चालू घडामोडी - २८ फेब्रुवारी २०१८

Date : 28 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात सहा नवी केंद्रं :
  • नवी दिल्ली : नीट 2018 परीक्षेसाठी यंदा 43 नव्या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. पहिल्यांदाच नीट परीक्षा एकूण दीडशे शहरांमध्ये पार पडणार. यामध्ये महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांचा समावेश आहे.

  • आतापर्यंत देशातील 107 सेंटर्सवर नीटची परीक्षा घेतली जात असे. यावेळी महाराष्ट्रातील सहा केंद्रांसह 43 केंद्रांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूरचा समावेश आहे.

  • मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांसदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. नीट 2018 परीक्षा रविवारी 6 मे रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

  • नीटसाठी राज्यात आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर ही दहा केंद्रं होती. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण केंद्रांची संख्या 16 वर पोहचली आहे.

  • सुरुवातीला नीट परीक्षा राज्यात फक्त सहाच केंद्रांवर घेतली जात होती. विद्यार्थ्यांनी ओरड केल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात चार केंद्रं वाढवण्यात आली. मराठवाड्यातील फक्त औरंगाबाद हे एकच केंद्र असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. आता बीड आणि लातूरची भर त्यात पडली आहे.

नागपूरकर वैज्ञानिकाने दिले ‘आईनस्टाईन’च्या सिद्धांताला आव्हान :
  • नागपूर : अल्बर्ट आईनस्टाईन म्हणजे विज्ञानातील सर्वात मोठे वैज्ञानिक म्हणून गणना होणारे नाव. जगभरातील लोकांच्या बुद्धिमापनाची तुलना करताना आईनस्टाईन हेच प्रमाण. त्यांनी मांडलेला सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरच विश्वातील पदार्थांच्या घडामोडी चालत असल्याच्या दाव्याला जगात मान्यता आहे.

  • या सिद्धांताला आतापर्यंत जगात अनेकांनी आक्षेप घेतला असला तरी कुणीही पुराव्यानिशी ते सिद्ध करू शकलेले नाही. मात्र आईनस्टाईनचा सिद्धांत पुराव्यासकट खोडून काढण्याचा दावा एका भारतीय आणि तेही नागपूरकर वैज्ञानिकाने केला आहे. होय, डॉ संजय वाघ हेच ते वैज्ञानिक ज्यांनी आईनस्टाईनचा सिद्धांत खोडून नवा सिद्धांत जगासमोर मांडला आहे.

  • डॉ. वाघ यांचे संशोधन समजण्यापूर्वी आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत समजणे महत्त्वाचे ठरेल. यालाच ‘जनरल थिएरी आॅफ रिलेटीव्हिटी’ असेही म्हटले जाते.

  • आईनस्टाईन यांनी सन १९१६ मध्ये मांडलेला नियम सामान्य भाषेत मांडायचा झाल्यास ‘निरीक्षण करणारा स्तब्ध किंवा गतिमान असेल, त्याचा भौतिकशास्त्राच्या नियमावर परिणाम होत नाही किंवा भौतिकशास्त्राचे नियम हे कुणीही निरीक्षण करणारा असेल, त्याला सारखेच लागू होतात’, असे करता येईल.

  • या सिद्धांताच्या आधारावरच विश्वात चालणाऱ्या घडामोडी सुरू आहेत. या सिद्धांताला १०० वर्षांपासून मान्यता असून कुणीही आक्षेप घेतलेला नाही. मात्र आईनस्टाईन यांनी सिद्धांत मांडताना जे गणितीय (मॅथमॅटिकल फॉर्म्युला) सूत्र सादर केले, त्यावर मात्र अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत.

बॉलिवूडच्या 'चांदनी'ला आज अखेरचा निरोप, श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी :
  • मुंबई -  बॉलिवूडची 'चांदनी', 'हवाहवाई' श्रीदेवी यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी (27 फेब्रुवारी) रात्री उशीरा दुबईहून मुंबईमध्ये आणण्यात आले.

  • श्रीदेवी यांचे पार्थिव लोखंडवाला येथील निवासस्थान ग्रीन एकर्स येथे ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सेलिब्रेशन क्लब येथे आणले जाईल. सकाळी 9.30 ते 12.30 वाजेपर्यंत श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. 

  • श्रीदेवी यांचे अखेरचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. 

