चालू घडामोडी - २६ जून २०१८

Date : 26 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दीपिकाने जिंकले विश्वचषकात सुवर्णपदक :
  • सॉल्ट लेक सिटी (अमेरिका) : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत महिला रिकर्व्ह गटात सुवर्णपदक जिंकले. दीपिकाने अंतिम फेरीत जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिला ७-३ असे पराभूत केले. अशा प्रकारे तिने सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या कामगिरीच्या बळावर दीपिका तुर्कीच्या सॅमसन येथे होणाऱ्या तिरंदाजी विश्वचषक फायनलसाठी पात्र ठरली आहे. या हंगामातील अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत ती सातव्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करेल.

  • दीपिकाने याआधी २०१२ मध्ये अंताल्या येथे जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, तर २०११, २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये झालेल्या विश्वचषकात तिने चार वेळेस रौप्यपदक जिंकले आहे. या कामगिरीनंतर दीपिकाने अखेरीस मी सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

  • दीपिकाने ३० पैकी २९ गुणांसह सुरुवात केली आणि २-० आघाडी घेतली. त्यानंतर तिने क्रोपेनसह बरोबरीने गुण मिळवले. जर्मन खेळाडूने तिसरा सेट जिंकताना ३-३ अशी बरोबरी साधली.

  • दीपिकाने त्यानंतर २९ आणि २७ स्कोअरवर चौथा आणि पाचवा सेट जिंकला. यादरम्यान क्रोपेनचा स्कोअर २६ राहिला. अशा प्रकारे भारतीय खेळाडूने हा सामना ७-३ असा जिंकला. दीपिका म्हणाली, ‘‘आपल्या खेळाचा आनंद लुटायचा आणि विजय आणि पराभव विसरून सर्वोत्तम कामगिरी करण्याचे मी स्वत:ला सांगत होते.’’ चिनी ताइपेच्या तान या तिंगने महिला रिकर्व्ह गटात कांस्यपदक जिंकले.

उरुग्वेकडून रशियाचा ३-० ने धुव्वा :
  • मॉस्को : लुई सुआरेझच्या उरुग्वेने रशियाचा 3-0 असा धुव्वा उडवून, फिफा विश्वचषकाच्या अ गटात अव्वल स्थान मिळवलं. रशियाला या पराभवासह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

  • उरुग्वे आणि रशियाने गटात लागोपाठ दोन सामने जिंकून, बाद फेरीचं तिकीट आधीच कन्फर्म केलं होतं. त्या दोन संघांमधला सामना हा गटातला पहिला आणि दुसरा क्रमांक निश्चित करण्यासाठी होता.

  • या सामन्यात लुई सुआरेझने दहाव्या मिनिटाला उरुग्वेचं खातं उघडलं. मग रशियाच्या डेनिस चेरीशेव्हने स्वयंगोल करून उरुग्वेच्या खात्यात भर घातली.

  • उरुग्वेच्या एडिसन कावानीने एन्जुरी टाईममध्ये तिसरा गोल डागला. त्यामुळे उरुग्वेला 3-0 असा विजया साजरा करता आला.

प्रणवदांच्या रेशीमबाग भेटीनंतर नव्या स्वयंसेवकांची संख्या चौपटीने वाढली :
  • मुंबई : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पश्चिम बंगालमधून संघात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. एक जून ते सहा जून दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होण्यासाठी इच्छुकांची संख्या सरासरी दररोज 378 अर्ज प्राप्त होत आहेत. सध्या सर्वात जास्त अर्ज हे पश्चिम बंगालमधून आले आहेत.

  • 7 जून रोजी आमच्या शिक्षा वर्गाला प्रणव मुखर्जी यांनी संबोधित केल्यानंतर आम्हाला 1779 अर्ज मिळाले आहेत. 7 जूननंतर आम्हाला दररोज 1200-1300 अर्ज येत आहेत. यातील 40 टक्के अर्ज हे बंगालमधील आहे, अशी माहिती संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विप्लव रॉय यांनी दिली.

  • मुखर्जींच्या भाषणानंतर संघाची लोकप्रियता वाढली का, असा सवाल त्यांना विचारला असता ते म्हणाले की, अशी व्याख्या करणे योग्य ठरणार नाही. मुखर्जी यांच्यामुळे संघाची स्वीकार्यता मात्र वाढली असल्याचे ते म्हणाले.

