चालू घडामोडी - २६ जानेवारी २०१९

Date : 26 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्रामधील ११ जण ‘पद्म’ पुरस्काराचे मानकरी :
  • नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लार्सन अँड टुब्रोचे अनिलकुमार नाईक, प्रख्यात नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, आदिवासी भागात आरोग्यसेवेचे काम करणारे डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, लातूरमध्ये वैद्यकीस सेवा देणारे डॉ. अशोक कुकडे गायक-संगीतकार शेकर महादेवन या ११ जणांचा समावेश आहे.

  • प्रख्यात लोकगायिका तीजनबाई यांना ‘पद्मविभूषण’ तर नामवंत पत्रकार स्व. कुलदीप नय्यर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हुकूमदेव यादव हेही यंदा ‘पद्मभूषण’चे मानकरी ठरले आहेत. याखेरीज अलीकडेच निधन झालेले अभिनेते कादर खान, क्रिकेटपटू (पान ११ वर)(पान १ वरुन) गौतम गंभीर, नृत्यदिग्दर्शक प्रभू देवा आणि माजी अधिकारी एस. जयशंकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व डॉ. अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण किताबाने तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मश्री किताब मिळणाऱ्यांमध्ये शंकर महादेवन, डॉ. कोल्हे दाम्पत्य, अभिेनेता मनोज वाजपेयी, दिनयार कॉन्ट्रॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम काटे, साहित्यिक नगीनदास संघवी, वन्यप्राणी सेवा कार्यकर्ते शब्बीर सय्यद यांचा समावेश आहे.

  • यंदाच्या ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यापैकी चार जणांना पद्मविभूषण, १४ जणांना पद्मभूषण आणि ९४ जणांना पद्मश्री किताब जाहीर झाले आहेत. यामध्ये २१ महिला असून, ११ परदेशी नागरिक आहेत. कादर खान यांचा उल्लेख कॅनडामधील रहिवासी असा आहे. तर तीन जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. याखेरीज यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे एका तृतीयपंथी व्यक्तीचीही पद्म पुरस्कारासाठी सरकारने निवड केली आहे.

तिरंग्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का :
  • आज भारतात ७०वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. कोणत्याही देशाची एकता, अखंडता आणि त्याची ओळख त्या देशाचा झेंडा असतो. असाच आपल्या देशाचा तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला? याच्या निर्मिती मागचा विचार काय होता? हे जाणून घेऊया....

  • देशाला पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये तयार करण्यात आला होता. कोलाकातातील बागान चौकात हा ध्वज फडकवण्यात आला होता. यात केसरी, पिवळा आणि हिरवा रंग होता. तसेच त्यात अर्ध्या उमललेल्या कमळाच्या फूलाचे चित्रही होते. सोबतच या ध्वजावर वंदे मातरम लिहिले होते. याआधीही एक ध्वज तयार करण्यात आला होता तो केवळ दोन रंगांचा होता. हा ध्वज पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत निर्वासित झालेल्या काही क्रांतिकारकांनी फडकवला होता. 

  • नंतर हा ध्वज बर्लिनमध्येही एका संमेलनात दाखवला गेला होता. यात तीन रंग होते. तर वरच्या पट्टीवर कमळाचं फूल होतं. सोबतच सात तारेही होते. याआधी स्वातंत्र्याबाबत आपल्या भावना प्रकट करण्यासाठी १९०४ मध्ये राष्ट्रध्वज निर्माण केला होता. हा स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी तयार केला होता. बंगालच्या एका रॅलीमध्ये या ध्वजाचा वापर करण्यात आला होता. नंतर नवीन राष्ट्रध्वज १९१७ मध्ये समोर आला. यात ५ लाल आणि ४ हिरव्या रंगांच्या पट्ट्या होत्या. तसेच त्यात तारेही होते. हा ध्वज डॉ.एनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी एका आंदोलनादरम्यान तयार केला होता. 

  • भारतीय राष्ट्रध्वजाचा मुख्य प्रवास १९२१ मध्ये तेव्हा सुरु झाला जेव्हा महात्मा गांधी यांनी देशासाठी ध्वजाचा विषय काढला. आणि त्यावेळी ध्वज पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता. यात केवळ लाल आणि हिरवा असे दोन रंग होते. ध्वजाच्या मधे पांढरा रंग आणि चरखा जोडण्याची सूचना गांधीजींनी लाला हंसराज यांच्या सल्ल्यानुसार दिली होती.

प्रणब मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न :
  • माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी तसेच दिवंगत समाजसेवक नानाजी देशमुख आणि दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांना शुक्रवारी ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला.

