चालू घडामोडी - २८ मार्च २०१८

Date : 28 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आधार-पॅन जोडण्यासाठी अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढवली :
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) आधार आणि पॅन कार्ड जोडण्यासाठीची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे. कर विभागाच्या धोरणं निश्चित करण्याऱ्या समितीने ही निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी दोन ओळखपत्रे एकमेकांना जोडण्यासाठीची शेवटची तारिख ही ३१ मार्च होती. त्यात आता वाढ करण्यात आली होती.

  • सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात या महिन्याच्या सुरुवातीला आधारला विविध प्रकारच्या सेवांसोबत जोडण्याचा अंतिम दिवस ३१ मार्चच्या पुढे वाढवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला लक्षात घेता सीबीडीटीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

  • चौथ्यांदा सरकारने आधार-पॅन अंतिम मुदत वाढवली आहे. मात्र, सरकारने प्राप्तिकर जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पॅन कार्ड काढण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य केला आहे.

  • ५ मार्चपर्यंत अपडेटेड डेटाच्या माहितीनुसार, एकूण ३३ कोटी पॅन कार्डांपैकी १६.६५ कोटी कार्ड लिंक करण्यात आले आहेत. आधारला पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारिख ३१ जुलै २०१७, ३१ ऑगस्ट २०१७ आणि ३१ डिसेंबर २०१७ नंतर आता पुन्हा बदलण्यात आली आहे. (source :loksatta)

अॅट्रॉसिटी निर्णय : सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार :
  • नवी दिल्ली : अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा, यासाठी सरकारतर्फे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने अटक करता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता.

  • दलित संघटना आणि विरोधी पक्षांच्या दबावानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात या निकालासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दाखवली आहे. सरकारी अधिकारी किंवा सामान्य व्यक्तींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यास, सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच पुढील कारवाई करण्यात येईल, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता.

  • अॅट्रॉसिटीबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल - कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा आरोप करुन त्याची थेट अटक होणार नाही. सुप्रीम कोर्टाने 20 मार्चला यासंदर्भात निकाल दिला, ज्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांसह सामान्य व्यक्तींनाही संरक्षण मिळालं.

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असेल तरच सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत अटकेची कारवाई करता येईल. न्यायमूर्ती उदय ललित आणि ए. के. गोयल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.(source :abpmajha)

भारतात एकूण किती राज्य? पाहा स्मृती इराणींनी काय दिलं होतं उत्तर :
  • नवी दिल्ली-  फेसबूक डेटा लीक प्रकरणापासून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला पोहोचला. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी नुकतीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर एनसीसबद्दल माहिती नसण्यावरून टीका केली.  "राहुल गांधीजी हे काय चालले आहे. तुम्ही जे सांगत आहात त्याच्या उलट तुमची टीम काम करत आहे.

  • नमो अॅप डिलीट करण्याऐवजी त्यांनी काँग्रेसचंच अॅप डिलीट केलं आहे. आता आपण तंत्रज्ञानाचा विचार करायला गेलो तर काँग्रेस आपला डेटा सिंगापूरमधील सर्व्हरमध्ये का पाठवते. जिथून हा डेटा कोणताही टॉम, डिक किंवा अॅनॅलिटिका मिळवू शकते, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली होती.(source :lokmat)

डेक्कन कॉलेजचे माजी संचालक डॉ. मधुकर ढवळीकर यांचे निधन :
  • पुणे : डेक्कन कॉलेजचे निवृत्त संचालक आणि भारतीय पुरातत्व शास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांचे मंगळवारी रात्री खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. 2011 मध्ये केंद्र शासनाने त्यांना पदमश्री किताबाने गौरवले होते. 'भारताची कुळकथा', 'लढा टाकलेल्या स्त्रियांचा' आदी पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

  • म.के.ढवळीकर यांचा जन्म १६ मे १९३० रोजी पाटस येथे झाला. त्यांनी १९५२ मध्ये पदवी तर 1958 मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना पुणे विद्यापीठाकडून पुरातत्व शास्त्रातील पीएचडी पदवी बहाल करण्यात आली. 

