चालू घडामोडी - २६ फेब्रुवारी २०१८

Date : 26 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बॉलिवूडची 'चांदणी' श्रीदेवी यांचे पार्थिव आज मुंबईत आणणार :
  • मुंबई -  अभिजात सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर रसिक, चाहते आणि समीक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, सिनेअवकाशातील 'चांदणी' श्रीदेवी निखळल्यानं अवघी चित्रपटीसृष्टी दुःखाच्या काळोखात बुडाली आहे. शनिवारी (24 फेब्रुवारी) रात्री संयुक्त अरब अमिरातमधल्या अबुधाबीत कार्डिअॅक अरेस्टने बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्या अवघ्या 54 वर्षांच्या होत्या. 

  • श्रीदेवी यांचे पार्थिव काही तासांतच दुबईहून मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे खासगी चार्टर्ड प्लेन दुबईमध्ये दाखल झाले आहे. मुंबईतील वर्सोवा येथील भाग्य बंगल्यात श्रीदेवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझमध्ये अंत्यसंस्कार होतील.

  • पार्थिव भारतात आणण्यास का होत आहे विलंब - बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन होऊन 30 तास उलटले आहेत. यामुळे त्यांचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब का केला जात आहे, अशा प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

  • संयुक्त अरब अमिरातील कायद्यानुसार, कोणत्याही परदेशी व्यक्तीचा मृत्यू हॉस्पिटलबाहेर झाल्यास संबंधित व्यक्तीची शवविच्छेदन प्रक्रिया करावीच लागते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे शवविच्छेदन व न्यायवैद्यक तपासणी पूर्ण झालेली आहे. 

महिलाराज असलेलं देशातील दुसरं रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या सेवेत :
  • जयपूर- देशात महिला सक्षमीकरणाचे जोरदार वारे वाहत असून, आता सकारात्मक बदलही पाहायला मिळतायत. मुंबईतल्या माटुंग्यापाठोपाठ राजस्थानमधल्या गांधीनगर रेल्वे स्थानकातही सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • विशेष म्हणजे महिलाराज असलेलं हे रेल्वे स्टेशन आजपासून प्रवाशासांठी खुलं करण्यात आलं आहे. प्रत्येक पोस्टवर महिलांचा वरचष्मा असलेलं हे राजस्थानमधल्या गांधीनगरच दुसरं स्टेशन म्हणून समोर आलं आहे.

  • गांधीनगर स्थानकावर स्टेशन अधीक्षकापासून मुख्य तिकीट कलेक्टरपर्यंत 32 वेगवेगळ्या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या शिपाई आणि स्टेशन मास्टरपासून रिझर्व्हेशन क्लार्कपर्यंतच्या पदांवर महिलांची निवड करण्यात आली आहे.

  • गांधीनगर रेल्वे स्टेशनवरून दररोज जवळपास 7 हजार प्रवाशांची ये-जा असते. या स्टेशनवरून नेहमीच 50हून अधिक एक्स्प्रेसची ये-जा असते. तर त्यातील 25 एक्स्प्रेस मेलला स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. स्टेशन मास्टर अँजेला स्टेला यांनी सांगितलं की, रेल्वेतील माझ्या नोकरीच्या कार्यकाळाला एक वर्षं पूर्ण झालं आहे.

  • स्टेशनवर आजपासून सर्व ठिकाणी महिलाचं कार्यरत असणार आहेत, त्याचा मला आनंद आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर नियमांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मी कटिबद्ध असेन.

जाणून घ्या, श्रीदेवी यांच्या पार्थिवाची का होत आहे न्यायवैद्यक तपासणी :
  • बॉलिवूडची चांदणी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे जगभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. दरम्यान, मुंबईत सर्व कलाकार, नातेवाईक आणि चाहते त्यांच्या अंतिम दर्शनाची वाट पाहत आहेत. मात्र, तत्पूर्वी श्रीदेवींच्या पार्थिवाचे दुबईमध्ये शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर दुबई पोलिसांकडून त्यांच्या पार्थिवाची न्यायवैद्यक चाचणी देखील होईल. त्यानतंर रविवारी उशिरा त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • भारतात प्रकृतीसंदर्भात जर काही समस्या असतील तर अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्याची गरज नसते. मात्र, दुबईत असे होत नाही, कारण येथील कायदाच तसा आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयक्रिया थांबल्याच्या कारणाने झाला असला तरी दुबईतील कायद्यांनुसार, कोणत्याही परदेशी नागरिकाचा जर अचानक मृत्यू होत असेल तर त्याची चौकशी केली जाते तसेच शवविच्छेदनही केले जाते. यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजू शकते.

