चालू घडामोडी - २८ डिसेंबर २०१८

Updated On : Dec 28, 2018 | Category : Current Affairsनव्या वर्षातील पाच ग्रहणांपैकी भारतीयांना दिसणार दोन :
 • नवे वर्ष हे अवकाश क्षेत्रासाठी खास वर्ष असेल, याचे कारण म्हणजे २०१९ मध्ये वर्षभरात तीन सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणे होणार आहेत. यातील विशेष बाब म्हणजे, यातील २ ग्रहणे ही भारतातून दिसू शकणार आहेत. उज्जैनमधील नामांकित वेधशाळेचे अधिक्षक असलेल्या डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हा ग्रहणांचा खेळ सुरु होणार आहे.

 • ६ जानेवारी रोजी अंशिक सूर्यग्रहण दिसणार असून ते भारतात दिसणार नाही. यापुढील ग्रहण २१ जानेवारी रोजी असेल. हे पूर्ण चंद्रग्रहण असून यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका रेषेत असतील. हे ग्रहणही भारतात दिसणार नाही याचे कारण म्हणजे त्यावेळी भारतात दिवस असल्याने प्रकाश असेल.

 • २ आणि ३ जुलैदरम्यान पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. मात्र यावेळी भारतात रात्र असल्याने हे सूर्यग्रहणही भारतीयांना दिसणार नाही. तर याच महिन्याच्या १६ आणि १७ तारखेला अंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी २ तास ५८ मिनिटे इतका असेल.

 • हे ग्रहण दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका ऑस्ट्रेलियासोबतच आशिया खंडातही दिसणार आहे. त्यामुळे भारतीय नागरिक हे ग्रहण पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. तर २६ डिसेंबर रोजी २०१९ मधील शेवटचे ग्रहण असेल. हे वर्तुळाकार सूर्यग्रहण भारतात दिसेल. देशाच्या दक्षिण भागातून हे ग्रहण जास्त चांगले दिसू शकणार आहे. यामध्ये कन्नूर, कोझीकोड, मदुराई, त्रिशूर हे ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे एक चंद्रग्रहण आणि एक सूर्यग्रहण भारतीयांना पाहता येणार आहे.

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक अखेर लोकसभेत मंजूर :
 • नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झालं. 245 विरुद्ध 11 अशा फरकाने हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. विधेयकातील सुधारणांवर मतदान सुरु असताना काँग्रेस, समाजवादी पक्ष, राजद आणि एआयएडीएमकेच्या खासदारांनी सभात्याग केला.

 • विधेयकावरील चर्चेदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. हे विधेयक कुठलाही धर्म किंवा समाजाविरोधात नाही तर महिलांचे हक्क आणि त्यांच्या सन्मानासाठी असल्याचं केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं. सती, बालविवाहासारख्या परंपरांचा नायनाट करतानाही अशा विरोधाला सामोरं जावं लागलं होतं, असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले.

 • देशात समान नागरी कायदा लागू केला तर तिहेरी तलाकच्या कायद्याची गरज पडणार नाही, अशी भूमिका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी घेतली. तिहेरी तलाक हा विषय मोठा असून, संयुक्त संसदीय समितीमार्फत यावर अभ्यास व्हावा अशी भूमिका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली.

 • तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा स्वागतार्ह असल्याचं सांगतानाच दोषी पतीला तुरुंगवास भोगावा लागण्याला विरोध असल्याचं स्पष्ट केलं.

 • एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकाला विरोध करत मुस्लिम संस्कृती आणि मान्यतेचं उल्लंघन असल्याचं म्हटल. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विधेयकाबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं.

 • तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत दुसऱ्यांदा सादर झालं. मागच्या वेळी राज्यसभेत हे विधेयक पास होऊ न शकल्यामुळे तो अध्यादेश रद्दबातल ठरला होता. तिहेरी तलाक विधेयकात तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, मुख्य प्रवाहाबाहेर पाठवणी :
 • नाशिक : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवण्यात आलं आहे. तुकाराम मुंढेंची एड्स नियंत्रण मंडळात प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे.

 • अवघ्या महिन्याभरातच तुकाराम मुंढेंची ट्रान्सफर करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची 22 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबईत बदली झाली आहे.

 • मुंबईतील नियोजन विभागाचं सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे मुंढे यांची वर्णी लावण्यात आली होती. यापूर्वी 2010 आणि 2012 मध्ये त्यांची बदली मुंबईत झाली होती. गेल्या बारा वर्षात बदली होण्याची तेरावी वेळ आहे.

 • नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णयही रद्द करणात आले आहेत. नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्याकडून प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले.

रतन टाटांबद्दल ‘या’ पाच गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का :
 • व्यवसाय करताना समाजहिताचा प्राधान्याने विचार करणाऱ्या उद्योगसमूहांमध्ये टाटा उद्योगसमूहाचे स्थान पहिले असेल. टाटा सन्सचा आज भारतासह जगभरात जो विस्तार झालाय त्यामध्ये रतन नवल टाटा यांचे महत्वाचे योगदान आहे. १९९१ साली रतन टाटा यांनी टाटा सन्सची धुरा सांभाळली तेव्हापासून या उद्योगसमूहाने मागे वळून पाहिलेले नाही. उद्योगविस्ताराबरोबर नैतिकता जपण्याला टाटा समूह पहिले प्राधान्य देतो त्यामुळे रतन टाटा यांचा फक्त उद्योगक्षेत्रातच नव्हे तर सर्वसामान्यही प्रचंड आदर करतात.

