चालू घडामोडी - २७ जानेवारी २०१९

Updated On : Jan 27, 2019 | Category : Current Affairsमोदी सरकार मांडणार पूर्ण अर्थसंकल्प - दलित, ओबीसी असणार केंद्रस्थानी :
 • नवी दिल्ली: गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी मतदारांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लेखानुदानाऐवजी पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्याकाही नेत्यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. तर संसदीय परंपरांचं उल्लंघन करु नका, अशा इशारा काँग्रेसनं भाजपाला दिला आहे. 

 • निवडणुकीआधी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पासाठी लेखानुदान शब्द वापरण्यावर भाजपामधील काही नेत्यांनी आक्षेप घेतला. 1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्पाप्रमाणेच असावा, असं भाजपामधील काही नेत्यांना वाटतं. या अर्थसंकल्पातून कराच्या बाबतीत काही सवलती देता येणार नाही. मात्र आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जावा, असं मानणारा मोठा वर्ग भाजपामध्ये आहे. या वर्गानं पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात यावा, असा सूर लावल्याचं वृत्त 'नवभारत टाईम्स'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. 

 • कोणत्याही अर्थसंकल्पाचा अर्थ पूर्ण अर्थसंकल्पच असतो. एक तारखेला सादर होणारा अर्थसंकल्प नेहमीसारखाच असेल अशी अपेक्षा आहे, असं भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलं. या अर्थसंकल्पातून मोदी सरकार दलित, ओबीसी, आदिवासी यांच्यासह व्यापारी, सवर्णांना दिलासा द्यायचा प्रयत्न करणार असल्याचं समजतं.

 • भाजपाच्या या पूर्ण अर्थसंकल्पावर काँग्रेसनं आक्षेप घेतला. लेखानुदानाच्या परंपरेचं पालन करा, असा इशारा काँग्रेसनं दिला. मात्र काँग्रेसनं पूर्वी या परंपरेचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत, असं प्रत्युत्तर भाजपानं दिलं आहे. 

नेपाळच्या खेळाडूने मोडला सचिनचा विक्रम :
 • मुंबई : नेपाळच्या रोहित पाउडेलने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम  आपल्या नावे केला आहे. हा विक्रम करताना रोहितने भारताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदिचा विक्रम मोडला आहे.

 • रोहित वयाने 16 वर्ष 146 दिवसांचा आहे. रोहितने यूएईविरोधात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसी सामन्यात 55 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. सचिन तेंडुलकरने 1989 मध्ये 16 वर्ष 213 दिवसांचा असताना पाकिस्तानविरुद्ध 59 धावा केल्या होत्या. तर शाहिद आफ्रिदिने 1996 मध्ये 16 वर्ष 217 दिवसांचा असताना अर्धशतक ठोकलं होतं.

 • रोहितने 58 चेंडूत 55 धावा केल्या. यावेळी त्याने 7 चौकार ठोकले. रोहितच्या या खेळीमुळे नेपाळने 50 षटकात 9 गडी बाद 242 धावा केल्या. नेपाळने दिलेले आव्हानाचा सामना करताना यूएईचा संघ अवघ्या 97 धावांवर तंबूत परतला. नेपाळने हा सामना 145 धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत आहेत.

प्रजासत्ताकदिनी लान्स नायक नजीर अहमद वानींना मरणोत्तर अशोक च्रक :
 • नवी दिल्ली : शहीद लान्सनायक नजीर अहमद वानी यांना आज देशाचा सर्वोच्च वीरता पुरस्कार अर्थात अशोकचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नजीर वानी यांच्या पत्नी आणि आईने हा मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार स्वीकारला.

 • नजीर वानी यांचे वैशिष्ट्य म्हणजे सैन्यात येण्याआधी हे अतिरेकी होते. त्यांचा काही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागही होता. पण 2004 साली वानी दहशतवादाला तिलांजली देऊन सैन्यात दाखल झाले.

 • सैन्यातील शौर्याबद्दल त्यांचा 2007 आणि 2017 सालीही गौरव करण्यात आल होता. पण 23 नोव्हेंबर 2018 ला शोपियातल्या दहशतवादांविरुद्धच्या लढाईत वानी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे मात्र त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्र पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असणारे राज्य होणार - राज्यपाल :
 • मुंबई : भारतात होणाऱ्या एकूण विदेशी थेट गुंतवणुकीपैकी 30 टक्के इतकी गुंतवणूक महाराष्ट्राला मिळाली आहे.  या वर्षी राज्याला 13.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी विदेशी थेट गुंतवणूक मिळाली आहे.  2025 वर्षापर्यंत महाराष्ट्र हे पहिले ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य बनेल, असा विश्वास राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

