चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ एप्रिल २०१९

Date : 27 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
JIO वर तीन लाख कोटींचे कर्ज, जपानची कंपनी गुंतवणूक करणार :
  • नवी दिल्ली - देशातील टेलिकॉम क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेली रिलायन्स जियोमध्ये लवकरच परदेशी कंपनी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे. जगभरात 13 व्या क्रमांकावर असलेले श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या जियोमध्ये जपानच्या सॉफ्टबॅंकने गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. जपानची ही कंपनी 20 हजार कोटी जियोमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

  • करोडपती मुकेश अंबानी यांनी जियोमधील काही हिस्सा विकण्यासाठी इच्छुक आहेत. आरआयएलने टेलिकॉम क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी रिलायन्स जियोला कोट्यावधी रुपये दिले होते. आत्तापर्यंत तीन लाख कोटींचे कर्ज जियोच्या डोक्यावर असल्याने भार हलका करण्यासाठी मुकेश अंबानीकडून जियोमधील काही शेअर्स विकण्याची तयारी दर्शवली आहे. आर्थिकतज्ज्ञांच्या माहितीनुसार हा व्यवहार मुकेश अंबानीच्या उत्तम बाजार कौशल्याचं उदाहरण आहे.

  • जेपी मॉर्गन यांच्या माहितीनुसार, जपानमधील सॉफ्टबॅंक खूप दिवसांपासून जियोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक होती. मागील दोन वर्षापासून अनेक गुंतवणुकदारांशी चर्चा सुरु होती. ज्यामध्ये सॉफ्टबॅँक या जपानमधील टेलिकॉम कंपनीने जियोमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचं दिसून आलं.

  • रिलायन्स जियो गेल्या तीन वर्षापासून भारतात टेलिकॉम क्षेत्रात अग्रगण्य राहिली आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणं भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र प्रत्यक्षात सॉफ्टबँक रिलायन्स जियोमध्ये कितपत पैसे गुंतवणूक करणार हे सांगणे कठीण आहे. कारण येणाऱ्या काळात रिलायन्स ई-कॉमर्स माध्यमातूनही व्यवसाय सुरु करणार असल्याचं बोललं जातंय. पीटीआयच्या वृत्तानुसार जियोमधील शेअर्स खरेदी करण्यासाठी सॉफ्टबॅंक कंपनी कायदेशीर प्रक्रियेवर काम करत आहे. मात्र या व्यवहारावर बोलण्यासाठी रिलायन्स आणि सॉफ्टबँक कंपनीकडून नकार देण्यात आला आहे. 

६ कोटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!, 'ईपीएफ'वर यंदा ८.६५ टक्के व्याज :
  • नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2018-19 साठी कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) 8.65 टक्के व्याज देण्याच्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या(ईपीएफओ) प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे ईपीएफओच्या 6 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) ईपीएफओच्या चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ 8.65 व्याज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

  • सुत्रांनी सांगितले की, वित्तीय सेवा विभागाने रिटायरमेंट फंडच्या पुरेशा व्यवस्थापनाशी निगडीत काही अटी पूर्ण करण्याच्या आधारावर ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. 

  • गेल्या तीन वर्षांत ईपीएफच्या व्याजदरात केलेली ही पहिली वाढ आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात 8.8 टक्के इतका व्याजदर होता, तो 2016-17 मध्ये 8.65 टक्क्यांवर आणण्यात आला. 2017-18 मध्ये तो 8.55 टक्के म्हणजे आणखीच घट करण्यात आली. मात्र, आता 2018-19 मध्ये वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर आता आयकर विभाग आणि श्रम मंत्रालय 2018-19 साठी व्याजदरची अधिसूचना जारी करेल. त्यानंतर ईपीएफओ आपल्या 120 हून अधिक क्षेत्रिय कार्यालयांना कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजदर जमा करण्यासाठी निर्देश देईल. 

मध्यमवर्गाचे योगदान अमूल्य – मोदी :
  • सरकारी सवलतींचा त्याग करण्यापासून ते देशाच्या शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कराच्या रूपाने पैसा देणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या योगदानातूनच देश चालतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील प्रचारसभेत मध्यमवर्गीय मतदारांना साद घातली.

  • मुंबईतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वांद्रे- कुर्ला संकुलात झालेल्या प्रचार सभेत मोदी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी होते. या सभेत मोदी यांनी मुंबईचे प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा यांचा ऊहापोह केला. मुंबईकरांना हवेचा बरोबर अंदाज येतो. या वेळीही ते रालोआलाच पाठिंबा देतील, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

  • देशावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना आम्ही त्यांच्या देशात घुसून मारले असून यापुढेही त्यांनी आगळीक केल्यास पाताळातून बाहेर काढून त्यांना मारू, असा इशारा देत मोदी यांनी अनेक दहशतवादी हल्ले सोसलेल्या मुंबईकरांना सुरक्षेची हमी दिली. देशातील विविध योजनांना, पायाभूत क्षेत्र विकासाला पैसा पुरवून देश चालवतो. अशा मध्यमवर्गाचा काँग्रेस जाहीरनाम्यात साधा उल्लेखही नाही, अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेस मध्यमवर्गविरोधी असल्याचा दावा केला.

