चालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१८

Date : 26 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राम मंदिराबाबत ११ डिसेंबरनंतर काहीतरी मोठा निर्णय होणार - स्वामी राम भद्राचार्य :
  • नवी दिल्ली : राम जन्मभूमीवर राम मंदिर बांधण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत विश्व हिंदू परिषदेनं आज अयोध्या येथे धर्मसभेचं आयोजन केलं आहे. यावेळी 11 डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत काहीतरी मोठा निर्णय होणार असल्याचा दावा जगद्गुरू रामानंदाचार्यजी स्वामी राम भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धोका देणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

  • राम मंदिरासंबधी ही शेवटची सभा किंवा संमेलन असल्याचं विश्व हिंदू परिषदेच्या कणखर भूमिकेवरून दिसत आहे. स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी पुढे म्हटलं की, "केंद्र सरकारला 6 डिसेंबरला काहीतरी करायचं होतं, मात्र आचारसंहितेमुळे ते शक्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्हाला धोका देणार नाहीत. 11 डिसेंबरनंतर काहीतरी निर्णय नक्कीच येईल", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • "11 डिसेंबरनंतर कदाचित राम मंदिराबाबत अध्यादेश किंवा ठोस निर्णय होऊ शकतो. केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यांने नाव न सांगण्याच्या अटीवरून मला आश्वासन दिलं आहे, असा दावा स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे.

  • "सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्यांची आणि माझी 23 नोव्हेंबरला रात्री 8.30 वाजता भेट झाली होती. राम मंदिराच्या मुद्यावर आमच्यात जवळपास 10 मिनिट चर्चा झाली. आणखी थोडी वाट पाहा असं संतांना जाऊन सांगा. लवकरच काहीतरी होईल. लवकरच अध्यादेश निघेल आणि तो अध्यादेश दोन तृतीयांश बहुमताने पास होईल", असं मंत्री महोदयांनी सांगितल्याचा दावा स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे.

२६/११ हल्ल्यातील शहीदांना सहा वर्षीय मुलाची स्केटिंगद्वारे मानवंदना :
  • सांगली : 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्लात शहीदांना सहा वर्षीय चिमुकल्याने स्केटिंगद्वारे अनोखी मानवंदना दिली आहे. तसेच सांगली ते कोल्हापूर असं 55 किलोमीटरचे अंतर स्केटिंग रॅलीद्वारे पूर्ण करुन ‘स्टॉप टेरेरिझ’चा संदेश देणार आहे.

  • केदार विजय साळुंखे असे या चिमुकल्याचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. आज सकाळी 6.30 वाजता केदारने सांगली येथील शहीद अशोक कामटे चौक विश्रामबाग येथून आपल्या स्केटिंग उपक्रमास सुरुवात केली. यावेळी सांगली पोलीस दलातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 26/11 च्या हल्ल्यात शहीदांना मानवंदना देण्यासाठी तसेच स्टॉप टेरेरिझम हा संदेश देण्यासाठी केदारने हे 55 किलोमीटरचे अंतर स्केटिंग रॅलीद्वारे पूर्ण करण्याचे धाडस दाखवले आहे.

  • केदार अंदाजे सकाळी 10.30 पर्यंत कोल्हापूरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचणार आहे. सांगली ते कोल्हापूर 55 किलोमीटरचे अंतर केदार चार तासात पूर्ण करणार आहे. या विक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड ,नॅशनल  बुक ऑफ रेकॉर्ड आणि चाईल्ड  बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (ग्लोबल) यामध्ये होणार आहे.

ब्रेक्झिट कराराला युरोपीय महासंघाची मान्यता :
  • ब्रिटनने युरोपीय महासंघातून (युरोपियन युनियन) बाहेर पडण्याच्या (ब्रेक्झिट) कराराला रविवारी युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांच्या नेत्यांनी मान्यता दिली. युरोपीय महासंघाच्या ब्रिटन सोडून उर्वरित २७ देशांच्या नेत्यांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला. त्यामुळे त्यावर मतदान झाले नाही. आता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या काराराला मान्यता मिळणे गरजेचे असून त्यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सर्व राजकीय शक्ती पणाला लावली आहे.

  • युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर ब्रिटनमध्ये जून २०१६ मध्ये सार्वमत घेण्यात आले. त्यात बहुसंख्य नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर ब्रिटनने लिस्बन कराराचे ५० वे कलम लागू करून ब्रेक्झिटच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली. ही प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी आणि ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी सौहार्दपूर्ण संबंध राहावेत यासाठी करार केला जात आहे.

  • त्या कराराला अतिम स्वरूप देण्यासाठी युरोपीयन काऊन्सिलची ब्रसेल्स येथे नुकतीच बैठक झाली. त्यात युरोपीय महासंघाच्या २७ देशांच्या नेत्यांनी सर्वानुमते ब्रेक्झिटच्या कराराला मान्यता दिली. युरोपीयन काऊन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी त्याची ट्विटरवरून अधिकृत घोषणा केली.

  • आता या कराराला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजुरी मिळवून देण्यात ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांची कसोटी लागणार आहे. त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांसह विरोधी पक्षांनी या कराराला विरोध दर्शवला आहे. थेरेसा मे गेले १८ महिने त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रेक्झिट कराराला मंजुरी मिळवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये डिसेंबर महिन्यात मतदान होणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सराव प्रश्नसंच :
  • मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमातील विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव व्हावा यासाठी 26 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती ) च्या वतीने उद्यापासून ऑनलाइन सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांसाठी दिले जाणार आहेत.

  • उद्यापासून रोज एक विषयाचा पेपर www.ebalbharati.in या संकेत स्थळावर अपलोड केला जाणार आहे. तर 6 डिसेंबर पासून याची उत्तरपत्रिका आणि तज्ज्ञ मंडळींचे याबाबतचे व्हिडीओ सुद्धा बालभारतीकडून अपलोड केले जाणार आहेत.

  • इयत्ता दहावीच्या परीक्षा मार्च 2019 मध्ये होणार आहेत. त्याआधी विद्यार्थ्यांना बदलत्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव व्हावा आणि आत्मविश्वास वाढवा यासाठी हे सराव प्रश्नसंच बालभारतीकडून अपलोड केले जाणार आहेत.

  • या सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थी स्वतः किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सोडवू शकतो ज्याने त्याला प्रश्नपत्रिका सोडविण्याचे आकलन होईल. या प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका आणि तज्ज्ञांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचा सराव होईल आणि आपल्या चुका लक्षात येतील.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन - गजानन कीर्तिकर यांची कार्याध्यक्षपदी निवड :
  • मुंबई :  गजानन कीर्तिकर व मंगल पांडे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष पदी निवड. इतर पदांची निवड ही बिनविरोध झाली होती. आज झालेल्या या दोन पदांकरिता निवडणूक घेण्यात आली.

  • कार्याध्यक्षच्या पदाकरिता मुंबई उपनगरचे कबड्डीअसो.चे अध्यक्ष व खासदार गजानन कीर्तिकर व औरंगाबाद कबड्डी असो.चे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर यांच्यात सामना रंगला होता. तर कोषाध्यक्ष पदाकरिता परभणी जिल्हा कबड्डी असो.चे कार्यवाह मंगल पांडे व कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांच्यात सरळ लढत होती.

  • या मतदानासाठी २५संलग्न जिल्ह्याचे ७४ प्रतिनिधी पात्र ठरले होते. त्यापैकी ७१ सदस्यांनी मतदान केले. गजानन कीर्तिकर यांना ५१ मते मिळाली, तर दत्ताभाऊ पाथरीकर यांना १९ मते मिळाली. एक मत बाद झाले. कीर्तिकर ३२ मतांनी कार्याध्यक्षपदी निवडून आले. मंगल पांडे यांना ४७ मते मिळाली, तर रमेश भेंडीगिरी यांना २४ मते मिळाली. पांडे हे २३मतांच्या फरकाने कोषाध्यक्षपदी निवडून असले. 

  • बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे:- १)अध्यक्ष :- अजितदादा पवार (पुणे). २)उपाध्यक्ष:- १)देवराम भोईर (ठाणे), २)अमरसिंह पंडित (बीड), ३)शशिकांत गाडे (अहमदनगर), ४)दिनकर पाटील (सांगली), महिला राखीव १)शकुंतला खटावकर (पुणे), २)नेत्रा राजशिर्के (रत्नागिरी). ३) सरचिटणीस :- आस्वाद पाटील (रायगड). ४)सहचिटणीस :- १)रवींद्र देसाई (रत्नागिरी), २)मदन गायकवाड (सोलापूर), ३)मोहन गायकवाड, ४)महादेव साठे (उस्मानाबाद), महिला राखीव :-१) सिय्यदा पटेल (नांदेड), २) स्मिता जाधव (परभणी).

मुंबई हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ५० लाख डॉलर्सचे बक्षीस :
  • मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही यातील दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान आहे.

  • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली आहे. तसेच या दोघांना पकडण्यासाठीच्या बक्षिसातही अमेरिकेकडून वाढ करण्यात आली असून ती ५० लाख डॉलर अर्थात ३५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.

  • मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. या हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पाकिस्तानेच परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिकेच्यावतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोम्पिओ म्हणाले, मुंबई हल्ल्याच्या दशवर्षपूर्तीनिमित्त मी अमेरिका तसेच सर्व अमेरिकन नागरिकांच्यावतीने मुंबईकरांना बळ मिळावे अशी भावना व्यक्त करतो.

काळ्या पैशाची माहिती देण्यास पीएमओचा नकार :
  • पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) माहिती अधिकार (आरटीआय) अधिनियमातील तरतुदीचा हवाला देत विदेशातून आणलेल्या काळ्या पैशाशी निगडीत माहिती देण्यास नकार दिला आहे. संबधित प्रकरणाचा तपास आणि आरोपींविरोधातीत खटल्यांमधील अडथळा लक्षात घेता आरटीआयच्या या अधिनियमानुसार माहिती देण्यास नकार दिला जाऊ शकतो. केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) १६ ऑक्टोबरला एका प्रस्ताव पारित करुन पीएमओला १५ दिवसांच्या आत काळ्या पैशांशी निगडीत माहिती देण्यास सांगितले होते.

  • काळ्या पैशाशी निगडीत आरटीअाय अंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पीएमओने म्हटले की, या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यांचा तपासही सुरु आहे.

  • व्हिसलबोअर भारतीय वन सेवेतील अधिकारी (आयएफएस) संजीव चतुर्वेदी यांनी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती विचारली होती. याचे उत्तर देताना पीएमओने म्हटले की, सरकारकडून होत असलेल्या कारवाईची माहिती सध्या जाहीर केल्यास संपूर्ण तपास प्रक्रिया किंवा आरोपींविरोधातील कारवाई बाधीत होऊ शकते. त्यामुळे याप्रकरणी आरटीआय कायदा कलम ८ (१) अंतर्गत माहिती जाहीर करण्यास सूट मिळते.

  • हा तपास विविध सरकारी तपास संस्था आणि सुरक्षा संस्थांच्या कक्षेत असून त्याला आरटीआय कायद्याच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. चतुर्वेदी यांनी आरटीआयच्या माध्यमातून सरकारकडे माहिती मागितली होती. जून २०१४ ते आतापर्यंत विदेशातून किती काळा पैसा भारतात आणला अशी माहिती त्यांनी विचारली होती.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन / भारतीय संविधान दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.

  • १९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.

  • १९४९: भारताची घटना मंजूर झाली.

  • १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

  • १९६५: अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

  • १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.

  • १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

  • १९९९: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

  • २००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

  • २००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६/११ म्हणून ओळखले जाते.

जन्म

  • १८८५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७५)

  • १८९०: भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७७)

  • १८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.

  • १९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१)

  • १९०४: भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०११)

  • १९१९: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०११)

  • १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ – नडियाद, गुजराथ)

  • १९२३: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९७५ – मुंबई)

  • १९२३: भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २०१४)

  • १९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.

  • १९३९: अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म.

  • १९४९: पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.

  • १९५४: एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २००९)

  • १९६१: कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.

  • १९७२: हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म.

  • १९८३: फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८९९)

  • १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. (जन्म: २ मे १८९९)

  • १९९९: पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचे निधन.

  • २००८: मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह १७ पोलीस कर्मचारी शहीद.

  • २०१२: भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)

  • २०१६: रशियन विमान मिग-२९ चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.