चालू घडामोडी - २८ ऑगस्ट २०१८

Date : 28 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कमाईमध्ये ‘जिओ’ देशात दोन नंबर, व्होडाफोनला टाकलं मागे :
  • अवघ्या दोन वर्षांमध्ये ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ कमाईच्या बाबतीत देशातील दुसरी मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. महसुली उत्पन्नाच्या निकषात जिओने व्होडाफोनला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे. पहिल्या क्रमांकावर एअरटेल कायम असून आता जिओ आणि एअरटेलमधील अंतर बरेच कमी झाले आहे.

  • कमी पैशांमध्ये इंटरनेट सेवा आणि गावागावात पोहोचलेलं नेटवर्क यामुळे जिओच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे, परिणामी कंपनीच्या उत्पन्नामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. 4जी सेवा सादर केल्यानंतर गेल्या दोन वर्षांत महसुली उत्पन्नाच्या बाजारपेठेत ‘जिओ’च्या बाजारहिश्श्यात मोठी वाढ झाली आहे. जून २०१८ च्या तिमाहीत कंपनीचा बाजारहिस्सा २२.४ टक्क्यांवर पोहोचला. ट्रायच्या आकडेवारीनुसार मार्च २०१८च्या तिमाहीच्या तुलनेत जूनअखेर २.५३ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

  • महसुली उत्पन्नाच्या निकषाच्या जून २०१८ च्या तिमाहीनुसार एअरटेल ३१.७ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे, २२.४ टक्क्यांसह जिओ दुसऱ्या क्रमांकावर , तिसऱ्या क्रमांकावर व्होडाफोन १९.३ टक्के आणि आयडिया १५.४ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जिओ लवकरच एअरटेललाही मागे टाकेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

SBI ने १३०० शाखांची नावं आणि IFSC कोड बदलले :
  • मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने देशभरातील सुमारे 1300 शाखांची नावं आणि आयएफएससी कोडमध्ये बदल केला आहे. संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांच्या सोयीसाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. बँकेने या शाखांची नवी नावं आणि नवे आयएफएससी कोडची यादी जारी केली आहे. एकूण 1295 शाखांच्या नावात हा बदल करण्यात आला आहे.

  • 1 एप्रिल 2017 रोजी पाच संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेचं एसबीआयमध्ये विलिनीकरण झालं होतं. यानंतर विलीनीकरणानंतर एसबीआयाच विस्तार आणि मूल्यांकन वाढलं. बँकेने जी यादी जाहीर केली आहे, त्यात शाखांची जुनी नावं आणि आयएफएससी कोडचाही उल्लेख करण्यात आला आहे. कोणत्या बँकेचा नवा कोड काय आहे, हे एसबीआयच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

  • एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक आहे. देशभरात बँकेच्या 22,428 शाखा आहेत. जगभरातील बँकांच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत एसबीआय 53 व्या स्थानावर आहे. 30 जून, 2018 पर्यंत एसबीआयची एकूण संपत्ती 33.45 लाख कोटी रुपये होती.

  • मागील वर्षी एप्रिलमध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि भारतीय महिला बँकेचं एसबीआयमध्ये विलीनीकरण झालं होतं. या विलीनीकरणामुळे एसबीआयच्या 1805 शाखा कमी झाल्या. एसबीआयकडे आधी दोन लाख कर्मचारी होते. आता कर्मचारी संख्येत 71 हजारांनी वाढ झाली आहे.

देशात पहिल्यांदाच जैविक इंधनावर विमानाचं उड्डाण :
  • नवी दिल्ली : देशात आज प्रथमच जेट्रोफा बियांपासून निर्मित इंधनावर 90 आसनी विमानाने यशस्वी उड्डाण केलं. स्पाईसजेटच्या बम्बार्डियर Q400 विमानावर हा प्रयोग करण्यात आला. डेहराडूनहून दिल्लीला हे विमान पोहोचलं. या विमानात जैविक जेट इंधन अर्थात बायो जेट फ्युएलचा वापर केला. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू उपस्थित होते.

  • या विमानात 75 टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्यूएल आणि 25 टक्के बायोफ्यूएल होतं. परीक्षणावेळी विमानात डीजीसीए आणि स्पाईसजेटच्या अधिकाऱ्यांसह 20 जण उपस्थित होते. हे उड्डाण जवळपास 25 मिनिटांचं होतं. या माध्यमातून विमानात जैविक इंधनाचा वापर करणारा भारत पहिला विकसनशील देश ठरला आहे. आतापर्यंत अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांनाच हे शक्य झालं आहे.

  • जेट्राफा म्हणजे एरंडाचा प्रकार आहे. त्याच्या बियांपासून मिळणाऱ्या तेलापासून हे जेट इंधन तयार करण्यात आलं आहे. परीक्षणासाठी काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आणि उत्तराखंडमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमने या इंधनाची निर्मिती केली आहे.

  • भारतात बायो फ्युएलला परवानगी मिळाली तर कार्बन उत्सर्जन तर कमी होईलच, शिवाय कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये खर्च होणारे परकीय चलनही वाचेल.

नेहरुंचं योगदान पुसू नका, मनमोहन सिंहांचं मोदींना पत्र :
  • नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील तीन मूर्ती स्मारकात  केल्या जाणाऱ्या प्रस्तावित बदलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या वास्तूंमध्ये बदल करून नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.

  • दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे.

  • माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे केवळ काँग्रेसचे नेते नव्हते तर ते संपूर्ण देशाचे नेते होते, असं सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.