 • 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जुगनाथ हे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 • 2022 वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुमारे 41 लाख इतक्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.  "प्रधानमंत्री पीक विमा योजना" आणि "पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना" राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.  प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 52 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 2700 कोटी रुपये इतकी नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

 • महाराष्ट्राची वेगाने प्रगती साध्य करण्याच्या हेतूने, विशेष उपाययोजना कार्यक्रम-2018 अंतर्गत 22,122 कोटी रुपये इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.  त्यापैकी 89 सिंचन प्रकल्पांवर 13,422 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.  "जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत", राज्यातील 15000 हून अधिक गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत.  यात 5 लाखांहून अधिक कामे पूर्ण करण्यात आली असून त्याद्वारे 24.36 लाख टीसीएम इतकी पाणी साठवण क्षमता निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.

जपानच्या नाओमी ओसाकाला ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद :
 • सिडनी : जपानच्या नाओमी ओसाकानं अमेरिकन ओपनपाठोपाठ ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावरही आपलं नाव कोरलं आहे. ओसाकानं आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं.

 • नाओमीनं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या पेट्रो क्वितोव्हाचं आव्हान 7-6, 5-7, 6-4 असं मोडून काढलं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदानं ओसाकाला जागतिक क्रमवारीतला 'नंबर वन'ही मिळवून दिला.

 • आंतराष्ट्रीय टेनिसच्या इतिहासात अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ओपनची विजेतीपदं लागोपाठ जिंकणारी ओसाका ही गेल्या चार वर्षांमधली दुसरी महिला टेनिसपटू ठरली. याआधी सेरेना विल्यम्सनं २०१५ साली ही कामगिरी बजावली होती. विशेष म्हणजे नाओमीनं सेरेना विल्यम्सलाच हरवून अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं.

 • नाओमीचं हे सलग दुसरं ग्रॅन्डस्लॅम आहे. तिने गेल्यावर्षी शेवटचं ग्रॅन्डस्लॅम आणि यावर्षीच्या पहिल्या ग्रॅन्डस्लॅमवर कब्जा केला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब आपल्या नावे केल्याने नाओमी सोमवारी जारी होणाऱ्या महिला टेनिसमध्ये (WTA) अव्वल खेळाडू बनणार आहे.

दुर्भाग्य, गेल्या ७० वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न नाही – रामदेव बाबा :
 • स्वातंत्र्यानंतर एकाही संन्याशाला भारतरत्न न दिल्याबद्दल योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी पुढील सरकारला एका तरी संन्यासाला भारतरत्न देण्याचा आग्रह केला आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न न मिळावं हे दुर्भाग्य आहे. महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंदजी किंवा शिवकुमार स्वामीजी यापैकी एकास सरकारने पुढील वेळी भारतरत्न देऊन सन्मान करावा असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे.

 • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल रामदेव बाबांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, प्रवण मुखर्जी यांना भारतरत्न दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुकही केले. २०१९ मधील निवडणुकीत काट्याची टक्कर होऊ शकते. कोणत्याही पक्षाला जाती आणि धर्माच्या बंधनात अडकवू नका. देशाला शैक्षणिक, आर्थिक, चिकित्सक आणि अन्य गुलामगिरीतून स्वतंत्र मिळावा यासाठी संकल्प करा, असेही ते म्हणाले.

 • दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, असा सल्ला याआधी योगगुरु रामदेवबाबा यांनी दिला होता. दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना अन्य सरकारी योजनांसाठीही अपात्र ठरवावे, असेही त्यांनी म्हटले होते. गेल्या अनेक दिवसांपासून मी राजकारणाला आयुष्यातून डिलीट केले आहे. देशाच्या राजकारणात सध्या युद्ध सुरु आहे.

 • दोन्ही बाजूंनी दिग्गज मैदानात उतरले आहेत. जय- पराजय हा कोणाचाही होऊ शकतो, पण ही निवडणूक रंगतदार असेल. राजकीय पक्षांनी देशाच्या विकासावरही भाष्य केले पाहिजे. पण दुर्दैवाने सध्या राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असून राजकारणातील मर्यादांचा त्यांना विसर पडला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना.

 • १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.

 • १९६७: केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग लागून त्यात गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले

 • १९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.

 • १९८३: जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.

जन्म 

 • १८५०: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९१२)

 • १९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९९४)

 • १९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९९८)

 • १९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६)

मृत्यू 

 • १९६८: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०२)

 • २००७: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९३२)

 • २००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

टिप्पणी करा (Comment Below)