  • दरम्यान, पोलिसांना यासाठी सर्व कागदोपत्री प्रक्रिया देखील पूर्ण कराव्या लागतात. यासाठी सुरुवातीला संबंधित देशाच्या दुतावासाला माहिती दिली जाते. त्यानंतर दुतावासाकडून मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द केला जातो. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते.

  • संबंधीत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण काय आहे. याची माहिती शवविच्छेदनानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात दिली जाते. या कागदपत्रावर त्यानंतर पोलिसांचा शिक्का मारला जातो. अशीच कायदेशीर प्रक्रिया श्रीदेवी यांच्या पार्थिवाबाबत पूर्ण केली जात आहे. त्यानंतरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात येणार आहे. याला रविवारी संध्याकाळपर्यंत वेळ लागू शकतो.

शी जिनपिंगसाठी घटनादुरुस्तीचा घाट, कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचा प्रस्ताव :
  • बीजिंग : चीनचे विद्यमान शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना त्या पदावर बेमुदत राहता यावे यासाठी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या केंद्रीय समितीने केला आहे.

  • चीनच्या राज्यघटनेनुसार कोणालाही राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदावर प्रत्येकी पाच वर्षांच्या दोन लागोपाठच्या कालखंडांखेरीज जास्त काळ राहता येत नाही. शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदाचा पाच वर्षांचा पहिला कालखंड संपत आला आहे. येत्या ५ मार्चपासून सुरु होणाºया चीनच्या संसद अधिवेशनात शी यांची पुन्हा पाच वर्षांसाठी राष्ट्राध्यक्षपदी निवड होणे नक्की आहे. चीनची संसद ‘रबर स्टँप’सारखी असून तिच्यात शी समर्थकांचे भारी बहुमत आहे.

  • शीन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने प्रस्तावित घटनादुरुस्तीविषयी त्रोटक घोषणा केली. त्यानुसार राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षपदांसाठी सध्या असलेली लागोपाठ दोन कालखंडांची कमाल मर्यादा दूर करण्याचा प्रस्ताव कम्युन्स्टि पक्षाच्या केंद्रीय समितीने केली आहे. शी पक्षप्रमुखही आहेत आणि संसदेतही त्यांच्या समर्थकांचे प्राबल्य आहे, हे पाहता शी यांना पाच वर्षांच्या दुसºया कालखंडानंतरही राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्याचा मार्ग सुकर असल्याचे मानले जाते.

‘आयपीएस’च्या वर्दीचा भत्ता वाढला! ६ हजारांनी वाढ; वर्षाला मिळणार २० हजार रुपये :
  • मुंबई : राज्य सेवेतील महसूल व पोलिसांच्या वेतन श्रेणीतील तफावतीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असला, तरी पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिका-यांसाठी एक खूशखबर आहे. त्यांना दिल्या जाणाºया गणवेश भत्त्यामध्ये आता ६ हजारांनी घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरवर्षी त्यांना आता २० हजार रुपये मिळणार आहेत. केंद्रीय गृहविभागाने सूचविलेल्या निर्देशानुसार भत्यामध्ये ही वाढ करण्यात आली आहे.

  • गणवेश भत्यातील नवीन वाढ गेल्या वर्षीच्या १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, यापुढे महागाई भत्यामध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर गणवेश भत्त्याच्या दरात २५ टक्यांनी वाढ केली जाणार आहे.

  • आयपीएस अधिकाºयांना सेवेबाबतचे सर्व नियम व अटी या केंद्रीय सेवेप्रमाणे लागू होत असतात. त्यांना २०११पासून त्यांना भारतीय पोलीस सेवा (गणवेश) नियम १९५४ अन्वये दरवर्षी १४ हजार रुपये दिले जात होते. त्यातून त्यांनी युनिफॉर्म, किट मेंटनन्स, कपडे धुलाई खर्च म्हणून निधी एकत्रितपणे दिला जात होता.

