चालू घडामोडी - २८ ऑक्टोबर २०१८

Date : 28 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
श्रीलंकेच्या राजकारणात खळबळ, महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान :
  • कोलंबो: श्रीलंकेत राजकीय घडामोडींना वेगळे नाटकीय वळण आले असून लंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटविले आहे. 72 वर्षीय राजपक्षे यांनी शपथ घेतल्यानंतर सिरिसेना यांच्यासोबत एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी ‘‘श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली’’, असा संदेश देखील लिहिला आहे.

  • सिरिसेना यांच्या युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायंस (यूपीएफए) ने घोषणा करत सध्याच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही पार्टी आतापर्यंत युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) सोबत होती, ज्या पक्षाचे नेते रानिल विक्रमसिंघे पंतप्रधानपदावर विराजमान होते. यूपीएफएने पाठिंबा काढल्यामुळे विक्रमसिंघे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

  • यापूर्वी जवळपास एक दशक राजपक्षे यांचे सरकार होते. त्यांच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेल्या सिरिसेना यांनी त्यांच्या विरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली. राजकीय विश्लेषकांच्या मते राजपक्षे यांना पंतप्रधान करण्याच्या सिरिसेना यांच्या निर्णयाला संवैधानिक अडचणी येऊ शकतात.

  • कृषिमंत्री आणि यूपीएफएचे महासचिव महिंदा अमरवीरा यांनी राजपक्षे यांच्या नियुक्तीबाबत संसदेला माहिती दिली. या संपूर्ण घडामोडीवर बोलताना वित्तमंत्री मंगला समरवीरा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान म्हणून राजपक्षे यांची नियुक्ती असंविधानिक आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले असून हे एक असंविधानिक सत्तापालट असल्याचे म्हटले आहे. 2015 साली विक्रमसिंघे यांच्या पाठिंब्याने सिरिसेना राष्ट्रपती बनले होते.

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात :
  • मुंबई : सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोल 40 पैशांनी, तर डिझेलचे दर 37 पैशांनी घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने देशभरात सलग दहाव्या दिवशी इंधनाच्या दरात घट झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर 85.93 रूपये प्रति लिटर, तर डिझेल 77.96 रूपये प्रति लिटर आहे.

  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सतत तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. राज्यात तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली होती. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये पेट्रोल 93 रुपयांच्या पुढे गेलं होतं.

  • दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच अडीच रुपये आणि राज्य सरकारने अडीच रुपये म्हणजे एकूण पाच रुपये कमी करुन दिलासा दिला होता. त्यात आता दर घसरत असल्याने येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

  • पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा फटका फक्त वाहनधारकांनाच बसत नव्हता. यामुळे प्रत्येक गोष्टीचे दर वाढून एकूणच महागाई वाढली होती. दळणवळणाचा खर्च वाढल्यामुळे भाजीपाल्यापासून ते दैनंदिन वस्तूंपर्यंत महागाई वाढण्याची परिस्थिती ओढावली होती. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल 2.38 रुपये तर डिझेल 1.31 रुपयांनी कमी झालं आहे.

संजय कुमार मिश्रा झाले ‘ईडी’चे हंगामी संचालक :
  • नवी दिल्ली : केंद्र सरकारने शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) हंगामी संचालक म्हणून संजय कुमार मिश्रा यांची नेमणूक केली. ही नेमणूक तीन महिन्यांसाठी आहे.

  • संजय कुमार मिश्रा भारतीय महसूल सेवेचे प्राप्तिकर केडरचे १९८६ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. मावळते संचालक कर्नाल सिंग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने मिश्रा यांच्या नावाला हंगामी संचालकपदासाठी मंजुरी दिली.

  • मिश्रा यांना ‘ईडी’चे प्रधान मुख्य संचालक नेमण्यात आले असून, त्यांच्याकडे तीन महिन्यांसाठी संचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

महाराष्ट्र, गोव्याच्या ८ जिल्ह्यांत मोदी पाठवणार अधिकारी :
  • नवी दिल्ली : निवडणुकांच्या आधी योजनांना गती देण्यासाठी तसेच सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रातील (एमएसएमई) क्लस्टर्सच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातील ८ जिल्ह्यांत अतिरिक्त सचिव व संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी पाठवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.

  • हे अधिकारी पुणे, नाशिक, धुळे, सांगली, नागपूर, औरंगाबाद, ठाणे आणि उत्तर गोवा या जिल्ह्यांत जातील. देशात ७५0 केंद्रीय अधिकारी पाठविण्याची मोदींची योजना आहे. ११५ जिल्ह्यांतील ४५ हजार गावांत ७ सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर हे अधिकारी देखरेख ठेवतील. एक अधिकारी ७५ गावांवर देखरेख करील. चार ते सात दिवसांत तो किमान तीन गावांना भेट देईल. हे अधिकारी संयुक्त अथवा अतिरिक्त सचिव दर्जाचे असतील.