  • आपल्या कार्यामुळे संघ लोकप्रिय आहे. परंतु, मुखर्जींच्या भाषणामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. हे एक त्यामागील प्रमुख कारण असू शकते, असेही ते म्हणाले.

काश्मीरमध्ये आता ‘4D’ धोरण, मोदी सरकारचा मोठा निर्णय :
  • नवी दिल्ली : भाजपने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आता राज्यपाल राजवट लागू झाली आहे. यानंतर फुटीरतावादी हुर्रियतच्या नेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी केंद्र सरकारने  ‘4D’ ही नवी मोहिम हाती घेतली आहे

  • ‘डिफेंड अँड डिस्ट्रॉय’ या ‘2D’ मध्ये भर टाकत ‘डिफीट’ ही मोहिमदेखील यापुढे राबवली जाणार आहे.

  • फुटीरतावादी नेत्यांना पाकिस्तानातून होणारी आर्थिक मदत रोखण्यासाठी, गृहमंत्रालयाचे गृहसचिव राजीव गौबा, एनआयएचे संचालक वाय सी मोदी आणि ईडी प्रमुख कर्नल सिंह यांच्यात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत हुर्रियतच्या मोठ्या नेत्यांवर मोठी कारवाई करण्याबाबत निर्णय झाल्याचे समजते.

  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए आणि ईडी अगोदरच 12 प्रकरणांची चौकशी करत आहेत. यावर्षी दहशतवाद्यांना होणाऱ्या फंडिंगबाबत एनआयएने चार्जशीट दाखल केली आहे. सुमारे 12 हजार पानांच्या या चार्जशीटद्वारे अशांतता पसरवणाऱ्या अनेकांची नावे समोर येतील. कुख्यात दहशतवादी हाफीस सईदचंही या चार्जशीटमध्ये नाव असल्याचं समजतंय.

पंतप्रधान मोदी आज मुंबईत :
  • मुंबई : पतंप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता पंतप्रधान एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेला संबोधित करतील.

  • मुंबई भाजपाने आयोजित केलेल्या आणीबाणीविरोधी दिनानिमित्त कार्यक्रमात ते सहभागी होतील. आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधान राजभवनात उद्योगपतींशी चर्चा करतील.

भारत उपग्रह तंत्रज्ञान इतर देशांना शिकविणार; ‘इस्रो’चा पुढाकार :
  • नवी दिल्ली : ज्यांच्याकडे उपग्रह बांधणीची क्षमता व तंत्रज्ञान नाही अशा देशाच्या वैज्ञानिकांना उपग्रह तयार करण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्याचे भारताने ठरविले आहे. १८ जूनपासून चार दिवस व्हिएन्ना येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘युनिस्पेस+५०’ या परिषदेत भारताने स्वत:हून ही तयारी दर्शविली.

  • परिषदेहून परत आल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले की, संयुक्त अरब अमिरात किंवा आफ्रिकेतील देशांकडे स्वत:चे उपग्रह तयार करण्याची क्षमता व तंत्रज्ञान नाही. अशा देशांतील वैज्ञानिकांना याचे प्रशिक्षण देण्यासाठी भारताने पुढाकार घेतला. हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाईल.

  • मात्र ज्यांना प्रशिक्षण द्यायचे त्या वैज्ञानिकांच्या निवडीत भारताची भूमिका असेल. अशा प्रकारे भारताने प्रशिक्षित केलेल्या अन्य देशांच्या वैज्ञानिकांनी भविष्यात तयार केलेले उपग्रह

  • उत्तम व सर्व चाचण्यांमध्ये उतरणारे असतील तर असे उपग्रह ‘इस्रो’ आपल्या अग्निबाणांनी अंतराळात सोडूनही देईल, असेही सिवान म्हणाले.

  • बाह्य अवकाशाचा फक्त शांततापूर्ण कामांसाठी वापर करण्याविषयीची संयुक्त राष्ट्र संघाचा पहिला करार सन  १९६८ मध्ये झाला. त्यात सहभागी झालेल्या देशांची (युनिस्पेस) दरवर्षी परिषद होते. यंदा ५० वी परिषद होती. भारताने घेतलेल्या या पुढाकाराचे परिषदेतील अन्य सदस्यांनी स्वागत केले.

