चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ मार्च २०१९

Date : 27 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अश्विनी-सिक्की जोडीचा धक्कादायक विजय :
  • राष्ट्रकुल कांस्यपदक विजेत्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानावर असलेल्या लि वेनमेई आणि झेंग यू जोडीवर सरळ गेममध्ये धक्कादायक विजयाची नोंद करीत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला दुहेरी गटाची दुसरी फेरी गाठली.

  • जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानावर असलेल्या भारताच्या अश्विनी-सिक्की जोडीने लि आणि झेंग जोडीला २२-२०, २१-१९ असे नामोहरम केले. पुरुष दुहेरीत चीनच्या ह्युआंग कायशियांग आणि वँग झेकांग जोडीने अर्जुन एमआर आणि श्लोक रामचंद्रन जोडीचा २१-१६, २१-१८ असा पराभव केला.

  • जागतिक क्रमवारीत २५७व्या स्थानावर असलेल्या कार्तिक जिंदालने पावेल कोट्सारेंकोला २१-१९, २१-९ असे पराभूत केले.

अरुणाचल प्रदेश भारतामध्ये दाखवणारे हजारो नकाशे चीनकडून नष्ट :
  • तैवानला स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेशला भारतामध्ये दाखवणारे जवळपास ३० हजार जागतिक नकाशे चीनकडून नष्ट करण्यात आले. मागच्या आठवडयात चीनच्या इशान्येकडील शहरात सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी हे नकाशे नष्ट केले. मागच्या काही वर्षातील अशा प्रकारची करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात आले.

  • इंग्लिशमध्ये असलेले हे नकाशे अनहुई प्रांतातील एका चिनी कंपनीने बनवले होते. अरुणाचल प्रदेशवर चीन पूर्वीपासून दावा करत आला आहे. अरुणाचल प्रदेश आपला भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटला हिस्सा मानतो.

  • सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर चीनच्या शेडोंग प्रांतातील किंगदाओ शहरातील कंपनीच्या कार्यालयावर छापा मारुन ८०० बॉक्स जप्त केले. त्यामध्ये २८,९०८ जागतिक नकाशे होते. जप्त केलेले साहित्य गुप्त ठिकाणी नेऊन नष्ट करण्यात आले. पूर्व चीनमधील अनहुई प्रांतातील कंपनीने हे नकाशे बनवले होते. हे नकाशे परदेशात पाठवण्यात येणार होते असे ग्लोबल टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

ट्रॅव्हल एजंट ते जेट एअरवेजचा संस्थापक; जाणून घ्या नरेश गोयल यांचा प्रवास :
  • जेट एअरवेज ही भारतातील खासगी विमान वाहतूक क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. कर्जाच्या विळख्यात सापडल्यामुळे सोमवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना संचालक मंडळाचा राजीनामा द्यावा लागला. नरेश गोयल यांचा जेटच्या एअरवेजच्या चेअरमनपदापर्यंतचा प्रवास कधीच सहजसोपा नव्हता. दिल्लीत साधा ट्रॅव्हल एजंट म्हणून कामाची सुरुवात करणाऱ्या नरेश गोयल यांनी मेहनत, हुशारीने जेटसारखी मोठी कंपनी उभी केली.

  • नरेश गोयल मूळचे पतियाळाचे. १९६७ साली वयाच्या १८ व्या वर्षी नरेश गोयल दिल्लीत आले. त्यावेळी त्यांच्या खिशात एक पैसा नव्हता. त्यांच्या कुटुंबाचा दोनवेळच्या जेवणासाठी संघर्षाचा तो काळ होता. संघर्षाच्या या दिवसांमध्ये जगाकडून ते अनेक गोष्टी शिकले व त्या स्थानापर्यंत पोहोचले जिथे हवाई क्षेत्राची धोरणे त्यांच्या गरजेनुसार बनवली जातात असे दिसू लागले.

  • १९६७ साली दिल्लीच्या कनॉट प्लेस येथे एका ट्रॅव्हल एजन्सीमधून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. आईच्या काकांच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ट्रॅव्हल एजंट म्हणून ते रुजू झाले. महिना त्यांना ३०० रुपये पगार मिळायचा. लवकरच गोयल यांनी ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये नवे मित्र जोडले. जॉर्डन, आखाती देश आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील विमान कंपन्यांमध्ये त्यांनी मित्र बनवले. तिकिट बुकिंगपासून ते विमान भाडयावर देण्याबाबत हवाई व्यवसायाची सर्व गणिते त्यांनी चटकन शिकून घेतली.

