चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ मे २०१९

Updated On : May 27, 2019 | Category : Current Affairs'ऑस्कर' अध्यक्षांच्या हस्ते राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, 'भोंगा' सर्वोत्कृष्ट :
 • मुंबई : 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळा ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पार पडला. पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचं संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा म्युझियममध्ये उभारण्यासाठी राज्य सरकार आग्रही असल्याचं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. 'भोंगा' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर के. के. मेनन आणि मुक्ता बर्वे यांनी सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार पट‍कावले.

 • वरळीतील 'नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया' मध्ये राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. संकलक वामन भोसले, अभिनेते परेश रावल यांना राज कपूर तर अभिनेत्री सुषमा शिरोमणी, अभिनेते भरत जाधव यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 • अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर ॲवॉर्डस) कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारमार्फत करण्यात येईल. भारतात सध्या सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. 'बॉलिवूड नगरी' असलेल्या भारतात बेली पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहेत. मात्र मुंबईत कार्यालय सुरु केल्यास याकडे आशियातले केंद्र म्हणून पाहता येईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला, ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा :
 • नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

 • लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर काल (25 मे) भाजपसह सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदींची संसदीय पक्षनेतेपदी निवड केली. केंद्रीय सभागृहतील बैठकीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर भाजपचे दोन माजी अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी या प्रस्तावावर मोहर उमटवली.

 • गडकरी आणि सिंह यांच्या समर्थनानंतर शिरोमणी अकाली दलचे नेते प्रकाश सिंह बादल, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) चे अध्यक्ष नितीश कुमार यांनीदेखील अमित शाह यांच्या प्रस्तावास समर्थन दिले.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा सोपवला होता. नरेंद्र मोदींच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी 16 वी लोकसभा विसर्जित करुन नरेंद्र मोदींना शपथविधीची तारीख आणि वेळ कळवायला सांगितलं होतं.

येत्या १० दिवसांत काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार :
 • नवी दिल्ली : येत्या दहा दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाला राहुल गांधींच्या ऐवजी नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असून ते आपला निर्णय मागे घेण्याची सुतराम शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय पक्षाचा नवा अध्यक्ष हा गांधी घराण्यातला नको, गांधी घराण्याबाहेरचे नाव सुचवा असेही राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यामुळे आता नवा काँग्रेस अध्यक्ष कोण असणार? याची चर्चा सुरु झाली आहे.

 • काल झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावरुन जोरदार मंथन झाले. त्यात राहुल गांधींनी दिलेला राजीनामा कार्यकारिणीने नाकारला. राहुल यांना पक्षाची पुर्नरचना करण्याचे सर्वाधिकारही देण्यात आले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाची नवी रचना कशी असणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.

 • दरम्यान एकाच वेळी काँग्रेसचे चार कार्यकारी अध्यक्ष नेमले जाणार असल्याचीही चर्चा रंगत आहे. परंतु या चार कार्यकारी अध्यक्षांमध्येही प्रियंका गांधी यांचे नाव नसणार हे निश्चित आहे. कारण घराणेशाहीच्या आरोपातून काँग्रेसला मुक्त करण्यासाठीच राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे 2019 च्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.

देशातील २५ राज्यांना महिना १ कोटी दंड :
 • देशातील  पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतची कृती योजना ३० एप्रिलपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर न केल्यामुळे त्यांना दर महिना १ कोटी रूपये पर्यावरण भरपाई द्यावी लागणार आहे.

 • ३० एप्रिलपर्यंत राज्यांनी कृती योजना सादर केल्या नाहीत, तर त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळास दरमहा १ कोटी रूपये भरपाई द्यावी, असे राष्ट्रीय हरित लवादाने असे बजावले होते. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अतिरिक्त संचालक एस.के. निगम यांनी सांगितले, की राज्यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे पालन केलेले नसून यात केवळ दंडच नव्हे तर तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. प्लास्टिक व घन कचरा व्यवस्थापनात राज्यांची अवस्था वाईट असून महापालिकांच्या अग्रक्रमाच्या यादीत तो शेवटचा विषय आहे. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ राष्ट्रीय हरित लवादास राज्यांनी आदेशाचे पालन न केल्याची माहिती देईल आणि त्यानंतर राज्यांना फार मोठा आर्थिक दंड केला जाईल.

