चालू घडामोडी - २८ नोव्हेंबर २०१८

Date : 28 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'मंगळ'मय मंगळवार! 48.2 कोटी किमीचं अंतर कापून नासाचं 'इनसाईट' मंगळावर :
  • नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. या मिशनबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया.

  • नासाच्या या यशस्वी उड्डाणाने इतिहास रचला आहे. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान तयार करण्यात आले आहे.

  • मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19,800 किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.

  • 6 महिन्यांत 42.2 कोटी किलोमीटरची यात्रा पूर्ण करून हे यान मंगळावर उतरले आहे. पॅराशूट आणि ब्रेकींग इंजिनचा वापर करून या यानाचा वेग कमी करण्यात आला आणि त्याला मंगळावर उतरवण्यात आले.

  • इनसाईटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे. नासाच्या या प्रकल्पासाठी 1 बिलियन डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च आला आहे.

  • सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल.

  • इनसाईट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सार्क परिषदेचं निमंत्रण पाठवणार पाकिस्तान :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानतर्फे सार्क परिषदेचे निमंत्रण पाठवलं जाणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता डॉक्टर मोहम्मद फैसल यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानात सार्क परिषद होणार आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात येईल असं फैसल यांनी स्पष्ट केलं. इम्रान खान यांनी जेव्हा पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा पाकिस्तान भारतापुढे मैत्रीचा हात करेल असे म्हटलं होतं. आता पाकिस्तानतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सार्क परिषदेचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

  • १९ व्या सार्क परिषदेचे आयोजन २०१६ मध्येच पाकिस्तानात करण्यात येणार होतं. मात्र भारत, बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी या परिषदेत सहभाग घेण्यास असहमती दर्शवली. त्यानंतर ही परिषदच रद्द करण्यात आली होती. उरी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भारताने या परिषदेला जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानने केलेल्या उरी येथील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

  • २०१६ मध्ये सार्क देशांची एक बैठक पाकिस्तानात झाली होती. त्यावेळी भारताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह गेले होते. त्यानंतर भारताचा एकही नेता पाकिस्तानात गेलेला नाही. आता पाकिस्तानने सार्क परिषदेचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीकारणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याचा बीसीसीआयचा निर्णय :
  • नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या Emerging Nations Cup (23 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ न पाठवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) घेतला आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याची संधी मिळणार आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास मनाई केल्याने त्यांना दणकाच बसला आहे.

  • 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता. त्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्यात आलेला नाही. भारतीय संघ सर्व सामने श्रीलंकेत खेळेल आणि अंतिम सामनाही येथेच होणार आहे.

  • पाकिस्तान आणि श्रीलंका यांना Emerging Nations Cup स्पर्धेचे संयुक्त यजमानपद देण्यात आले आहे. कराचीत बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग आणि पाकिस्तान यांचे सामने होणार आहेत, तर कोलंबो येथे श्रीलंका, भारत, अफगाणिस्तान आणि ओमान यांच्यात लढती होतील. कोणत्याही अटींवर भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचा पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे. 

  • 6 ते 15 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. पाकिस्तानातील सर्व सामने नॅशनल स्टेडियममध्ये होणार असून त्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे पीसीबीने सांगितले. सुरक्षेच्या कारणावरूनच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास मनाई केली आहे. त्यामुळे Emerging Nations Cup ही स्पर्धा पाकिस्तानला त्या सर्व खेळाडूंचा विश्वास जिंकण्याची संधी असल्याचे बोलले जात आहे.

‘राम मंदिर बांधले गेले नाही तर जनतेचा भाजपावरचा विश्वास उडेल’ :
  • भाजपाची सत्ता देशात आहे, त्यांनी राम मंदिराचे काम सुरु केले नाही तर जनतेचा सत्ताधाऱ्यांवरून विश्वास उडेल असे योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. तसेच कारसेवक मंदिराचे बांधकाम सुरु करू शकत नाहीत कारण हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे राम मंदिराची निर्मिती करण्यासाठी अध्यादेश आणणे हा एकमेव पर्याय सरकारपुढे आहे असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

  •  

  • योगगुरु बाबा रामदेव यांनी हरिद्वार या ठिकाणी शदाणी दरबाराच्या पाच मजली भवनाचे उद्घाटन केले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना राम मंदिराबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राम मंदिराची निर्मिती करायची असेल तर अध्यादेश हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. राम मंदिर उभारणे हा प्रश्न हिंदू अस्मितेशी जोडला गेला आहे. यासाठी केंद्राने लवकरात लवकर अध्यादेश आणायला हवा नाहीतर जनतेचा भाजपावरचा विश्वास उडेल.

  • तीन दिवसांपूर्वीही बाबा रामदेव यांनी याच प्रकारचे वक्तव्य केले होते. राम मंदिराबाबत केंद्राने अध्यादेश आणला नाही तर लोकांचा संयम संपेल. अनेक रामभक्त स्वतःहूनच मंदिर बांधण्यास सुरुवात करतील. जर तसे झाले तर धार्मिक तेढ वाढू शकते.

