चालू घडामोडी - २७ जून २०१८

Date : 27 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं : 
  • मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार संगीतकार आर. डी. बर्मन अर्थात पंचमदा यांचा 27 जून 1939 हा जन्मदिवस. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी  4 जानेवारी 1994 रोजी या अवलियाने जगाला अलविदा केलं. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे पती आणि संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांचे सुपुत्र अशीही त्यांची ओळख.

  • आर डी बर्मन यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांना संगीताचे पाच सूर ऐकवले आणि त्यांना पंचम ही नवी ओळख मिळाली. पंचमदांच्या 79 व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या सूरमयी आयुष्यावर एक नजर टाकूया.

  • वयाच्या 9 व्या वर्षी आर. डी. बर्मन यांनी पहिल्यांदा गाणं संगीतबद्ध केलं. ‘ऐ मेरी टोपी पलट के आ’ हे गाणं काही वर्षांनी (1956 मध्ये) त्यांचे पिता एस. डी. बर्मन यांनी फंटूश चित्रपटात वापरलं. तर ‘सर जो तेरा चकराये’ हे गुरु दत्तच्या प्यासा (1957) मध्ये वापरलं गेलं.

  • हेमंत कुमार यांच्या आवाजातील ‘है अपना दिल तो आवारा’ गाण्याला रसिकांची पसंती मिळाली. ‘सोलवा साल’मधील या गाण्यातलं माऊथ ऑर्गन खुद्द पंचमदा यांनी वाजवलं होतं.

  • इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर पंचमदांनी पहिल्यांदा सिनेमामध्ये केला. तिसरी मंजिल चित्रपटातील गाजलेल्या ‘ओ मेरे सोना रे..’ या गाण्यासाठी आर. डींनी पहिल्यांदा ही वाद्यं वापरली.

एसपीजीच्या परवानगीविना मंत्री, खासदारांनाही मोदींच्या जवळ जाता येणार नाही :
  • नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने स्पेशल प्रोटेक्शन गृप (एसपीजी) आणि सर्व राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

  • सार्वजनिक मंचावर एसपीजीच्या परवानगीशिवाय पंतप्रधान मोदींच्या आसपास कोणाही मंत्र्याला, खासदाराला किंवा आमदाराला जाऊ देऊ नये, असा आदेश गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांतील डीजीपी आणि एसपीजी यांना देण्यात आला आहे.

  • गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं की, “पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली आहे. 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी नरेंद्र मोदी हे स्टार प्रचारक असतील, त्यामुळे प्रचारादरम्यान होणाऱ्या सभांवेळी मोदींसोबत इतर स्थानिक नेतेही मंचावर असतील. अशावेळी मोदींची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणं गरजेचं आहे.”

  • नक्षलवाद्यांनी नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर एसपीजीने नरेंद्र मोदी आणि एसपीजी सुरक्षा असणाऱ्या अन्य नेत्यांच्या सुरक्षेची तपासणी केली. सुरक्षेबाबतची परवानगी असल्याशिवाय रोड शो केला जाऊ नये, असं एसपीजीकडून नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सांगितलं जाणार आहे.

भारत महिलासांठी सर्वात असुरक्षित देश - सर्व्हे :
  • नवी दिल्ली : ग्लोबल एक्सपर्ट्सने केलेल्या सर्व्हेतून भारतासाठी एक लाजिरवाणी आकडेवारी समोर आली आहे. या सर्व्हेनुसार, महिलांसाठी असुरक्षित असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात महिलांवर लैंगिक अत्याचार करणं फारच सोपं आहे, हेच महिलांच्या असुरक्षिततेमागचं मुख्य कारण देण्यात आलं आहे.

  • आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महिला असुरक्षिततेबाबतीत भारत हा अफगाणिस्तान आणि सौदीपेक्षाही वरच्या क्रमांकावर आहे.

  • तासाला चार महिलांवर बलात्कार - भारतात प्रत्येक तासाला चार महिलांवर बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, 2007  ते 2016 या कालावधीत भारतातील महिला अत्याचारांत 83 टक्क्यांनी वाढ झाली.

  •  2011 साली भारत चौथ्या स्थानी - 2011 सालीदेखील असा सर्व्हे घेण्यात आला होता, ज्यामध्ये भारत चौथ्या स्थानी होता. तेव्हा अफगाणिस्तान, कॉन्गो, पाकिस्तान आणि भारताला महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश म्हणण्यात आलं होतं. या सर्व्हे एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, भारताने 2012 साली निर्भया प्रकरण होऊनही महिला सुरक्षेच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले नाहीत. परिणामी, सात वर्षांपूर्वी चौथ्या स्थानी असलेला भारत आता पहिल्या स्थानी गेला.

अभिनेत्री प्रियांका चोप्राला मिळाला आणखी एक बिग बजेट चित्रपट :
  • मुंबई : ‘क्वांटिको’ या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन झाली आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजनविश्वातील प्रियांकाचा वावर आणि तिची लोकप्रियता पाहता तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. परदेशात जास्तीत जास्त वेळ व्यतित करणारी देसी गर्ल नुकतीच भारतात परतली असून तिच्या पदरामध्ये आणखी एक चित्रपट पडल्याचे सांगण्यात येत आहे.

  • बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये वावरणाऱ्या प्रियांकाचं मानधन सध्या प्रचंड वाढलं असून ती लवकरच सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या चित्रपटासाठी प्रियांकाने तब्बल १४ कोटी रुपयांचे मानधन स्वीकारलं असून सर्वाधिक मानधन स्वीकारणाºया अभिनेत्रींच्या यादीमध्ये ती अव्वल स्थानावर असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र असं असूनही तिच्या वाट्याला आता आणखी एक चित्रपट आला आहे.

  • सूत्रांनुसार, ती लवकरच चित्रपट निर्मात्या सोनाली बोस यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. बोस यांच्या आगामी चित्रपटामध्ये प्रियांका अभिनेता फरहान अख्तर याच्याबरोबर प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट आयेशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिने लिहिलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.

महिनाभर बेरोजगार राहिल्यास ७५ टक्के पीएफ काढता येणार :
  • नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO)च्या सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार आहे. या व्यतिरिक्त तुमचं पीएफ खातंही सुरूच राहणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार म्हणाले, या योजनेंतर्गत सलग एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास ईपीएफओचा कोणताही सदस्य 75 टक्क्यांपर्यंत रक्कम खात्यातून काढू शकणार आहे. तसेच त्याचे खातेही सुरूच राहणार आहे.

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952च्या तरतुदीतील सुधारणेनुसार दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यास ईपीएफओ सदस्य स्वतःच्या खात्यातील उर्वरित 25 टक्के रक्कम काढून खातंही बंद करू शकतो.

  • ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेट फंडमध्ये ईपीएफओची गुंतवणूक 47 हजार 431.24 कोटी रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे. लवकरच हा आकडा एक लाख कोटींच्या घरात जाईल. या गुंतवणुकीवर 16.07 टक्के परतावा मिळत आहे, अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली.

ट्रम्प यांची मुस्लिम देशांवरील प्रवासबंदी योग्यच- सर्वोच्च न्यायालय :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मुस्लिम देशांच्या नागरिकांवर लादलेली प्रवेशबंदी योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प सरकारचा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी टि्वटरवर ‘वॉव’ असे लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • ट्रम्प यांच्या या मुस्लिम देशांच्या नागरिकांवरील प्रवासबंदीवर जोरदार टीका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही प्रवास बंदी योग्य ठरविल्यामुळे आता हा वाद संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ट्रम्प यांच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती.

  • ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे अमेरिकेत प्रवासबंदीच्या इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन होते किंवा अमुक एका धर्मावर अन्याय केला जातोय हे सिद्ध होऊ शकलेले नसल्याचं स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांचा निर्णय योग्य ठरविला.

  • मुस्लिम देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवास करण्यास बंदी घालणारा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगत डेमोक्रॅटिक खासदार व मानवाधिकार संघटनांनी त्यावर टीका केली होती. तथापि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय ५ विरुद्ध ४ मतांनी योग्य ठरविला. 

सातवा वेतन आयोग : बहुतांश केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता बंद होणार :
  • बहुतांश केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता आता बंद करण्यात येणार असून तसा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. कार्मिक मंत्रालयाने याबाबत अधिसुचना जारी केली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे.

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनेक वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये ऑपरेशनल स्टाफ आणि औद्याोगिक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्व केंद्रीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता थांबवण्यात येणार आहे, असे खर्च विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

  • सर्व केंद्रीय मंत्रालये/विभाग, भारत सरकारशी जोडलेली आणि संलग्न असलेल्या सर्वप्रकारच्या कार्यालयांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या प्रशासनाला त्यांच्याकडील ऑपरेशनल स्टाफची यादी तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

  • तसेच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक उपस्थिती असल्यास ओव्हरटाईम भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑपरेशनल स्टाफच्या ओव्हरटाइम भत्त्यात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा भत्ता १९९१च्या आदेशाप्रमाणेच कायम राहणार आहे.

  • त्याचबरोबर जेव्हा संबंधीत कर्मचारी आपण तातडीच्या कामासाठी कार्यालयात कामाच्या वेळेव्यतिरिक्त थांबणार आहोत, असे लिखित स्वरुपात आपल्या वरिष्ठांना सांगेल तेव्हाच त्यांना ओव्हरटाइम भत्ता देण्यात येईल असेही कार्मिक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

  • १९५४: अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

  • १९७७: जिबुटी देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.

  • १९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

  • १९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.

जन्म 

  • १५५०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १५७४)

  • १८३८: बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल१८९४)

  • १८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)

  • १८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.

  • १८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)

  • १८८०: अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९६८)

  • १९१७: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९८४)

  • १९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा  जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)

मृत्यू 

  • १७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

  • १८३९: सिख साम्राज्याचे संस्थापक रणजितसिंग यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)

  • २०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.

  • २००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णन कंत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)

  • २००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९१४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.