चालू घडामोडी - २७ ऑगस्ट २०१८

Date : 27 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नॉनबँकिंग फायनान्शिअल क्षेत्रात तब्बल अडीच ते तीन लाख नोकऱ्या :
  • मुंबईनोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षभरात देशाच्या नॉनबँकिंग फायनान्शियल क्षेत्रात तब्बल अडीच ते तीन लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्राची पस्तीस ते चाळीस टक्के वेगाने वाढ होणार असल्याचा अंदाज आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

  • बँकांसमोर सध्या नॉन परफॉमिंग असेटचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्या आव्हानाचा सामना करत आपली आर्थिक स्थिती सुधारण्यात बँका अडकल्या आहेत. त्यामुळे देशात बँकसेवांपासून दूर असलेला एक मोठा वर्ग स्वत:कडे वळवण्याची संधी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांना मिळाली आहे. ही संधी साधण्यासाठी त्यांना नव्या तंत्रज्ञानाचे मजबूत पाठबळही आहे.

  • अडीच ते तीन लाख नोकऱ्यांपैकी बहुसंख्य या सेल्स कलेक्शन, अंडररायटिंग आणि रिस्क या विभागांमध्ये उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पुढील 12 महिन्यात तब्बल 35 ते 40 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

धावपटू हिमा दास आणि मोहम्मद अनासला रौप्य पदक :
  • जकार्ता : एशियाडमधील अॅथलेटिक्स प्रकारात भारताच्या हिमा दास आणि मोहम्मद अनासनं रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. हिमानं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदकाची कमाई केली. तर मोहम्मद अनासनं पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत 45.69 वेळेसह दुसरं स्थान मिळवलं.

  • महिलांच्या 400 मीटर शर्यतीत बहरीनच्या सल्वा नासिरने 50.09 सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावलं. एशियाडमध्ये हा नवा विक्रम आहे. कझाकिस्तानच्या एलिना मिखिनाने 52.63 सेकंदात शर्यत पूर्ण करत कास्य पदक पटकावलं. भारताची निर्मला या शर्यतीत चौथ्या स्थानावर राहिली. निर्मलाने ही शर्यत 52.96 सेकंदात पूर्ण केली.

  • पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत कतारच्या हसन अब्देलाहने सुवर्ण पदक तर बहरीनच्या अली खमीसने कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं.

  • भारताचा धावपटू गोविंदन लक्ष्मणनने पुरुषांच्या 10 हजार मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. तामिळनाडूच्या गोविंदनचं एशियाड स्पर्धेतील हे पहिलं पदक आहे.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा झेंडा विसरले, ट्विटरवर झाले ट्रोल :
  • वॉशिंग्टन- संयुक्त अमेरिकेचा ध्वज हा जगभरात सहजगत्या ओळखला जाणार ध्वज आहे. या झेंड्याला अमेरिकेची ओल्ड ग्लोरी असंही संबोधलं जातं. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाच झेंड्याचा विसर पडल्याचा एक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेच्या झेंड्यावर लाल आणि पांढ-या रंगाच्या पट्ट्या आहेत, तसेच झेंड्याच्या एका निळ्या रंगाच्या कोप-यात 50 पांढ-या रंगात तारे दाखवण्यात आले आहेत.

  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्पबरोबर गुरुवारी एका रुग्णालयात लहानग्यांना पाहण्यासाठी पोहोचले होते. ट्रम्प जेव्हा लहानग्यांसह अमेरिकेच्या झेंड्यामध्ये रंग भरत होते. तेव्हा लाल रंगाच्या जागी ट्रम्प एका पट्टीमध्ये चक्क निळा रंग भरत असल्याचं निदर्शनास आलं. हा फोटो एलेक्स अजहर यांनी 24 ऑगस्ट रोजी ट्विटवर शेअर केला. त्यानंतर अजहर यांनी शेअर केलेल्या फोटोंमुळे ट्रम्प ट्रोल झाले आहेत.

  • तर दुस-या एका चित्रातही ट्रम्प यांनी पहिल्या चुकीची पुनरावृत्ती केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पुन्हा लाल रंगाच्या जागी निळा रंग भरला. त्यानंतर ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रम्प ट्रोल झाले. ट्रोलर्सनी ट्रम्प यांना खडे बोलही सुनावले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या शहीद जवानांच्या आठवणी आणि सन्मान देत असताना जाहीर आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती.

