चालू घडामोडी - २८ सप्टेंबर २०१८

Date : 28 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एनएसजी सदस्यत्वासाठी ब्रिटनचा भारताला बिनशर्त पाठिंबा :
  • नवी दिल्ली: अणु पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी ब्रिटननं भारताला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या गटात सामील होण्यासाठी भारत पात्र असल्याचं ब्रिटननं म्हटलं आहे. एनएसजीमध्ये सामील होण्यासाठी आवश्यक असलेली योग्यता भारताकडे असल्याचंही ब्रिटनचं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अणू व्यापारावर निगराणी ठेवण्याचं काम एनएसजीकडून केलं जातं. एनएसजीमध्ये प्रवेश मिळण्याचे अनेक फायदे असल्यानं ब्रिटननं घेतलेली भूमिका भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. 

  • भारताला एनएसजीमध्ये प्रवेश देण्याबद्दल ब्रिटन अनुकूल आहे. 'एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी आवश्यक असणारी योग्यता भारताकडे आहे. भारत एक प्रतिष्ठीत देश असून तो एनएसजीचा भाग असायला हवा, अशी आमची भूमिका आहे,' अशी भूमिका ब्रिटननं घेतली आहे. भारताच्या एनएसजी प्रवेशाला विरोध करण्याचं नेमकं कारण काय, हे चीननं एकदा स्पष्ट करावं, असं आवाहनही ब्रिटनकडून करण्यात आलं आहे. 

  • एनएसजीमधील भारताच्या प्रवेशाला चीननं वारंवार विरोध केला आहे. मात्र तरीही भारतानं एनएसजीमधील प्रवेशाचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. यासाठी गेल्याच महिन्यात भारतानं 2+2 संवाद साधला. यावेळी भारत आणि अमेरिकेचे दोन मंत्री भेटले होते. मात्र अद्याप एनएसजी प्रवेशाबद्दल भारताला अमेरिकेकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. मात्र अमेरिकेकडून सहकार्य मिळेल, अशी आशा मोदी सरकारला आहे.

रयत शिक्षण संस्थेसाठी विशेष टपाल तिकीट :
  • मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट व विशेष कव्हर प्रकाशित करण्यात येणार आहे.

  • सातारा येथील संस्थेच्या मुख्यालयात ४ आॅक्टोबरला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात हे प्रकाशन केले जाईल, अशी माहिती टपाल खात्याच्या सूत्रांनी दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये लावलेल्या या संस्थारूपी रोपट्याचे आता मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर

  • झाले आहे. संस्थेच्या या कारकिर्दीबाबत टपाल तिकीट प्रकाशित करून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.

अयोध्या प्रकरण सुनावणीचा मार्ग मोकळा, २९ ऑक्टोबरपासून नियमित सुनावणीची शक्यता :
  • नवी दिल्ली : अयोध्या वादग्रस्त जागेच्या निर्णयाची नियमीत सुनावणी होण्याची शक्यता आहे. मशिदीत नमाज पठण करणं हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे की नाही, याबाबत 1994च्या सर्वोच्च न्यायालयाच्याच निर्णयाचं पुनरावलोकन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता वरिष्ठ घटनापीठाकडे जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

  • अयोध्या वादग्रस्त जागेच्या सुनावणीदरम्यान हा मुद्दा पुढे आला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या घटनापीठानं 2:1 असा हा निर्णय दिला. अयोध्या वादग्रस्त जागेच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 ऑक्टोबर पासून होणार आहे.

  • न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटलं की, "1994मध्ये पाच न्यायधीशांच्या घटनापीठानं दिलेला निर्णयावेळी काय परिस्थिती होती. प्रत्येक निर्णयासाठी परिस्थिती वेगवेगळी असते. प्रकरणाच्या निकालासाठी मागील काही निर्णय समजून घेणं गरजेचं आहे."

  • मात्र न्यायमूर्ती एस. अब्दुल यांनी घटनापीठाच्या इतर दोन सदस्यांना निर्णयाच्या वेगळं मत माडलं आहे. त्यांनी म्हटलं की, "मशिद इस्लामचा अविभाज्य भाग आहे. या विषयावरील निर्णय धार्मिक भावना लक्षात घेऊन दिला गेला पाहिजे. यावर गंभीर विचार करणे गरजेचं आहे."

५० टक्के लोकांनीच केला आधार क्रमांक पॅनला लिंक! आता करणे अनिवार्य :
  • नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्राप्तिकर विवरणासाठी दिलेल्या निकालामुळे पॅन क्रमांक (परमनंट अकाउंट नंबर) व आधार क्रमांक एकमेकांना जोडणे (लिंक करणे) बंधनकारक बनले आहे. मात्र आतापर्यंत ५0 टक्के लोकांनी आधार व पॅन लिंक केले नसल्याचे आढळून आले आहे.

  • प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ कोटी ८ लाख १६ हजार ७७६ लोकांनी पॅन व आधार एकमेकांना जोडले आहे. प्रत्यक्षात पॅन कार्डधारकांची संख्या ४१ कोटी २६ लाख ६९६८ इतकी आहे.