  • याशिवाय ३२२ संचालक, उपसचिव, ३२२ अवर सचिव दर्जाचे अधिकारी नोडल आॅफिसर म्हणून काम करतील. पहिल्या टप्प्यात ८0 अधिकाऱ्यांची निवड करण्यात येत आहे. ८0 जिल्ह्यांत एमएसएमईसाठी सरकार पॅकेज घोषित करणार आहे. एमएसएमई क्षेत्रात ६ कोटी उद्योग असून १२0 दशलक्ष लोकांना रोजगार दिला जातो. मोदींनी पाठविलेले अधिकारी बँका, ईपीएफओ, ईसीआयएस, एसआयडीबीआय या संस्थांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करतील.

मोदींना मोठा धक्का; ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार :
  • नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनावेळी मुख्य अतिथी म्हणून हजर राहण्यास सपशेल नकार कऴविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी आणि इराणकडून तेलाची आयात केल्याने ट्रम्प नाराज आहेत. यामुळे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ट्रम्प भारतात येणार नसल्याचे पत्र दिले आहे. 

  • अमेरिकेमध्ये काही राजकीय कार्यक्रम आणि स्टेट ऑफ यूनियनला ट्रम्प संबोधित करणार असल्याचे कारण देत ट्रम्प यांनी या पत्रामध्ये खेद व्यक्त केला आहे. मात्र, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनावेळी सर्व कार्यक्रम, जबाबदाऱ्या बाजुला ठेवून मुख्य अतिथी म्हणून भारतात आले होते.

  • ट्रम्प यांनी मोदींचे हे निमंत्रण अशावेळी नाकारले आहे, जेव्हा इराणकडून तेल खरेदी सुरुच ठेवल्याने भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. तसेच गेल्या आठवड्यात रशियाकडून केलेली शस्त्रास्त्र खरेदीही याला कारण मानले जात आहे. 

  • भारताने रशियाकडून एस-400 एअर डिफेंस मिसाईल सिस्टिम नुकतीच खरेदी केली होती. यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. तसेच अमेरिकेची एफ-16 विमाने खरेदी करण्यासही भारताला बजावले होते. रशियाच्या राजदुतांनी भारताच्या स्वतंत्र देशाच्या भुमिकेवर स्तुतीसुमने उधळली होती. तसेच इराणकडून तेल खरेदीमध्ये कमी करण्यासही भारताने नकार दिला होता. यामुळे ट्रम्प भारतावर नाराज आहेत.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे निधन :
  • नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराना यांचे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरीच निधन झाले. ते 82 वर्षांच होते. त्यांचा मुलगा हरिश खुराना यांनी ट्विट करून ही माहिती दिली. 

  • मदन लाल खुराना हे मेंदूज्वरामुळे गेल्या काही वर्षांपासून कोमामध्ये गेले होते. तसेच त्यांच्या एका मुलाचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले होते. मदनलाल खुराना हे भाजपमधील मोठे नेते होते. दिल्लीच्या राजकारणात ते बऱ्याच काळापासून सक्रीय होते. 1993 ते 1996 या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्रीही राहिले होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबरला पाकिस्तानच्या फैलसाबादमध्ये झाला होता. 

  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात खुराना संसदीय कार्यमंत्री आणि पर्यटन मंत्रीही राहिले होते. दिल्लीमधून ते चारवेळा संसदेवर निवडून गेले होते. अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द लाभलेल्या खुराना यांना 2001 मध्ये राजस्थानच्या राज्यपालपदी नेमण्यात आले. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी 2004 मध्ये राजीनामा देत पुन्हा सक्रीय राजकारणात परतावे लागले होते. ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते. 

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन

महत्वाच्या घटना 

  • १४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.

  • १४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.

  • १६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.

  • १८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.

  • १९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.

  • १९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.

जन्म 

  • १८६७: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर१९११)

  • १८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)

  • १९३०: हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय तथा अंजान यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)

  • १९५५: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांचा जन्म.

  • १९५५: भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म.

  • १९५६: ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद यांचा जन्म.

  • १९५८: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.

  • १९६७: अमेरिकन अभिनेत्री ज्यूलिया रॉबर्टस यांचा जन्म.

  • १९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६२७: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १५६९)

  • १८११: राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १७७६)

  • १९००: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८२३)

  • १९४४: डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)

  • २००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)

  • २०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)

  • २०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.