चालू घडामोडी - २८ जानेवारी २०१९

Updated On : Jan 28, 2019 | Category : Current Affairsपंतप्रधानांनी केले सोनाली हेळवीचे कौतुक :
 • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार सोनाली हेळवी हिचा आकाशवाणीवरील प्रसारित ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला. त्याचप्रमाणे खेलो इंडियातील चांगली कामगिरी करणाºया खेळाडूंचेही मोदी यांनी कौतुक केले.

 • मोदी म्हणाले, न्यू इंडियाच्या निर्माणात फक्त मोठ्या शहरांतील लोकांचेच नव्हे, तर छोटे शहर, खेड्यापाड्यांतून येणारे युवा, मुलांच्या क्रीडा गुणवत्तेचेदेखील खूप मोठे योगदान आहे, हेच खेलो इंडियातून स्पष्ट होत आहे. त्यांनी सांगितले की, जानेवारीत पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत १८ खेळांत जवळपास ६ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला. जेव्हा स्थानिक पातळीवर खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतो तेव्हा तो जागतिक पातळीवरही सर्वोत्तम कामगिरी करील. या वेळेस ‘खेलो इंडिया’ प्रत्येक राज्यातील खेळाडूंनी आपापल्या पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. पदक जिंकणाºया अनेक खेळाडूंचे जीवन जबरदस्त प्रेरणादायक ठरले आहे. याविषयी पंतप्रधानांनी बॉक्सिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारा खेळाडू आकाश गोरखा याचा उल्लेख केला. आकाश याचे वडील पुणे येथे एका कॉम्प्लेक्समध्ये गार्डचे काम करीत आहेत आणि ते आपल्या कुटुंबासह एका पार्किंग शेडमध्ये राहतात.

 • ‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदी यांनी २१ वर्षांखालील महाराष्ट्र महिला कबड्डी संघाची कर्णधार सोनाली हेळवी हिचा उल्लेख केला. सोनालीने खूप कमी वयात आपल्या वडिलांना गमावले आणि तिचा भाऊ व आईने सोनालीच्या गुणवत्तेला प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले.

 • आसनसोलचा १० वर्षीय अभिनव शॉ हा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू ठरला. कर्नाटकातील बेळगाव येथील शेतकºयाची मुलगी अक्षता बासवानी कमती हिनेदेखील वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकल्याचे त्यांनी सांगितले. अक्षताने यशाचे श्रेय तिच्या वडिलांना दिले.

शेतकऱ्यांना मोदी सरकार आज देणार खूषखबर :
 • नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार सोमवारी खूषखबर देण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी होत असून त्यात हे निर्णय अपेक्षित आहेत

 • अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जाहीर करण्याचे संकेत कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी दिले होते. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे अनेक पर्याय कृषी मंत्रालयाने दिले आहेत. यापैकी कोणता पर्याय मंत्रिमंडळ मंजूर करते, यावर त्याचे स्वरूप ठरेल.

 • तीन राज्यांमधील सत्ता गमावल्यानंतर मोदी सरकार काही भरीव करण्याची घाई करत आहे. मात्र, आता अशी योजना राबवून त्याचा लोकसभा निवडणुकीत कितपत फायदा होऊ शकेल, याविषयी मात्र राजकीय निरीक्षक साशंक आहेत.

देशातील सर्वात जलद ट्रेनचे नामकरण, नवीन नाव :
 • नवी दिल्ली : 30 वर्ष जुन्या शताब्दी एक्स्प्रेसच्या जागी धावणाऱ्या 'ट्रेन 18' या रेल्वेला 'वंदे भारत एक्स्प्रेस' असे नाव देण्यात आले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल बोलताना रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, "या ट्रेनसाठी लोकांनी अनेक नावं सुचवली होती. परंतु आम्ही वंदे भारत एक्स्प्रेस या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसीदरम्यान 160 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावणार आहे."

 • पियुष गोयल म्हणाले की, "ही ट्रेन बनवण्यासाठी केवळ दीड वर्षांचा कालावधी लागला असून त्यासाठी 97 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही रेल्वे वापरात आल्यानंतर 160 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावेल. चाचणीदरम्यान ही ट्रेन 180 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावली होती."

 • "ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये 16 कोच आहेत. ही ट्रेन दिल्ली ते वाराणसीदरम्यान केवळ अलाहाबाद आणि कानपूर या दोनच स्थानकांवर थांबेल. ही भारतातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन असून पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. ही ट्रेन मेक इन इंडियाचे एक उत्तम उदाहरण आहे." असेही गोयल यांनी सांगितले

 • वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीहून सकाळी सहा वाजता सुटेल. दुपारी दोन वाजेपर्यंत ती वाराणसी येथे पोहोचेल. 800 किमी अंतर केवळ 8 तासांमध्ये पूर्ण करेल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता ही ट्रेन वाराणसीहून दिल्लीकडे रवाना होईल. रात्री 10.30 वाजता दिल्लीत दाखल होईल.

 • 2 डिसेंबर रोजी या ट्रेन 18 ची कोटा ते सवाई माधोपूर सेक्शनदरम्यान चाचणी घेण्यात आली. यादरम्यान ही ट्रेन 180 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावली होती.

