चालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१८

Date : 29 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जसप्रीत बुमराने शास्त्री गुरुजींना मागे टाकलं, मोडला ३३ वर्षांपूर्वीचा विक्रम :
  • मेलबर्न, भारत विरुद्घ ऑस्ट्रेलिया : भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराने बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशीही सातत्यपूर्ण कामगिरीचे सत्र कायम राखले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सहा विकेट घेणाऱ्या बुमराने दुसऱ्या डावात पहिल्या चार फलंदाजांमध्ये दोन विकेट टिपल्या.

  • शॉन मार्शला पायचीत करून बुमराने पदार्पणाच्या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने दोन विकेट घेत कपिल देव,  आणि अजित आगरकर यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. यासह त्याने 33 वर्षांपूर्वीचा रवी शास्त्रींचा विक्रमही मोडला. 

  • भारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज 114 धावांवर माघारी परतले. यात बुमराने दोन विकेट घेतल्या. बुमराने या दोन विकेटसह या कसोटीत मिळून आठ विकेट घेतल्या.

  • कारकिर्दीत प्रथमच बुमराने एका सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. बुमराने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीसह त्याने कपिल देव व अजित आगरकर यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. कपिल देव यांनी 1985 व 1992 साली अॅडलेड कसोटीत अनुक्रमे 8/109 आणि 8/163 अशा कामगिरीची नोंद केली होती. त्यानंतर आगरकरने 2003 मध्ये अॅडलेड येथेच 8/160 अशी कामगिरी केली.

  • आज बुमराने मेलबर्नवर आतापर्यंत 8/51 अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात भारताच्या एकाही जलदगती गोलंदाजांला कसोटीत दहा विकेट घेता आलेल्या नाहीत आणि बुमराला हा विक्रम नोंदवण्याची संधी आहे. 

गगनयान अवकाशात झेपावणार, ३ अंतराळवीर ७ दिवस करणार मुक्काम :
  • इस्त्रोच्या मिशन गगनयानला केंद्र सरकारचा हिरवा कंदिल मिळाला असून लवकरच भारतीय अंतराळवीर या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. या मोहिमेंतर्गत ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात सात दिवस मुक्काम करणार आहेत. ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

  • केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या दिड ते दोन महिन्यात हे मिशन सुरू होणार आहे. जगातील इतर देशही सॅटेलाइट लॉन्च करण्यासाटी इस्रोची मदत घेत आहेत. या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे.

  • ही गगनयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अंतराळात जाणाऱ्या एका व्यक्तीच्या कमीत कमी चाचण्या घेण्यात येणार आहेत. या शिवाय २०२२ पर्यंत गगनयान अंतराळात पाठवणार असल्याचं इस्रोचे प्रमुख सिवन यांनी आधीच सांगितलं आहे. त्याआधी २०२० आणि २०२१ मध्ये दोन मानवरहित यानही अवकाशात पाठवण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली होती, त्याला आता मूर्त रुप येणार आहे.

  • या मोहिमेची जबाबदारी एका महिलेच्या हाती सुपूर्द करण्यात येणार असून इस्रोच्या या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनीयर करणार आहेत. त्या गेल्या ३० वर्षांपासून इस्रोमध्ये काम करीत आहेत. गगनयान मोहिमेअंतर्गत पाठविण्यात येणार अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल, अपेक्षित आहे, या प्रकल्पामध्ये विविध संघटना, तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मंडळी सहभागी असतील. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही बोलले जात आहे.

भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी भारताची ४५०० कोटींची मदत :
  • भारताने भूतानला ४५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून, त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ही मदत करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे भूतानी समपदस्थ लोटे त्सेरिंग यांनी द्विपक्षीय चर्चा केली.

  • मोदी यांनी सांगितले, की भूतानबरोबर जलविद्युत सहकार्य हा महत्त्वाचा भाग असून, तो दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मंगदेच्छू प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येईल.

  • त्सेरिंग यांचे गुरुवारी पहिल्या परदेश भेटीवर आगमन झाले. त्यांनी गेल्या महिन्यात भूतानचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. मोदी यांनी सांगितले, की भारत हा भूतानचा विश्वासू मित्र असून तेथे महत्त्वाची भूमिका पार पाडील यात शंका नाही.

  • भारताने त्यांच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ४५०० कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. भूतानने या वर्षी नवी पंचवार्षिक योजना सुरू केली असून, तिची मुदत २०२२ पर्यंत आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्सेरग यांची आज सकाळी भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले. त्सेरिंग यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीवर राजघाट येथे पुष्पचक्र वाहिले.

