चालू घडामोडी - २९ एप्रिल २०१८

Date : 29 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तानकडे दुर्लक्ष करुन जिनपिंग आणि मोदींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये वुहानमध्ये झालेल्या दोन दिवसीय अनौपचारिक शिखर परिषदेत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात अफगाणिस्तानसंबंधी घेतलेला निर्णयामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखू शकते. भारत आणि चीन अफगाणिस्तानमध्ये प्रथमच संयुक्त आर्थिक प्रकल्पावर एकत्र काम करणार आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये या प्रकल्पाबद्दल एकमत झाले आहे.

  • भारत आणि चीनच्या या निर्णयामुळे निश्चितच पाकिस्तान दुखावला जाऊ शकतो. कारण अफगाणिस्तानमध्ये भारताने हस्तक्षेप करु नये, भारताचे महत्व वाढू नये असे पाकिस्तानचे मत आहे. मोदी आणि जिनपिंग यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला होता. पाकिस्तानची हीच अस्वस्थतता लक्षात घेऊन चीनने पाकिस्तानसोबतच्या संबंधात कुठलाही फरक पडणार नाही. दोन्ही देशांचे संबंध पूर्वी होते तसेच दृढ राहतील असे चीनने आश्वासन दिले होते.

  • अफगाणिस्तानमध्ये भारताचे महत्व वाढू नये अशी पाकिस्तानची इच्छा आहे पण आता जिनपिंग यांनी भारतासोबत संयुक्त आर्थिक प्रकल्पावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे.  मोदी आणि जिनपिंग यांनी अफगाणिस्तानसंबंधी घेतलेल्या या निर्णयामुळे दोन्ही देश आशियाई क्षेत्रात फक्त स्पर्धकच नसून परस्परांचे चांगले सहकारी असल्याचाही संदेश जाईल.

उत्तर प्रदेशात १ मे रोजी साजरा होणार महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा :
  • मुंबई - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. या वर्षी लखनौमध्ये होणारा महाराष्ट्र दिवस सोहळा उत्तर प्रदेश सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र समाज लखनौ, मराठी समाज उत्तर प्रदेश आणि भातखंडे संगीत विश्वविद्यालयाच्यावतीने 1 आणि 2 मे रोजी राजभवनातच आयोजित करण्यात आला आहे. 

  • 1 मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्य अतिथी असतील, तर उत्तर प्रदेशाच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति दिलीप बाबासाहेब भोसले आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे विशेष अतिथी असतील.  

  • उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आणि सूचना मंत्री डॉ. नीळकंठ तिवारी हेही उपस्थित राहतील. 2 मे रोजी समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य तसेच मंत्री मंडळातील ज्येष्ठ मंत्री डॉ. रिटा बहुगुणा जोशी, लक्ष्मी नारायण चौधरी, आशुतोष टंडन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

  • असेही राज्यपाल नाईक यांनी सांगितले. समारोहातील सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली असून पहिल्या दिवशी ‘भूपाळी ते भैरवी’ या संघातर्फे महाराष्ट्रातील 16 लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

जे.जे. रुग्णालयाला जागतिक स्तरावर ‘सॅजेस’ पुरस्कार :
  • मुंबई : सर जे.जे. रुग्णालयाला अमेरिकेत सॅजेस पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे. या रुग्णालयात २०१६ साली एका महिला रुग्णाला ‘पॅराथायरॉइड एडेमोना’ या आजारावर दुर्बिणीने एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेमुळे ही महिला रुग्ण आजारमुक्त झाली आणि याचमुळे जागतिक पातळीवर अमेरिकेने या शस्त्रक्रियेची दखल घेतली आहे. जे.जे. रुग्णालयाला मिळालेल्या पुरस्कारानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी टिष्ट्वट करून अभिनंदन केले आहे.