सिमकार्डप्रमाणे सेट टॉप बॉक्सची 'पोर्टेबिलिटी' करता येणार :
 • नवी दिल्ली : योग्य सुविधा न मिळाल्यास आपण मोबाईलमधील सिमकार्ड बदलतो. त्याचप्रमाणे आता आपल्या केबल नेटवर्क ऑपरेटरने चांगल्या सुविधा दिल्या नाहीत किंवा ती कंपनी मनमानी कारभार करत असेल तर आपण सेट-टॉप बॉक्समधील कार्डही बदलून दुसऱ्या कंपनीचे कार्ड वापरु शकतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) येत्या काळात या प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे.

 • जे ग्राहक आताच्या डीटीएच ऑपरेटर कंपनीला कंटाळले आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे. ट्रायने ही नवी प्रणाली वापरात आणल्यानंतर सेट टॉप बॉक्सच्या कंपन्या, डीटीएच कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसेल, असे बोलले जात आहे.

 • सध्या आपण केबल ऑपरेटर किंवा कंपनीने दिलेला सेट टॉप बॉक्स आणि कार्ड वापरतो. सेट टॉप बॉक्समुळे ग्राहकांना कंपनी बदलण्यात अडथळे येतात. ट्रायच्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांची होणारी कुचंबणा थांबेल. दरम्यान डीटीएच कंपन्या व केबल सेवा पुरवठादारांकडून ट्रायच्या या प्रस्तावाला तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे ट्रायला कठीण जाणार आहे. परंतु या वर्षअखेरपर्यंत नवी प्रणाली आमलात आणण्याचा ट्रायचा प्रयत्न असेल.

 • प्रत्येक डीटीएच कंपनीचा सेट टॉप बॉक्स वेगवेगळा आहे. त्यामध्ये टेक्निकल (तांत्रिकदृष्ट्या) फरक आहे. त्यामुळे जर त्यामधील कार्ड बदलले तर दुसऱ्या कंपनीची पायरसी व इतर तांत्रिक बाबींचा गोंधळ होण्याची शक्यता कंपन्यांकडून वर्तवण्यात येत आहे. प्रत्येक कंपनीचे सेट टॉप बॉक्समधील सॉफ्टवेअर्स वेगवेगळे असल्याने एका कंपनीच्या सेट टॉप बॉक्समधून दुसऱ्या कंपनीची सेवा पुरवणे अवघड जाऊ शकते, असे कंपन्यांनी म्हटले आहे.

 • सेट-टॉप बॉक्सशी छेडछाड झाल्यास कंपन्यांची माहिती चोरी होऊ शकते, असा युक्तीवाद करत डीटीएच कंपन्यांनी ट्रायच्या या नव्या निर्णयाला विरोध केला आहे. डीटीएच कंपन्यांचे सर्व युक्तीवाद ऐकल्यानंतर ट्रायने यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

मेट्रो डब्यांच्या निर्मिती तंत्रज्ञानासाठी १५० कोटींची निविदा :
 • मेक इन इंडिया प्रकल्पात रेल्वेची निर्मिती करण्यासाठी दी मॉडर्न कोच फॅक्टरीने (आधुनिक डबे कारखाना) तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी १५० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रो गाडय़ांचे डबे २०२१ पर्यंत तेथे निर्माण केले जाणार आहेत. गेल्या आठवडय़ात रायबरेली येथील एमसीएफ कारखान्याने ही निविदा जारी केली आहे.

 • मेट्रो व रेल्वेचे डबे तयार करणाऱ्या बाजारपेठेत आम्ही उतरत आहोत, त्यात सुरुवातीला देशातील गाडय़ांसाठीच हे डबे तयार केले जाणार आहेत. सध्या हे डबे मोठय़ा प्रमाणात आयात करावे लागत आहेत. ते या कारखान्यात कमी किमतीत तयार केले जाणार आहेत. २८ फेब्रुवारीला निविदा उघडण्यात येणार असून, २०२१ पर्यंत अशा प्रकारचा पहिला डबा तयार केला जाणार आहे.

 • कोलकाता मेट्रोचे डबे सध्या चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ (आयसीएफ) येथे तयार केले जात असून, एमसीएफ या रायबरेलीतील कारखान्यात आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरलेले डबे प्रथमच तयार केले जाणार आहेत. ते जास्त चांगल्या दर्जाचे असतील.  रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सध्या इतर देशातून जे डबे आयात केले जातात त्यासाठी ८ ते ९ कोटी रुपये खर्च येतो. आमच्याकडे मोठय़ा प्रमाणात मागणी नोंदवली गेल्यास ते ४ ते ६ कोटींना उपलब्ध करून दिले जातील.

 • सध्या मेट्रोचे एकूण २२ प्रकल्प सुरू असून त्यात दिल्ली, बंगळुरू, लखनौ, चेन्नई, नागपूर, पुणे, कोची, अहमदाबाद, नोईडा-बृहत् नोईडा, हैदराबाद, जयपूर, कोलकाता व  गुरुग्राम यांचा समावेश आहे. एमसीएफ कारखान्यात या डब्यांच्या निर्मितीसाठी रोबोटचा वापर केला जाणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.

 • १९६१: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

 • १९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

 • १९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.

 • २०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.

जन्म 

 • १८६५: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)

 • १८९९: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १५ मे १९९३)

 • १९२५: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर २००४)

मृत्यू 

 • १८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)

 • १९९६: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९११ – शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)

 • १९९७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन. (जन्म: २७ जुलै१९११)

 • २००७: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १९२६)

टिप्पणी करा (Comment Below)