  • मात्र, वाढत्या महागाईमुळे त्यात वाढ करण्याची मागणी अधिकाºयांच्या संघटनेकडून करण्यात आली होती. त्यानसार, केंद्रीय गृहविभागाने गणवेश भत्त्याचा वर्षाला १४ वरून २० हजार रुपये करण्याचा निर्णय गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना सर्व राज्यांना करण्यात आली होती. त्यानुसार, राज्य सरकारने अधिकाºयांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी अधिकाºयांच्या एका महिन्याच्या वेतनात तो जमा केला जाईल.

काँग्रेसच्या 48 वर्षांशी माझ्या 48 महिन्यांच्या कारकिर्दीची तुलना करा, मोदींचे आव्हान :
  • पुद्दुचेरी -  येत्या मे महिन्यात माझ्या नेतृत्वाखालील सरकार 48 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. आता काँग्रेसच्या 48 वर्षांच्या कारभाराशी आमच्या 48 महिन्यांच्या कारभाराची तुलना करून पाहा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुद्दुचेरी येथील श्री अरविंद आश्रमाला भेट दिली. त्यानंतर एक सभेला संबोधित केले. त्यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 

  • आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला. मात्र जगात असे अनेक देश आहेत जे आमच्यानंतर स्वतंत्र होऊन देखील विकासाच्या मार्गावर आमच्या पुढे गेले आहेत. आपल्या देशातील राजकीय संस्कृती आणि सरकारी संस्कृतीमध्ये आम्ही विकासाच्या मार्गात बरेच मागे राहिलो आहोत त्याबाबत आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

  •  काँग्रेसवर मोदींचे टीकास्त्र मोदी म्हणाले, "आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर आमच्या पहिल्या पंतप्रधानांनी 17 वर्षे देशाचा कारभार सांभाळला. त्यानंतर त्यांच्या मुलीने 14 वर्षे त्यानंतर त्यांच्या मुलीच्या मुलग्याने पाच वर्षे पंतप्रधानपद सांभाळले. तर 2004 ते 2014 या काळात हे कुटुंब रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवत होते.

  • बेरीज केली तर एकूण 48 वर्षे एकाच कुटुंबाने देश चालवला. त्यांनी 48 वर्षे सरकार चालवले. तर या मे महिन्यात आमच्या सरकारला 48 महिने पूर्ण होणार आहेत. आता त्यांनी 48 वर्षांत काय केले आणि आम्ही 48 महिन्यांत काय केले याची तुलना देशातील विद्वान मंडळींनी करावी,"

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९०९: सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.

  • १९२८: बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.

  • १९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

  • १९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.

  • १९९५: बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.

  • १९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.

  • १९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.

  • १९९९: आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.

जन्म

  • १८०२: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८८५)

  • १८२९: अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९०२)

  • १८६६: अमेरिकन डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर१९३०)

  • १८७४: प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म.

  • १९०८: भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २००७)

  • १९२२: चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण  यांचा जन्म.(मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९०)

  • १९३७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९४)

मृत्यू

  • १८७७: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८०४)

  • १८८६: गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट१८३३)

  • १८८७: भारतीय डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म. (जन्म: १५ मार्च १८६५)

  • १९०३: गटलिंग गन चे निर्माते रिचर्ड जॉर्डन गटलिंग यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८१८)

  • १९३७: मानववंशशास्त्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८६२)

  • १९६६: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे१८८३)

  • २०००: बेळगाव येथील उद्योगपती बा. म. तथा रावसाहेब गोगटे यांचे निधन.

  • २००३: व्यंगचित्रकार राम वाईरकर  यांचे निधन.

  • २००४: केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९२०)

  • २००५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉश चे निर्माते जेफ रस्किन यांचे निधन. (जन्म: ९ मार्च१९४३)

  • २०१०: समाजसुधारक व संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ – कडोळी, परभणी, महाराष्ट्र)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.