चालू घडामोडी - २७ जुलै २०१८

Date : 27 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करूणानिधी यांची प्रकृती स्थिर - एम. के. स्टॅलिन :
  • द्रमुक अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आले असून तिथेच त्यांच्यावर सर्व उपचार केले जात आहेत, अशी माहिती द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी दिली. ‘द्रमुक’चे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती किंचितशी खालावली असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले होते. त्यानंतर लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही स्टॅलिन यांनी केले.

  • करुणानिधी हे ९६ वर्षाचे असून वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली असल्याचे कावेरी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते. करुणानिधी हे मूत्रपिंडाच्या संसर्गाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कावेरी रुग्णालयाच्या वैद्यकीय बुलेटिनमधून देण्यात आली आहे.

  • करुणानिधी यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी नलिका बदलण्यासाठी कावेरी रुग्णालयाच्या युनिटकडे नेण्यात आले होते. मात्र सध्या वैद्यकीय पथकाकडून करुणानिधी यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत आणि रुग्णालयातील सेवांप्रमाणे वैद्यकीय सेवा त्यांना पुरवण्यात येत असल्याचीही माहिती रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

एचआयव्ही बाधितांचे भारतातील प्रमाण घटले :
  • पुणे : गेल्या दहा-बारा वर्षांत भारतातील एचआयव्ही बाधितांची संख्या लक्षणीय रीत्या कमी झाली आहे. भारतात एचआयव्ही रोखण्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे एचआयव्ही बाधितांची संख्या सुमारे ४० हजारांनी कमी झाली आहे, तर एचआयव्हीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही जवळपास एक लाखांनी कमी झाले आहे. मात्र, फिलिपिन्स आणि पाकिस्तानमध्ये एचआयव्हीबाधितांचे प्रमाण वाढतेच आहे.

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या एचआयव्हीसंदर्भात कार्यरत असलेल्या सहयोगी संस्थेने (यूएन एड्स) जागतिक पातळीवरील ‘माइल्स टू गो’ हा अहवाल नुकताच जाहीर केला. या अहवालात २०१० ते २०१७ दरम्यानची एचआयव्ही संबंधित आकडेवारी देण्यात आली आहे. जागतिक पातळीवर एचआयव्ही रोखण्यासाठी अपेक्षित वेगाने काम होत नसल्याची धोक्याची घंटा या अहवालाद्वारे वाजवण्यात आली आहे.

  • नव्याने एचआयव्ही बाधितांचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतासह कंबोडिया, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनाम या देशांनी विशेष लक्ष दिल्यामुळे २०१०च्या तुलनेत २०१७ मधील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण लक्षणीय रीत्या कमी झाले आहे. भारतात २०१०मध्ये एचआयव्ही आढळून आलेल्या नव्या रुग्णांचे प्रमाण जवळपास १ लाख २० हजार होते. २०१७ मध्ये ते कमी होऊन जवळपास ८८ हजारांवर आले आहे.

  • एचआयव्हीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १ लाख ६० हजार वरून ६९ हजार इतके कमी झाले. तर एचआयव्हीसह जगणाऱ्यांचे प्रमाण २३ लाखांवरून २१ लाखांवर आल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट झाले.

...तर इम्रान खान पंतप्रधान बनणारे पाचवे क्रिकेटर :
  • इस्लामाबाद इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे इम्रान खान हे पंतप्रधान झाल्यास पंतप्रधानपदी वर्णी लागलेले इम्रान खान प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातले पाचवे क्रिकेटर ठरणार आहेत.

  • पाकिस्तानातल्या निवडणुकांमध्ये माजी कसोटीवीर इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख नेते इम्रान खान यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याचा मार्ग खुला होणार आहे.

  • 1925 साली न्यूझीलंडचे फ्रान्सिस बेल पंतप्रधान बनलेले पहिले क्रिकेटपटू ठरले होते. 1970 साली इंग्लंडचे अॅलेक डग्लस-होम, 1994 साली फिजीचे कामिसेसे मारा आणि 1997 साली पाकिस्तानचे नवाज शरीफ यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. नवाज शरीफ यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या रेल्वे संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

आर्थिक निकषावर आरक्षण? दिल्लीत प्राथमिक स्तरावर चर्चेला सुरुवात :
  • नवी दिल्ली: आरक्षण आंदोलनांनी राज्य आणि केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली असताना, आता मोदी सरकारने पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. त्यापैकी आर्थिक निकषावर आरक्षण देता येईल का? या पर्यायावर केंद्रात खल सुरु आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

  • महाराष्ट्रात मराठा आंदोलन, गुजरातमध्ये पटेल, हरियाणात जाट, राजस्थानात गुर्जर अशी आंदोलने देशभरात गाजली. त्यामुळे सरकार आता आरक्षणाच्या पर्यायांवर चर्चा करत आहे.