  • दुपारी अंत्ययात्रा - श्रीदेवीचे पार्थिव अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील सेलिब्रेशन क्लबमध्ये सकाळी ९.३० पासून ११.३० पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दुपारी २ वाजता तेथून अंत्ययात्रा निघेल. पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

मोदींच्या विदेश दौ-यांतील विमानाचा खर्च जाहीर करा, माहिती आयोगाचे परराष्ट्र खात्याला आदेश :
  • नवी दिल्ली : पंतप्रधानांनी २०१३ ते २०१७ या कालावधीत विदेश दौ-यांसाठी एअर इंडियाचे जे चार्टर्ड विमान वापरले, त्यापोटी किती खर्च झाला, याचा तपशील जाहीर करावा, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने परराष्ट्र खात्याला दिला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २0१४ ते २0१७ या ४ वर्षांत केलेल्या विदेशी दौ-यांमध्ये किती खर्च झाला, याबाबतचा तपशील निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी केंद्रीय परराष्ट्र खात्याकडे माहितीच्या अधिकारात मागविला होता. मात्र, परराष्ट्र खात्याने अपुरी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे या प्रकरणी दाद मागितली.

  • पंतप्रधानांच्या विदेश दौ-यामध्ये झालेल्या खर्चाची हवाई दल व एअर इंडियाने पाठविलेली बिले, त्यांचे दिनांक, या बिलांतील रकमेचा सविस्तर तपशील हा विविध कागदपत्रांमध्ये विखुरलेला असून, ती सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी ब-याच अधिका-यांना कामाला लावावे लागेल, असे परराष्ट्र खात्यातर्फे या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी माहिती आयोगाला सांगण्यात आले.

  • मात्र, हे म्हणणे अमान्य करत, ही सर्व माहिती लोकेश बात्रा यांना देण्यात यावी, असा आदेश केंद्रीय माहिती आयुक्त आर. के. माथुर यांंनी परराष्ट्र खात्याला दिला.

भारतीय संघाची दक्षिण अफ्रिकेला ५.६ लाखांची आर्थिक मदत :
  • जोहान्सबर्ग - भारतीय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने पाण्याच्या समस्येशी झगडणा-या केपटाऊन शहराला पाण्याच्या बाटल्या पोहोचवण्यासाठी तसंच बोअरवेलसाठी जवळपास 8500 डॉलर्स म्हणजेच 5.6 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

  • टी-20 मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी 1,00,000 रँड (दक्षिण आफ्रिकेचे चलन, 5.6 लाख रुपये) ‘द गिफ्ट ऑफ द गिव्हर्स फाऊंडेशन’ला दान केले. ही आफ्रिकन खंडातील सर्वात मोठी आपत्ती निवारण संस्था आहे.

  • भारतीय संघ केपटाऊमध्ये पोहोचला होत तेव्हा त्यांना पाण्याचा कमीत कमी वापर केला जावा यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. भारतीय संघातील खेळाडूंना आंघोळीसाठी फक्त दोन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. फक्त दोन मिनिटांत आंघोळ उरका असा आदेशच होता. पाण्याची समस्या इतकी भयानक झाली आहे आहे तेथील झाडं, फुलांनाही देण्यासाठी पाणी नाहीये. 

  • भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौ-यात कसोटी मालिकेत 2-1 ने पराभवाला सामोरं जावं लागलं. पण भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करत 5-1 ने मालिका जिंकली. तसंच टी-20 तही 2-1 ने विजय नोंदवला. सध्या भारतीय संघ तिहेरी मालिकेसाठी श्रीलंका दौ-यावर जाणार आहे. 

पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआयकडून अटक :
  • चेन्नई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआयने चेन्नईतून अटक केली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्तीला अटक करण्यात आली.

  • लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली. चेन्नई विमानतळावरच सीबीआयकडून कार्ती यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीला नेलं जाणार आहे.

  • आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी परवानगी घेताना गैरप्रकार झाल्याचा कार्ती यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते. याप्रकरणी कार्ती यांच्यावर गेल्या वर्षी मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.

  • १९२२: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

  • १९३५: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

  • १९४०: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.

जन्म

  • १८७३: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी१९५४)

  • १८९७: मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४)

  • १९०१: रसायनशास्त्रज्ञ लिनस कार्ल पॉलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९४)

  • १९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै २००२)

  • १९२९: भारतीय-अमेरिकन संशोधन रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म.

  • १९४२: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक ब्रायन जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९६९)

  • १९४४: संगीतकार व गीतकार रविन्द्र जैन यांचा जन्म.

  • १९४८: ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांचा जन्म.

  • १९५१: भारतीय क्रिकेटपटू करसन घावरी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ – नाशिक)

  • १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८९९)

  • १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८४)

  • १९६६: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८९८)

  • १९६७: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लूस यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८९८)

  • १९८६: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या. (जन्म: ३० जानेवारी १९२७)

  • १९९५: कथा, संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१४)

  • १९९८: अभिनेता राजा गोसावी यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १९२५)

  • १९९९: औध संस्थानचे राजे भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.