चालू घडामोडी - २६ जुलै २०१८

Date : 26 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पीटीआय सर्वात मोठा पक्ष; इम्रान खान पंतप्रधान होणार :
  • इस्लामाबाद: पाकिस्तानात काल सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झालं. यानंतर रात्रीपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यामध्ये सुरुवातीपासूनच इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षानं आघाडी घेतली आहे. माजी क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तानातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. 

  • पाकिस्तानात काल 272 जागांसाठी मतदान झालं. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार इम्रान खान यांच्या पीटीआयला 119 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीएमएल 56 जागांवर आघाडीवर आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी तिसऱ्या स्थानावर आहे. पीपीपी 34 जागांवर पुढे आहे. याशिवाय 58 जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईददेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. मात्र त्याच्या मिल्ली मुस्लिम लीगला एकाही जागेवर आघाडी मिळालेला नाही.

  • मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पीटीआयनं आघाडी घेतली. यानंतर नवाज शरीफ यांच्या पीएमएल पक्षाकडून निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. नवाज शरीफ यांचा लहान भाऊ शहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषद घेत इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले.

  • पाकिस्तानात आता झालेली निवडणूक ही इतिहासातील सर्वात अप्रामाणिकपणे लढवण्यात आलेली निवडणूक असल्याचं शरीफ म्हणाले. आम्ही या निवडणुकीचे निकाल स्वीकारत नाहीत. आम्हाला ते मान्य नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. 'इम्रान खान यांनी गैरमार्गाचा वापर करुन आघाडी घेतली आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणांवरुन बाहेर काढण्यात आलं आहे. मतमोजणीत मोठा घोटाळा करण्यात आला आहे,' असा आरोप शहबाज शरीफ यांनी केला. 

विश्व चॅम्पियनशिप, आशियाडमध्ये ‘सुवर्ण लक्ष्य’ :
  • नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात सलग तीनवेळा अंतिम फेरी गाठली; पण तिन्हीवेळा जेतेपद पटकविण्यात अपयशी ठरलेली आॅलिम्पिक रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू चीनमधील विश्व चॅम्पियनशिप आणि जकार्ता येथील आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

  • रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यापासून सिंधू जबर फॉर्ममध्ये आहे. गतषवर्षी तिने सहा फायनलची अंतिम फेरी गाठली व त्यात तीनदा जेतेपद पटकाविले. यंदा इंडिया ओपन, राष्टÑकुल क्रीडा स्पर्धा आणि थायलंड ओपनमध्ये सिंधू पराभूत होताच तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

  • यावर ती म्हणते, ‘गेल्या काही महिन्यांत मी फायनलमध्ये सातत्याने पराभूत होत आहे. यामागे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू असतात. तुम्ही चांगले खेळत आहात, पण अखेरचा अडथळा पार करणे कठीण का होते, याचा विचार करावा लागेल.’ सिंधू ३० जुलै रोजी चीनमध्ये सुरू होत असलेल्या विश्व चॅम्पियनशिपसाठी शनिवारी रवाना होणार आहे.

  • विश्व आणि आशियाडमध्ये सुवर्ण जिंकणे हे आपले लक्ष्य असल्याचे सांगून सिंधू म्हणाली, ‘आशियाडमध्ये मारिन वगळता सर्वच दिग्गजांची उपस्थिती राहणार असल्याने प्रत्येक सामना अंतिम सामना असेल. विश्व चॅम्पियनशिपचा ड्रॉ देखील कठीण असल्याने कुठलाही सामना सहजसोपा नसेल.’ 

राज्यात सातव्या वेतन आयोगाला गणेशोत्सवाचा मुहूर्त :
  • मुंबई : महाराष्ट्रात सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या घोषणेला अखेर मुहूर्त लाभला आहे. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत राज्य सरकार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे.

  • एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू होत आहे. त्यामुळे यामधील थकबाकीचा सुमारे पाच हजार कोटींचा पहिला टप्पा गणेशोत्सवाच्या काळात थेट कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा होणार आहे.

  • कोणाला किती थकबाकी - प्रथम श्रेणी कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपये, द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांना 75 हजार, तृयीय श्रेणी कर्मचाऱ्यांना 50 हजार, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये, सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  • दिवाळीपासून प्रत्यक्षात सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजेच दिवाळीच्या महिन्यापासून प्रत्यक्ष वाढीव पगार हा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

  • सातवा वेतन आयोग लागू करताना आधीच खडखडाट असलेल्या राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 21 हजार कोटींचा भार पडणार आहे.

