चालू घडामोडी - २७ सप्टेंबर २०१८

Date : 27 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अयोध्याप्रकरणातील याचिकेवर आज निकाल :
  • नवी दिल्ली : मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निर्णय देण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये वादग्रस्त जमिनीच्या त्रिभाजनाचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरोधातील याचिकांच्या सुनावणीत मशीदीचा हा मुद्दा येणार आहे.

  • १९९४मध्ये एम. इस्माईल फारूकी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात पाच सदस्यीय पीठाने मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानुसार वादग्रस्त जमिनीचे सरकारला अधिग्रहण करता येईल, असे पाच सदस्यीय पीठाने तेव्हा स्पष्ट केले होते.

  • त्या निकालाचा  विस्तारित पीठाकडून पुनर्विचार केला जावा, अशी मागणी अयोध्या मालमत्ता वादात पुढे आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय पीठ गुरुवारी दुपारी दोन वाजता निर्णय देण्याची शक्यता आहे.

देशात २१.०८ कोटी जणांची पॅन -आधार क्रमांक जोडणी :
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आधारबाबतच्या निकालानुसार परमनंट अकाऊंट नंबर म्हणजे पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांना जोडणे अनिवार्य करण्यात आले असून आतापर्यंत २१.०८ कोटी लोकांनी हे दोन क्रमांक एकमेकांशी जोडले आहेत.

  • अधिकृत आकडेवारीनुसार प्राप्तिकर खात्याने जारी केलेले २१०८१६७७६ इतके पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडले गेले आहेत. एकूण पॅनकार्ड किंवा क्रमांकांची संख्या ही ४१.०२ कोटी  (४१०२६६९६९)असून त्यातील २१.०८ कोटी कार्ड आधार क्रमांकाशी जोडले गेले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची तारीख पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. याबाबतचा आदेश ३० जूनला जारी करण्यात आला होता.

  • नवीन माहितीनुसार ४१.०२ कोटी पॅन कार्डमधील ४०.०१ कोटी कार्ड हे व्यक्तींच्या नावावर आहेत. बाकीच्या कंपन्या व करदाते यांच्या नावावर आहेत. त्यामुळे फक्त पन्नास टक्के पॅन क्रमांक किंवा कार्ड हे आधार क्रमांक किंवा कार्डशी जोडले गेले आहेत. आधार क्रमांक व पॅन क्रमांक जोडण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच वेळा वाढवून देण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त राष्ट्रसंघाचा मानाचा पुरस्कार :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ या पुरस्काराने गौरव केला आहे. ‘पॉलिटिकल लीडरशीप’ या विभागात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.

  • संयुक्त राष्ट्रसंघाने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना पर्यावरणसंबंधी जागतिक करार करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींना २०२२ पर्यंत देशात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्धाराबद्दल हा पुरस्कार दिला आहे. केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही पुरस्कार देण्यात आला आहे. अक्षय उर्जेच्या दिशेने पावले टाकल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

  • पर्यावरणसंदर्भात जागतिक स्तरावर प्रभावी नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०२२ पर्यंत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचा दृढनिश्चय केल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. तर केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे सौरउर्जेवर चालणारे विमानतळ आहे.

पाकिस्तानचा धुव्वा, बांगलादेशची फायनलमध्ये धडक :
  • दुबई: बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळं शुक्रवारी (उद्या) फायनलमध्ये आता भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना पाहायला मिळेल.

  • या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानला 240 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण इमाम उल हकच्या 83 धावांच्या झुंजार खेळीचा अपवाद वगळता, पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इमामने शोएब मलिकच्या साथीनं 67 धावांची आणि असिफ अलीच्या साथीनं 71 धावांची भागीदारी रचली. पण या दोन्ही भागीदारी पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. पाकिस्तानला 50 षटकात 9 बाद 202 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुस्ताफिजूर रहमाननं पाकिस्तानच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं.

  • या सामन्यात टॉस जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 239 धावा केल्या. बांगलादेशने 12 धावांतच तीन विकेट गमावल्या होत्या. सौम्या सरकार (0), मोमिनुल हक (5) आणि लिटन दास (6) धावा करुन माघारी परतले. मात्र मुश्फीकूर रहीमने 99, तर मोहम्मद मिथूनने 60 धावा केल्याने बांगलादेशला 239 धावांपर्यंत मजल मारता आली.

दिनविशेष :
  • जागतिक पर्यटन दिन

महत्वाच्या घटना

  • १७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

  • १८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.

  • १८५४: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.

  • १९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.

  • १९०८: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.

  • १९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.

जन्म

  • १९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.

  • १९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.

  • १९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)

  • १९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.

मृत्यू

  • १८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२)

  • १९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४)

  • १९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)

  • १९९९: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९३५)

  • २००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)

  • २०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)

  • २०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.