चालू घडामोडी - २६ जुलै २०१७

Date : 26 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रिझर्व बँकेकडून २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद :
  • आगामी काळात २००० रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. कारण रिझर्व बँकेने पाच महिन्यांपूर्वीच २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे.

  • विशेष म्हणजे, म्हैसूरमध्ये २०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु झाल्याची माहिती रिझर्व बँकेच्या सूत्रांनी दिली आहे.

  • ‘हिंदुस्थान टाईम्स’ आणि ‘द क्विंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर, रिझर्व बँकेने पाच महिन्यांपूर्वीच त्याची छपाई बंद केली.

  • पंतप्रधान मोदींना ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर १००० रुपये मूल्याच्या तब्बल ६.३ अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या, यानंतर सरकारने २००० रुपयांच्या नव्या नोटांच्या माध्यमातून ७.४ ट्रिलियन मूल्याच्या ३.७ अब्ज नोटा बाजारात आणल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं. 

संकरित बियाण्यांचे जनक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन :
  • संकरित बियाण्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे 'महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी'चे (महिको) संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे २४ जुलै रोजी निधन झाले असून ते ८६ वर्षांचे होते.

  • डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी 'महिको'च्या माध्यमातून भरघोस उत्पादन देणारे बियाणे शेतकरीवर्गाला उपलब्ध करून देत कृषी क्षेत्रात क्रांती घडवली.

  • डॉ. बारवाले यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे बियाणे उत्पादन क्षेत्र खासगी उद्योग क्षेत्रासाठी खुले झाले, कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल 2001 साली भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान केला.

  • १९९८ साली अमेरिकेतील वर्ल्ड फूड प्राइज फाऊंडेशनतर्फे वर्ल्ड फूड प्राइज या किताबाने त्यांना गौरवण्यात आले होते.

भारताचा कारगिल विजय दिवस :
  • कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला असून या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते.

  • ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युध्दाचे स्वरुप वेगळे होते.

  • कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला, ज्यामुळे शत्रू फक्त चीत झाला नाही तर, त्याला तिथून पळ काढावा लागला.

  • कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल-द्रास सेक्टर आणि नवी दिल्लीत कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी  इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती येथे पंतप्रधान शहीद जवानांना आदरांजली वाहतात.

वर्चस्वाचा डंका, आता लक्ष्य लंका ! 
  • भारताच्या आयसीसी कसोटी क्रमवारीतील अग्रस्थानाचा प्रवास जेथून सुरू झाला, त्याच श्रीलंकेत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे.

  • विराटच्या भारतीय संघाने २०१५ मध्ये गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मानहानीकारक पराभव पत्करला होता.

  • त्यावेळी १७६ धावांच्या आव्हानापुढे भारताचा डाव ११२ धावांत गडगडला होता. या दोन वर्षांच्या कालखंडात बरेच काही बदलले आहे. सुरुवातीच्या काळात युवा आणि आक्रमक संघनायक अशी ओळख जपणारा विराट आता परिपक्व झाला आहे.

  • विराटच्या नेतृत्वाखालील १७ कसोटी सामन्यांपैकी भारताने १२ सामने जिंकले असून २०१६-१७ च्या हंगामात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे विजय मिळवले आहेत.

महापालिका अन्नपदार्थांपासून बनविणार बायोगॅस :
  • महापालिकेच्या वतीने ठेकेदारी संस्थेसमवेत पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी संबंधित संस्थेला प्रतिटन ११२५ रुपये देण्यात येणार आहेत.

  • पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेलांमधून गोळा करण्यात येणार्‍या अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस तयार करण्यात येणार आहे.

  • शहरातील सर्व हॉटेलांमध्ये दैनंदिन वाया गेलेले अन्नपदार्थ महापालिकेमार्फत गोळा करण्यात येतात, शहरातील हॉटेलांमध्ये दिवसाला सरासरी १६ मेट्रीक टन कचरा निर्माण होतो.

  • सद्य:स्थितीत महापालिकेला घनकचरा गोळा करणे, वाहतूक करणे आणि प्रक्रिया करणे यासाठी १३६५ रुपये प्रतिटन आणि महापालिकेच्या वाहनांमार्फत हॉटेलमधील कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे १०२२ रुपये प्रतिटन इतका खर्च येतो.

लष्कराच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा कारगिल विजय दिवस : मोदी
  • कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

  • देशासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी कारगिल युद्धात लढणाऱ्या शूरवीर जवानांची आणि देशाच्या लष्करी सामर्थ्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे.

  • कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • विजय दिन : भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).

जन्म, वाढदिवस

  • शाहू महाराज, समाज सुधारक : २६ जुलै १८७४

  • जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू : २६ जुलै १९२७

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार : २६ जुलै २००९

  • सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष : २६ जुलै १८४३

ठळक घटना

  • मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य : २६ जुलै १९६५

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.