला कांस्यपदकावर समाधान :
  • बँकॉक : कविंद्र सिंग बिश्त (५६ किलो) आणि अमित पांघल (५२ किलो) यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कविंद्र आणि अमितसह भारताच्या अन्य चार बॉक्सर्सनी अंतिम फेरी गाठली आहे.

  • सलग चौथ्यांदा आशियाई स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या शिवा थापाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. शिवाने २०१५च्या रौप्यपदक विजेत्या कझाकस्तानच्या झाकिर शफीउल्लीन याला कडवी लढत दिली, मात्र तिसऱ्या फेरीत केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

  • पुरुषांमध्ये आशीष (६९ किलो) तसेच सतीश कुमार (९१ किलोवरील) यांना तर महिलांमध्ये एल. सरिता देवी (६० किलो) आणि गेल्या वर्षीची रौप्यपदक विजेती मनीषा (५४ किलो), कनिष्ठ गटातील जगज्जेती निखत झरीन (५१ किलो) आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सोनिया चहल (५७ किलो) यांना कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे.

  • दीपक सिंग (४९ किलो) आणि आशीषकुमार (७५ किलो) यांनी पुरुष गटात तर पूजा राणी (७५ किलो) आणि सिमरनजीत कौर यांनी महिलांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. कझाकस्तानच्या टेमिर्टास झुस्सुपोव्ह याने दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतल्यामुळे रिंगणात न उतरताच दीपकला अंतिम फेरी गाठता आली. सलग दुसऱ्यांदा दीपकला पुढे चाल मिळाली आहे.

चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, १७ मतदारसंघात ३ कोटी १२ लाख मतदार :
  • मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

  • या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत.  सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.

  • राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरु आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. 'सखी' मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.

  • नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान होणार आहे.

निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडण्याचे मोदी यांच्याकडून समर्थन :
  • दरभंगा (बिहार) : निवडणूक प्रचारात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल विरोधी पक्ष करत असलेल्या टीकेचा समाचार घेताना, दहशतवादाचे उच्चाटन करणे गरिबी निर्मूलनासाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.

  • देशाच्या संरक्षणासाठी खर्च होणारा पैसा गरिबांच्या उत्थानासाठी अधिक चांगल्या रीतीने खर्च केला जाऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

  • काँग्रेसशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा, तसेच सत्तेवर आल्यास देशभरात ही उपाययोजना करण्याचे आश्वासन मोदी यांनी खोडून काढले. कर्जमाफीमुळे कुणाही गरीब दलित किंवा आदिवासीचा फायदा झालेला नसून, केवळ विरोधी पक्षांच्या चेल्याचपाटय़ांनी याचा फायदा घेतलेला असल्याचे ते म्हणाले.

  • अवघ्या २० ते ४० जागांवर किंवा कर्नाटकात तर केवळ आठ जागांवर निवडणूक लढवत असतानाही पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगणाऱ्या क्षेत्रीय सुभेदारांची पंतप्रधानांनी थट्टा उडवली. मोदी दहशतवादाबद्दल का बोलत असतात, असे ते (विरोधी पक्ष) विचारताच, हा काही मुद्दा नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद हे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे मतदारांना कळते, पण हे स्वार्थी राजवंशी लोक ही साधी गोष्ट समजण्यास असमर्थ आहेत, असे दरभंगा शहरातील प्रचार सभेत मोदी यांनी सांगितले.

जो प्रश्न विचारण्याची हिंमत कुठल्याही पत्रकारात नाही तो प्रश्न अक्षय कुमारने विचारला - राज ठाकरे :
  • पनवेल :  अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीत तुम्ही आंबा खाता का असा प्रश्न विचारला होता. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना जोरदार टोला हाणला. अक्षय कुमारने पंतप्रधानांना काय प्रश्न विचारावा? आंबे खाता का? मजा लावली आहे का? असा सवालही उपस्थित केला. आज पनवेलमध्ये राज ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत राज यांनी चौफेर टीका केली.

  • नोटबंदी हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा पुनर्रुच्चारही राज यांनी केलाय. देशातील निष्णात वकील कपिल सिब्बल यांनी नोटाबंदीच्या अगोदर उर्जित पटेल यांच्या सहीने दोन हजाराच्या नोटा परदेशात छापल्या गेल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं, त्या नोटा भारतात आणून जुन्या नोटांच्या बदल्यात जवळपास तीन लाख कोटी रुपये बदलून दिले गेल्याचा आरोपही केला.