सलमानचा बॉडीगार्ड शेराला सांगलीत 'आरोग्यरत्न' पुरस्कार :
  • सांगली: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा अंगरक्षक म्हणून 'शेरा'ची ख्याती सर्वदूर पसरली आहे. नुकताच सांगलीमध्ये महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शेराचा 'आरोग्यरत्न' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

  • सांगलीच्या श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीने 'आरोग्यरत्न' हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सलमान खानचा अंगरक्षक गुरमीतसिंग उर्फ शेरा याला यावेळी 'आरोग्यरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

  • चंद्रकातदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. चांदीची गदा, मानपत्र, रोख रक्कम असे या 'आरोग्यरत्न' पुरस्काराचे स्वरुप आहे.

  • शेरा अंबाबाई तालीम संस्थेतील मल्लांसोबतही संवाद साधणार आहे. सांगलीतील एसबीजीआय इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला अध्यक्षस्थानी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे उपस्थित होते.

  • शेरा जवळपास गेल्या वीस वर्षांपासून सलमानचा अंगरक्षक म्हणून काम करत आहे. सलमान जिथे जाईल, तिथे शेरा सावलीप्रमाणे त्याच्या मागे असतो. सलमान वर्षाला दोन कोटी रुपये मानधन घेत असल्याचं एका वेबसाईटवर म्हटलं आहे.

  • शीख कुटुंबातील शेराला लहानपणापासूनच बॉडीबिल्डिंगची आवड होती. 1987 मध्ये तो ज्युनिअर मिस्टर मुंबई आणि पुढच्या वर्षी ज्युनिअर मिस्टर महाराष्ट्र ठरला होता.

उद्या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण :
  • पुणे : येत्या पौर्णिमेला म्हणजेच २७ जुलै रोजी रात्री या शतकातील ( २००१ ते २१०० ) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे. सध्या आपल्याकडे पावसाळी व ढगाळ वातावरण असल्याने आपण या संधीला मुकतो की काय असे वाटत आहे. या वेळेस होणाऱ्या ग्रहणाचा कालावधी सुमारे चार तास ( ३ तास ५५ मिनिटे ) असल्याने हे सर्वात मोठ्या कालावधीचे ठरणार आहे व याच दिवशी सूर्यमालेतील क्रमांक चारचा तांबडा ग्रह मंगळ ही प्रतियुती मध्ये येत असून तो २००३ नंतर प्रथमच इतक्या कमी अंतरावर येत आहे.

  • भौतिकशास्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, २७ जुलै रोजी सूर्य - पृथ्वी - चंद्र व मंगळ ग्रह हे सर्व एकच रेषेत येत आहेत. या वेळेस खग्रास स्थितीतील तांबडा चंद्रव तेजस्वी तांबडा ग्रह मंगळ हे दोन्हीही आकाशात लक्ष वेधून घेणार आहेत. २७ जुलै २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे सोरास चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडातून (युरोप, आफ्रिका, आशिया, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका ) हे ग्रहण पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतात यावेळी ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.

  • भारतीय प्रमाण वेळेनुसार २७ जुलै रोजी २३़५४ वाजता चंद्र पृथ्वीच्या पश्चिमेकडील बाजूने विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे़ खग्रास स्थिती वेळ २८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता सुरू होणार आहे. ग्रहण मध्य २८ जुलै रोजी १ वाजून ५२ मिनिटांनी होणार आहे, तर पहाटे २.४३ वाजता ग्रहणाची खग्रास स्थिती संपेल व चंद्र विरळ छायेतून दिसायला सुरुवात होईल व ३.४९ वाजता ग्रहण समाप्ती होणार आहे.

  • या खग्रास चंद्रग्रहणाच्या सर्व स्थिती (स्पर्श, संमिलन, उन्मिलन व मोक्ष) या भारतातील सर्व ठिकाणांतून दिसणार आहे, केवळ पावसाळ्याचे दिवस असल्याने ढगाळ वातावरण असेल, तर या मोठ्या खगोलीय घटनेला मुकावे लागणार आहे.

दिनविशेष :
  • कारगिल विजय दिन

महत्वाच्या घटना 

  • १५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.

  • १७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.

  • १७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.

  • १८४७: लायबेरिया देश स्वतंत्र झाला.

  • १९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ २६ जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.

  • १९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.

  • १९६३: सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.

  • १९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

  • १९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.

  • १९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.

  • १९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

  • २००५: मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.

  • २००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.

जन्म 

  • १८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)

  • १८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)

  • १८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)

  • १८९४: कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १९६९)

  • १८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

  • १९२७: भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद यांचा जन्म.

  • १९२८: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९८०)

  • १९४२: स्लोव्हेकिया देशाचे १ले पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.

  • १९४९: थायलंड देशाचे २३वे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.

  • १९५४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)

  • १९५५: पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८४३: टेक्सास प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.

  • १८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.

  • १८९१: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)

  • १९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.

  • २००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.