चालू घडामोडी - २६ ऑक्टोबर २०१८

Date : 26 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना टागोर पुरस्कार जाहीर :
  • आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम सुतार यांच्यासह मणिपुरी शास्त्रीय नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह यांना २०१४ या वर्षासाठीचा तर बांगलादेशातील छायानौत या सांस्कृतिक संस्थेला २०१५ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची नावं निवडली आहेत अशी माहिती समोर आली आहे. या समितीत चीफ जस्टिस ऑफ इंडिया रंजन गोगोई यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने रविंद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंतीपासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे.

  • कोण आहेत राम सुतार - राम सुतार हे जागतिक किर्तीचे शिल्पकार आहेत. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ते शिल्प निर्मिती करत आहेत. त्यांच्या कलेतील योगदानासाठी त्यांना २०१६ मध्ये पद्मभूषण आणि १९९९ मध्ये पद्मश्री या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या शिल्पांसह अनेक शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे. एवढंच नाही तर फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांची शिल्पं पोहचली आहेत. भारतातले दिग्गज शिल्पकारांपैकी एक अशी त्यांची ख्याती आहे.

सीबीआय महासंचालकांची नियुक्ती कशी होते :
  • नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि विरोधीपक्षाचे नेते या तिघांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार सीबीआय महासंचालकांची नियुक्ती करतं. लोकपाल कायद्यानंतर आधीच्या नियुक्तीच्या पद्धतीत बदल झाला.

  • सरन्यायाधीश स्वतः उपस्थित राहू शकत नसतील, तर ते सुप्रीम कोर्टातल्या एखाद्या न्यायमूर्तींनाही नॉमिनेट करु शकतात. अधिकृतपणे विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झाली नसेल, तर लोकसभेमध्ये सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा गटनेता या समितीमध्ये असतो.

  • सीबीआय महासंचालकांच्या नियुक्तीची सुरुवात गृहमंत्रालयापासून होते. या पदासाठी पात्र असलेल्या आयपीएस ऑफिसरची सेवाज्येष्ठता आणि अनुभवानुसार गृहमंत्रालयाकडून यादी तयार होते.

  • गृहमंत्रालयाकडून ही यादी डीओपीटी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगकडे जाते. ते या यादीला सेवेतल्या इतर काही कौशल्यांचा विचार करुन सुधारित रुप देतात. ही यादी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीसमोर येते.

  • नियुक्तीचा निर्णय सर्वसंमतीने किंवा बहुमताने होऊ शकतो. एखाद्या सदस्याचा नियुक्तीस विरोध असल्यास त्याची रेकॉर्डमध्ये नोंद करावी लागते.

भारतीय वंशाच्या डॉ. अभय अष्टेकरांचा आइन्स्टाइन पुरस्काराने सन्मान :
  • कृष्णविवरांमधील टक्कर यांसारख्या जटिल भौतिक घटनांचा अभ्यास करण्याचे समीकरण तयार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ डॉ. अभय अष्टेकर यांना  प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार  नुकताच प्रदान करण्यात आला.

  • अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या (एपीएस) वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. एपीएस ही भौतिक शास्त्रज्ञांची जगातील दुसऱ्या क्रमांकांची संस्था आहे. अष्टेकर यांना प्रदान केलेल्या पुरस्काराचे स्वरूप १० हजार डॉलर असे आहे.

  • अल्बर्ट आइन्स्टाइनने काही दशकांपूर्वी वर्तवलेल्या गुरुत्वाकर्षणासंबंधीची भविष्यवाणी समजून घेण्यासाठी अष्टेकर यांनी १९८७मध्ये गणितीय समीकरण मांडले. त्यालाच लूप क्वॉंटम ग्रॅव्हिटी सिद्धान्त किंवा अष्टेकर व्हेरीअबल्स असे म्हटले जाते. जगातील अनेक शास्त्रज्ञ या सिद्धांतावर आधारित संशोधन करीत आहेत.

  • अष्टेकर यांनी क्वॉंटम फिजिक्स आणि सामान्य सापेक्षता यांच्या एकत्रीकरणातून लूप क्वॉंटम ग्रॅव्हिटी हा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताचा आज महत्त्वाचा घटक आहे. कृष्णविवरांमधील टक्कर यांसारख्या प्रचंड घटना उलगडून सांगण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग करण्यात येत आहे.

  • काळ आणि वेळेचे स्वरूप, एकरेषीय नसलेल्या सामान्य सापेक्षतेतील गुरुत्वीय लहरी, महास्फोट, कृष्णविवरांमधील ऊर्जेचे स्वरूप याबद्दलची जगाची समज अष्टेकर यांच्या संशोधनामुळे वाढली, असे एपीएसने म्हटले आहे.

हिरा व्यापाऱ्याची पुन्हा दरियादिली, दिवाळीला ६०० कार कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या :
  • सुरत : दिवाळीच्या मुहूर्तावर सावजी ढोलकिया या गुजरातच्या सुरतमधील हिरा व्यापाऱ्याने सलग चौथ्या वर्षी कर्मचाऱ्यांना बंपर बोनस दिला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस म्हणून 600 कार देत धमाकेदार बंपर गिफ्ट दिलं आहे. ढोलकियांनी यापूर्वी आपल्या कंपनीतील 1260 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केली आहे, तर 400 कर्मचाऱ्यांना घरखरेदी करण्यात मदत केली आहे.