  • यानुसार सर्व जातींमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण देण्याचा विचार सुरु आहे. सध्या केवळ प्राथमिक स्वरुपात हा पर्याय समोर आला आहे. यावर अजून चर्चेला सुरुवात झाली नाही. मोदी सरकारकडून केवळ या पर्यायाची चाचपणी सुरु आहे.

  • जर मोदी सरकारला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचं असेल, तर त्यासाठी घटनात्मक बदल करावा लागणार आहे. ते काम सोपं नाही. त्यासाठी दोन तृतीयांश खासदारांची संमती असणं गरजेचं आहे. मात्र ती संमती मिळणं अवघड आहे.

शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज पाहता येणार :
  • पुणे : देशातील सर्व खगोलप्रेमी याबरोबरच नागरिकांना आज शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण (२७ जुलै) पाहता येणार आहे. १ तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असणार असून, शुक्रवारी रात्री १०.४५ मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार आहे. मात्र, आपल्याकडील गेल्या काही दिवसांपासूनच्या पावसाळी व ढगाळ वातावरणाचा अडथळा दूर झाल्यास हे ग्रहण पाहता येणार आहे. ग्रहण कालावधी चार तास (तीन तास पंचावन्न मिनिटे) असल्याने हे सर्वांत मोठ्या कालावधीचे ठरणार आहे.

  • पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील मोठे ग्रहण असणार आहे. यानंतर पुन्हा ९ जून २१२३ मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल. जुलै महिन्यामध्ये सूर्य हा पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते. या ग्रहणादरम्यान चंद्र या सावलीतून जात असल्याने हे ग्रहण पाहायला मिळते. चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते. आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ सर्वांना पाहायला मिळणार आहे.

  • ग्रहणाविषयी अधिक माहिती देताना खगोलशास्त्रज्ञ प्रकाश तुपे म्हणाले, शुक्रवारी रात्री १0.४५ वाजता हे ग्रहण सुरू होईल. या वेळी चंद्र पृथ्वीच्या छायेत शिरेल. ११.५४ वाजता चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत प्रवेश करेल. त्यापुढे रात्री १ वाजता चंद्र हा पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत शिरलेला असेल. २.४३ मिनिटांनी दाट छायेतून तो बाहेर पडेल. ४.५९ मिनिटांनी तो पूर्णपणे पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडलेला असले.

  • हे संपूर्ण चार तासांचे ग्रहण असेल. पृथ्वीच्या सभोवतालचे वातावरण योग्य असेल तर या ग्रहणाच्या काळात चंद्र हा तांबूस रंगाचा दिसेल. तर वातावरण दूषित असले तर चंद्र हा काळवंडलेला पाहायला मिळेल. हे ग्रहण कोणालाही पाहता येणे शक्य आहे. या ग्रहणाचे कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. या शतकातील हे मोठे ग्रहण असल्याने विद्यार्थी, खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंनी हे ग्रहण पाहण्याची संधी सोडू नये.

सर्वपक्षीय खासदारांकडून दिल्लीत शाहू महाराजांना अभिवादन :
  • नवी दिल्ली/कोल्हापूर : आपल्या संस्थानातील मागास समाजाला ११७ वर्षांपूर्वी आरक्षण लागू करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना गुरुवारी दिल्ली येथे अभिवादन करण्यात आले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वपक्षीय खासदार संसद प्रांगणातील शाहू महाराजांच्या पुतळा परिसरात उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणाचीही मागणी करण्यात आली.

  • खासदार संभाजीराजे म्हणाले, गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलने करीत आहे. गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून ५८ मूक मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले गेले. हे मोर्चे अतिशय शांततेत काढून मराठा समाजाने जगासमोर एक आदर्श निर्माण केला होता; परंतु आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामुळे समाजाने पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे. आजपर्यंत दोन युवकांनी आत्महत्या केली आहे.

  • पात्रता असूनही आरक्षणाअभावी शिक्षण, नोकºयांमध्ये संधी मिळत नसल्याने या समाजामध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. म्हणूनच तातडीने आरक्षण मिळण्याची गरज आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार धनंजय महाडिक, आनंदराव आडसूळ यांच्यासह अन्य खासदार उपस्थित होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

  • १९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.

  • १९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए वाईल्ड हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

  • १९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

  • १९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

  • १९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.

  • २००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.

  • २०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

जन्म

  • १९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

  • १९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी. एस. बाली यांचा जन्म.

  • १९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

मृत्यू

  • १८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.

  • १९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.

  • १९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)

  • १९८७: जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)

  • १९९२: हिंदु चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० – गझनी, अफगाणिस्तान)

  • २००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्ण कांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)

  • २००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)

  • २०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.