चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ एप्रिल २०१९

Date : 28 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसाक पुरुषांच्या आतंररष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील पहिली महिला अम्पायर :
  • दुबई : ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट पंच क्लेअर पोलोसाकनं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. क्लेअर पोलोसाक पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम पाहणारी जगातली पहिली महिला ठरली आहे.

  • क्लेअरनं सध्या सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये नामिबिया आणि ओमान संघांमधल्या सामन्यात मुख्य पंच म्हणून भूमिका बजावली. 31 वर्षीय क्लेअरनं याआधी महिलांच्या 15 वन डे सामन्यात तसेच आयसीसीच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातही पंच म्हणून काम पाहिलं होतं.

  • नोव्हेंबर 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये झालेला वन डे सामना हा क्लेअरच्या अंपायरिंग करिअरमधला पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर 2018 सालच्या महिला टी 20 विश्वचषकात आणि 2017 च्या महिलांच्या वन डे विश्वचषकातही तिनं पंचांची भूमिका बजावली होती.

आरबीआयकडून २० रुपयांची नवी नोट जारी, नोटेवर महाराष्ट्रातील वेरुळची लेणी :
  • नवी दिल्ली : भारतीय चलनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच महात्मा गांधींच्या नव्या रुपातील 20 रुपयांची नोट दाखल करण्यात येणार आहे. नवीन वैशिष्ट्ये तसेच नव्या रंगातील ही नोट असणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने नोटबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांच्य नव्या नोटा बाजारात आणल्या होत्या. त्यानंतर 200,100,50 आणि 10 रुपयांच्याही नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.

  • आरबीआयच्या वेबसाईटवर या नोटेचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या नोटेच्या वैशिष्ट्यांबाबत माहितीही देण्यात आली आहे. वीस रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची आहे, नोटेच्या मागील बाजूस सांस्कृतिक वारसा असलेल्या महाराष्ट्रातील वेरुळच्या लेणीचे चित्र आहे. या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे.

  • 'महात्मा गांधींच्या नव्या रुपातील 20 रुपयांची नोट आरबीआयकडून जारी करण्यात येत आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या बाजारात असलेल्या वीस रुपयांच्या जुन्या नोटा देखील बाजारात असणार आहे', अशी माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती :
  • मुंबई : मतदार केंद्रावर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. फक्त मोबाईलच नव्हे तर कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावर नेऊ नये अशी सक्त ताकीद निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.  दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईलनं शुटिंग करून गुप्त मतदानाच्या संकल्पनेला हरताळ फासण्यात आला होता. म्हणून निवडणूक आयोगानं ही खबरदारी घेतली आहे.

  • लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदानाची पद्धत गुप्त राखण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्रात जाताना मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

  • निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना तसं आवाहन केलं आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानावेळी झालेलं फेसबुक लाईव्ह आणि तिसऱ्या टप्प्यातील टिकटॉकच्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली आहे.

चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, २९ एप्रिलला मतदान :
  • मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. चौथ्या टप्प्यात देशभरातील 9 राज्यातील 71 लोकसभा मतदार संघातील जागांसाठी येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जागांचा समावेश आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. 

  • लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील आजच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचाराच्या सभा घेतल्या. या निवडणुकीत सुभाष भामरे, समीर भुजबळ, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, पूनम महाजन, मिलिंद देवरा आदींचे भवितव्य 29 एप्रिल रोजी मतपेटीत बंद होणार आहे. 

  • चौथ्या टप्प्यात देशातील बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर या 9 राज्यातील 71 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये एकूण 323 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 

  • महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघांत मतदान - नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर आणि शिर्डी मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 

अमेरिका घालणार पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध :
  • वॉशिंग्टन - पुलवामा हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात देखील दरी निर्माण झाली आहे. त्यातच आता अमेरिका पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध घालण्याच्या विचारात आहे.

  • अमेरिकेतील कायद्यांतर्गत ज्या १० देशांवर प्रतिबंध घालता येणार आहे. यात पाकिस्तानचे देखील नाव आहे. या कायद्यानुसार निर्बंध असलेल्या राष्ट्रातील नागरिकांनी व्हिसातील मुदतीपेक्षा जास्त काळ अमेरिकेत वास्तव्य केल्यास आणि व्हिसा परत देण्यास नकार दिल्यास त्याचा व्हिसा रद्द करण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी याच वर्षी पाकिस्तान आणि घाना यांचा या यादीत समावेश केला आहे. याअगोदर २००१ साली गयाना, कंबोडिया, इरिट्रीया, गिनी आणि २०१७ साली बर्मा आणि लाओस या देशांचाही समावेश करण्यात आला होता.

  • अमेरिकेने २०२८ साली ३८ हजार पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अमेरिकेने व्हिसा कार्डचा खेळ करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या या खेळीपुढे झुकत पाकिस्तानने अनेक दहशतवादी संघटनांवर निर्बंध घातले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी सैन्य मदतही थांबवली आहे.

पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ :
  • केंद्र सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ करत कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे. आता कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के इतके व्याज मिळणार आहे. याचा फायदा तब्बल ६ कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. ‘ईपीएफओ’ने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता पीएफवर ८.६५ टक्के इतके व्याज मिळणार आहे.

  • गेल्या आर्थिक वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधीवर ८.५५ टक्के व्याजदर होते आता २०१८-१९ मध्ये ०.१० टक्के वाढवून ८.६५ टक्के करण्यात आला आहे. व्याजदर वाढीबाबतचा प्रस्ताव कर्मचारी भविष्य निधी संगठनाने (ईपीएफओ) पाठवला होता. त्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे चांगले व्याज मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांतील ही पहिली व्याजदरवाढ ठरली आहे.

  • २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ८.८ टक्के इतका व्याजदर होता. तो २०१६-२०१७ मध्ये ८.६५ टक्क्यांवर आणण्यात आला. २०१७-१८ मध्ये तो कमी करण्यात आला. तो ८.५५ टक्के कमी करण्यात आला. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९१६: होम रुल लीगची स्थापना झाली.

  • १९२०: अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.

  • १९६९: चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

  • २००१: डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.

  • २००३: ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.

जन्म 

  • १७५८: अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्‍रो यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८३१)

  • १८५४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९४४)

  • १९०८: ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.

  • १९१६: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी  १९९३)

  • १९३१: लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.

  • १९३७: इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००६)

  • १९४२: इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.

  • १९६८: झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७४०: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७००)

  • १९४५: इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: २९ जुलै १८८३)

  • १९७८: अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९०९)

  • १९९२: ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)

  • १९९८: जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई यांचे निधन. (जन्म: २० जून १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.