चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ सप्टेंबर २०१९

Date : 26 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक स्नूकर स्पर्धा - अडवाणी-मेहता जोडीला विश्वविजेतेपद :
  • मंडाले (म्यानमार) : भारताच्या पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता जोडीने आव्हानात्मक थायलंडच्या संघाचा पराभव करीत बुधवारी ‘आयबीएसएफ’ जागतिक स्नूकर स्पर्धेतील सांघिक विजेतेपदावर नाव कोरले. अडवाणीच्या खात्यावर हे २३वे जागतिक जेतेपद जमा झाले आहे. तंदुरुस्तीमुळे भविष्यापुढे प्रश्नचिन्ह उभ्या राहिलेल्या आदित्यचे हे पहिलेवहिले विश्वविजेतेपद ठरले.

  • आदित्यने अंतिम सामन्यातील पहिल्या टप्प्यात ६५-३१ अशी विजयी आघाडी मिळवली. मग गेल्याच आठवडय़ात जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या पंकजने दुसऱ्या टप्प्यात ९-६९ अशी हार पत्करली. मग दुहेरीची लढत भारताने जिंकताना ५५ ब्रेक गुण मिळवले. भारताने ३-२ अशी आघाडी मिळवली असल्याने सर्वोत्तम नऊ सामन्यांच्या अंतिम सामन्यात आणखी दोन विजयांची आवश्यकता होती. मग पंकजने ५२ ब्रेक गुणांसह सहावा आणि आदित्यने ८९-९ गुणांसह सातवा सामना जिंकला.

  • ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बिलियर्ड्स स्पध्रेसाठी जाण्यापूर्वी अडवाणी आठवडय़ाभरासाठी भारतात येणार आहे.

स्वच्छ भारत मोहिमेमुळे शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यात यश – पंतप्रधान मोदी :
  • न्यूयॉर्क : स्वच्छ भारत मोहिमेमुळे संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेली  उद्दिष्टे व लक्ष्ये साधण्यात भारताला फायदा झाला असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

  • बिल व मेलिंडा गेटस फाउंडेशनचा ग्लोबल गोलकीपर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला असता ते बोलत होते. ते म्हणाले की, स्वच्छता अभियानामुळे भारताला संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे साध्य करण्यात मोठी मदत झाली. म.गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार मिळाला हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. १३० कोटी लोकांनी जर एखादे ध्येय ठरवले त्यासाठी शपथ घेतली तर कुठलेही आव्हान पार पाडता येते हे स्वच्छता अभियानातून आम्ही सिद्ध केले आहे.

  • स्वच्छ भारत अभियानाचे यश हे कुठल्याही आकडेवारीच्या पलीकडे आहे. देशातील लोकांनी यात मोठी  भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे हा सन्मान त्यांचाही आहे.  स्वच्छ भारत अभियान मोहिमेचे जनचळवळीत रूपांतर करणाऱ्या लोकांचे हे यश आहे, त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेला प्राधान्य दिले. दुसऱ्या कुठल्याही देशात अशी मोहीम पूर्वी झाल्याचे ऐकिवात नाही. ही मोहीम सरकारने सुरू केली असली तर नंतर लोकांनीच ती पुढे नेली.  गेल्या पाच वर्षांत देशात अकरा कोटी स्वच्छतागृहे बांधण्यात आली. तो एक विक्रम आहे. या मोहिमेचा फायदा गरीब व महिला  यांना जास्त प्रमाणात झाला. स्वच्छतागृहे नसल्याने मुली शिक्षण सोडून देत होत्या आता हे थांबत आहे.

  • कार्यक्रमानंतर मोदी यांनी मेलिंडा गेट्स व बिल गेट्स यांची भेट घेतली. गेट्स फाउंडेशनच्या अहवालातही ग्रामीण स्वच्छतेमुळे मुलांमधील हृदयाच्या समस्या सुटण्यास मदत झाली, महिलांमध्ये बॉडी मास इंडेक्स सुधारला हे मान्य करण्यात आल्याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.  महात्मा गांधीचा स्वच्छतेचा संदेश हा  स्वातंत्र्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा होता असे मत त्यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील कंपन्यांना मोदींचे आमंत्रण :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेतील कंपन्यांनी वेगाने वाढणाऱ्या भारतीय  बाजारपेठेत गुंतवणूक करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले. आमच्या सरकारने कंपनी कर कमी केला असून गुंतवणूक व उद्योगास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे त्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले. न्यूयॉर्क येथे ब्लुमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरमच्या परिषदेत ते बोलत होते.

  • येथील कंपन्यांना वेगाने वाढणाऱ्या  बाजारपेठेत, स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी गुंतवणुकीसाठी  भारतात यावे आमच्याकडे उद्योगास अनुकूल अशी पायाभूत परिसंस्था तयार आहे असे सांगून ते म्हणाले की, सरकार आणखी चांगल्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे.

  • सरकारने अलीकडेच कंपनी कर ३५ टक्क्यांवरून २५.१७ टक्के केला होता त्यामुळे भारत करनिर्धारणाच्या पातळीवर जागतिक अर्थव्यवस्थांच्या बरोबरीने आला आहे. हाच धागा पकडून त्यांनी गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण केल्याचा दावा जागतिक उद्योग धुरिणांच्या उपस्थितीत केला.

