चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ एप्रिल २०१९

Date : 29 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुगल कर्मचाऱ्यांना गैरवर्तनाबाबतच्या तक्रारींसाठी कंपनीची नवीन वेबसाईट :
  • गुगलने आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक गैरवर्तनाबाबतच्या तक्रारींसाठी एक विशेष वेबसाईट लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेबसाईटवर गैरवर्तनाबाबतच्या तक्रारी सोप्या पद्धतीने करता येणार आहेत. गुगलच्या डाइवर्सिटी, इक्वीटि एंड इंक्ल्यूजन विभागाच्या ग्लोबल डायरेक्टर मिलोनी पार्कर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

  • गुगलच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अडचणी थेट आणि सोप्या पद्धतीने मांडता याव्यात यासाठी नवी वेबसाईट बनवली असल्याचे मिलोनी पार्कर यांनी सांगितले. गुगल कर्मचाऱ्यांसाठीची ही वेबसाईट जून महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

  • गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जगभरातील जवळपास वीस हजार गुगल कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गैरवर्तनावरुन आंदोलन केले होते. त्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी घोषणा केली होती की, लैंगिक छळ आणि हिंसा याबाबतच्या तक्रारींबाबत कंपनी ठोस पाऊल उचलेल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना कोर्टात जावं लागणार नाही.

  • या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून गुगलच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणारा त्रास थेट मांडता येणार आहे. गुगल त्यांच्या व्हेंडर्स आणि हंगामी कर्मचाऱ्यांबाबतही अशाच प्रकारची यंत्रणा उभी करणार आहे.

पंतप्रधान मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, अरुण जेटलींचं मायावतींना प्रत्युत्तर :
  • नवी दिल्ली : बसप अध्यक्ष मायावतींच्या पंतप्रधान मोदीं राजकारणासाठी जातीचा वापर करत असल्याच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले आहे. 'मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही', असं ट्वीट जेटली यांनी केलं आहे.

  • बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्वतःच्या जातीचा मागास जातीत समावेश करुन घेतल्याचा आरोप केला होता. त्या आरोपावर जेटली यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'पंतप्रधानांच्या जातीचा काय संबंध? त्यांनी कधीही जातीचं राजकारण केलेलं नाही.

  • आतापर्यंत त्यांनी फक्त विकासाचं राजकारण केलं आहे', असं ट्वीट जेटली यांनी केलं आहे. तसेच 'जातीचं नाव घेऊन जे लोक गरिबांना फसवत आहेत त्यांना यश मिळणार नाही. जातीचं राजकारण करुन त्यांनी फक्त पैसे कमवले आहेत. बसप किंवा राजद प्रमुखांच्या कुटुंबाकडील संपत्तीच्या प्रमाणात मोदींकडे 0.01 टक्के देखील संपत्ती नाही', असंही जेटली यांनी लिहीले आहे.

  • पंतप्रधान मोदींनी राजकीय फायद्यासाठी त्यांच्या जातीचा वापर केल्याचा आरोप बसप अध्यक्ष मायावतींनी केला आहे. 'पंतप्रधान मोदी वरच्या जातीतील आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करुन घेतला', असा आरोप मायावतींनी केला आहे.

स्टुडंट व्हिसासाठी अर्ज कधी करायचा हे कसं कळू शकेल :
  • प्रश्न - स्टुडंट व्हिसासाठी केव्हा अर्ज करायचा आणि अमेरिकेत कधी प्रवेश करायचा, हे कसे कळू शकेल?

  • उत्तर - स्टुडंट F-1 व्हिसासाठी अर्ज करणं ही अनेक टप्प्यांत होणारी प्रक्रिया आहे. सर्वात आधी अर्जदारानं स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिझिटर प्रोग्राम (एसईव्हीपी) अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यावा. एसईव्हीपीच्या अंतर्गत येणाऱ्या अमेरिकेतल्या 4,500 संस्थांची यादी https://studyinthestates.dhs.gov/school-search या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट 'एज्युकेशनयूएसए'च्या माध्यमातून अमेरिकेत शिकू इच्छिणाऱ्यांना मोफत सल्ला देतं. मुंबई,अहमदाबाद आणि देशातील इतर शहरांमध्ये एज्युकेशनयूएसएची कार्यालयं आहेत. या कार्यालयांमध्ये अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी https://educationusa.state.gov/ या संकेतस्थळाला भेट द्या.

  • प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी अर्जदारांनी त्यांच्या विद्यापीठानं फॉर्म आय-20, नॉन इमिग्रंट स्टुडंट स्टेटस मिळवण्यासाठी ठरवून दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी. आय-20 मध्ये विद्यार्थी, त्याच्या अभ्यासक्रमाचं क्षेत्र, त्यासाठीचा खर्च आणि त्याचा कालावधी यांची माहिती असते. याशिवाय अभ्यासक्रम कधी सुरू होणार याचीही तारीख असते.

