चालू घडामोडी - २६ ऑगस्ट २०१८

Updated On : Aug 26, 2018 | Category : Current Affairsगोळाफेकीत भारताला सुवर्णपदक, तेजींदरपालचा विक्रम :
 • जकार्ता - भारताच्या तेजींदरपाल सिंग तूरने आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. त्याने पाचव्या प्रयत्नांत 20.75 मीटर गोळाफेक करून भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने या कामगिरीसह आशियाई विक्रमही नावावर केला. आशियाई स्पर्धेत 1951 ते आत्तापर्यंत भारताला सर्वाधिक 9 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्यपदक गोळाफेकीत मिळालेली आहेत. ती परंपरा तेजींदरपालने कायम राखली.  

 • तेजींदरने पहिल्याच प्रयत्नात 19.96 मीटर गोळाफेक करताना अव्वल स्थान कायम राखले होते. पंजाबच्या या 23 वर्षीय खेळाडूने जकार्तात आपल्या कामगिरीत सुधारणा केली. सौदी अरेबीयासाठी तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुलतान अब्दुलमाजीद अल्हेबशीला पहिल्या तिन्ही प्रयत्नांत अपयश आल्याने तो पदक शर्यतीतून बाद झाला. त्यामुळे तेजींदरपाल सिंगच्या पदकाच्या आशा उंचावल्या. 

 • पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील खोसा पांडो गावात जन्मलेल्या या खेळाडूचे पहिले प्रेम क्रिकेट होते. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या तेजींदरपालने वडिलांखातर गोळाफेक खेळाची निवड केली.

 • 2017च्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 20.40 मीटर गोळाफेकला होता. मात्र, त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रतेसाठीचे 20.50 मीटर अंतर गाठता आले नाही. त्यानंतर 2017च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तूरने 19.77 मीटरसह रौप्यपदक जिंकले होते. अवघ्या 0.03 मीटरने त्याचे सुवर्णपदक हुकले होते. 

भारताला डायमंड लीग आयोजनाची संधी, 'सॅबेस्टियन को' यांचे संकेत :
 • जकार्ता : भारताला अ‍ॅथलेटिक्स डायमंड लीग आयोजनाची संधी मिळू शकते. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सॅबेस्टियन को यांनी ही माहिती देताना अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सचा समावेश असलेली ही स्पर्धा जगभरातील प्रमुख शहरात आयोजित करण्यावर भर दिला आहे. येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले को यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भारतात डायमंड लीगच्या अयोजनाच्या शक्यतेबाबत चर्चा केली.

 • को म्हणाले,‘ डायमंड लीग किंवा विश्व दर्जाच्या अनेक स्पर्धा युरोपपर्यंत मर्यादित राहिल्या. आमच्याकडे सुविधा उपलब्ध असल्या तरी दिल्ली, टोकियो, बीजिंग या आशियाई शहरात आयोजन व्हावे याची काळजी घेत आहोत. ’

 • दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन राहिलेले को यांनी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात आयोजनावर भर देत असल्याचे सांगून डायमंड लीग आयोजनाचा करार सध्या एक वर्षे शिल्लक असून जगभरातील शहरात ही स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती दिली.

 • ते पुढे म्हणाले,‘ पुढच्या वर्षी दोहा येथे आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन , २०२० मध्ये टोकियो शहरात आॅलिम्पिकचे आयोजन आणि चीनच्या नानजिंग शहरात विश्व इन्डोअर अ‍ॅथलेटिक्सचे आयोजन होणार आहे. अ‍ॅथलेटिक्सच्या दृष्टीने पुढील चार- पाच वर्षे आशियावर केंद्रित राहतील. चीन आणि कतार हे देश डायमंड लीगचे यजमानपद भूषवित आहेत.’

पाकिस्तानात अधिकाऱ्यांच्या फर्स्ट क्लास हवाई प्रवासावर बंदी, इम्रान खान सरकारचा निर्णय :
 • पाकिस्तानात नव्याने निवडून आलेल्या इम्रान खान यांच्या सरकारने पैशांची उधळपट्टी रोखण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकारी, नेते आणि घटनात्मक पदांवरील व्यक्तिंना फर्स्ट क्लासमधून हवाई प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानुसार यापुढे पाकिस्तानात, सरकारी अधिकारी, राष्ट्राध्यक्ष, मुख्य न्यायमूर्ती, पंतप्रधान आणि सिनेट चेअरमन यांना फर्स्ट क्लास दर्जाचा हवाई प्रवास करता येणार नाही.

 • मंत्री फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली. आठवडयाभरात झालेल्या दुसऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आठवडयातील रविवारच सुट्टी कायम ठेऊन शनिवारची सुट्टी रद्द करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने फेटाळून लावला. वीजेची कमतरता आणि इंधन वाचवण्यासाठी पाकिस्तानात २०११ साली सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला होता.

