चालू घडामोडी - २७ डिसेंबर २०१८

Date : 27 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्य साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती :
  • मुंबई : ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती राज्य साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी केली आहे.  राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

  • या मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासह अन्य 35 नव्या सदस्यांची नियुक्तीही करण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

  • विचारवंत डॉ.मोरे हे यापूर्वी पुणे विद्यापीठातील तत्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सदस्यपदी कलावंत गिरीष प्रभूणे, चित्रपट समीक्षक अशोक राणे, लेखक अरुण शेवते, भारत ससाणे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, संगीतकार संदीप खरे, आसाराम कसबे, ज्योतीराम कदम, उत्तम बंडू तुपे, रेणू पाचपोर, आशुतोष अडोणी, रवींद्र गोळे, सिसिलीया कार्व्हालो, उमा कुलकर्णी, सुप्रिया अय्यर, डॉ, विद्या पाटील, फरझाना डांगे, उषा परब, राणी दुर्वे, सुधीर पाठक, ए.के.शेख, विजय पाडळकर, जगन्नाथ शिंदे, अशोक सोनावणे, डॉ. रणधीर शिंदे, लखनसिंग कटारे, पत्रकार अरुण करमकर, शंकर धडके, संजय ढोले, देवीदास पोटे, रमेश पवार, डॉ. उत्तम रुद्रावतार, डॉ. मधुकर वाकोडे यांच्यासह 35 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

२९ डिसेंबरनंतर तुमचं टीव्ही पाहणं स्वस्त होणार की महाग :
  • मुंबई : टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) येत्या वर्षात ग्राहकांना पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे ग्राहकांना जे चॅनेल्स पाहायचे आहेत केवळ त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. परंतु त्यासोबत केबल टीव्ही ऑपरेटर्स, डीटीएच ऑपरेटर्स आणि ग्राहकांवर काही बंधनेही घातली आहेत. नव्या नियमांमुळे ग्राहकांचे टीव्ही पाहणे खूप स्वस्त होणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.

  • परंतु नव्या अटी जाचक असून त्यामुळे आमच्यासोबत ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागणार असल्याचे केबल आणि डीटीएच ऑपरेटर्सचे म्हणणे आहे. त्यामुळेच देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवारी (27 डिसेंबर) तीन तास केबल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षक प्राईम टाईममधील त्यांच्या आवडीच्या मालिकांना मुकणार आहेत.

  • दर महिन्याला किती खर्च - नेटवर्क फी म्हणून ग्राहकांकडून 130 रुपये आणि त्यावरील टॅक्स घेतला जाईल. ज्यामध्ये ग्राहकांना 100 फ्री टू एअर चॅनेल्स दिले जातील त्यापैकी 26 चॅनेल्स हे दूरदर्शनचे आहेत. दूरदर्शनचे चॅनेल्स ग्राहकांना देणे अनिवार्य आहे. हे सर्व चॅनेल्स ट्रायने निवडलेले आहेत. यापेक्षा जास्त आणि आवडीचे चॅनेल्स पाहण्यासाठी ग्राहकांना त्या-त्या चॅनेलच्या बेस प्राईस रेंजनुसार पैसे द्यावे लागतील. चॅनेल्सची सबस्क्रिप्शन प्राईस रेंज 1 ते 19 रुपये इतकी आहे. आवडीच्या 25 चॅनेल्ससाठी अतिरिक्त 20 रुपये द्यावे लागतील

आज तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर लोकसभेत चर्चा, काँग्रेसही होणार सहभागी :
  • नवी दिल्ली : मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक असलेल्या तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरविण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर लोकसभेमध्ये गुरुवारी चर्चा होणार आहे. हा निर्णय लोकसभेने गेल्या आठवड्यात घेतला. त्या चर्चेत सहभागी होण्याचे काँग्रेसने मान्य केले आहे.

  • तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधकांनी गदारोळ माजवू नये असे आवाहन संसदीय कामकाजमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.

  • राफेल खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने लावून धरली आहे. त्या मुद्यावरून लोकसभा, राज्यसभेत विरोधकांकडून सतत आवाज उठविला जातो. त्यातून होणाऱ्या गदारोळामुळे सभागृहांचे कामकाज तहकूब करण्याची वेळ वारंवार आली आहे.

  • तिहेरी तलाकसंदर्भातील नवे विधेयक लोकसभेत १७ डिसेंबर रोजी मांडण्यात आले. त्यातील तरतुदींनुसार आरोपी पतीस तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. हे नवे विधेयक मंजूर झाल्यास ते याआधी याच विषयावरील लोकसभेत संमत झालेल्या जुन्या विधेयकाची जागा घेईल. आधीच्या विधेयकात काही दुरुस्त्या करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.