  • गेल्या पाच वर्षांत आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेत १ लाख कोटी डॉलर्सची भर टाकली असून पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देशात लोकशाही, राजकीय स्थिरता, निश्चित धोरण, निष्पक्ष न्याय हमी हे इतरही घटक आता मजबूत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

PMC बँक प्रकरण: फक्त एका खात्यानं बुडवली ३५ वर्ष जुनी बँक :
  • अनुत्पादित कर्ज मालमत्तेचे प्रमाण प्रत्यक्षात जितके आहे त्यापेक्षा कमी दाखविल्याबद्दल आणि अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांच्या कथित कारणांसाठी मंगळवारी मुंबईस्थित पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अर्थात ‘पीएमसी’ बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लागू करण्यात आले. महिनाभरात निर्बंध आणण्यात आलेली ही राज्याच्या सहकार क्षेत्रातील चौथी बँक आहे.

  • बँकिंग नियमन कायद्याच्या ‘कलम ३५ ए’नुसार झालेल्या कारवाईने पीएमसी बँकेचा ‘बँकिंग परवाना’ रद्दबातल केला गेलेला नाही. तरी निर्बंध काळात पीएमसी बँकेला रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवानगीशिवाय कर्ज वितरणाला, नवीन गुंतवणूक करण्याला किंवा निधी मिळवून दायित्व वाढविता येणार नाही. त्याचप्रमाणे नव्याने ठेवी स्वीकारण्याला, तसेच ठेव वठविणे, देणी चुकती करण्याला आणि आपल्या कोणत्याही स्थावर मालमत्ता व संपत्तीची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य मार्गाने विल्हेवाटीवर बंदी आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकेवर निर्बंध का घालण्यात आले याची माहिती मात्र देण्यात आली नाही. परंतु केवळ एका खात्यामुळेच बँके डबघाईला आल्याची माहिती आता समोर येत आहे.

  • रियल इस्टेट फर्म हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर २ हजार ५०० कोटी रूपयांचे कर्ज आहे. परंतु ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे कर्ज एनपीएमध्ये टाकणे आवश्यक होते. कंपनीकडून कर्ज भरलं गेलं नसलं तरी बँकेने ते कर्ज एनपीएमध्ये टाकलं नाही. मुंबई मिररने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा प्रकरणांमध्ये बँकांना होणाऱ्या नुकसानीची माहिती देणं आवश्यक आहे. पीएमसी बँकेचे कॅश रिजर्व्ह १ हजार कोटी तर कंपनीचं २ हजार ५०० कोटी रूपयांचं कर्ज थकीत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

नरेंद्र मोदींपाठोपाठ जगभरात धोनीचीच हवा :
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु असली तरीही त्याच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडलेला नाहीये. YouGov या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या निकषात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या यादीमध्ये मोदींपाठोपाठ आपलं स्थान मिळवलं आहे. या सर्वेक्षणामध्ये ४१ देशांमध्ये ४२ हजार लोकांची मत नोंदवण्यात आली होती.

  • टक्केवारीच्या निकषांमध्ये मोदींची लोकप्रियता ही १५.६६ तर धोनीची लोकप्रियता ही ८.५८ टक्के इतकी आहे. या खालोखाल यादीमध्ये सचिन तेंडुलकर ५.८१, विराट कोहली ४.४६, ख्रिस्तीयानो रोनाल्डो २.९५ तर लायनल मेसी २.३२ टक्के हे खेळाडू आहेत. देशभरात असलेल्या चाहत्यावर्गाच्या निकषावर ही टक्केवारी काढण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे, भारतीय संघात धोनीला स्थानही मिळवता आलेलं नाही. मात्र तरीही धोनीची लोकप्रियता कायम आहे.

  • महिलांच्या यादीत बॉक्सर मेरी कोमने १०.३६ टक्क्यांसह पहिल्या तर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी दुसऱ्या, लता मंगेशकर तिसऱ्या, माजी भाजप नेत्या सुषमा स्वराज चौथ्या आणि बॉलिवूड सेलिब्रेटी पाचव्या स्थानावर आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७७७: अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.

  • १९०५: अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख  प्रकाशित केला.

  • १९१०: त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.

  • १९५०: इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९५४: जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.

  • १९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

  • १९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

  • १९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

  • १९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९७: गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.

  • २००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.

  • २००९: टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.

जन्म 

  • १८२०: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)

  • १८४९: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)

  • १८५८: लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)

  • १८७०: डेन्मार्कचा राजा क्रिस्चियन (दहावा) यांचा जन्म.

  • १८७६: भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १८५२)

  • १८८८: अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी. एस. इलिय यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)

  • १८९४: प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)

  • १९०९: नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)

  • १९१८: मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०००)

  • १९२३: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)

  • १९२७: गेटोरेडे चे सह-संशोधक रॉबर्ट कड यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००७)

  • १९३१: भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९८३)

  • १९३२: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.

  • १९४३: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म.

  • १९७२: न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू मार्क हॅस्लाम यांचा जन्म.

  • १९८१: अमेरिकन टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०२: लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापकलेवी स्ट्रॉस यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)

  • १९५२: स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज सांतायाना यांचे निधन.

  • १९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)

  • १९७७: भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)

  • १९८८: रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)

  • १९८९: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९२०)

  • १९९६: मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२४)

  • २००२: मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)

  • २००८: अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२५)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.