चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ मार्च २०१९

Date : 26 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेचे रशियाशी संधान नाही :
  • २०१६ सालची अध्यक्षीय निवडणूक जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेने रशियाशी संधान साधल्याचा कुठलाही पुरावा नाही, असे अमेरिकेतील विशेष वकील रॉबर्ट म्युलर यांनी काँग्रेसला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे अध्यक्षपदाच्या कारकीर्दीवर गेली दोन वर्षे सावट पडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा मिळाला आहे.

  • खासदारांना रविवारी पाठवलेल्या चार पानी पत्रात अ‍ॅटर्नी जनरल विल्यम बार यांनी बहुप्रतीक्षित म्युलर अहवालाचे दोन भाग नमूद केले. २०१६ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठीचे रशियाचे प्रयत्न आणि अध्यक्ष ट्रम्प यांनी न्यायप्रक्रियेत अडथळा आणला काय हे ते दोन भाग आहेत. हा अहवाल शुक्रवारी बार यांना सादर करण्यात आल्यानंतर त्यांनी त्याचे परीक्षण करून त्याचा सारांश काँग्रेसला सादर केला.

  • या प्रकरणाचा तपास सुरू असताना ट्रम्प यांनी एफबीआयचे संचालक जेम्स कोमे यांना पदमुक्त करण्यासह केलेल्या इतर कार्यवाहीमुळे, ते तपास गुंडाळण्याचा प्रयत्न करत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती.

  • रशियाशी संबंधित असलेल्या काही व्यक्तींनी ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेला सहकार्य करण्याचे अनेक प्रयत्न केले; तथापि यात कुठलाही कट असल्याचे अध्यक्षीय निवडणुकीत घातपात करण्याच्या रशियाच्या सुनियोजित प्रयत्नांचा दोन वर्षे तपास करणाऱ्या म्युलर यांना आढळले नाही, असे बार यांनी या पत्रात लिहिले आहे.

‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांची संख्या वाढविण्यावर न्यायालय ठाम :
  • आगामी सार्वत्रिक निवडणुका, तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांची संख्या वाढविण्यावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भर दिला आणि कोणत्याही संस्थेला नवीन बदलांपासून स्वत:ला अलिप्त राखता येणार नाही, असे निवडणूक आयोगाला सुनावले.

  • मतदान यंत्राद्वारे आपण ज्या उमेदवाराला मत दिले आहे त्यालाच ते मिळाले आहे की नाही, याची खातरजमा या यंत्राद्वारे येणाऱ्या पोचपावतीद्वारे मतदाराला करता येते. लोकसभा निवडणुकांमध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांपैकी किमान ५० टक्के यंत्रांमधील व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह २१ विरोधी नेत्यांनी केली आहे. तिच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सोमवारी ही भूमिका मांडली.

  • व्हीव्हीपॅट सर्वेक्षणाची नमुना संख्या प्रत्येकी एकवरून वाढवता येईल काय याबाबत २८ मार्चपर्यंत माहिती द्यावी, असे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले. व्हीव्हीपॅट सर्वेक्षण नमुन्यांची संख्या वाढवण्यात यावी, असे आमचे मत आहे. हा कुणाच्या इराद्यावर शंका घेण्याचा मुद्दा नसून, मतदारांच्या समाधानाचा मुद्दा आहे, असे न्यायालय म्हणाले.

मुकेश अंबानींच्या कंपनीने तिरुमला देवस्थानला दिले १.११ कोटी :
  • रिलायन्स इंडस्ट्रीज लि.ने (आरआयएल) रविवारी भगवान वेंकेटेश्वर देवस्थानला १.११ कोटी रूपयांची देणगी दिली आहे. देवस्थानमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गंभीर आजाराशी सामना करत असलेल्या गरीब व्यक्तींसाठी तिरूमला तिरूपती देवस्थानकडून (टीटीडी) एक रूग्णालय चालवले जाते. त्यासाठी एक ट्रस्ट बनवण्यात आले असून त्याला ही रक्कम देणगी स्वरूपात देण्यात आली आहे.

  • रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे प्रतिनिधीत्व करणारे कार्यकारी संचालक पीएमएस प्रसाद यांनी टीटीडीच्या संयुक्त कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या रकमेचा डिमांड ड्राफ्ट सोपवला. या रकमेचा उपयोग देवस्थानच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सुपर स्पेशलिटी रूग्णालयात मोफत उपचाराची सुविधा प्रदान करण्यासाठी केला जाईल. रिलायन्सने सप्टेंबरमध्ये या कारणासाठीच १.११ कोटी रूपयांचे दान दिले होते.

  • दरम्यान, देशात सर्वाधिक दान करणाऱ्यांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश होतो. एका संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार ऑक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१८ दरम्यान आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती अंबानी यांनी एका वर्षांत वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात ४३७ कोटी रुपये खर्च केले. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पिरामल समूहाचे अजय पिरामल हे आहेत. त्यांनी २०० कोटी रूपये दान केले आहेत.