मराठा आरक्षणासह दुष्काळग्रस्त जिल्ह्यात एसटीची मेगाभरती :
  • धुळे : राज्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी एसटी महामंडळाच्या वतीने मेगाभरती होणार आहे. चालक आणि वाहक पदाच्या चार हजार 242 पदांची भरती करण्यात येणार असून यासंबंधीची जाहिरात महामंडळाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही एसटी महामंडळाने घेतला आहे.

  • दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या 15 जिल्ह्यांमधील युवकांना रोजगार मिळावा, या हेतूने एसटी महामंडळाने त्यांना चालक-वाहक पदाची संधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

  • याशिवाय, औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी 560 पदे एसटी महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील, अशी माहिती रावतेंनी दिली. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल पाटीलही उपस्थित होते.

'ट्राय'चं नवं केबल धोरण ३१ जानेवारीपासून लागू होणार :
  • नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाचं (ट्राय)  ग्राहकांना पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य देणारं नवं केबल धोरण आता 29 डिसेंबर ऐवजी 31 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.  त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी आता महिन्याभराचा वेळ मिळणार आहे.

  • गुरुवारी ट्राय(TRAI) आणि ब्रॉडकास्टर्स, डीटीएच ऑपरेटर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ट्रायच्या नव्या नियमानूसार ग्राहकांना जे चॅनेल्स पाहायचे आहेत केवळ त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. ग्राहकांच्या फायद्याची ही नवी नियमावली लागू करताना त्यांना आपल्या पसंतीचे चॅनल निवडण्यासाठी वेळ मिळावा यासाठी तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती ट्रायचे सचिव एस. के. गुप्ता यांनी दिली.

  • यापूर्वी ट्रायची नवी नियमावली 29 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार होती. परंतू आपल्या पसंतीचे चॅनल निवडायचे कसे याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम होता. या नव्या नियमांमुळे ग्राहकांचे टीव्ही पाहणे खूप स्वस्त होणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोव्यात १०५४ एलपीजी जोडण्या :
  • पणजी : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोव्यात १0५४ एलपीजी गॅस सिलिंडरच्या जोडण्या देण्यात आल्या असून उत्तर गोव्यात १२९ टक्के तर दक्षिण गोव्यात १२0 टक्के उद्दिष्ट साध्य झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. गॅस स्टोव्ह तसेच सिलिंडरसाठी पैसे नसल्याने ३८.१४ टक्के लाभार्थींना कर्ज सुविधा देण्यात आली. 

  • पत्रकार परिषदेत हिन्दुस्तान पेट्रोेलियम कंपनीचे विभागीय साहाय्यक व्यवस्थापक (विक्री) वैभव भगत म्हणाले की, १४.२ किलोचा सिलिंडर रिफिल घेणे शक्य नसलेल्यांसाठी ५ किलोचा रिफिल देण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्तर गोव्यात सर्वाधिक ६0 टक्के गरजुंनी पेडणे तालुक्यात लाभ घेतलेला आहे त्या पाठोपाठ फोंडा तालुक्याचा क्रमांक लागतो. दक्षिण गोव्यात धारबांदोडा व काणकोण तालुक्यांमध्ये जास्त लाभार्थी आहेत. 

  • वरील योजनेखाली उत्तर गोव्यात भारत पेट्रालियमने ३१४, हिन्दुस्तान पेट्रोलियमने ३४८ तर इंडियन आॅइल कंपनीने ८३ एलपीजी सिलिंडर दिले. दक्षिण गोव्यात भारत पेट्रालियमने ४ , हिन्दुस्तान पेट्रोलियमने २७७  तर इंडियन आॅइल कंपनीने २८ एलपीजी सिलिंडर दिले. देशभरात मार्च २0१९ पर्यंत दारिद्र्य रेषेखालील ५ गृहिणींना आणि मार्च २०२० पर्यंत अतिरिक्त ३ कोटी गृहिणींना या योजनेखाली एलपीजी जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मागास व अनुसूचित जमातींच्या लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. 

  • १ मे २0६ रोजी ही योजना सुरु करण्यात आली. आतापर्यंत ज्यांनी या योजनेखाली सिलिंडर घेतले त्यातील ८0 टक्के लाभार्थींनी पुन: सिलिंडर भरुनही घेतल्याचे सांगण्यात आले.  पत्रकार परिषदेस भारत पेट्रोलियमचे विभागीय साहाय्यक व्यवस्थापक (विक्री) मथुरा वैद्य हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात सर्व पेट्रोलियम कंपन्यांचे मिळून दक्षिण गोव्यात २ लाख ३ हजार तर उत्तर गोव्यात २ लाख ७४ हजार ग्राहक आहेत.