  • तिहेरी तलाकच्या ४३० घटना तिहेरी तलाकवर बंदी घालणारा वटहुकूम जारी झाला होता. त्याची मुदत सहा महिनेच आहे. ती संपण्याआधी संसदेच्या चालू अधिवेशनात या विषयाचे विधेयक मांडल्यानंतर ४२ दिवसांच्या आत ते मंजूर करणे अनिवार्य आहे. असे झाल्यास ते विधेयक वटहुकमाची जागा घेईल.

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला, निफाडचा पारा १.८ अंशावर :
  • मुंबई : मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबईत आज 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत काही ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट झाली आहे.

  • मुंबईतं काल कुलाब्यात 20.5 अंश सेल्सिअस, सांताक्रूजमध्ये 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात आज 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट झालेली पाहायला मिळत आहे. सांताक्रूजमध्ये आज 12.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

  • निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद - निफाडचा पारा 1.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. यंदाच्या वर्षात राज्यातील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. सातारा, महाबळेश्वरमध्येही कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं पुढील 2 ते 3 दिवस तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतातल्या ‘या’ हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरच्या रात्रीचे भाडे ११ लाख रुपये :
  • डिसेंबर महिना उजाडला की, अनेकांना ३१ डिसेंबरचे वेध लागतात. नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेक जण पार्टी, पिकनिकांचे बेत आखतात. प्रत्येकजण आपली ऐपत आणि सोयीनुसार ३१ डिसेंबरचा प्लान करतो. भारतातील अतिश्रीमंत वर्गात मोडणारे काहीजण तर ३१ डिसेंबरच्या एकारात्रीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार असतात.

  • अनेक नामांकित पंचतारांकीत हॉटेल्स, रिसॉटर्स ३१ डिसेंबरसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारतात. यंदा राजस्थानमधील हॉटेल्सचे दर पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारतील. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस आणि उदयपूरच्या ताज लेक पॅलेस या हॉटेलमध्ये ३१ डिसेंबरच्या एका रात्रीच्या वास्तव्यासाठी तब्बल ११ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

  • हॉटेलमधील अन्य खोल्यांच्या तुलनेत खास सूटसचे दर नेहमीच जास्त असतात. ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी तर अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये हॉटेलच्या भाडयामध्ये ४० टक्के वाढ झाली आहे असे जयपूरच्या रामबाग पॅलेसच्या सूत्रांनी सांगितले. हॉटेल पूर्ण भरलेले नसेल तर २० टक्क्यापर्यंत सवलत मिळते पण नववर्षाच्यावेळी ही सवलत फार कमी असते तसेच भाडे कमी करुन द्यायलाही कोणी तयार नसते.

  • जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री काही खास सूटससाठी ८.५२ लाख रुपये भाडे आकारले जाते. यामध्ये कराचा समावेश नाही. २०१७ वर्षअखेरीच्या तुलनेत त्यात ७ टक्के वाढ झाली आहे. अन्य हॉटेल्समध्ये हेच दर कमी-जास्त प्रमाणात सारखेच असतात. हॉटेलमधील सूटसचा सरासरी दर २५ ते ७० हजारच्या दरम्यान आहे.

भाजपचे १७ राज्यांमध्ये नवे निवडणूक प्रभारी :
  • नवी दिल्ली : हिंदी पट्टय़ातील तीनही राज्यांमध्ये सत्ता गमावल्यानंतर भाजपने पक्षसंघटना  बळकट करण्यासाठी पावले उचलली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये स्वतंत्र देव सिंह हे मध्य प्रदेशचे नवे निवडणूक प्रभारी असतील तर, सतीश उपाध्याय यांना सहप्रभारी करण्यात आले आहे.

  • गुजरात दंगलीतील सहभागाचा आरोप झालेले गोवर्धन झडाफिया यांच्याकडे उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी पद देण्यात आले आहे.

  • राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी ऐनवेळी प्रकाश जावडेकर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनाच राजस्थानचे लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून कायम ठेवण्यात आले असून सुधांशू त्रिवेदी सहप्रभारी असतील. छत्तीसगढमध्येही डॉ. अनिल जैन यांना प्रभारीपदी कायम ठेवण्यात आले आहे.

  • आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी उत्तर प्रदेश आणि बिहार ही दोन्ही राज्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. बिहारमध्ये ‘एनडीए’तील घटक पक्ष नितीश कुमार यांचा जनतादल (सं) आणि रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष यांना एकत्र ठेवण्याची कसोटी भाजपपुढे आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या विश्वासातील भूपेंद्र यादव यांच्याकडेच प्रभारी पदाची जबाबदारी असेल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 

  • १९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.

  • १९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.

  • १९४५: कोरिया देशाची फाळणी झाली.

  • १९४९: इंडोनेशिया  देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.

  • १९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.

  • २००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.

जन्म 

  • १६५४: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)

  • १७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.

  • १७९७: उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा आग्रा येथे जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)

  • १८९८: विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)

  • १९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)

  • १९४४: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)

  • १९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.

  • १९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२३: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८३२)

  • १९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.

  • १९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.

  • १९७२: कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते लेस्टर बी. पिअर्सन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८९७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.