चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ मार्च २०१९

Date : 28 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आरोग्य सेवेतील डॉक्टर व तंत्रज्ञांसह हजारो कर्मचारी निवडणूक कामात :
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपू नये अशा निवडणूक आयोगाच्याच मार्गदर्शक सूचना असतानाही राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये व आरोग्य संचालनालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमधील हजारो डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आले आहे. या साऱ्याचा परिणाम राज्याच्या आरोग्य सेवेवर होण्याची भीती वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांनी व्यक्त केला आहे.

  • मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपता येणार नाही, असे स्पष्ट झाल्यामुळे निवडणूक आयोगाने आपले लक्ष आरोग्य सेवेकडे तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वळवून या अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर व तंत्रज्ञांसह हजारो कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी घेण्याचे आदेश जारी केले. या आदेशामुळे आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागात खळबळ उडाली असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळाले नाही तर त्यातून निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कोण घेणार असा सवाल या दोन्ही विभागातील उच्च पदस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

  • राज्यातील हजारो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये येत असून एक्सरे तंत्रज्ञांसह हजारो तांत्रिक कर्मचारी तसेच शस्त्रक्रिया गृहातील मदतनीस निवडणुकीच्या कामासाठी दिले तर रुग्णालय चालवायचे कसे असा सवाल अनेक अधिष्ठात्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत जे.जे. रुग्णालय व सेंट जॉर्ज दंतमहाविद्यालयातील सहाशेहून अधिक तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आले आहे.

  • वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील सोळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील २१०० डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आले होते. तथापि अत्यावश्यक सेवा लक्षात घेऊन डॉक्टर व तंत्रज्ञांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने डॉक्टरांना वगळण्याचा निर्णय घेतल्यामुळे आमचे १४०० कर्मचारी आता निवडणुकीचे काम करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. तंत्रज्ञांनाही वगळण्याची आमची मागणी असून त्याबाबत निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिल्याचे डॉ. लहाने म्हणाले.

बॉलिवूड भीतीपोटी नरेंद्र मोदींना समर्थन देत आहे - प्रिया दत्त :
  • माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी नरेंद्र मोदी सरकारला बॉलिवूडकडून मिळणारं समर्थन हे भीतीपोटी असल्याचं म्हटलं आहे. प्रिया दत्त यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रिया दत्त दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी पुन्हा एकदा प्रिया दत्त यांची पूनम महाजन यांच्याशी लढत असणार आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

  • यावेळी त्यांना सध्या बॉलिवूड अभिनेते राजकीय भाष्य करत असून केंद्र सरकारची बाजू मांडत असल्याबद्दल विचारण्यात आलं. यावर हे भीतीपोटी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘तुम्हाला वाटत नाही का यामागे भीती हे कारण आहे ? मला तरी असंच वाटतं. नाहीतर अचानक इतका बदल कसा झाला असता?’, असा प्रश्न प्रिया दत्त यांनी विचारला आहे.

  • ‘प्रत्येकाचं नुकसान झालं आहे. प्रत्येक नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. समाजावर ते प्रभाव पाडतात. पण त्यांच्यावरही जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनी स्पष्ट मत मांडलं पाहिजे’, असं प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे. यावेळी प्रिया दत्त यांनी राजकारणातून ब्रेक घेण्यासंबंधी आणि पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यासंबंधीही सांगितलं.

  • ‘मी दोन ते तीन वर्ष राजकारणात सक्रीय होते. पण मला माझ्या वैयक्तिक कामांवरही लक्ष द्यायचं होतं. मी नर्गिस दत्त फाऊंडेशनसाठी काम करत होते. ती नेहमीच माझी आवड राहिली आहे. मी राजकीयदृष्या सक्रीय नव्हते. मला माझ्या मुलांना सर्व वेळ द्यायचा होता जो मी गेल्या दहा वर्षात देऊ शकले नव्हते’, असं प्रिया दत्त यांनी सांगितलं आहे.

पारदर्शकतेला धोका :
  • नवी दिल्ली : राजकीय पक्षांना निधी पुरवण्याबाबतच्या अनेक कायद्यांमध्ये बदल करण्यात आल्याचे पारदर्शकतेवर ‘गंभीर परिणाम’ होतील, असे आपण केंद्र सरकारला कळवले असल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

  • एफसीआरए २०१० मध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे राजकीय पक्षांना परदेशातून कुठल्याही तपासणीशिवाय निधी मिळणे शक्य होईल व त्यामुळे भारताच्या धोरणांवर विदेशी कंपन्यांचा प्रभाव पडू शकेल, असेही आयोगाने म्हटले आहे.

  • प्राप्तिकर कायदा, लोकप्रतिनिधित्व कायदा आणि वित्त कायदा यामध्ये करण्यात आलेले बदल राजकीय पक्षांना निधी मिळण्यात पारदर्शकता आणण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये खीळ घालतील, असे आपण २६ मे २०१७ रोजी विधि व न्याय मंत्रालयाला लिहिले असल्याचे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. आयोगाचे संचालक (कायदा) विजय कुमार पांडे यांनी हे शपथपत्र दाखल केले आहे.

  • सरकारने निवडणूक रोखे (इलेक्टोरल बॉण्ड्स) जारी करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये आयोगाने हे उत्तर दाखल केले आहे. निवडणूक रोख्यांची माहिती दिली नाही तर राजकीय पक्षांनी सरकारी कंपन्यांनी आणि परदेशी स्त्रोतांकडून काही देणगी घेतली आहे काय हे स्पष्ट होणार नाही. परकीय अर्थसहाय्य नियमन कायदा (एफसीआरए) बदलांनी भारतीय कंपनीत अधिक समभाग आहेत अशा परदेशी कंपनीकडून मदत घेता येणार आहे.

महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या आठ सभा :
  • मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान होत असल्याने प्रत्येक टप्प्यात दोन अशा रीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ प्रचारसभा घेण्याच्या दृष्टीने प्रदेश भाजपचे नियोजन सुरू आहे. सभा कुठे घ्यायच्या आणि त्यात वाढ करण्याबाबतचा अंतिम निर्णय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेणार असून शेवटची सभा मुंबईत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

  • राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १ एप्रिल रोजी वर्धा येथे सभा होणार आहे. त्यानंतर आणखी एक सभा विदर्भात होईल. म्हणजेच पहिल्या टप्प्यात मोदी यांच्या दोन सभा होणार आहेत. 

  • मागील निवडणुकीत केवळ मोदी यांच्या सभेमुळे झालेल्या वातावरणनिर्मितीच्या जोरावर सोलापुरात शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळे मोदी यांच्या सभांसाठी राज्यातील अनेक उमेदवार उत्सुक आहेत.

  • राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात १४ जागांसाठी तर चौथ्या टप्प्यात १७ जागांसाठी मतदान होणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

  • १८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.

  • १९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

  • १९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.

  • १९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.

  • १९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

  • १९९८: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

जन्म 

  • १८६८: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९३६)

  • १९२५: अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८)

  • १९२७: भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०१३)

  • १९६८: इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसैन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९४१: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८८२)

  • १९६९: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक ड्वाईट आयसेनहॉवर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८९०)

  • १९९२: स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचे निधन.

  • २०००: शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.