चालू घडामोडी - २८ जून २०१८

Date : 28 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात हिंदी अव्वल, बंगाली दुसऱ्या स्थानी, मराठीचा नंबर किती :
  • नवी दिल्ली: देशभरातील सर्वाधिक जनतेची मातृभाषा हिंदी आहे हे आपल्यापैकी बहुसंख्यांना माहित आहे. मात्र हिंदीनंतर देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? शिवाय देशात मराठी भाषेचा कितवा नंबर लागतो? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित आहेत?

  • देशातील 43.63 टक्के जनतेची मातृभाषा हिंदी आहे. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये  हिंदी भाषा पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या नंबरवर बंगाली भाषा आहे. यानंतर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीचा नंबर लागतो. म्हणजेच देशात तिसऱ्या नंबरवर मराठी भाषा आहे.

  • मराठीने तेलुगूला मागे टाकत, सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

  • देशातील छोट्या छोट्या 22 भाषांपैकी संस्कृत भाषा ही सर्वात कमी लोकांची मातृभाषा आहे. बोडो, मणिपुरी, कोंकणी आणि डोगरी या भाषांपेक्षाही संस्कृत कमी बोलली जाते.

  • देशातील 2 लाख 60 हजार लोकांनी इंग्रजी ही पहिली बोलीभाषा असल्याचं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे त्यातील 1 लाख 6 हजार हे महाराष्ट्रातील आहेत. इंग्रजी प्रथम बोली भाषा मानणाऱ्यांमध्ये तामिळनाडू दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.

पहिल्या टी-20 मध्ये आयर्लंडचा धुव्वा, भारताचा ७६ धावांनी विजय :
  • डबलिन : टीम इंडियाने आयर्लंड दौऱ्यातल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात यजमानांचा 76 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. पण कुलदीप यादवने चार आणि यजुवेंद्र चहलने तीन फलंदाजांना माघारी धाडून, आयर्लंडला नऊ बाद 132 धावांत रोखलं.

  • आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-20 सामन्यात भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने 97, तर शिखर धवनने 74 धावा केल्या.

  • या खेळीच्या बळावर टीम इंडियाने पाच बाद 208 धावा करत आयर्लंडला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं.

  • आयपीएलनंतर नव्या दमाने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने आयर्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. रोहित शर्माने 61 चेंडूत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 97 धावा केल्या. मात्र अखेरच्या षटकात तो बाद झाला.

  • शिखर धवननेही 45 चेंडू खेळत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 74 धावा ठोकल्या. सोळाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर केविन ऑब्रायनच्या चेंडूवर शिखर धवन बाद झाला. त्यानतंर आलेला सुरेश रैना केवळ दहा धावा करुन माघारी परतला.

५४८ लोकांच्या सर्व्हेवरुन भारत महिलांसाठी धोकादायक कसा - महिला आयोग :
  • नवी दिल्ली:  राष्ट्रीय महिला आयोगाने भारत महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देश आहे हा ‘थॉमसन रायटर्स फाउंडेशन’चा दावा फेटाळला आहे. अवघ्या 548 लोकांच्या सर्व्हेवरुन संपूर्ण देशाचा निष्कर्ष कसा काढला? असा सवाल महिला आयोगाने उपस्थित केला आहे.

  • या सर्व्हेनुसार महिलांसाठी असुरक्षित असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात महिलांवर लैंगिक अत्याचार करणं फारच सोपं आहे, हेच महिलांच्या असुरक्षिततेमागचं मुख्य कारण देण्यात आलं आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महिला असुरक्षिततेबाबतीत भारत हा अफगाणिस्तान आणि सौदीपेक्षाही वरच्या क्रमांकावर आहे.

  • मात्र भारताच्या महिला आयोगाने या सर्व्हेवर आक्षेप घेतला आहे. महिला आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या मते, “थॉमसन रायटर्स फाउंडेशन’ने जो दावा केला आहे, त्याचं प्रमाण, त्याचे नमुने (सॅम्पल साईज) खूपच कमी होते.

  • त्यावरुन संपूर्ण देशाचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ज्या देशात महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचीही परवानगी नाही, त्या देशांचाही नंबर भारतापेक्षा खालचा आहे. त्यामुळे हा सर्व्हे चुकीचा आहे”

अमेरिकेनं भारताबरोबरची बैठक केली स्थगिती, जाणार होत्या सुषमा आणि निर्मला :
  • नवी दिल्ली- अमेरिकेनं भारताबरोबर होणा-या बैठका काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित केल्या आहेत. अमेरिकन प्रशासनानं यासाठी खेदही व्यक्त केला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान 6 जुलै रोजी बैठका आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण सहभागी होणार होत्या. परंतु आता या बैठका होणार नाहीत.

  • परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, पॉम्पिओ यांनी सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली आणि काही अपरिहार्य कारणांमुळे ही बैठक होणार नसल्याचे सांगत खेदही व्यक्त केला. लवकरच परस्पर सहमतीनं भारत आणि अमेरिकेदरम्यान चर्चा होणार असल्याचंही रवीश यांनी सांगितलं.

  • अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निकी हॅले या सध्या भारताच्या दौ-यावर आहेत. धार्मिक स्वातंत्र्याप्रमाणेच नागरिकांचे अधिकारही महत्त्वाचं असल्याचं निकी हॅले म्हणाल्या होत्या.

अमेरिकी काँग्रेसच्या प्राथमिक फेरीत भारतीय वंशाचे सहा उमेदवार पराभूत :
  • वॉशिंग्टन : अमेरिकी काँग्रेस प्रतिनिधीगृहाच्या प्राथमिक फेरीत भारतीय वंशाचे अर्धा डझन उमेदवार पराभूत झाले असून अमेरिकेतील न्यूयॉर्क, मेरीलँड, कोलोरॅडो व उटाह येथील निवडणुकात त्यांना धक्का बसला. भारतीय अमेरिकी असलेल्या अरुणा मिलर या मेरीलँड मतदारसंघातून पराभूत झाल्या, तर न्यूयार्कमधील मतदारसंघातून सूरज पटेल यांना पराभवाचा धक्का बसला. दोघांनीही देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी प्राथमिक लढतीसाठी मोठा निवडणूक निधीही जमवला होता. हैदराबादला जन्मलेल्या मिलर यांचा डेव्हिड ट्रोन यांनी पराभव केला.

  • मिलर यांनी पराभव मान्य केला असून त्या म्हणाल्या की, माझ्या प्रचाराने मेरीलँडमधील नव अमेरिकनांना प्रेरणा दिली आहे. येत्या काही वर्षांसाठी आम्ही मतदारांची नवी घडण केली आहे. आमचा प्रचार हा पैशांवर आधारित नव्हता. आम्ही जिंकलो नाही तर आम्ही बराच बदल घडवला आहे.

  • त्यांचे प्रतिस्पर्धी ट्रोन हे अब्जाधीश होते. त्यांनी १० दशलक्ष डॉलर्स खर्च केले. मिलर यांचा दहा टक्के मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. मेरीलँडमधील एका मतदारसंघातून भारतीय अमेरिकी असलेले उत्तम पॉल यांना ३.७ टक्के मते मिळाली, तर काँग्रेस सदस्य असलेले जेमी रस्कीन यांना ९० टक्के मते मिळाली. न्यूयॉर्कमधील एका मतदारसंघातून  सूरज पटेल यांचा विद्यमान कॅलोलिन मॅलोनी यांनी पराभव केला.

या दिवशी २१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण :
  • आजपासून बरोबर एक महिन्याने म्हणजेच २७ जुलै रोजी २१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्राचे असेल असेल म्हटले जात आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी १ तास ३४ मिनिटांचा असेल. या काळात चंद्र अतिशय सुंदर अशा लालसर रंगात दिसेल.

  • वैज्ञानिकांनी या चंद्रग्रहणाला ब्लड मून (Blood Moon) असे नाव दिले आहे. हे ग्रहण भारताबरोबरच आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये दिसणार आहे. चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाप्रमाणे डोळ्य़ांना हानीकारक नसते, त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. जाणून घेऊया सुपरमून, ब्लड मून आणि चंद्रग्रहणाबद्दलच्या काही खास गोष्टी…

  • सुपरमून - चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी असते तेव्हा चंद्र जास्त प्रमाणात चमकतो, त्याला सुपरमून म्हणतात.

  • ब्लड मून - यात चंद्रग्रहणादरम्यान चंद्र लाल रंगाचा दिसतो. पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा त्याच्यावर लाल रंगाची सावली पडते आणि तो लाल दिसतो. यालाच आपण ब्लड मून म्हणतो. असे तेव्हाच होते जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला जातो. यातही सूर्याची लाल किरणे चंद्रापर्यंत पोहोचतात.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरि यांचा राज्याभिषेक झाला.

  • १९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.

  • १९७८: अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.

  • १९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.

  • १९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.

  • १९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.

जन्म 

  • १७१२: फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार रुसो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १७७८)

  • १९२१: भारताचे ९वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिंह राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)

  • १९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)

  • १९३४: कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज रॉय गिलख्रिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २००१)

  • १९३७: साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८३६: अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५१)

  • १९७२: प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९३)

  • १९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९११)

  • १९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.

  • १९११: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १९१२)

  • १९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार रामभाऊ निसळ यांचे निधन.

  • २०००: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९२७)

  • २००६: संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन.

  • २००९: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे निधन. (जन्म: ५ मे १९५५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.