  • नोटबंदीच्या स्कॅमवरुन कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांना भाजप उत्तरं का देत नाही असा सवालही उपस्थित राज यांनी उपस्थित केला. तसेच नोटाबंदी काळात भाजपने लाभ करुन घेतला, तो पैसा आता निवडणूक काळात वापरला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

  • बालाकोट एअरस्ट्राईक मध्ये कोणीही गेलं नाही असं वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केलं आहे. मला सांगा जर आम्ही पुरावे मागितले तर आम्ही देशद्रोही तर मग आता सुषमा स्वराज जे म्हणाल्या त्यावर त्या आता देशद्रोही की देशप्रेमी? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. एअर स्ट्राईकमध्ये किती लोक मेले, हे दुसऱ्या दिवशी सकाळी अमित शाहांना कसं समजलं? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

‘न्यायनिश्चिती’च्या चौकशीसाठी समिती ; न्या. ए. के. पटनायक यांची नियुक्ती :
  • नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात ‘न्यायनिश्चिती’ करणारे म्हणजेच हवा तसा न्याय मिळवून देणारे ‘फिक्सर्स’ आहेत काय आणि असे ‘फिक्सिंग’ चालते काय, याचा छडा लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्या. ए. के. पटनायक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी एकसदस्यीय चौकशी समिती नेमली. समितीच्या अहवालानंतर या प्रकरणी पुढील सुनावणी घेतली जाणार आहे.

  • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना गोवण्यासाठी झालेले लैंगिक अत्याचाराचे आरोप हा एका व्यापक कटाचा भाग असल्याचा दावा वकील उत्सव सिंग बैंस यांनी केला होता. तसेच न्यायदानातील ‘फिक्सिंग’चे प्रकार गोगोई यांनी मोडून काढल्यामुळेच हा कट रचला गेल्याचा दावा त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे प्रकरण तडीस नेण्याचे ठरविले आहे. न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील या खंडपीठात न्या. रोहिंग्टन नरिमन आणि न्या. दीपक गुप्ता यांचा समावेश आहे.

  • न्या. पटनायक यांना चौकशीत आवश्यकतेनुसार पूर्ण सहकार्य करावे, असेही खंडपीठाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि गुप्तचर विभाग (आयबी) यांच्या संचालकांसह दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना सांगितले. अर्थात सरन्यायाधीशांवर सर्वोच्च न्यायालयातील एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची मात्र ही समिती चौकशी करणार नाही तसेच त्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यी चौकशी समितीच्या कामकाजावर या समितीकडून कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

  • ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर न्या. पटनायक हे त्यांचा अहवाल बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करतील आणि त्यानंतर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. या चौकशीसाठी कुणाचे सहकार्य घ्यायचे हे समितीने ठरवायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवा भारत दहशतवादास चोख प्रत्युत्तर देणारा - मोदी :
  • वाराणसी : समृद्ध भारतासाठी विकासाइतकीच देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, नवा भारत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. ते वाराणसीत बोलत होते.

  • मोदी यांनी गुरुवारी वाराणसीत भव्य ‘रोड शो’द्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोदी यांनी सुमारे सात किलोमीटपर्यंतच्या ‘रोड शो’ची सुरुवात केली. गंगा आरतीनंतर त्यांनी एका सभेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केले.

  • ‘‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. आता जगातील बहुतांश देश दहशतवादाविरोधातील लढय़ात भारताला साथ देत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेला आमचे प्राधान्य असून, आमच्या सरकारने दहशतवादाबाबत कठोर भूमिका घेतली आहे,’’ असे मोदी म्हणाले.

  • ‘‘काशीने मला खासदार म्हणूनच नव्हे, तर पंतप्रधान म्हणून आशीर्वाद दिला आहे. तेथील विकासाचे आध्यात्मिक, व्यावहारिक आणि मानवी असे तीन मुख्य पैलू आहेत,’’ असे मोदी म्हणाले. सर्व कामे झाल्याचा दावा नाही. मात्र, विकासाची दिशा योग्य आहे. पाच वर्षांत सरकारने प्रामाणिकपणे काम केले. पुढील पाच वर्षांत त्याची फलनिष्पत्ती दिसून येईल, असे मोदी यांनी सांगितले.

दिनविशेष :
  • जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन

महत्वाच्या घटना 

  • १९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.

  • १९३३: नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.

  • १९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.

  • १९६४: टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.

  • १९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.

  • १९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.

  • १९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.

  • १९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

  • १९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.

  • २००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले

जन्म 

  • १४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म.

  • १९००: रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्लस रिश्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९८५)

  • १९०८: भारताचे १३ वे सरन्यायाधीश सर्व मित्र सिकरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९९२)

  • १९४०: भारतीय मोल्वी आणि राजकारणी मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी  यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २०१४)

  • १९४८: अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म.

  • १९७०: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १८८७)

  • १९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३०)

  • १९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)

  • १९९९: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचे निधन. (जन्म: २० जून १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.