क्रिकेटच्या डॉनला गुगलची मानवंदना :
  • मुंबई - 99.94 अशी जबरदस्त सरासरी आणि अवघ्या 52 कसोटी सामन्यांत 29 शतके, एका दिवसात त्रिशतक असे फलंदाजीतले अनेक विक्रम करणारे सर डॉन ब्रॅडमन यांचा आज 111 वा जन्मदिन. क्रिकेटमधील फलंदाजांचे डॉन असलेल्या ब्रॅडमन यांना गुगलने मानवंदना दिली आहे. आज गुगलच्या डुडलवर ब्रॅडमन झळकले आहेत. 

  • 27 ऑगस्ट 1908 रोजी ऑस्ट्रेलियातील कुंटमुद्रा येथे जन्मलेल्या डॉन ब्रॅडमन यांनी क्रिकेटच्या मैदानात अजेक विक्रम प्रस्थापित केले. 1928 ते 1948 या काळात एकूण 52 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना ब्रॅडमन यांनी 99.94 च्या सरासरीने एकूण 6 हजार 996 धावा फटकावल्या. त्यामध्ये 29 शतकांचा समावेश होता.

  • 1931 च्या अॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी 974 धावा फटकावल्या होत्या. हा विक्रम अद्याप अबाधित आहे. तसेच एका दिवसात त्रिशतक फटकावणारे ब्रॅडमन हे एकमेव फलंदाज आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 99.96 च्या सरासरीने धावा फटकावण्याच्या त्यांच्या विक्रमाचा आसपासही कुठला फलंदाज फिरकू शकलेला नाही. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके फटकावणारे ते पहिले फलंदाज होते. त्यांच्या या विक्रमाशी नंतर ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी बरोबरी केली होती. 

‘एकत्र निवडणुकांवर चर्चा हीच वाजपेयींना श्रद्धांजली’ :
  • एकाच वेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्दय़ावर सुरू झालेली चर्चा हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे, देशाची राजकीय संस्कृती बदलणारे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ती समर्पक श्रद्धांजली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

  • ते म्हणाले की, लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या संदर्भातील चर्चा हे सुचिन्ह आहे. सरकार व विरोधक त्यावर मते मांडत आहेत. आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने ही पोषक बाब आहे. खुल्या चर्चाना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे व तीच अटलजींना खरी श्रद्धांजली आहे.

  • एका वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्दय़ावर राजकीय पक्षात मतभेद असून भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल व अद्रमुक, समाजवादी पक्ष व तेलंगण राष्ट्रीय समिती यांनी एकाच वेळी निवडणुका घेण्यास पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, तेलगु देसम, डावे पक्ष व जनता दल धर्मनिरपेक्ष यांनी यास विरोध केला आहे.

  • मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले की, कायदेशीर चौकट असल्याशिवाय लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेता येणार नाहीत. त्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्याकरिता एक वर्ष लागेल. जर एकाच वेळी निवडणुका घ्यायच्या असतील तर २०१९ मध्ये २४ लाख इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे लागतील. ही संख्या केवळ लोकसभा निवडणुकांसाठी लागणाऱ्या यंत्रांच्या दुप्पट आहे. अतिरिक्त १२ लाख मतदान यंत्रांसाठी ४५०० कोटी रुपये खर्च येणार असून तेवढीच व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल यंत्रेही लागतील.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.

  • १९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.

  • १९६६: वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.

  • १९९१: युरोपियन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया लिथुआनिया या देशांच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

  • १९९१: मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

जन्म

  • १८५४: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते दादासाहेब खापर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९३८)

  • १८५९: उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९३२)

  • १८७७: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९१०)

  • १९०८: अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७३)

  • १९०८: ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१)

  • १९१०: इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४)

  • १९१६: रेंज रोव्हर चे सहरचनाकार गॉर्डन बाशफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९१)

  • १९१९: संतसाहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल २०१३)

  • १९२५: रहस्यकथाकार नारायण धारप यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट २००८)

  • १९२५: भारतीय कवीजसवंत सिंग नेकी यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर २०१५)

  • १९७२: मल्ल दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली यांचा जन्म.

मृत्यू

  • १८७५: बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८२६)

  • १९५५: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १८७९)

  • १९७६: हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक मुकेश चंद माथूर तथा मुकेश यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९२३)

  • १९९५: भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मधू मेहता यांचे निधन.

  • १९९७: राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन.

  • २०००:  रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री मनोरमा वागळे यांचे निधन.

  • २००६: चित्रपट दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.