  • २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूवरेत्तर आणि ईशान्य भारतावर भारतीय जनता पक्ष विशेष भर देत आहे. त्याच धोरणाचे प्रतिबिंब या ‘भारतरत्न’च्या निवडीत पडले आहे.

  • काँग्रेसमध्ये प्रियंका गांधी यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला असतानाच घराणेशाहीचा आरोप सत्तावर्तुळातून सुरू आहे. त्या आरोपाची धार मुखर्जी यांच्या निमित्ताने अधिक तीव्र केली जाण्याची शक्यता आहे. मुखर्जी यांच्यावर काँग्रेसने नेहमीच अन्याय केल्याचे वक्तव्य भाजप नेत्यांनी जाहीरपणे केले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातही मुखर्जी यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करून भाजपने त्यांच्याशी जवळीकीचा आभास निर्माण केला आहेच. या पाश्र्वभूमीवर या पुरस्काराने पुढचे पाऊल टाकल्याची चर्चा आहे.

  • हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे जन्मलेले नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले ज्येष्ठ नेते होते. जनसंघाचे नेते असलेले नानाजी हे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण  भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले. चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते. २०१०मध्ये वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.

चेन्नईत कर्करोगावरील प्रोटॉन उपचारपद्धती उपलब्ध :
  • कर्करोगावर परिणामकारकपणे उपचार करण्याची, तसेच रुग्णाच्या शरीरात कर्करोग पुन्हा उत्पन्न होऊ  नये हे सुनिश्चित करण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक प्रोटॉन उपचार पद्धती चेन्नई येथील ‘अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर’मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या केंद्राचे शुक्रवारी उद्घाटन झाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पळणीस्वामी, उपमुख्यमंत्री टी. पनीरसेल्वम, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि अपोलो हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. प्रताप रेड्डी या वेळी उपस्थित होते.

  • व्यंकय्या नायडू म्हणाले की, तरुणाईमध्ये व्यायामाचा अभाव आहे. तसेच बदलती आहारशैली आणि पाश्चिमात्यांचे अनुकरण केले जात आहे. त्यामुळे जीवनशैलीतील बदलांच्या परिणामातून कर्करोग, हृदयरोग, मधुमेह या आजारांचे प्रमाण वाढत आहे. भारतासमोर असलेले कर्करोगाचे आव्हान संपवण्यासाठी डॉक्टरांनी स्थानिक अन्नपदार्थ आणि व्यायामाचे महत्त्व याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. वैद्यकीय सेवा सर्वांपर्यंत पोहोचवताना ती तळागाळातील रुग्णांना परवडेल याचा विचार करणे आवश्यक आहे.

  • कर्करोग, मधुमेह, हृदयविकार ही भविष्यातील आरोग्य क्षेत्रासमोरील आव्हाने आहेत. ही आव्हाने त्सुनामीएवढी असल्याने त्यांचा बीमोड करण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा इतर पाश्चिमात्त्य देशांच्या तुलनेत अधिक परिणामकारक तरीही सर्वसामान्यांना परवडणारी असल्याने भविष्यात भारत आधुनिक उपचारांचे केंद्रस्थान म्हणून उदयाला येण्याची क्षमता आहे, असे डॉ. प्रताप रेड्डी म्हणाले.

  • प्रोटॉन थेरपी म्हणजे काय - कर्करोगावरील उपचारांसाठी सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या रेडिएशन आणि केमोथेरपी उपचारांना आधुनिक पर्याय म्हणून प्रोटॉन उपचार पद्धतीचा वापर करता येणार आहे. जपान, चीन आणि कोरिया येथे उपलब्ध असलेले हे तंत्रज्ञान आग्नेय आशियात सर्वप्रथम चेन्नईमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कृष्णा सोबती यांचे निधन :
  • ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कृष्णा सोबतीयांचे दिल्लीत शुक्रवारी निधन झाले.  त्या ९३ वर्षांच्या होत्या. येथील रुग्णालयात त्यांना दोन महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांचे स्नेही व राजक मल प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक अशोक माहेश्वरी यांनी सांगितले.

  • कृष्णा सोबती यांच्या वयाची फेब्रुवारीत ९४ वर्षे पूर्ण होणार होती. गेला एक आठवडा त्या अतिदक्षता विभागात होत्या. सायंकाळी निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्धापकाळातही त्यांना समाजातील घडामोडींची जाणीव होती. कृष्णा सोबती या संवेदनशील व सजग लेखिका होत्या. साहित्यात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. ‘छन्ना’ हे त्यांचे पुस्तक ११ जानेवारीला नवी दिल्ली जागतिक पुस्तक जत्रेत प्रकाशित करण्यात आले होते. खरेतर हे पुस्तक म्हणजे त्यांची साठ वर्षांपूर्वी लिहिलेली पहिली कादंबरी आहे. काही कारणास्तव ती प्रकाशित झाली नव्हती.

