चालू घडामोडी - २७ फेब्रुवारी २०१९

Date : 27 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंदिरा गांधींनंतर नरेंद्र मोदींनीच पाकिस्तानमध्ये घुसून दाखवले :
  • नवी दिल्ली : दहशतवाद्यांना जन्माला घालणारे कारखाने नष्ट करण्यासाठी हवाई दलाला नियंत्रण रेषा ओलांडण्याची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताचे आगमन झाल्याचा संदेश दिला. इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पूर्ण युद्धाची घोषणा झाल्यावर पाकिस्तानच्या आत हवाई दलाला पाठवले होते. मोदी यांनी ती इच्छाशक्ती ४८ वर्षांनी दाखवत विमानांना एलओसीच्या आत जाण्यास मुभा दिली.

  • दहशतवादाविरुद्ध यापूर्वी विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी एवढेच काय डॉ. मनमोहनसिंग यांनीही असा उपाय केला नव्हता. १९८९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी रुबियाच्या बदल्यात आठ दहशतवाद्यांना सोडण्यात आले.

  • पंतप्रधान चंद्रशेखर यांनी १९९० मध्ये सैफुद्दीन सोझ यांच्या मुलीच्या बदल्यात जेकेएलएफच्या अतिरेक्यांना सोडले. १९९३ मध्ये नरसिंह राव यांनी हजरतबाल मशिदीत ओलिस प्रकरणात अतिरेक्यांना जाऊ दिले होते.

  • १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर व तिघांना कंदाहारमध्ये नेऊन सोडले. त्याच मसूद अझहरने २00१ मध्ये संसदेवर हल्ला घडवून आणला. डॉ. मनमोहनसिंग यांना मुंबई हल्ल्यानंतर स्ट्राइक करायचा होता. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही.

पाकवरील सर्वात मोठ्या सर्जिकल स्ट्राईकचं मराठी कनेक्शन :
  • नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने आज पाकिस्तानी सीमेत घुसून जी कारवाई केली या कारवाईची चर्चा संपूर्ण देशभरात सुरु आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे या अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाईमध्ये ज्या दोन खात्यांनी मोलाची भूमिका बजावली त्या दोन्हीही ठिकाणी मराठी माणूस महत्त्वाच्या भूमिकेत होता. संरक्षण राज्यमंत्री म्हणून सुभाष भामरे आणि परराष्ट्र सचिव  विजय गोखले या संपूर्ण घडामोडींच्या केंद्रस्थानी होते.

  • हवाई दलाच्या कारवाईवेळी जे लोक या संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून होते, त्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचाही समावेश होता. दिल्ली सोडू नका असं दोन दिवसांपूर्वीच भामरे यांना सांगण्यात आलं होतं. ते धुळ्यात असताना त्यांना तातडीने बोलावून दिल्लीत थांबायला सांगितलं गेलं.

  • कालच्या संपूर्ण कारवाईच्या वेळी तेही वॉर रुममध्ये उपस्थित होते. पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल, हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह जे मोजके लोक या कारवाईचे प्रथम साक्षीदार होते त्यात मराठमोळे भामरेही होते.

  • दुसरीकडे या संपूर्ण हल्ल्याची माहिती अधिकृतपणे देण्याची जबाबदारी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांभाळली. या हल्ल्याचं ब्रीफिंग करताना जे शब्द तोलून-मापून वापरण्यात आले होते. त्यातल्या मुत्सद्देगिरीची सगळीकडे कौतुकास्पद चर्चा होती. ही महत्त्वाची प्रेस ब्रेफिंग तयार करण्यात विजय गोखले यांचाच वाटा होता.

बुमरा विश्वातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक :
  • भारताच्या जसप्रीत बुमराने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली असून सध्याच्या घडीला तो विश्वातील सवरेत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने बुमराची स्तुती केली.

  • विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला अखेरच्या चेंडूवर पराभूत केले. कमिन्सनेच विजयी धाव घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र बुमराने अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करताना १९ व्या षटकात दोन फलंदाजांना बाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला होता. बुमराच्या त्या कामगिरीची कमिन्सने दिलखुलासपणे प्रशंसा केली आहे.

  • ‘‘बुमरा नक्कीच अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजी करण्याबरोबरच चेंडूचा अचूक टप्पा राखण्याची कलाही त्याला अवगत आहे. या दोन गोष्टी ज्या गोलंदाजाकडे असतात तो कोणत्याही फलंदाजाला आव्हान देऊ शकतो. खेळाचे उत्तम ज्ञान असल्यामुळेच बुमरा त्याने आखलेल्या व्यूहरचनेची अंमलबजावणी करण्यात यशस्वी ठरत आहे,’’ असे २५ वर्षीय कमिन्स म्हणाला.