  • १९७३ साली त्यांनी जेट एअर नावाने स्वत:ची एजन्सी सुरु केली. जेव्हा ते पेपर तिकिटे आणण्यासाठी विमान कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये जायचे तेव्हा एजन्सीचे नाव विमान कंपनीसारखे ठेवल्यामुळे लोक त्यांची खिल्ली उडवायचे. त्यावेळी गोयल एकदिवस मी माझी विमान कंपनी सुरु करुन दाखवेन असे त्यांना सांगायचे. १९९१ साली त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आले. जेव्हा जेट एअरवेजची एअर टॅक्सी म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी खासगी विमान कंपन्यांना भारतामध्ये परवानगी नव्हती. वर्षभराने जेटने चार विमानांसह स्वत:ची सेवा सुरु केली.

विंग कमांडर अभिनंदन वैद्यकीय रजेसाठी श्रीनगरला रवाना :
  • विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे वैद्यकीय रजेवर आहेत. ते आता श्रीनगर या ठिकाणी रवाना झाले आहेत. गेल्या महिन्यात बालाकोटवर जो एअरस्ट्राईक करण्यात आला त्यानंतर पाकिस्तानच्या काही लढाऊ विमानांनी भारतीय हवाई सीमेत घुसखोरी केली. त्यातील एका विमानाचा पाठलाग करताना विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या सीमेत जाऊन पोहचले. त्यांनी पाकिस्तानचे F-16 हे विमान पाडले देखील. त्यानंतर मात्र त्यांचे MIG 21 हे विमान अपघातग्रस्त झाले.

  • त्यानंतर अभिनंदन हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले. पाकिस्तानच्या तावडीतून सुमारे ५५ तासांनी त्यांची सुटका झाली. त्यांचे शौर्य अतुलनीय आहे यात काहीही शंकाच नाही. ते भारतात परतल्यावर सगळ्या भारताने जल्लोष केला.

  • त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. डॉक्टरांनी त्यांना चार आठवड्यांची वैद्यकीय रजा घेण्यास सांगितले आहे. या चार आठवड्यांच्या वैद्यकीय रजेसाठी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी चेन्नई येथील आपले घर न निवडता श्रीनगर येथील त्यांच्या हवाई तळाजवळ जाणे निवडले आहे. आजच अभिनंदन श्रीनगरला रवाना झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

  • खरंतर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना चार आठवड्यांच्या वैद्यकीय रजेदरम्यान त्यांच्या घरी रहाण्याच्या, घरातल्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याची निवड ते निश्चितच करू शकले असते. मात्र त्यांनी घराचा पर्याय न निवडता आपल्या एअर फोर्सच्या तळाजवळचा पर्याय निवडला अशी माहिती वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना दिली.

पर्रिकरपुत्रांच्या राजकारण प्रवेशासाठी भाजप उत्सुक :
  • गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पुत्रांनी राजकारणात यावे, यासाठी भारतीय जनता पक्षात वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू असल्याचे समजते.भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी सोमवारी सांगितले की, पणजी पोटनिवडणुकीत पर्रिकर यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल यांनी उमेदवार म्हणून उभे राहावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अभिजात हा पर्रिकरांचा दुसरा पुत्र आहे.

  • भाजपचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी पर्रिकर कुटुंबीयांची नुकतीच सांत्वन भेट घेतली त्या वेळी पक्षाची इच्छा पुत्रांच्या कानी घालण्यात आली. मात्र तिला या पुत्रांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. पणजी पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.

मुरली मनोहर जोशी यांनाही सक्तीची निवृत्ती :
  • भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारली असल्याने लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणे जोशी यांचीही प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. भाजपचे समन्वयक रामलाल यांनी जोशी यांना कानपूरच नव्हे तर देशातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नका असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर जोशी यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोशी कानपूरचे विद्यमान खासदार आहेत.

  • रामलाल यांच्या ‘आदेशा’नंतर मुरली मनोहर जोशी यांनी विद्यमान लोकसभा मतदारसंघ कानपूरमधील मतदारांना तीन ओळींचे पत्र लिहून पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. रामलाल यांनी आपल्याला लोकसभा निवडणूक लढवू नये असे कळवले असल्याचे या पत्रात जोशी यांनी नमूद केले आहे. उत्तर प्रदेशमधील प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा असल्याने जोशी यांनी पुन्हा एकदा कानपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केलेली होती. 