 • सरकारी नोकरीची आठ तासाची वेळ कायम ठेवण्यात आली आहे. फक्त आता नऊ ते पाच अशी वेळ करण्यात आली आहे. यापूर्वी सरकारी कामकाजाची वेळ आठ ते चार होती. परदेश दौरे तसेच देशांतर्गत प्रवासासाठी विशेष विमान न वापरण्याचा निर्णय इम्रान खान यांनी घेतला आहे.

 • पंतप्रधान म्हणून काम करताना ते फक्त दोन गाडया आणि दोन नोकर सेवेसाठी ठेवणार आहेत. आधीच्या सरकारने पंजाब आणि खैबर पख्तूनखवा प्रांतात सुरु केलेल्या सर्व मोठया प्रकल्पांचे ऑडीट करण्याचा महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

आता काढा आकाशगंगेबरोबर सेल्फी, नासाने आणले नवे अॅप :
 • न्यू यॉर्क- अंतराळातील विविध ग्रह ताऱ्यांबद्दल, आकाशगंगांबद्दल सर्वांनाच कुतुहल असते. पृथ्वीच्या पलीकडे या विश्वामध्ये नक्की काय आहे, कसे आहे याबद्दल मानवाला हजारो वर्षांपासून प्रश्न पडत आहेत. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण किंवा एखाद्या नव्या ताऱ्याचा शोध लागतो तेव्हा मिळणाऱ्या माहितीमुळे यातील काही प्रश्नांचे उत्तरही मिळत असते.

 • आता नासाने तयार केलेल्या एका अॅपमुळे लोकांना अंतराळातील ग्रहताऱ्यांबरोबर सेल्फी काढता येणार आहे. तसेच ट्रॅपिस्ट-1 या ग्रहमंडळाबरोबरही सर्वांना सेल्फी काढता येणार आहे. ट्रॅपिस्ट 1 मध्ये पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रह आहेत. खगोलप्रेमींसाठी ही एक अनोखी भेटच म्हणावी लागेल. RAD असे या अॅपचे नाव आहे.

 • नासाने स्पीट्झर स्पेस टेलिस्कोप या दुर्बिणीद्वारे अंतराळात अनेक शोध लावले आहेत. तसेच अंतराळातील लाखो अनोख्या ग्रहताऱ्यांची, घटनांची छायाचित्रे टिपली आहेत. या दुर्बिणीचे कामकाज सुरु होऊन 15 वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ नासाने हे अॅप तयार केले आहे.

 • आकाशगंगेच्या मध्यभागी तिंवा ओरियन नेब्युलाच्या शेजारी स्पेससूट घालून उभे आहोत अशा पद्धतीचा आभास तयार करुन लोकांना फोटो काढता येणार आहेत. हे सर्व फोटो आभासी असतील. अशा प्रकारचे सेल्फी काढण्यामागे कोणते विज्ञान आहे याचीही माहिती नासा देणार आहे. स्पीट्झरने काढलेल्या 30 फोटोंचा समावेश सध्या यात केलेला आहे. इतर अनेक फोटो या अॅपमध्ये लवकरच समाविष्ट केले जातील.

३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समजतंय - कुमारस्वामी :
 • कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस आघाडीचं सरकार आल्यापासून या दोन्ही पक्षात एकमेकांविरुद्ध कुरबूर सुरुच आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मला जर जनतेचा आशीर्वाद मिळाला तर मी पुन्हा एकदा कर्नाटकचा मुख्यमंत्री होईल, असं विधान केलं असताना त्यांच्या विधानावर सध्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी एक मोठं विधान केलं आहे. माध्यमांतील माझ्या मित्रांकडून ३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे असं मला समजलंय, असं कुमरस्वामी म्हणाले.

 • मला असे समजले आहे, की ३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. पण मला त्याची चिंता नाहीये. मी किती काळ मुख्यमंत्री म्हणून राहील यापेक्षा, मी जे काम करत आहे, तेच माझे भविष्य ठरवेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी कोणाचंही नाव न घेता केला केला. पण, आमचं सरकार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 • काय म्हणाले होते सिद्धरामय्या : सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली होती. मी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी विरोधकांनी हातमिळवणी केली होती. सध्या राजकारणात जात आणि पैशांचं महत्व वाढलं आहे. पण राजकारण कायम बदलत असते. मी पुन्हा एकदा लोकांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री होईल, असे सिद्धरामय्या म्हणाले होते. दोन्ही मोठ्या नेत्यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यांमुळे येथे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

 • १४९८: मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.

 • १७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.

 • १८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी.

 • १९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

 • १९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर.

 • १९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा.

जन्म

 • १७४०: हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुन १८१०)

 • १९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर१९९७)

 • १९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २०१०)

 • १९२७: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.

 • १९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१५)

मृत्यू

 • १७२३: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १६३२)

 • १९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर१८७२)

 • १९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.

 • १९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.

 • १९७४: पॅरिस ते न्यूयॉर्क ही ५,८०० कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे ३३ तासात जिंकणारा वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)

 • २०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचेनिधन.  (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)

टिप्पणी करा (Comment Below)