  • म्हणजे २0 कोटींहून अधिक लोकांनी पॅन व आधार एकमेकांना लिंक केलेले नाही, असा अर्थ निघतो. अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची मुदत ३१ मार्च २0१९ पर्यंत वाढवून दिली आहे. तसे ३0 जून रोजी जाहीर करण्यात आले होते. तोपर्यंत ते काम संबंधित पॅन कार्डधारकांना करावेच लागणार आहे. मात्र आधारचा फैसला होईपर्यंत पॅन व आधार जोडण्यास मुदतवाढ देण्याचे मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयानेच जाहीर केले होते.

  • आता न्यायालयाचा निर्णय आला असून, त्यात हे करणे बंधनकारक केले आहे. प्राप्तिकर कायदा विवरणपत्रात आधार क्रमांक देणे सक्तीचे केले होते. त्यात १ जुलै २0१७ रोजी ज्यांच्याकडे पॅन आहे आणि जे आधार क्रमांकासाठी पात्र आहेत, त्यांनी आधार क्रमांक प्राप्तिकर विभागाला कळविणे बंधनकारक केले होते.

सार्क देशांच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी दुर्लक्ष केल्यानं पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचा तीळपापड :
  • न्यूयॉर्क- भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. त्यामुळे भारतानं पाकिस्तानबरोबरच्या सर्व चर्चा थांबवल्या होत्या. त्यातच पाकिस्तानकडून कायम शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्यानं दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत चाललाय. याचा प्रत्यय अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये आयोजित दक्षिण आशिया क्षेत्रीय सहयोग संघटने(सार्क)च्या बैठकीतही पाहायला मिळालं.

  • खरंतर न्यूयॉर्कमध्ये सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजयांनीही भाग घेतला होता. परंतु सुषमा स्वराज यांनी भाषण दिल्यानंतर बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी सुषमा स्वराज यांच्या भूमिकबाबत नाराजी व्यक्त केली.

  • विशेष म्हणजे सुषमा स्वराज यांच्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांचं भाषण होणार होतं. तत्पूर्वीच सुषमा एका कार्यक्रमानिमित्तानं तिथून बाहेर पडल्या. या प्रकारानंतर महमूद कुरेशी यांना राग अनावर झाला.

  • ते म्हणाले, जर शांतीच्या दृष्टिकोनातून चर्चा करायची असल्यास दोन्ही देशांना एक पाऊल पुढे यावे लागेल. परंतु सुषमा स्वराज यांची ही कुठली पद्धत आहे ?, जर सार्क देशांच्या प्रगतीत कोणी बाधा बनत असेल, तर ती एका देशाची भूमिका आहे. तसेच सुषमा स्वराज आणि आमच्यामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. सुषमा स्वराज बैठकीतून निघून गेल्या.

  • कदाचित त्यांची तब्येत ठीक नसावी, मी त्यांचं भाषण ऐकलं, त्यांना क्षेत्रीय सहयोग वाढवायचा आहे. परंतु त्यासाठी एका देशानं दुस-या देशाशी चर्चा करण्याची गरज नाही. त्या देशाला बाजूला करून चर्चा होऊ शकत नाही. 

रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या आणखी ५०० जनुकांचा शोध :
  • लंडन- ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या एका मोठा जनुक अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. या संशोधकांनी रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या ५०० जनुकांचा शोध लागल्याचा दावा केला आहे.  या संशोधनामध्ये १० लाख लोकांच समावेश करण्यात आला होता. रक्तदाब आणि जनुकीय संबंध या विषयावर क्वीन मेरी युनिव्हर्सिटी आॅफ लंडन अँड इम्पेरियल कॉलेज आॅफ लंडनच्या संशोधकांनी अभ्यास केला.

  • रक्तदाब आणि जनुके यांच्यसंबंधातील ही सर्वात मोठी प्रगती असल्याचे मत नॅशनल रिसर्च बार्ट्स बायोमेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक मार्क कॉलफिल्ड यांनी सांगितले. रक्तदाबावर परिणाम करणारे १००० जनुकीय संकेत आता आपल्याला माहिती झाले आहेत. यामुळे आपले शरीर रक्तदाब कसे नियंत्रित करते आणि भविष्यात औषधनिर्मिती कशी करावी लागेल याची माहिती या शोधामुळे मिळेल असे मार्क यांनी मत व्यक्त केले. 

  • जुनकांमुळेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांना डॉक्टर आता जीवनशैलीतील बदल, वजन कमी करणे, मद्यपान कमी करणे, व्यायाम करणे असे उपाय सुचवू शकतील. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक आणि हृद्यरोगाच त्रास होण्याची भीती असते, त्यामुळे केवळ २०१५ या एका वर्षामध्ये जगभरात ८० लाख लोकांचे प्राण गेले अशीही माहिती त्यांनी दिली.

दिनविशेष :
  • जागतिक रेबीज दिन / आंतरराष्ट्रीय जाणून घेण्याचा हक्क दिन / आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात

महत्वाच्या घटना

  • १९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.

  • १९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.

  • १९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९९९: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १८६७: जपानी पंतप्रधान कीचिरो हिरानुमा यांचा जन्म.

  • १८९८: स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म.

  • १९०७: क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

  • १९२९: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म.

  • १९६६: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.

  • १९८२: ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म.

मृत्यू

  • १९६७: सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचे निधन.

  • २०००: सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते यांचे निधन.

  • २००४: इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.