  • लोकांचा संयम सुटण्याची वाट सरकारने पाहू नये त्याऐवजी राम मंदिर बांधण्यासंबंधीचा अध्यादेश आणावा आणि लवकरात लवकर अयोध्येत मंदिराचे काम सुरु करावे. आता जर राम मंदिर बांधले गेले नाही तर लोक आक्रमक होऊ शकतात. त्यानंतर परिस्थिती चिघळली तर ती सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असेही त्यांनी म्हटले होते. आज पुन्हा एकदा लवकरात लवकर राम मंदिराच्या निर्मितीसाठी अध्यादेश आणला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘ओडिशात धर्मेंद्र प्रधान भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार’ :
  • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान हे ओडिशात भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ज्युएल ओराम यांनी जाहीर केले आहे. दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत ओडिशा केडरच्या आयएएस अधिकारी अपराजिता सारंगी या भाजपात सहभागी झाल्यानंतर ओराम यांनी ही माहिती दिली.

  • ओराम म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान ओडिशामध्ये भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील. त्यांच्या नेतृत्वात आम्ही आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवू. नवीन पटनाईक यांना सत्तेतून बेदखल करणे आणि राज्यात बिगर ओडिया नोकरशाहंचे सरकार संपुष्टात आणण्याचे आमचे लक्ष्य आहे.

  • सारंगी यांच्या भाजपात सामील होण्याबाबत ते म्हणाले की, प्राथमिक सदस्य म्हणून त्या सहभागी झाल्या आहेत. पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते राउरकेलाचे आमदार दिलीप रे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य विजय महापात्रा यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. यावर ओराम यांनी यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल, अशी चिंता व्यक्त केली.

मंगळावर जगण्याची शक्यता फारच कमी, तरीही एलॉन मस्क यांना खुणावतोय 'रेड प्लॅनेट' :
  • नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे  मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. या यानाच्या यशस्वी लॅन्डींगनंतर सर्वांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • त्याचप्रमाणे तेथील वातावरणाबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. मंगळावरील जीवन कसे असेल? तिथे मानवाला जगण्यासाठी पोषक असं वातावरण असेल का? असे अनेक प्रश्न जगभरातून उपस्थित होत असतानाच, या प्रश्नांना सामोरं जात स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी मंगळवारी करण्याची इच्छा दर्शवली आहे. पण त्यांना एक भीती सतावत आहे की, मंगळावर गेल्यानंतर किंवा तिथे जात असतानाच जिवंत राहण्याची शक्यता फार कमी आहे. 

  • सीएनईटीने दिलेल्या रिपोर्टनुसार, रविवारी अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तवाहिनी 'एचबीओ'शी बोलताना मस्क ने सांगितले की, 'काही दिवसांपूर्वीच आम्ही अनेकदा यशस्वी झालो आहोत आणि यामुळे मी फार उत्साहीत आहे.' पुढे बोलताना मस्कने सांगितले की, 'मला मंगळवार जाण्याची इच्छा आहे आणि मी तसे प्रयत्नही करत आहे. त्यासंबंधी मी अनेक व्यक्तींशी चर्चा देखील करत आहे. साधारणतः 70 टक्के शक्यता आहे की मी मंगळावर जाऊ शकतो. पण असे करण्याचे गंभीर परिणाम देखील भोगावे लागू शकतात.'

  • एलॉन मस्कने सांगितले की, 'मंगळावर मानवाच्या जिवंत राहण्याची शक्यता पृथ्वीपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे तिथे जात असतानाच किंवा तिथे पोहोचल्यावर मृत्यू होण्याची शक्यता अधिक आहे.' याचे कारण विचारल्यावर स्पष्टीकरण देत असताना मस्कने सांगितले की, 'अनेक गिर्यारोहक उंच पर्वत, शिखरं सर करण्यासाठी जातात. माउंट एवरेस्टवर अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. पण तरीही अनेक लोक याकडे आव्हान म्हणून पाहतात.'

मध्य प्रदेश, मिझोरम विधानसभेसाठी मतदान सुरु :
  • भोपाळ/ऐजावल : मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागांसाठी आणि मिझोरमच्या 40 जागांसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मध्य प्रदेशात सध्या भाजपची सत्ता आहे तर, मिझोरममध्ये काँग्रेस सत्ताधारी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आज सत्ता टिकवण्यासाठी कांटे की टक्कर आहे. दोन्ही राज्यांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • छत्तीसगडमधील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज एकाच वेळी मध्य प्रदेशमध्ये सर्व 230 जागांसाठी मतदान होत आहे. गेली 15 वर्षे मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेत आहे. तर दुसऱ्या बाजूला मिझोरम विधानसभेच्या 40 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे.

  • मिझोरममध्ये काँग्रेस आणि मिझोराम नॅशनल पार्टी या दोन पक्षांच्या युतीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात सत्तापालट करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे तर, मिझोराममधील सत्ता टिकवण्याचं आव्हानही काँग्रेससमोर आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

  • १९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

  • १९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

  • १९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

जन्म 

  • १८५३: डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९४४)

  • १८५७: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५)

  • १८७२: गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९४३)

  • १९६४: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९०: श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८२७)

  • १८९३: ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८१४)

  • १९३९: बास्केटबॉल चे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८६१)

  • १९५४: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९०१)

  • १९६२: गायक, संगीत संयोजक व अभिनेते कृष्ण चंद्र तथा के. सी. डे यांचे निधन.

  • १९६३: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन. (जन्म: २५ मे १८९५)

  • १९६७: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८०)

  • १९६८: बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट१८९७)

  • १९९९: अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा यांचे निधन.

  • २००१: नाटक निर्माते अनंत काणे यांचे निधन.

  • २००८: भारतीय हवलदार गजेन्द्र सिंग यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.