  • साध्वी प्राज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांचे शौर्य, त्याग, बलिदान यांचे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी केले. आजवर ३३ हजार पोलीस शहीद झाले असून पोलिसांचे देशातील पहिले स्मारक नवी दिल्ली येथे उभारण्याचे काम भाजप सरकारने केले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

‘आयसिस’चे १३० हून अधिक हस्तक श्रीलंकेत कार्यरत :
  • आयसिसशी संबंधित जवळपास १३० हून अधिक संशयितांच्या श्रीलंकेमध्ये कारवाया सुरू असल्याचे शुक्रवारी अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी सांगितले. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्यानंतर सिरिसेना यांनी ही माहिती दिली आहे.

  • रविवारी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, श्रीलंकेतून दहशतवाद्यांच्या जाळ्याचा संपूर्ण नायनाट केला जाईल, असे सिरिसेना म्हणाले. आयसिसशी संबंधित १३०-१४० जणांच्या श्रीलंकेत कारवाया सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे, जवळपास ७० जणांना अटक करण्यात आली आहे, सर्वाना लवकरच अटक केली जाईल आणि दहशतवादाचा नायनाट केला जाईल, असे सिरिसेना म्हणाले.

  • दरम्यान, इस्टर सणावेळी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी संरक्षण सचिव व पोलिस प्रमुख यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी पोलिस प्रमुख पुजिथ जयसुंदरा यांनी राजीनामा दिला आहे.

  • सिरीसेना हे संरक्षणमंत्रीही आहेत. त्यांच्या आदेशानुसार पोलिस महानिरीक्षकांनी त्यांचा राजीनामा हंगामी संरक्षण सचिवांकडे पाठवला आहे. नवीन पोलिस महानिरीक्षकांची नियुक्ती लवकरच केली जाईल, असे सिरीसेना यांनी म्हटले आहे. रविवारच्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण सचिव हेमासिरी फर्नाडो यांनी त्यांचा राजीनामा कालच अध्यक्षांना सादर केला होता. जयसुंदरा व फर्नाडो या दोघांनाही अध्यक्ष सिरीसेना यांनी राजीनामा देण्यास सांगितले होते.

महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी :
  • मुंबई : महाराष्ट्रासह देशातल्या 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे..  कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी या संभाव्य हल्ल्याचं पत्र लिहून याबाबत यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • ज्या शहरांना समुद्रकिनारा लाभला आहे. त्या शहरांमध्ये हल्ल्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मुंबईसह सर्व महत्वाच्या शहरांमध्ये कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोवा, तमिलनाडु, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगानासह 8 राज्यांना अलर्टच्या सूचना दिल्या आहेत. एका व्यक्तीनं बंगळूरच्या पोलीस कंट्रोल विभागात फोन करुन या हल्ल्याची माहिती दिल्याची बोललं जातंय.

  • श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आधीपासूनच किनारा लाभलेल्या राज्यांमधील  कोस्ट गार्ड, कोस्टल मरीन पोलीस आणि स्थानिक पोलिसांना अलर्ट देण्यात आलेले आहेत.

  • श्रीलंका बॉमस्फोटामध्ये सहभागी असणारे काही दहशतवादी समुद्री मार्गाने भारतात घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • स्वामी सुंदर मूर्ती नावाच्या एका व्यक्तीने शुक्रवारी बंगळुरू सिटीच्या कंट्रोल रूमला फोन करून याबाबत माहिती दिली. तामिलनाडु, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, पुद्दुचेरी, गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील मोठी शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. दहशतवादी या राज्यांमध्ये ट्रेनवर हल्ला करण्याची शक्यता आहे. तामिलनाडुच्या रामनाथपुरममध्ये 19 दहशतवादी असल्याचा दावा देखील मूर्तीने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालमत्ता किती :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता आहे. लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज  भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात याबाबत उल्लेख आहे. मोदींच्या अचल संपत्तीमध्ये गांधीनगरमधील एका सदनिकेत 25 टक्के मालकी आहे. तर मोदींच्या हातात फक्त 38 हजार रुपये रोकड आहे.

  • मोदींची चल (जंगम) संपत्ती 1.41 कोटी रुपयांच्या घरात आहे, तर अचल (स्थावर) संपत्ती 1.10 कोटी रुपये आहे. मोदींवर एकाही रुपयाचं कर्ज नाही. सरकारकडून मिळणारा पगार आणि बँकेतून मिळणारे व्याज हे मोदींच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा जदयू अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाश सिंह बादल यांच्यासह एनडीए घटकपक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८५४: पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

  • १९०८: चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.

  • १९६१: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.

  • १९९२: बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.

  • १९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.

  • २००५: एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

  • २०११: अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले.

जन्म 

  • १७९१: मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल १८७२)

  • १८२२: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै १८८५)

  • १८८३: नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९६४)

  • १९१२: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०१४)

  • १९२०: महात्मा गांधींचे अनुयायी डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९९३)

  • १९२७: मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांचा जन्म.

  • १९७६: पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५२१: पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलन यांचे निधन.

  • १९८०: पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०१)

  • १८८२: अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचे निधन. (जन्म: २५ मे १८०३)

  • १९८९: पॅनासोनिक कंपनी चे स्थापक कोनोसुके मात्सुशिता यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८९४)

  • १८९८: ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८५३)

  • २००२: बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक रुथ हँडलर यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९१६)

  • २०१७: भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.