नरेश गोयल यांनी दिला जेटच्या संचालक मंडळाचा राजीनामा :
  • आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल जेटच्या संचालक मंडळावरुन पायउतार झाले आहेत. त्यांनी जेटच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. २५ वर्षांपूर्वी नरेश गोयल यांनी पत्नी अनितासह मिळून जेट एअरवेजची स्थापना केली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

  • चेअरमनपदावरुन पायउतार होण्यास व कंपनीतील ५१ टक्के हिस्सा कमी करण्यास नरेश गोयल तयार असल्याची माध्यमांमध्ये चर्चा होती. कर्ज थकितापोटी कर्मचारी, वैमानिकांचे वेतन वेळेवर देऊ शकत नसलेल्या जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याची सूचना स्टेट बँकेने प्रवर्तक नरेश गोयल तसेच त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना केली होती.

  • कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे जेटचा नियमित उड्डाणे चालू ठेवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. वैमानिक, पुरवठादार, बँका आणि कर्मचाऱ्यांचे पगार, हप्ते वेळेवर देणे जेटला शक्य होत नाहीय. जेटची ४० विमाने जमिनीवरच उभी आहेत. जेट एअरवेजने याआधी सुद्धा गंभीर आर्थिक संकटाचा सामना केला आहे. २०१३ मध्ये अबूधाबीच्या इतिहाद एअरवेजने जेटमध्ये गुंतवणूक करुन २४ टक्के हिस्सा विकत घेतला.

  • जेटला या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज मिळू शकते. जेट एअरवेजवर सध्या २६ बँकांचे आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

माझे पैसे घ्या आणि जेट एअरवेजला वाचवा – विजय मल्ल्या :
  • जेट एअरवेजसमोर आर्थिक संकट उभं राहिलं असून त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने सर्व बँकांना हाक दिली आहे. यामुळेच कर्ज देणाऱ्या 26 बँकांपैकी 2 बँका जेटची मदत करण्यास तयार झाल्या आहेत. जेटच्या रुपाने किंगफिशरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशी हाकच सरकारकडून देण्यात आली होती. दरम्यान बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्याने आपल्याला मदत करण्यासाठी काहीही प्रयत्न न केल्याने मोदी सरकारवर टीका केली आहे.

  • विजय मल्ल्याने अनेक ट्विट केले आहेत. आपण किंगफिशरला वाचवण्यासाठी केलेली गुंतवणूक आणि प्रयत्न याकडे दुर्लक्ष करत विनाकारण टीका करण्यात आली असं विजय मल्ल्याने म्हटलं आहे. तसंच विजय मल्ल्याने एनडीए सरकार दुटप्पी वागत असल्याचीही टीका केली आहे.

  • ‘मी कंपनी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी किंगफिशर एअरलाइन्समध्ये 4000 कोटींची गुंतवणूक केली. पण त्याची अजिबात दखल न घेतला शक्य तितकी टीका माझ्यावर करण्यात आली. याच सरकारी बँकांनी भारतातील सर्वोत्कृष्ट असलेल्यांपैकी एका कंपनीला बुडू दिलं. एनडीए सरकारची दुटप्पी भूमिका’, असं विजय मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तामिळनाडूतील १११ शेतकरी वाराणसीतून मोदींना आव्हान देणार :
  • तिरुचिरापल्ली : दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर तामिळनाडूचे शेतकरी आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत हेत. राज्यातील शंभरहून अधिक शेतकरी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. या 111 शेतकऱ्यांनी वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी ही माहिती दिली.

  • "भाजपने आपल्या जाहिरनाम्यात शेतीमालाला योग्य दरासह इतर मागण्यांचा समावेश करावा यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे," असं अय्याकन्नू यानी स्पष्ट केलं. "आमच्या मागण्या पूर्ण होतील, असं आश्वासन त्यांनी आपल्या जाहिरनाम्यात देताच, आम्ही मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेऊ. मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही आमचा निर्णय कायम ठेवू आणि मोदींविरोधात निवडणूक लढवू," असं अय्याकन्नू यांनी सांगितंल.

  • अय्याकन्नू यांच्या नेतृत्त्वात 2017 मध्ये दिल्लीत तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी 100 हून अधिक दिवस आंदोलन केलं होतं.

  • काँग्रेससह इतर पक्षांनीही तुमच्या मागण्यांचा जाहीरनाम्यात समावेश केलेला नाही, मग भाजपकडेच ही मागणी का करत आहात, असं विचारलं असताने अय्याकन्नू म्हणाले की, "सध्या भाजप सत्ताधारी आहे आणि मोदी पंतप्रधान आहेत." "आम्ही भाजप किंवा पंतप्रधानांविरोधात नाही. सत्तेत येण्यासाठी मोदींनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. आमचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. आजही ते आमचे पंतप्रधान आहे आणि भाजप सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करत आहोत," असं अय्याकन्नू यांनी सांगितलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

  • १९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.

  • १९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.

  • १९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

  • १९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

  • १९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

  • १९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

  • २०१३: त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

जन्म 

  • १८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६५)

  • १८७९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९६५)

  • १८८१: गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९५३)

  • १८९८: पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

  • १९०७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)

  • १९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)

  • १९७३: गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.

  • १९८५: झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८२७: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७०)

  • १८८५: वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८२५)

  • १९३२: कॅडिलॅक आणि लिंकन कंपनी चे स्थापक हेन्री एम. लेलंड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)

  • १९९६: हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)

  • १९९७: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९१०)

  • १९९९: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९४२)

  • २०१२: प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन. (जन्म: १० मे १९४०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.