चालू घडामोडी - २९ ऑगस्ट २०१८

Updated On : Aug 29, 2018 | Category : Current Affairs



स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या अॅपल १ कॉम्प्युटरचा होणार लिलाव, कोट्यवधीची बोली लागण्याची शक्यता :
 • नवी दिल्ली - तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील आघाडीवर असलेल्या अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या संगणकाचा लिलाव होणार आहे. अॅपल कंपनीसाठी खास असलेला हा अॅपल 1 संगणक अजूनही बऱ्यापैकी कार्यरत असून, 25 सप्टेंबर रोजी त्याचा लिलाव होणार आहे.  लिलावामध्ये या संगणकाला सुमारे 3 लाख डॉलर एवढी किंमत मिळण्याची शक्यता आहे. 

 •  1970 साली अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझनिक यांनी अॅपल 1 हा संगणक तयार केला होता.  या खास संगणकाचा लिलाव बोस्टन स्थित आरआर ऑक्शनकडून आजोजित करण्यात येणार आहे. अॅपल 1 हा संगणक त्या खास 60 संगणकांपैकी आहे, जे आजही अस्तित्वात आहेत. अॅपल 1 संगणकाला अॅपल I किंवा अॅपल-1 या नावानेही ओळखले जाते. हा एक डेस्कटॉप संगणक आहे. तसेच अॅपलने 1976 साली तो बाजारात आणला होता. 

 • लिलावामध्ये केवळ मदरबोर्डच नाही तर ओरिजनल मेन्युअल, पीरियड स्टाइल मॉनिटर आणि कीबोर्ड यांचाही समावेश असेल. 1976 साली संगणक किती शक्तिशाली होता, हे यामाध्यमातून दाखवण्यात येईल. अॅपल 1 एक्स्पर्टस् कोरी कोहेन यांनी 2018 मध्ये या संगणकाला रिस्टोअर केले होते. तसेच त्यांनी त्याला 8.5/10 एवढे रेटिंग दिले होते.  

मध्य भारताचा प्रवास १७१ कि.मी. ने घटणार :
 • नवी दिल्ली : नव्याने होणाऱ्या इंदूर-मनमाड रेल्वेमार्गामुळे मुंबईहून मध्य भारतातील प्रवासाचे अंतर १७१ किलोमीटरने घटणार आहे. तसेच मुंबई-दिल्ली मालवाहतुकीचा खर्च, वेळही वाचणार आहे. हा प्रकल्प येत्या सहा वर्षात पूर्णत्वास जाईल.

 • या ३६२ किलोमीटरच्या मार्गासाठी मंगळवारी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) , रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्यप्रदेश सरकारमध्ये सामंजस्य करार झाला. सध्या इंदूरहून मुंबई, पुणे तसेच जेएनपीटीसारख्या बंदरापर्यंत पोहोचायचे असेल तर बडोदा, सुरतमार्गे जावे लागते. हे अंतर ८१५ किलोमीटर आहे. नव्या मार्गामुळे

 • हे अंतर १७१ किलोमीटरने घटेल.  या मार्गांचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या इगतपुरी, नाशिक आणि सिन्नर, पुणे, खेड, धुळे आणि नरडाणा नोडला फायदा होणार आहे.

विद्यार्थ्यांअभावी देशभरातील ६०० इंजिनीअरिंग कॉलेज केली बंद - प्रकाश जावडेकर :
 • नवी दिल्ली - कुठे विद्याशाखांचा अभाव, तर कुठे विद्यार्थीच नसल्याने सरकारने देशातील सरकारी व खाजगी अशी ६०० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद केली आहेत.

 • मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शैक्षणिक सुविधांचा अभाव, विद्यार्थ्याची वानवा असलेली ६०० अभियांत्रिकी महाविद्यालये काही वर्षांत बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यात अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच बी. टेक व अन्य पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या संस्था तसेच तांत्रिक महाविद्यालयांचा समावेश आहे.

 • कमी विद्यार्थी व अन्य कारणांनी आणखी १५० महाविद्यालयांना प्रवेशास बंदी घातली जाईल.. मात्र असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. याला जावडेकर यांनी दुजोरा दिला नाही.

 • अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा सुधारणे व पर्यायी अभ्यासक्रम सुरू करणे यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, त्यात काही अभियांत्रिकी महाविद्यालये बंद होतील. काहींचे रूपांतर मॉल्स, व्यवसाय केंद्रात होईल वा तिथे नवे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या महाविद्यालयांत २०११-१२ पासून ओहोटी सुरू झाली आणि २०१४ पर्यंत स्थिती दयनीय झाली. दरवर्षी ७५ हजारांची घट

 • अखिल भारतीय तंत्र परिषदेच्या माहितीनुसार वर्षाकाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या संख्येत ७५ हजारांनी घट झाली आहे.

चांद्रयान-२चे जानेवारीत प्रक्षेपण :
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या जानेवारी महिन्यात चांद्रयान-२ या अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी ही माहिती दिली. चंद्रयान-२ हे अभियान सर्वात कठीण असल्याचे ते म्हणाले.

