चालू घडामोडी - २७ नोव्हेंबर २०१८

Date : 27 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नासाच्या ‘इनसाइट’ यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग :
  • नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १ वाजून २४ मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना १९८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. दरम्यान, इनसाइटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.

  • सहा महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर लँड केले. नासाच्या या प्रकल्पासाठी १ बिलियन डॉलर म्हणजेच ७० अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला २६ महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल अशी अपेक्षा आहे.

  • नासाने म्हटले आहे की, इनसाइट यान पृष्ठभागावर १० ते १६ फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे १५ टक्के अधिक खोल असेल. २०३० पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.

  • इनसाइट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल.

ब्रेग्झिटसाठी ब्रिटिश संसदेत ११ डिसेंबरला मतदान :
  • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे ब्रेग्झिटवरुन संसदेच्या निशाण्यावर राहण्याची शक्यता आहे. ब्रेग्झिटप्रकरणी ११ डिसेंबरला मतदान होणार असल्याचे मे यांनी म्हटले आहे. दरम्यान, यूरोपीयन यूनियनच्या देशांनी रविवारी ब्रेग्झिट कराराला मंजुरी दिली. आता हा करार ब्रिटिश संसदेच्या मंजुरीनंतर लागू केला जाईल.

  • ब्रसेल्सबरोबर मागील दोन वर्षांपासून या कराराबाबत सुरु असलेली चर्चेची प्रक्रिया खूप जटील आणि दुख:दायी राहिली. अनेकवेळा करार होऊ शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती.

  • आता मे यांच्यासमोर शेवटची आणि मोठी अडचण दूर करण्याचे आव्हान आहे. त्यांना ब्रिटिश संसदेत हा करार मंजूर करुन घ्यावा लागणार आहे. मे यांचेच अनेक खासदार अजूनही याला मोठा विरोध करत आहेत.

सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त :
  • निवडणूक आयुक्त सुनील अरोरा देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांचे स्थान ते घेतील. निवडणूक आयोगाने सोमवारी या नियुक्तीला पुष्टी दिली. येत्या २ डिसेंबरला अरोरा हे पदभार स्वीकारतील. रावत यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे.

  • अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८० च्या तुकीडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. विधी मंत्रालयाने सोमवारी अरोरा यांच्या नियुक्तीला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर परवानगीसाठी तो राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आला आहे. अरोरा यांच्या नियुक्तीच्या औपचारिक घोषणेची अधिसूचना लवकर काढण्यात येईल, असे मंत्रालयातील सूत्राने माहिती दिली.

  • राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना ६२ वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवर काम केले आहे. ते १९९३ ते १९९८ पर्यंत राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि २००५ ते २००८ पर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.

अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार :
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

  • आयोजकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात आयटी उद्योग विकसित करणे, फ्रान्समध्ये आर्थिक गुंतवणूक करणे तसेच अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून एक समाजसेवकाच्या रुपात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान केला जात आहे.

  • प्रेमजी यांच्यापूर्वी भारतातील बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी आणि अभिनेता शाहरुख खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी गृहपाठ मुक्त होणार :
  • पहिली आणि दुसरी या दोन इयत्तांच्या मुलांसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक परिपत्रक काढले आहे. ज्यानुसार या विद्यार्थ्यांना गृहपाठातून मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने राज्यांना परिपत्रक पाठवले आहे. या परिपत्रकानुसार पहिली आणि दुसरीच्या मुलांना गृहपाठ देण्यात येणार नाही. एवढेच नाही तर या मुलांच्या दप्तराचे वजन हे जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत असेल.

  • पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित हे दोनच विषय शिकवण्यात यावेत. तिसरी ते पाचवीच्या मुलांना गणित, भाषा आणि सामान्य विज्ञान शिकवले जावे अशाही सूचना या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. ज्या पुस्तकांची आवश्यकता नाही अशी पुस्तकं शाळेत न आणण्याबाबतचा निर्णय शाळांना घ्यावा असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. टाइम्स नाऊ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

  • तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन दोन ते तीन किलो, सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन चार किलो, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार किलो तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन पाच किलोपेक्षा जास्त असू नये असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

संविधान दिन - भारतीय संविधानाचा इतिहास आणि रंजक गोष्टी :
  • मुंबई : 26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो. आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपलं संविधान कसं तयार केलं म्हणजेच त्याचा इतिहास काय आहे आणि याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...

  • 1946 मध्ये ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु केला. ब्रिटीश सरकारने एक कॅबिनेट मिशन भारतात पाठवल्यानंतर याची सुरुवात झाली. कॅबिनेट मिशनला ब्रिटीश सरकार आणि भारताच्या विविध राज्यांच्या प्रतिनिधींना भेटायचं होतं. या प्रतिनिधींना भेटून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या हेतूने, संविधान सभेच्या स्थापनेबाबत चर्चा करायची होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८१५: पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.

  • १८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.

  • १९९५: पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.

  • १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

  • २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.

जन्म 

  • १८५७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९५२ – इस्ट्बोर्न, ससेक्स, लंडन, इंग्लंड)

  • १८७४: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२)

  • १८७८: भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९४८)

  • १८८१: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७)

  • १८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म.

  • १९०३: नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ लार्स ऑन्सेगर यांचा जन्म.

  • १९१५: मराठी कथा कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण उर्फ दी. बा. मोकाशी यांचा उरण, रायगड येथे जन्म. (मृत्यू: २९ जून १९८१)

मृत्यू 

  • १९७५: गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)

  • १९७८: भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै१९०५)

  • १९९५: दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.

  • २०००: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०९)

  • २००२: भारतीय कवी आणि शैक्षणिक शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९१५)

  • २००७: गेटोरेड चे सहनिर्माते रॉबर्ट केड यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२७)

  • २००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन. (जन्म: २५ जून १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.