  • ढोलकिया यांच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर 6 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यांचा व्यवसाय 71 देशांमध्ये विस्तारला आहे. काही कर्मचाऱ्यांना यापूर्वीच बोनसच्या रुपात कार देण्यात आली होती, तर काहींचा यावर्षी नंबर लागला आहे.

  • दोन वर्षापूर्वी कंपनीतील 491 कामगारांना कार भेट मिळाली होती. तर 207 कामगारांना दोन बेडरुमचा फ्लॅट दिवाळीचा बोनस म्हणून देण्यात आला होता. 503 कर्मचाऱ्यांना दागिने भेट म्हणून देण्यात आले होते. सावजी भाई ढोलकिया यांची हरे कृष्ण डायमंड एक्सपोर्ट कंपनीमध्ये जवळपास साडेपाच हजार कर्मचारी काम करतात. त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 6 हजार कोटी रुपये आहे.

  • त्यांनी याआधी आपल्या कंपनीतील तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडीज देखील गिफ्ट केली आहे. ढोलकिया यांच्याकडून या दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना 600 कार देऊन पुन्हा आपल्या मोठेपणाचा परिचय दिला आहे. ढोलकियांनी दिलेल्या बोनसमुळे कर्मचाऱ्यांमध्येही नवा उत्साह संचारला आहे. पुन्हा सरप्राईज गिफ्ट मिळेल, या आशेने कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत.

सिंधू पुन्हा दुसऱ्या स्थानी :
  • नवी दिल्ली : स्टार पी.व्ही. सिंधूने गुरुवारी जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफ ताज्या विश्व क्रमवारीत पुन्हा एकदा दुसरे स्थान पटकावले.

  • सिंधूने एका स्थानाने प्रगती करुन चिनी तैपईच्या ताय ज्यू यिंगनंतर दुसरे स्थान पटकावले. सिंधू गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रथमच दुसºया क्रमांकावर पोहोचली होती, पण त्यानंतर तिची घसरण झाली.

  • सिंधू त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दुसºया स्थानी होती. सायनाने एका स्थानाने प्रगती करत नववे स्थान मिळवले. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत सहाव्या स्थानी कायम असून समीर वर्माने १८ वे स्थान गाठले आहे.

यवतमाळ येथील साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला :
  • पुणे : घटनादुरुस्तीत नमूद केल्याप्रमाणे साहित्य महामंडळाकडे सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांच्याकडून नावे प्राप्त झाली असून, २८ आॅक्टोबर रोजी होणार असलेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

  • साहित्यसंस्थांनी सुचवलेल्या नावांमध्ये प्रभा गणोरकर आणि डॉ. अरुणा ढेरेयांचा समावेश आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या नऊ दशकांच्या इतिहासात अध्यक्षपदी महिला साहित्यिका विराजमान होणार का, याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

  • यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला.

  • त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावे मागवण्यात आली होती. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने नावे माघारी घेतल्याने त्या नावांचा विचार केला जाणार नाही. इतर नावांबाबत चर्चा झाल्यावर बहुमताने एका नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

पर्यावरणाला धोका न पोहचवता सण साजरे करा - राष्ट्रपती :
  • राजधानी दिल्लीमध्ये सध्या हवा प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला असून इथल्या लोकांना श्वास घेण्यासही अडचणी येत आहेत. आता दिवाळी सणही येत असल्याने या काळात फटाक्यांमुळे इथली हवा अधिकच विषारी बनणार आहे. याची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काळजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सण साजरे करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याबाबत सामाजिक संघटनांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करावी अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.

  • दिल्लीत आंतरराष्ट्रीय आर्य महासम्मेलन २०१८ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राष्ट्रपती म्हणाले, सध्याचा काळ हा हिवाळी सणांचा काळ आहे. या काळात हवेतील प्रदुषणाच्या पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे दिल्लीकरांना श्वसनासही अडचणी येत आहेत. त्यामुळे या सणांच्या काळात समाजात शांतता आणि एकोपा टिकवण्याबरोबरच पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी सामाजिक संघटनांनी जनजागृती करावी.

  • गेल्या काही आठवड्यात दिल्लीतील हवेचा दर्जा कमालीचा घसरला असून त्यामुळे दिवसभर शहरात धुसर वातावरण असते. याला काही नैसर्गिक कारणे असली तरी शहरातील वाहनांमधून होणारे प्रदुषण, बांधकाम उद्योगामुळे उडणारी धूळ तसेच शेजारील पंजाब आणि हरयाणा सारख्या राज्यांमध्ये थंडीच्या काळात नव्या गव्हाच्या हंगामासाठी जुन्या निघालेल्या पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण मोठे असल्याने त्याचा थेट परिणाम दिल्लीतील हवेवर होत असतो. दिल्लीतील हवा प्रदुषणाची ही समस्या आता नेहमीचीच बनली असून श्वसनासाठीही त्रास होत असल्याने परिस्थिती गंभीर आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय इंटरसेक्स जागृकता दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.

  • १९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.

  • १९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.

  • १९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.

  • १९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.

  • १९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

  • १९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

  • १९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.

जन्म 

  • १२७०: संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०)

  • १८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)

  • १८९१: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६४)

  • १९००: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९९३)

  • १९१९: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८०)

  • १९३७: संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.

  • १९४७: अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०९: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८४१)

  • १९३०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १८६०)

  • १९७९: अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.

  • १९९१: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)

  • १९९९: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.