 • चांद्रयान-२ या अंतराळ यानाचे जीएसएलव्ही-एमके-३-एम १ या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यात आले आहे. चांद्रयान-२च्या वजनामध्ये वाढ झाली असून आता ते ३.८ टन इतके झाले आहे. त्यामुळेच चांद्रयान-२चे जीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण करता येणार नाही, असेही सिवन यांनी सांगितले.

 • गरजेनुसार प्रक्षेपण यान अद्ययावत करून त्याला जीएसएलव्ही-एमके-३ असे स्वरूप देण्यात आले आहे. सदर यानाचे प्रक्षेपण ३ जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान करण्याचे ठरविण्यात आले आहे. दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे जगातील पहिलेच अभियान आहे, असेही सिवन यांनी सांगितले.

ताजमहाल संपुष्टात आला, तर दुसरी संधी मिळणार नाही : सर्वोच्च न्यायालय :

 • ‘एकदा ताजमहाल संपुष्टात आला, तर दुसरी संधी मिळणार नाही,’ असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. ताजमहालाच्या संवर्धनासाठी आराखडा लवकरात लवकर तयार करावा आणि हा आराखडा तयार करताना प्रदूषण आणि हरित क्षेत्राच्या मुद्द्याचा गांभीर्याने विचार केला जावा अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

 • ताजमहालच्या संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी संबधीत पक्षकारांकडून सुचना मागवल्या आहेत. यामध्ये मुख्य पक्षकार एम. सी. मेहता, केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि उत्तर प्रदेश सरकारचा समावेश आहे. न्या. मदन लोकूर, एस. अब्दुल नाझीर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने या सुचना मागवल्या आहेत.

 • सुनावनीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ताजमहाल ही पूरातन वास्तू आहे, त्यामुळे तिचे जतन करणे महत्वाचे असल्याचे निरीक्षण नोंदवले. आराखडा तयार करताना वाहनांमुळे होणारे प्रदूषण, ताज संरक्षित क्षेत्रामधील (टीटीझेड) उद्योगांचे प्रदूषण आणि यमुना नदीच्या पाण्याची पातळी यांचाही विचार व्हायला हवा, असेही सर्वोच्च यासंबंधी आराखडा तयार करणाऱ्या प्रकल्प समन्वयकाला सांगितले.

 • तर, दिल्लीतील स्कूल ऑफ प्लानिंग अँड आर्किटेक्चरतर्फे ताजमहालाचे संवर्धन व अन्य मुद्द्यांबाबत सर्वंकष आराखडा तयार करण्यात येत आहे, असे उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व अॅड. ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयाला सांगितले.

पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार :
 • पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बुधवारी गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले होते. मात्र आज ते गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेस जाणार आहेत. आज सायंकाळी ते अमेरिकेस रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 • मुख्यमंत्री पर्रिकर 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी अमेरिकेहून 11 दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर आणि गोमेकॉचे डॉक्टर  कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही.

 • दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते  लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले. त्यानंतर ते खासगी गाडीने आपल्या निवासस्थानी निघून गेले.

 • दुसऱ्या दिवशी त्यांना उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या माहितीप्रमाणे, पर्रिकर शनिवारी किंवा रविवारी गोव्यात परतणार होते. मात्र नंतर ते बुधवारी गोव्यात पोहोचतील, असे मुख्यमंत्री कार्यालयातर्फे कळवण्यात आले होते. मात्र आज त्यात पुन्हा बदल झाला असून मुख्यमंत्री आज सायंकाळी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार असून दुपारपर्यंत ते मंत्रिमंडळाला याची कल्पना देणार आहेत.

दिनविशेष :
 • आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन / भारतीय क्रीडा दिन / तेलगु भाषा दिन

महत्वाच्या घटना

 • १४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.

 • १८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

 • १८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.

 • १८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.

 • १८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.

 • १९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.

 • १९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.

 • १९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.

 • १९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.

 • २००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.

जन्म

 • १८६२: ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान अँड्रु फिशर यांचा जन्म.

 • १८८०: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९६८)

 • १८८७: भारतीय डॉक्टर आणि राजकारणी जीवराज नारायण मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९७८)

 • १९०१: सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)

 • १९०५: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)

 • १९१५: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२)

 • १९२३: भारतीय क्रिकेट खेळाडू हिरालाल गायकवाड यांचा जन्म.

 • १९२३: इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा जन्म.

 • १९५८: अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार मायकेल जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २५ जून २००९)

 • १९५९: दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांचा जन्म.

मृत्यू

 • १७८०: पंथीयन  चे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १७१३)

 • १८९१: सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३)

 • १९०४: ओट्टोमन सम्राट मुराद (पाचवा) यांचे निधन.

 • १९०६: मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा पद्मनजी मुळे यांचे निधन.

 • १९६९: लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९१६)

 • १९७५: आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉनडी व्हॅलेरा यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८८२)

 • १९७६: इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचे निधन. (जन्म: २५ मे १८९९)

 • १९८२: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९१५)

 • १९८६: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: १५ जून१८९८)

 • २००७: स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)

 • २००८: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)

टिप्पणी करा (Comment Below)