  • तुमचं सरकार एका अजेंड्यानुसार नेहरु मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी यांची रचना बदलण्याच्या तयारीत आहे. मात्र तुमच्याकडून अपेक्षा आहे की ते होऊ देऊ नये, असं मनमोहन सिंह यांनी पत्रात नमूद केलं.

  • शिवाय आपल्या पत्रात मनमोहन सिंहांनी वाजपेयींच्या त्या भाषणाचा उल्लेख केला आहे, ज्यात नेहरुंच्या निधानंतर लोकसभेतील भाषणात वाजपेयींनी नेहरुंच्या कार्याचा गौरव केला होता.

शरद पवारांनी सांगितला पंतप्रधान निवडीचा फॉर्म्युला :
  • नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढा उभारण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र दुसरीकडे विरोधकांमधून पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार म्हणून कोण समोर येणार, यावर पुरेपूर मौन बाळगण्यात येत आहे. या सर्व चर्चांदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक फॉर्म्युला देत या मुद्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 

  • पंतप्रधानपद उमेदवारीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ज्या पार्टीचा सर्वाधिक जागांवर विजय होईल ती पार्टी पंतप्रधानपदासाठी दावा करू शकते. शरद पवार पुढे असंही म्हणाले की, आधी निवडणूक होऊ द्या आणि भाजपाला सत्तेबाहेर जाऊ द्या. त्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेऊ आणि ज्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्या पक्षाला पंतप्रधानपदासाठी दावा करता येईल. ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान होईल.

  • दरम्यान, यापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेसला जागा मिळाल्या तर मीच पंतप्रधान होणार असं वक्तव्य केलं होतं. परंतु राहुल गांधींनीच मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही स्पष्ट केले आहे. यावरही शरद पवार असं म्हणाले की, मी खूश आहे की, राहुल गांधी यांनीही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केले. 'पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहत नाही', असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतीय पत्रकारांसोबत संवाद साधताना सांगितले होते.

डबघाईला आलेल्या पाकिस्तान नडतोय काश्मीरचा हव्यास :
  • नवी दिल्ली - पृथ्वीवरील स्वर्ग समजले जाणाऱ्या काश्मीरवर सुरुवातीपासूनच पाकिस्तानची वाकडी नजर आहे. पण काश्मीरच्या हव्यासामुळे पाकिस्तानचे चौफेर नुकसान होत असल्याचे मत पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाची सखोर माहिती असलेल्या भारताच्या गुप्तवार्ता विभागातील एका माजी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

  • काश्मीरबाबत पाकिस्तानच्या मनात असलेल्या हावेमुळेच पाकिस्तानमध्ये लष्कर सर्वोच्च शक्तीकेंद्र बनली आहे. तसेच काश्मीरच्या हव्यासातूनच पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा उदय झाला असून, तेथील लोकशाही धोक्यात आली आहे, असे मत या अधिकाऱ्याने मांडले आहे. 

  • भारताची गुप्तहेर संघटना असलेल्या रॉ मध्ये विशेष सचिव म्हणून काम पाहिलेल्या ज्योती के. सिन्हा यांनी इंडियन डिफेन्स रिव्ह्यूमध्ये आपले मत मांडले आहे. " मोहम्मद अली जिन्ना यांचा झालेला आकस्मिक मृत्यू आणि पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये अराजकाची सुरुवात झाली. जिन्ना आणि खान यांनी पाकिस्तानला लोकशाहीची दिशा दिली होती. मात्र लवकरच लष्कर पाकिस्तानमध्ये प्रबळ झाले. तसेच काश्मीर प्रश्न हा पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा बनला. काश्मीरबाबतच्या कारवायांमुळेच पाकिस्तानात लष्कर प्रभावी आणि शक्तिशाली बनले. पुढे पाकिस्तान हा  देशाकडे लष्कर नव्हे तर लष्कराकडे असलेला देश बनला."   

  • पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी आणि पूर्व पाकिस्तानातील बंगाली यांच्या वादातून बांगलादेशचा जन्म झाला. आज बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा कैकपटीने पुढे गेला आहे. बांगालदेशमध्ये लोकशाही स्थिरस्थावर झाली आहे.

  • तसेच तेथील लष्करही लोकनियुक्त सरकारच्या आदेशाबरहुकूम काम करते. मात्र पाकिस्तानचे भवितव्य अनिश्चित आहे. फाळणीनंतर काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याचे पाकिस्तानचे मनसुबे पूर्ण होऊ शकलेले नाही. काहीही करून काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

  • १९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.

  • १९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.

  • १९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

जन्म

  • १७४९: जर्मन महाकवी, कलाकार योहान वूल्फगाँग गटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च १८३२)

  • १८९६: उर्दू शायर रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९८२)

  • १९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म.

  • १९१८: मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

  • १९२८: भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म.

  • १९२८: सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च २००४)

  • १९३४: सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर यांचा जन्म.

  • १९३८: कॅनडाचे पंतप्रधान पॉल मार्टिन यांचा जन्म.

  • १९५४: भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री रवी कंबुर यांचा जन्म.

  • १९६५: पोकेमोन चे निर्माते सातोशी ताजीरी  यांचा जन्म.

  • १९६६: माजी खासदार प्रिया दत्त यांचा जन्म.

मृत्यू

  • १६६७: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १६११)

  • १९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.

  • १९८४: इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मुहम्मद नागुब यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१)

  • २००१: लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.