  • सोबती यांचा जन्म १९२५ मध्ये झाला. ‘स्त्री ओळख व लैंगिकता’ यावर त्यांनी लेखन केले.  ‘मित्रों मर्जानी’, ‘जिंदगीनामा’, ‘सूरजमुखी अंधेरे के’ ही त्यांची आणखी पुस्तके आहेत. त्यांना साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, त्यांना पद्मभूषणही देऊ केले होते पण ते त्यांनी नाकारले.

  • कवी अशोक वाजपेयी यांनी सांगितले, की त्यांनी साहित्यातून लोकशाहीच्या विश्वस्त म्हणून भूमिका पार पाडली. साहित्यात त्यांचे योगदान अजोड असून समता, न्याय यासाठी त्यांनी लढा दिला. त्यांनी हिंदीतून लेखन केले असले, तरी संपूर्ण भारतीय साहित्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. स्त्रियांच्या सन्मानाचा मुद्दा त्यांनी लेखनातून पहिल्यांदा मांडला, असे कवी अशोक चक्रधर यांनी सांगितले. त्यांच्या ‘मित्रों मर्जानी’ या संग्रहाने भारतीय साहित्यातील शैलीत एक वेगळे वळण आणले, त्यांच्या निधनाने देशाचेच नव्हे तर जगाचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्रातील 44 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर :
  • नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. 855 पोलिस अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले असून महाराष्ट्रातील ४४ पोलिसांचा यात समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मानकऱ्यांना गौरवण्यात येईल.

  • महाराष्ट्रातील चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरवण्यात येणार आहे. तर उर्वरित 40 पोलिसांना पोलिस पदक पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

  • राष्ट्रपती पुरस्कृत जीवन रक्षा पदक 48 बहादूर पोलिसांना देण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोन पोलिस अधिकाऱ्यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, दोन पोलिस अधिकाऱ्यांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि एकाला जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

  • दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर :
  • मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रोहा-रायगड येथे २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्टÑाचा संघ जाहीर झाला असून गिरिश एर्नाक याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

  • गतवर्षी आपल्या भक्कम बचावाच्या खेळामुळे महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ठाण्याच्या गिरीशच्या गळ्यात संघाच्या नेतृत्वाची माळ पडली. कोल्हापूरच्या तुषार पाटीलला उप कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. या संघात रायगड, पुणे, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्याच्या दोन-दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे. तर मुंबई, उपनगर, सांगली, कोल्हापूर यांचा एक खेळाडू या संघात आहे.

  • सिद्धार्थ देसाईला मात्र महाराष्ट्राच्या संघाबाहेर बसावे लागले. सिद्धार्थ रेल्वेमध्ये नोकरी करत आहे. त्याने आंतर रेल्वे कबड्डी स्पर्धेत दक्षिण-मध्य रेल्वेला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याचा समावेश अलिबाग येथे झालेल्या महाराष्ट्र संघाच्या शिबिरात करण्यात आला होता. महाराष्ट्र संघाकडून खेळण्यासाठी सिद्धार्थने रेल्वेचा राजीनामा दिला, पण रेल्वेने तो स्वीकारला नाही. त्याला रेल्वेकडूनही ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने तो महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.

  • महाराष्ट्राचा संघ - गिरीश एरनाक - कर्णधार (ठाणे), तुषार पाटील - उपकर्णधार (कोल्हापूर), विशाल माने (मुं. शहर), रिशांक देवाडीगा (मुं. उपनगर), विकास काळे (पुणे), अमीर धुमाळ (रायगड), निलेश साळुंखे (ठाणे), सचिन शिंगाडे (सांगली), अभिषेक भोजने (रत्नागिरी), सुनील दुबिले (पुणे), अजिंक्य पवार (रत्नागिरी), संकेत बनकर (रायगड). प्रशिक्षक : प्रताप शिंदे (मुं. उपनगर), व्यवस्थापक : मनोज पाटील (ठाणे).

दिनविशेष :
  • भारतीय प्रजासत्ताक दिन

महत्वाच्या घटना 

  • १५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.

  • १६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.

  • १८३७: मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.

  • १८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.

  • १९२४: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.

  • १९३३: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.

  • १९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.

  • १९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.

  • १९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.

  • १९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.

  • १९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १८९१: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९३७)

  • १९२१: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९९९)

  • १९२५: अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर पॉल न्यूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००८)

  • १९५७: क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७३०: कवी श्रीधर यांनी समाधि घेतली.

  • १८२३: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचे निधन. (जन्म: १७ मे १७४९)

  • १९५४: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १८८७)

  • १९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १८८०)

  • २०१५: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.