वैद्य, हकिमांना द्यावी लागेल आता डॉक्टरकीची परीक्षा, केंद्राची मंजुरी :
  • नवी दिल्ली : भारतीय उपचार पद्धतींसाठी ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम फॉर मेडिसीन बिल २०१८’ला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, आयुर्वेद, युनानी, सिद्धा व स्वोरिगपाच्या परीक्षेसाठी नवीन बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच प्रकारचा बोर्ड होमिओपॅथी परीक्षेसाठीही तयार करण्यात येणार आहे. या सर्व उपचार पद्धतींमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट देण्याबरोबरच एक्झिट परीक्षाही द्यावी लागेल.

  • केंद्रीय विधि व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, याद्वारे भारतीय उपचार पद्धतीला एक सुव्यवस्थित रूप प्राप्त करून देण्याबरोबरच याला अ‍ॅलोपॅथी पद्धतीच्या नियमनासाठी स्थापित करण्यात येणाºया आयोगाप्रमाणे एक पारदर्शक, मानकपूर्ण आयोगाच्या अंतर्गत आणणे, हा उद्देश आहे. याद्वारे या क्षेत्रातील सर्व चिंता दूर केल्या जाऊ शकतील.

  • आधीपासूनच या पद्धतींमध्ये उपचार करणारे वैद्य व हकिमांबरोबरच इतरांनाही लागू होणाºया नियमाच्या प्रश्नावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, सरकारने या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. आता संसदेत यावर चर्चा होईल. त्यानंतर या कायद्याचे अंतिम स्वरूप कोणते असेल, हे स्पष्ट होईल. हा आयोग स्थापन झाल्यानंतर विद्यमान सेंट्रल कौन्सिल फॉर इंडियन मेडिसीन त्यात समाविष्ट होईल. या आयोगाच्या अंतर्गत चार स्वायत्त बोर्ड स्थापन केले जातील. ते आयुर्वेद, युनानी, सिद्धा, स्वोरिगपा बोर्ड असतील व ते या क्षेत्रातील शिक्षण निश्चित करतील. याबरोबरच अन्य दोन बोर्ड असतील.

  • त्यातील एक विविध शैक्षणिक संस्थांना या भारतीय चिकित्सा पद्धती शिकविण्यासंबंधी मान्यता देणे, त्यांचे रेटिंग करण्याचा अधिकार देईल. बोर्ड आॅफ एथिक्स अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन आॅफ प्रॅक्टिशनर्स आॅफ इंडियन सिस्टीम आॅफ मेडिसीन हा दुसरा बोर्ड असेल. हे बोर्ड सिद्धांतांबाबत प्रकरणांबरोबरच या पद्धतींमधील सेवा देणाºयांचे एक नोंदणी रजिस्टर ठेवील.

होऊदे जल्लोष; ९० वर्षांचा इतिहासही भारताच्या बाजूनं :
  • मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झालेली आहे. गोलंदाजीला पोषक असलेल्या या खेळपट्टीवर फलंदाजांची चांगलीच कसोटी पणाला लागत आहे. त्यामुळे 399 धावांचे लक्ष्य सोपं नाही आणि मेलबर्न कसोटीचा 90 वर्षांचा इतिहासही हेच सांगतो. 

  • भारतीय संघाने कालच्या 5 बाद 54 धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाची सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राप्रमाणे भारतीय फलंदाज अपयशी ठरतील असे वाटले होते. मात्र मयांक अग्रवाल आणि रिषभ पंत यांनी खेळपट्टीवर तग धरला. त्यांनी सहव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. मयांक 42 आणि पंत 33 धावांवर माघारी फिरला. कर्णधार कोहलीने 8 बाद 106 धावांवर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले. 

  • मेलबर्नची खेळपट्टीपाहता ऑस्ट्रेलियाला हे लक्ष्य पार करणे तितके सोपे नाही. दोन दिवसांच्या खेळात 167 षटकं खेळणे हे कांगारूसाठी आव्हानात्मक आहे. त्यात येथील कसोटी इतिहासही हेच सांगतो. चौथ्या डावात येथे धावांचा पाठलाग करणे कठीण आहे. आतापर्यंत 24 वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ अपयशी ठरला आहे आणि केवळ चार सामने अनिर्णीत राहिली आहेत. येथे इंग्लंडने 1928 साली मिळवलेला विजय हा आतापर्यंत येथे सर्वाधिक धावांचा पाठलाग ठरला आहे. इंग्लंडने 332 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.

  • १९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

  • १९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

जन्म 

  • १८००: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १८६०)

  • १८०८: अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८७५)

  • १८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.

  • १९००: मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)

  • १९०४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)

  • १९१७: निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)

  • १९२१: फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१४)

मृत्यू 

  • १९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन.

  • २०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)

  • २०१४: भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९२२)

  • २०१५: पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.