अयोध्येत राम मंदिर होणारच - आदित्यनाथ :
  • पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. अयोध्येत राम मंदिर होणारच यामध्ये शंका असण्याचे कारणच नाही, असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

  • अयोध्येत संत संमेलनात योगी आदित्यनाथ म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम राम ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. त्यामुळे प्रभू रामचंद्रांची कृपा होईल तेव्हा अयोध्येत राम मंदिर होणे स्वाभाविक आहे, त्याबाबत शंका असण्याचे कारण नाही.

  • न्यायालयाच्या परवानगीची प्रतीक्षा न करताच राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली पाहिजे, असे मत रामजन्मभूमी न्यासचे सदस्य रामविलास वेदान्ती यांनी व्यक्त केल्यानंतर आदित्यनाथ यांनी वरील मत व्यक्त केले. गेल्या काही दिवसांत आदित्यनाथ यांनी प्रथमच राम मंदिर बांधण्याबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे.

  • उपस्थितांसमोर आदित्यनाथ म्हणाले की, मीही तुमच्यातीलच एक आहे. आतापर्यंत तुम्ही धीर धरला आहे, आणखी काही काळ तुम्ही धीर धरला पाहिजे. मंदिराच्या उभारणीत अडसर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याबाबत इशारा देताना आदित्यनाथ म्हणाले की, एकीकडे सुनावणी २०१९ पूर्वी होऊ नये यासाठी न्यायालयात याचिका केली जाते आणि दुसरीकडे भाजप या बाबत काहीच करीत नाही, अशी ओरडही केली जाते. मात्र भाजपचे सरकार असो वा अन्य कोणतेही घटनात्मक मार्गाने तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असेही आदित्यनाथ म्हणाले.

‘सरदार पटेल काश्मीर पाकिस्तानला देण्यास तयार होते’ :
  • सरदार वल्लभभाई पटेल हैदराबादच्या बदल्यात काश्मीर पाकिस्तानला देण्यास तयार होते, असा दावा काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांनी केला आहे. हैदराबादचा भूभाग पाकिस्तानशी जोडलेला नाही, त्यामुळे तुम्हाला हैदराबाद कशाला हवे, असा प्रश्न सरदार पटेल यांनी पाकिस्तानला विचारला होता, असे सोझ यांनी म्हटले आहे.

  • सैफुद्दीन सोझ यांच्या काश्मीरसंदर्भातील पुस्तकाचे सोमवारी दिल्लीत प्रकाशन झाले. या पुस्तकाचे पी. चिदंबरम यांच्या हस्ते प्रकाशन होणार होते. मात्र, सोझ यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेस पक्षनेतृत्वाने नेत्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यापासून लांब राहावे असे आदेश दिले होते. त्यामुळे पी. चिदंबरम, मनमोहन सिंग अशा दिग्गज नेत्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे पाठ फिरवली. मात्र, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश या सोहळ्याला उपस्थित होते.

  • पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सोझ म्हणाले, काँग्रेसचा या पुस्तकाशी संबंध नाही. हे पुस्तक माझे असून याची मी जबाबदारी स्वीकारतो. मला पक्षाला अडचणीत आणायचे नाही, असे त्यांनी सांगितले. नेहरु आणि सरदार पटेल हे भारताचे सुपूत्र असल्याचे सांगत सोझ पुढे म्हणाले, सरदार पटेल हे व्यावहारिक होते.

  • त्यांनी चांगल्या हेतूने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांना काश्मीर देण्याची तयारी दर्शवली होती. तुम्ही हैदराबादची मागणी सोडून द्या. हैदराबाद सागरी किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पाकिस्तानशी जोडलेला नाही. मग तुम्ही हैदराबादवर कसा काय दावा करु शकता असे पटेल यांनी म्हटल्याचे सोझ यांनी सांगितले.

दिनविशेष :
  • जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन / आंतरराष्ट्रीय अत्याचारबळी सहाय्यता दिन

महत्वाच्या घटना 

  • १७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.

  • १९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.

  • १९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.

  • १९६०: सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.

  • १९७४: ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड (युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड) लावण्यास सुरूवात झाली.

  • १९७७: एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.

  • १९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.

  • १९९९: शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.

जन्म 

  • १७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)

  • १८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम थॉमसन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)

  • १८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)

  • १८७४: राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२)

  • १८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९६७)

  • १८९२: अमेरिकन कादंबरीकार पर्ल एस. बक यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९७३)

  • १९१४: इराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)

मृत्यू 

  • १९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८)

  • १९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.

  • २००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.