  • आय-20 फॉर्म मिळाल्यानंतर विद्यार्थी http://ceac.state.gov संकेतस्थळावर जाऊन व्हिसासाठी आवश्यक अर्ज भरू शकतात. यानंतर विद्यार्थ्यांनी व्हिसा अर्जासाठी आवश्यक शुल्क भरावं आणि दोन अपॉईंटमेंट निश्चित कराव्यात. यातील एक बायोमेट्रिक कलेक्शनसाठी, तर दुसरी व्हिसाच्या मुलाखतीसाठी असेल. ज्या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करत आहात, तो आय-20 अर्जावरील व्हिसा प्रकाराशी जुळत असल्याची खात्री विद्यार्थ्यांनी करून घ्यावी. विद्यार्थी त्यांच्या आय-20 अर्जावर नमूद करण्यात आलेल्या तारखेच्या (शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख) 120 दिवस आधी व्हिसा मुलाखतीची तारीख निश्चित करू शकतात.

श्रीलंकेत १०६ संशयित अटकेत :
  • श्रीलंकेत २१ एप्रिल रोजी ईस्टर सणावेळी चर्च व आलिशान हॉटेलांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १०६ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यात तामिळ माध्यमाच्या एका शिक्षकाचाही समावेश आहे. आयसिसने श्रीलंकेतील बॉम्बहल्ल्यांची जबाबदारी घेतली असून त्यांचे तीन दहशतवादी सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत आत्मघाती स्फोटात मारले गेले.

  • गुन्हे अन्वेषण विभागाने म्हटले आहे,की नॅशनल  तौहिद जमात या गटाने हे हल्ले केल्याचे स्पष्ट झाले असून  १०६ संशयितांचे जाबजबाब घेण्यात आले आहेत. अटक केलेल्यांमध्ये तामिळ माध्यमाच्या चाळीस वर्षे वयाच्या शिक्षकाचा समावेश असून त्याच्याकडे पन्नास सिमकार्ड व इतर आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. कालपिटिया पोलिस व नौदल यांच्या कारवाईत त्याला पकडण्यात आले. वावुनिया येथे लष्कर व पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत १० संशयितांना अटक करण्यात आली आहे.

  • श्रीलंकेने शनिवारी एनटीजे व आयसिसशी संबंधित इतर गटांवर बंदी घातली आहे. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या परदेशी नागरिकांची संख्या ४० झाली असून त्यात ११ भारतीय आहेत. श्रीलंकेत एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के लोक मुस्लीम आहेत. सात टक्के लोक ख्रिश्चन आहेत.

पुण्यात रेकॉर्डब्रेक उन्हाळा; ३६ वर्षांतील सर्वाधिक तापमान :
  • सध्या निवडणुकांचे वारे महाराष्ट्रभर वाहत आहेत. पण खऱ्याखुऱ्या वार्याला मात्र महाराष्टाचा विसर पडल्याचे चित्र आहे. उष्णतेच्या लाटेमुळे वाढलेल्या तापमानाने राज्याला सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी हैराण केले. महत्वाची बाब म्हणजे स्कायमेटच्या वृत्तानुसार, पुण्यात शनिवारी तब्बल ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची करण्यात आली. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान ठरले. यातही विशेष म्हणजे गेल्या ३६ वर्षांतील हे पुण्याचे सर्वाधिक तापमान ठरले. या आधी ३० एप्रिल १९८७ साली पुण्यात ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

  • याशिवाय, शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये नोंदविण्यात आले. अकोल्यात ४६.७ अंश सेल्सिअस तापमान होते. कोकण, महाबळेश्वर वगळल्यास सर्वत्र कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याचे आढळून आले. सर्वाधिक किमान तापमानाची नोंद कोल्हापूरमध्ये करण्यात आली. कोल्हापुरात २५.९ अंश सेल्सिअस तापमान होते.

  • विदर्भातही शनिवारी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम होता. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान नगर जिल्ह्यामध्ये (४५.१ अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले. वातावरणातील बदलांमुळे शुक्रवारपासून विदर्भातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाळा असह्य होऊ लागल्याचे दिसून येत आहे.

  • दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय नृत्य दिन

महत्वाच्या घटना 

  • १९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • १९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

  • १९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.

  • १९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.

जन्म 

  • १७२७: फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते जीन-जॉर्जेस नोव्हर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १८१०)

  • १८४८: चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९०६)

  • १८६७: भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९३५)

  • १८९१: भारतीय कवी आणि कार्यकर्ते भारतीदासन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९६४)

  • १९०१: दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचा जन्म. (मृत्यू: ७ जानेवारी १९८९)

  • १९३६: भारतीय संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्म.

  • १९६६: इंग्लिश फिरकी गोलंदाज फिल टफनेल यांचा जन्म.

  • १९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू आंद्रे आगासी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९४५: जर्मन नाझी अधिकारी हेन्रिच हिमलर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९००)

  • १९६०: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९७)

  • १९८०: लेखक, विचारवंत आणि समीक्षक श्रीकृष्ण के. क्षीरसागर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)

  • १९८०: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९९)

  • २००६: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९०८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.