  • जोशी यांनी पक्षाची बांधणी केली आणि पक्षाचा विस्तार केला, याबद्दल पक्ष नेहमीच त्यांचा आभारी असेल. पण, उमेदवारी दिली गेली नाही म्हणून लोकांनी आक्रोश करू नये. मुलायम सिंह यादव यांनादेखील तिकीट नाकारले गेले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी व्यक्त केली.

  • भाजपने उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधील स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली असून लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या बुजुर्ग भाजप नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेलेले हे दोन्ही ज्येष्ठ नेते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी प्रचार करणार नाहीत. उमा भारतींना मात्र पक्षाने प्रचारासाठी पाचारण केलेले आहे.

प्रसिद्ध मल्याळम लेखिका, कवयित्री अशिता यांचे कर्करोगाने निधन :
  • प्रसिद्ध मल्याळम लेखिका आणि कवयित्री अशिता यांचे बुधवारी (दि.२७) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले, त्या ६३ वर्षांच्या होत्या. कर्करोगाने ग्रस्त असल्याने त्यांच्यावर त्रिशूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, येथेच त्यांनी प्राणज्योत मालवली.

  • शिता यांचा जन्म ५ एप्रिल १९५६ रोजी त्रिशूरमध्ये झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली आणि मुंबईत झाले आहे. त्यानंतर त्यांनी एर्नाकुलमच्या महाराजा कॉलेजमधून इंग्रजी साहित्यातून पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेतले. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या लेखनाच्या क्षेत्रात सक्रिय झाल्या. आजवर त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यामध्ये विस्मया छिन्नांगल, अपोर्ना विरामंगल, अष्टाधायुदे कथकाल, मज्झमंगल ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

  • मल्याळम भाषेतील लेखनात विशेष कामगिरी केल्याबद्दल अशिता यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. यामध्ये प्रतिष्ठीत एडसेरी अवॉर्ड (१९८६) आणि ललितांबिका अंतर्जनम पुरस्कार (१९९४) यांचा समावेश आहे.

ओलाची इंग्लडमधील लिव्हरपूलमध्ये बजाज ऑटोरिक्षाची सेवा :
  • मुंबई : प्रसिद्ध रेडियो कॅब सर्व्हीस ओलाने इंग्लडमधील लिव्हरपूलमध्ये बजाज आॅटोरिक्षांची स्वस्तातील सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना शहराच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वस्तात प्रवास करता यावा या हेतुने ही सेवा सुरू करण्यात आल्याचे बजाज आॅटोच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.

  • इंग्लडमधील टॅक्सी सेवेच्या नियमांनुसार बजाज आॅटोरिक्षांना निओन ग्रीन रंगात रंगवले असून चालकांचा (ड्रायव्हर्स) गणवेशही त्याच रंगाचा आहे. याचबरोबर ओलाने लिव्हरपूलमध्ये पियाज्जियो टुकटुकचा ताफाही सुरू केला आहे.

  • सेवेचा प्रारंभ म्हणून ओलाने ओलाचे मोबाईल अ‍ॅप्प डाऊनलोड करून त्याचा उपयोग आॅटोरिक्षा बोलावण्यासाठी करणाऱ्या प्रवाशांना ५० टक्के सवलत देऊ केली आहे. जगभरातील आपली प्रतिस्पर्धी कंपनी उबर रेडियो कॅबला ताब्यात घेण्याचा हेतू असलेल्या बजाज आॅटोरिक्षाने आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत उत्तम ग्राहकसेवा आणि चालकांना कमिशन देत असतो, असा दावाही केला आहे.

  • ओला रेडियो कॅब सेवेने इंग्लडमध्ये गेल्या वर्षी आॅगस्टमहिन्यात कार्डिफसह प्रवेश केला होता आणि नंतर आपला कारभार आॅक्टोबरमध्ये ब्रिस्टोलमध्ये तर नोव्हेंबरमध्ये बाथ आणि एक्झेटरमध्ये व आता लिव्हरपूलमध्ये विस्तारला आहे.

दिनविशेष :
  • जागतिक रंगमंच दिवस

महत्वाच्या घटना 

  • १६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.

  • १७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.

  • १८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

  • १९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

  • २०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८४५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)

  • १८६३: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९३३)

  • १९०१: डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)

मृत्यू 

  • १८९८: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)

  • १९५२: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९४)

  • १९६७: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर१८९०)

  • १९६८: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३४)

  • १९९२: साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्‍चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.

  • १९९७: संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.