 • पर्यावरण मंत्रालयाने याबाबत जी जनजागृती करायला पाहिजे होती ती केलेली नाही. प्लास्टिक कचरा वेगळा काढण्याच्या सूचना व इतर बाबतीत राज्यातील अधिकाऱ्यांचेच प्रबोधन केलेले नाही. हरित लवादाच्या आदेशाचे पालन झाले नाही, तर १ मे २०१९ पासून दर महिन्याला १ कोटी रूपये याप्रमाणे दंड आकारण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

 • महाराष्ट्रासह २२ राज्यांत प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती, पण ठोस नियंत्रणाअभावी या बंदीचे पालन योग्य प्रकारे झाले नाही. त्यामुळे प्लास्टिकचा साठा करणे, ते विकणे असे प्रकार शहरांमध्ये सुरू झाले आहेत. दिल्लीसह काही  केंद्रशासित प्रदेशांत प्लास्टिक कचरा जाळण्याचे प्रकारही झाले आहेत.

मोदी यांचे इम्रान यांना दहशतवादमुक्तीचे आवाहन :
 • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात निर्माण झालेला तिढा सोडवण्याचा भाग म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून दोन्ही देशांच्या उन्नतीसाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर, या क्षेत्रात शांतता व समृद्धी वाढवण्यासाठी हिंसाचार व दहशतवाद यापासून मुक्त असलेले वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी त्यांना सांगितले.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या भरघोस विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी खान यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विटरचा आधार घेतला होता. यानंतर रविवारी त्यांनी मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. या संवादात, दक्षिण आशियात शांतता, प्रगती आणि समृद्धी ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोदी यांच्यासोबत काम करण्याची आपण वाट पाहात असल्याचे खान म्हणाले.

 • या दूरध्वनी संवादात, दोन्ही देशांमध्ये विश्वास उत्पन्न करण्याची, तसेच दक्षिण आशियात शांतता व समृद्धी वर्धिष्णु होण्यासाठी हिंसाचार आणि दहशतवादमुक्त वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता मोदी यांनी व्यक्त  केली.

 • आपल्या सरकारच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार घेतलेल्या पुढाकाराची आठवण करून देत मोदी यांनी, दोन्ही देशांनी गरिबीचा एकत्रितपणे मुकाबला करण्याबाबत यापूर्वी खान यांना केलेल्या सूचनचे यावेळी स्मरण करून दिले.

मराठीतशपथ : महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, नेटीझन्सची सोशल मीडियावर मागणी :
 • मुंबई : लोकसभा निवडणुकीत मराराष्ट्रातून निवडून आलेल्या खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी ट्विटर होत आहे. यासाठी #मराठीतशपथ असा हॅशटॅग नेटीझन्सकडून वापरण्यात येत आहे. अनेकांनी या मोहिमेला समर्थन देत ट्वीट केलं आहे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन होण्यास मदत होईल, असा यामागे उद्देश आहे.

 • मराठी भाषा प्राचीन भारतीय भाषा आहे. तसेच मराठी भारतातील तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. आपल्या मराठी भाषेचा जगभरात गौरव केला जातो, मग महाराष्ट्रातील खासदारांचे शपथविधी मराठीत का असू नयेत? महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीतच शपथ घ्यावी, असा आग्रह ट्विटर केला जात आहे.

 • महाराष्ट्रातून निवडून आलेल्या जवळपास सर्वच खासदारांना उत्तम मराठी येते. म्हणून सर्व खासदारांनी मराठीत खासदारकीची शपथ घ्यावी. तसेच मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही नेटीझन्सकडून होत आहे.

 • मराठी भाषेबाबतच्या आणि खासदारांनी मराठी शपथ घेण्याच्या आशयाचे अनेक ट्वीट ट्विटरवर अनेकांकडून केले जात आहेत. अनेकांनी तर नव्या खासदारांना टॅग करत ही मागणी केली आहे. मात्र अद्याप एकाही खासदाराने नेटीझन्सच्या ट्विटला रिप्लाय दिलेला नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८८३: अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.

 • १९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.

 • १९३०: त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर – १०४६ फूट) असलेल्या ख्रायसलर सेंटर या इमारतीचे न्यूयॉर्कमधे उद्‍घाटन झाले.

 • १९५१: मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.

 • १९६४: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

 • १९९८: ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.

 • १९९९: अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.

 • २०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.

जन्म 

 • १९१३: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे २००४)

 • १९२३: अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते हेन्‍री किसिंजर यांचा जन्म.

 • १९५७: भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म.

 • १९६२: भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९१०: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८४३)

 • १९१९: भारतीय लेखक कंधुकुरी वीरसासिंगम यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८४८)

 • १९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन.

 • १९६४: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९)

 • १९८६: संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचे निधन.

 • १९८६: भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी निधन. (जन्म: १५ एप्रिल १९०१)

 • १९९४: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १९०१)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)