 • रतन टाटा यांच्याबद्दल समाजात प्रचंड आकर्षण असून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी जणांना काही गोष्टी माहिती असतील. १९६१ साली त्यांना आयबीएममध्ये नोकरीची ऑफर आली होती. पण त्यांनी ही ऑफर नाकारली आणि कौटुंबिक व्यवसायामध्ये स्वत:ला झोकून दिले आणि टाटा सन्सला नव्या उंचीवर घेऊन गेले.

 • भारताचे यशस्वी उद्योगपती असलेल्या रतन टाटा यांच्याबद्दल आपण आज अशाच पाच गोष्टी जाणून घेणार आहोत.

 • – रतन टाटा आता टाटा सन्सच्या दैनंदिन काराभारापासून दूर असले तरी त्यांनी अनेक स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया ते ई-कॉमर्स अशा वेगवेगळया क्षेत्रात त्यांनी गुंतवणूक केली आहे. एखादेच असे क्षेत्र असेल ज्यात टाटा यांनी गुंतवणूक केली नसेल. ३० पेक्षा जास्त स्टार्ट अप कंपन्यांमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. उदयोन्मुख प्रतिभेवर विश्वास ठेवण्याची टाटांची जी परंपरा आहे त्यानुसारच ही गुंतवणूक करण्यात आली आहे.

 • – रतन टाटा अविवाहित आहेत पण चारवेळा त्यांच्या मनात लग्नाचा विचार आला होता. २०११ साली सीएनएन इंटरनॅशनला या वृत्तवाहिनीला टॉक एशिया कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वत: ही कबुली दिली होती. चारवेळा मी लग्न करण्याच्या निर्णयाप्रत आलो होतो. पण प्रत्येकवेळी मी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे मनात असलेल्या भितीपोटी माघार घेतली.

लवकरच शनीची सर्व कडी नष्ट होणार :
 • ‘ज्या ग्रहाभोवती कडे आहे तो ग्रह म्हणजे शनी’, असं आपल्यापैकी सर्वांनाच सूर्यमालेमधील शनी ग्रह कसा ओळखावा हे शिकवताना सांगितले गेले आहे. शनी ग्रहापासून दोन लाख ८० हजार किलोमीटवर असणारी ही कडी शनीला इतर ग्रहांपासून वेगळं ठरवते. मात्र शनीची ओळख असणारी ही कडी लवकरच नष्ट होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

 • हो हे वृत्त खरे आहे. वैज्ञानिकांनी अंदाज बांधलेल्या त्याहून अधिक वेगाने शनी भोवतालची ही कडी नष्ट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या शनी ग्रहाच्या भूपृष्ठभागावर या कड्यांमधून दर सेकंदाला दहा हजार किलो वजनाचा बर्फ, खडक आणि धुलिकण पडत आहेत. हा खडकांचा पाऊस म्हणजे शनीच्या कडी नष्ट होत असल्याचे संकेत आहेत. शनीभोवतालच्या कडी ही खडक, बर्फ आणि धुलिकणांनी बनलेली आहेत. सुर्याची युव्ही किरणे तसेच अंतराळातील इतर खगोलिय गोष्टींचा सतत मारा होत असल्याने या कडांमधील घटकांचे तुकडे होऊन ते शनीच्या भूपृष्ठभागावर पडत आहेत.

 • शनीच्या कडांमधून होणाऱ्या या खडकांच्या पावसाची माहिती पहिल्यांदा १९८० मध्ये मिळाली. नासाच्या व्हॉयेजर्स मोहिमेअंतर्गत यानाने टिपलेल्या फोटोमध्ये शनीच्या वातावरणामध्ये काळ्या रंगाचे पट्टे अढळून आले त्यावेळी शनीवर अशाप्रकारचा पाऊस पडतो हे पहिल्यांदा मानवाच्या लक्षात आले. त्यावेळी शनीच्या कडांमधून पडणारा खडकांचा पाऊस असाच सुरु राहिल्यास तीन लाख वर्षांमध्ये शनीची कडी पूर्णपणे नष्ट होतील असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र मागील वर्षी शनीच्या दिशेने पाठवण्यात आलेल्या कॅसिनी या यानाने पाठवलेल्या फोटोंमधून पावसांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

 • कॅसिनी या शनीच्या भूपृष्ठभागावर आदळून नष्ट झाले असले तरी त्यांनी पाठवलेल्या फोटोवरून शनीची कडी अपेक्षित वेळेच्या आधीच नष्ट होतील असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याचा या कड्यामधून शनीवर पडणाऱ्या खडकांच्या पावसाचे प्रमाण पाहता शनीची कडी केवळ एक हजार वर्षे राहतील असं शास्त्रज्ञांच म्हणणं आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १६१२: गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.

 • १८३६: स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

 • १८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.

 • १८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.

 • १९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन.

 • १९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.

 • १९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

जन्म 

 • १८५६: अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी१९२४)

 • १८९९: मराठी पत्रकार आणि साहित्यिक त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)

 • १९२२: स्पायडर मॅनचा जनक स्टॅन ली यांचा जन्म.

 • १९३२: प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेअरमन धीरूभाई अंबानी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै२००२)

 • १९३७: टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म.

 • १९४०: भारताचे परराष्ट्रमंत्री ए. के. अँटनी यांचा जन्म.

 • १९४५: नेपाळचे राजे वीरेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००१)

 • १९५२: केंद्रीय मंत्री व वकील अरुण जेटली यांचा जन्म.

मृत्यू 

 • १६६३: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १६१८)

 • १९६७: अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. गो. कर्वे यांचे निधन.

 • १९७७: हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचे निधन. (जन्म: २० मे १९००)

 • १९८१: हिंदी चित्रपट अभिनेते डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.

 • २०००: ध्रुपदगायक उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)

 • २००६: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)

टिप्पणी करा (Comment Below)