  • ढवळीकर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या अकेडमीक कौन्सिलचे संचालक आणि बृहनमहाराष्ट्र प्राच्यविद्या परिषेदेचे अध्यक्ष होते.(source :lokmat)

पंतप्रधानांकडे डोकलाम प्रश्नावर तोडगा आहे का :
  • नवी दिल्ली : डोकलाममध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना कसा करावा, याचा तोडगा ‘५६ इंचाची छाती असलेल्यांकडे असावा, अशी आशा आहे,’ असा टोला काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. डोकलाम हा आमचाच प्रदेश असून, गेल्या वर्षी येथे जे घडले, त्यापासून भारताने धडा शिकायला हवा, असे चीनने सोमवारी म्हटले होते.

  • या अनुषंगाने केलेल्या टिष्ट्वटमध्ये राहुल गांधी यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात केलेल्या टिष्ट्वटर पोलमध्ये हजारो लोक सहभागी झाले. डोकलामचा प्रश्न सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी आलिंगन नीतीचा उपयोग करतील, संरक्षणमंत्र्यांना दोष देतील व जाहीरपणे अश्रू ढाळतील, असे या पोलमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ६३ टक्के लोकांना वाटते. मात्र, ५६ इंचाची छाती असलेल्यांकडे डोकलाममधील स्थितीवर मात करण्यासाठी ठोस तोडगा असावा, अशी आशा आहे.

  • सिक्कीमच्या सीमेला लागून असलेल्या डोकलाममध्ये चीनच्या लष्कराने रस्ता बांधायला घेतला होता. त्याला भारतीय लष्कराने आक्षेप घेतला. चीनी लष्कराने डोकलाममध्ये एक प्रकारे घुसखोरीच चालविली होती. ती रोखण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झाले. त्यामुळे भारत व चीनचे लष्कर संघर्षाच्या पवित्र्यात डोकलाममध्ये उभे ठाकले.

  • ही स्थिती सुमारे ७३ दिवस कायम होती. भारताने आपले सैन्य मागे नेण्यास ठाम नकार दिला होता. सरतेशेवटी चर्चा होऊन दोन्ही देशांनी आपले सैन्य माघारी नेले. मात्र, तरीही डोकलाममधील तणाव पूर्णपणे संपलेला नाही. आता चीनने पुन्हा या भागात बांधकाम सुरू केल्याच्या बातम्या झळकल्या होत्या.(source :lokmat)

बीजिंगमध्ये किम जोंग उन-क्षी जिनपिंग यांची भेट, अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत सकारात्मक चर्चा :
  • बीजिंग -  उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची मंगळवारी (27 मार्च) बीजिंग येथे भेट घेतली. चीन सरकारे अधिकृत वृत्तसंस्था अससेल्या 'शिन्हुआ'नं उत्तर कोरिया व चीनच्या शिष्ठमंडळादरम्यान झालेल्या चर्चेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहेत.

  • या भेटीमध्ये किम जोंग यांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचा संकल्प केल्याचे वृत्त असून कोरियन द्विपकल्पात शांतता राहावी, यासंदर्भातही दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • शिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेसोबत वाटाघाटी करण्यास तयार असल्याचं किम जोंग उन यांनी बैठकीनंतर सांगितले, तसंच ते दोन्ही देशांचं एक संयुक्त संमेलनही भरवण्यास इच्छुक आहेत. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग म्हणालेत की, बदललेल्या या परिस्थितींमध्ये ते उत्तर कोरियाशी नियमित स्वरुपातील संपर्क ठेऊ इच्छितात. उत्तर कोरियासोबत विभिन्न माध्यामांद्वारे संपर्क वाढवण्याची इच्छादेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.(source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

  • १८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.

  • १९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

  • १९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.

  • १९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.

  • १९७९: अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.

  • १९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

  • १९९८: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

जन्म

  • १८६८: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९३६)

  • १९२५: अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८)

  • १९२७: भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे२०१३)

  • १९६८: इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसैन यांचा जन्म.

मृत्यू

  • १९४१: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८८२)

  • १९६९: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक ड्वाईट आयसेनहॉवर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८९०)

  • १९९२: स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचे निधन.

  • २०००: शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.