  • या शस्त्रक्रियेला जगात मान्यता मिळाली असून यामुळे रुग्णालयाला ‘सोसायटी आॅफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अँण्ड एंडोस्कोपिक सर्जन’ (सॅजेस) या पुरस्काराने अमेरिकेत सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी हजारांहून अधिक प्रबंध जगभरातून आले होते. यातून छाटणी होत होत अखेर पहिला पुरस्कार जे. जे. रुग्णालयाला जाहीर करण्यात आला. २०१६ पासून सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.

  • ग्रॅण्ट रोड परिसरात राहणाºया फरहात शेख या महिलेवर करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. या महिलेमध्ये असलेला ट्युमर हा थायरॉइड ग्रंथीच्या आत लपलेला होता. त्यामुळे या महिलेला होणारा कंबरदुखी तसेच हाडांच्या दुखण्याच्या त्रासाचे निदानच होत नव्हते. एक्टोपिक पॅराथायरॉइड हा एक अत्यंत दुर्मीळ आजार आहे. याचे वेळेत निदान होणे कठीण असते. या आजाराने त्रस्त रुग्णाच्या शरीरातील हाडे ठिसूळ होऊ लागतात. रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते.

जयंत पाटील राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष? आज घोषणेची शक्यता :
  • पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोती बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

  • बैठकीनंतर गुलटेकडी येथील पक्षाच्या सभेत शरद पवार नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करतील. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. बैठकीत शरद पवार पक्षातील नेत्यांशी चर्चा करतील आणि आपली भूमिका मांडतील.

  • बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे नेते उपस्थित असतील.

मोदी-जिनपिंग भेटीतून भारताला काय मिळालं?... पाच ठळक मुद्दे :
  1. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करून आर्थिक पातळीवर एकत्र काम करण्यास भारत-चीनमध्ये एकमत झालं आहे. अफगाणिस्तानातील दहशतवाद मिटवण्यासाठी चीनची साथ मिळणं ही जमेची बाजू आहे. 

  2. भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनेही दोन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. २००५मध्ये जे निकष निश्चित करण्यात आले होते, त्या आधारावरच विशेष प्रतिनिधी दुसऱ्या टप्प्यात चर्चा करतील, असं यावेळी ठरवण्यात आलंय.     

  3. भारत-चीन सीमेवर शांतता-स्थैर्य राहावं, यादृष्टीने दोन्ही देश आपापल्या लष्कराला आचारसंहिता देणार आहेत. त्यामुळे पुन्हा डोकलामसारखी परिस्थिती निर्माण न होण्यास मदत होऊ शकेल. 

  4. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक अधिक संतुलित आणि टिकाऊ करण्याच्या दृष्टीने दोन्ही देश पावलं टाकणार आहेत. 

  5. मोदी आणि जिनपिंग यांच्यातील मैत्रीचं नातं या भेटीमुळे आणखी दृढ झालं आहे. हुबई म्युझियममध्ये जिनपिंग स्वतः मोदींसोबत गेले, त्यांना ऐतिहासिक कलाकृती दाखवल्या. २० मिनिटांऐवजी ते ४० मिनिटं तिथे होते आणि गप्पांमध्ये रंगले होते. या मैत्रीमुळे दोन देशांमधील संवाद वाढून वाद मिटण्यास फायदा होऊ शकतो.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • १९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

  • १९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.

  • १९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.

जन्म

  • १७२७: आधुनिक बॅले डान्सच्या जनक जीन-जॉर्जेस नोव्हर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १८१०)

  • १८४८: चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९०६)

  • १८६७: भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९३५)

  • १८९१: भारतीय कवी आणि कार्यकर्ते भारतीदासन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९६४)

  • १९०१: दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचा जन्म. (मृत्यू: ७ जानेवारी १९८९)

  • १९३६: भारतीय संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्म.

  • १९६६: इंग्लिश फिरकी गोलंदाज फिल टफनेल यांचा जन्म.

  • १९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू आंद्रे आगासी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९४५: जर्मन नाझी अधिकारी हेन्रिच हिमलर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९००)

  • १९६०: हिन्दी कवी पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९७)

  • १९८०: लेखक, विचारवंत आणि समीक्षक श्रीकृष्ण के. क्षीरसागर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)

  • १९८०: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९९)

  • २००६: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९०८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.