  • ‘‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये बुमराची प्रगती दिवसेंदिवस वाढतच असून आजच्या काळात विश्वातील सवरेत्कृष्ट गोलंदाजांमध्ये त्याची गणना हमखास केली जाईल. त्याची गोलंदाजी पहायला चाहत्यांनाही आवडते,’’ असे कमिन्सने सांगितले.

भारताच्या ‘एअर स्ट्राइक’वर चीनने दिली ‘ही’ प्रतिक्रिया :
  • पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ बॉम्बहल्ल्याने उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या या कारवाईनंतर जगभरातील बहुतांश देशांनी भारताच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. त्यानंतर आता पाकिस्तानला सर्वाधिक पाठिशी घालणाऱ्या चीनने देखील भारताच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • चीनने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. ‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहे.भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम राखावा , दोन देशांमधील संबंध आणि सहकार्य यांच्या आधारावरच दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकते’, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लु कांग यांनी वृत्तसंस्था पीटीआयकडे दिली.

  • चीनकडून आलेली प्रतिक्रिया पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण या दोन्ही देशांमधील संबंध जिव्हाळ्याचे आहेत, पण, चीनने भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केलेला नाही. परिणामी भारताच्या दृष्टीकोनातुनही चिनकडून आलेली प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

  • याशिवाय, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही चीनमधील १६व्या भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताने सीमेपपलिकडे केलेल्या कारवाईची माहिती दिली. जगापुढे भारताची बाजू जोरकसपणे मांडताना त्यांनी पाकिस्तानला घेरलं आणि भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले असून आता दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असल्याचेही स्वराज यांनी ठासून सांगितले. या कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिकाला ईजा पोहोचू नये याची काळजी घेतली गेल्याचंही स्वराज यांनी सांगितलं.

‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा’ :
  • भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असा सल्ला संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी दिला आहे. मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानवर कारवाई केली. पुलवामा येथे शहीद झालेल्या चाळीस जवानांचा बदला भारताने घेतला त्यानंतर वायुदलाचं कौतुक होतं आहे. देशभरात जल्लोष साजरा होतो आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं म्हटलं आहे.

  • दोन्ही देशांमधले वातावरण अधिक तणावपूर्ण होऊ नये म्हणून आम्ही अशी अपेक्षा करतो की हे दोन्ही देश संयम बाळगतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध तणावाचे आहेत. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर हा तणाव जास्त वाढला होता. आता भारताने कारवाई केल्यावर दोन्ही देशांनी सबुरीने घ्यावं असा सल्ला अँतोनियो गुतेरेस यांनी दिला आहे.

  • पुलवामात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. या घटनेचा तीव्र निषेध संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही नोंदवला. तसेच हा हल्ला निंदनीय आणि कायरतेचे लक्षण असल्याचेही म्हटले होते. आता संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी दोन्ही देशांना सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

भारताचे सहा बॉक्सर अंतिम फेरीत :
  • राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारे मनीष कौशिक (६० किलो) आणि सतीश कुमार (९१ किलोवरील) यांच्यासह सहा भारतीय बॉक्सर्सनी इराण येथे सुरू असलेल्या माकरान चषक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

  • मंगळवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतींमध्ये दीपक सिंग (४९ किलो), पी. ललिता प्रसाद (५२ किलो), संजीत (९१ किलो) आणि दुर्योधन सिंग नेगी (६९ किलो) यांनीही आपापल्या लढती जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

  • राष्ट्रीय विजेत्या कौशिकने अश्कान रेझाई याचा ४-१ असा पराभव केला. त्याला विजेतेपदासाठी डॅनियल बक्ष शाह याच्याशी लढत द्यावी लागेल. सतीशने इमान रमाझान याचा ५-० असा धुव्वा उडवला. त्याला मोहम्मद मिलास याच्याशी झुंज द्यावी लागेल. दीपकने मलेक अम्मारी याचा ५-० असा पाडाव केला. त्याची अंतिम फेरीत गाठ जाफर नसेरी याच्याशी पडेल.

  • प्रसादने फिलिपिन्सच्या मार्विन टोबामो याचे आव्हान ५-० असे परतवून लावले. अंतिम फेरीत त्याला ओमिद साफा अहमदी याच्याशी दोन हात करावे लागतील. संजीतने पौर्या अमिरी याला ५-० असे पराभूत केले. त्याची सुवर्णपदकासाठीची लढत एहसान बहानी रौझ याच्याशी होईल.

दिनविशेष :
  • मराठी भाषा दिन / जागतिक स्वयंसेवी संस्था दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.

  • १९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

  • २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

  • २००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

जन्म 

  • १८०७: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८८२)

  • १८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १८२२)

  • १८९९: इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७८)

  • १९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: १० मार्च १९९९)

  • १९३२: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०११)

  • १९८६: भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९२: फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर लुई वूत्तोन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८२१)

  • १९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: २३ जुलै १९०६)

  • १९३६: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८४९)

  • १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८८)

  • २०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.