चालू घडामोडी - २९ जानेवारी २०१९

Date : 29 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : विश्वनाथन आनंद संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी :
  • विक आन झी : पाच वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरणाऱ्या विश्वनाथन आनंदला टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने ९ गुणांसह या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

  • आनंदला १३व्या आणि अखेरच्या फेरीत भारताचा ग्रँडमास्टर विदीत गुजराथीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. त्यामुळे आनंदला तीन विजय, एक पराभव आणि नऊ बरोबरींसह ७.५ गुणांनिशी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर मजल मारता आली. या कामगिरीमुळे आनंदच्या खात्यात सहा रेटिंग गुण जमा झाले असून तो जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

  • कार्लसनने अपेक्षितपणे या स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना हॉलंडच्या अनिश गिरीला अखेरच्या फेरीत बरोबरीत रोखले. काळ्या मोहऱ्यांसह स्वेश्निकोव्ह बचाव पद्धतीने खेळणाऱ्या कार्लसनने कोणताही धोका न पत्करता सातव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.

  • गिरीने ८.५ गुणांसह दुसरे तर आनंद, रशियाचा इयान नेपोमनियाची आणि चीनचा डिंग लिरेन यांनी संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. विदीत गुजराथीने दोन पराभव, तीन विजय आणि आठ डाव बरोबरीत अशी सर्वोत्तम कामगिरी करताना ७ गुणांसह सहावे स्थान प्राप्त केले. या कामगिरीसह नाशिकच्या विदीतने २७०० रेटिंग गुणांच्या खेळाडूंमध्ये स्थान पटकावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार आदर्श परीक्षेचे धडे :
  • नवी दिल्ली : 'मन की बात' नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 'परीक्षा पे चर्चा' या क्रार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.  परीक्षेच्या वेळी तणावाला कसं सामोर जायचं यासंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या वर्षी देखील मोदींनी 'परिक्षा पे चर्चा'कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

  • या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान मोदी मंगळवारी(ता.29) देशभरातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातून 106 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  परिक्षेचा ताण हलका करण्यासाठी काय करायला हवं यावर ते बोलणार आहेत.

  • महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांतून हे 106 विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. एका स्पर्धेद्वारे ही निवड करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.

  • गेल्या वर्षी देखील पंंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे मार्गदर्शन केले होते. त्यावेळी फक्त दिल्लीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी होती. मात्र यावर्षी देशभरातून विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेक. तसेच विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांसोबतही यंदा पंतप्रधान संवाद साधणार आहेत.

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन :
  • देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामगार नेते, मुंबईच्या जनजीवनाशी जोडले गेलेले एकेकाळचे बंदसम्राट अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे कामगारांसाठी लढणारा योद्धा हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.

  • गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी मंगळुरु येथे झाला. सहा भावांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे सर्वात मोठे होते. मुंबईत आल्यावर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले. स्वातंत्र्यानंतर तीन वेतन आयोग आले होते. पण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारात अपेक्षित वाढ झाली नव्हती.

  • जॉर्ज फर्नाडिस १९७३ मध्ये ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ रोजी मुंबईत रेल्वे कामगारांचा संप झाला. या आंदोलनामुळे जॉर्ज फर्नांडिस यांना लढवय्या कामगार नेता अशी ओळख मिळवून दिली. त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई. रेल्वे कामगारांवर त्यांची मजबूत पकड होती.

  • भारताच्या राजकारणात फर्नांडिस प्रसिद्ध झाले ते आणीबाणीच्या काळात. फर्नांडिस यांचा जन्म मंगळुरु येथे झाला, कार्यक्षेत्र मुंबई पण निवडणूक लढवली तिहार तुरुंगातून. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत ते विक्रमी मतांनी विजयी झाले होते.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश :
  • गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यापूर्वी काँग्रेस आणि भाजपामध्ये राहिलेल्या वाघेला यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी याबाबत माहिती दिली आहे.

  • गेल्या आठवडाभरापासून वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यापूर्वी वाघेला यांच्या पक्षप्रवेशाबाबत मुंबईत घोषणा होणार असल्याचंही म्हटलं जात होतं.

  • शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतरच राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं वाघेला यांनी सांगितलं. ‘याबाबत पवारांशी चर्चा झाली, ही चांगली गोष्ट आहे. सार्वजनिक जीवनात जनतेच्या मुद्यांना वाचा फोडण्यासाठी एका चांगल्या व्यासपीठाची गरज असतेच आणि कोणालाही अशा गोष्टीसाठी नाही म्हणू नये’, असं वाघेला म्हणाले.

चीननं उभारला जगातील सर्वाधिक लांब 3D प्रिंटेड ब्रिज :
  • जगातील सर्वाधिक लांब 3D प्रिंटेड ब्रिज चीनमध्ये उभारण्यात आला आहे. शांघायमधील वाटसरूंसाठी हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलाची लांबी 26.3 मीटर आणि रुंदी 3.6 मीटर एवढी आहे. रोबोटिक आर्म्सच्या मदतीनं केवळ 19 दिवसांमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. यामध्ये 3D-प्रिंटेड 44 काँक्रीट ब्लॉकचाही वापर करण्यात आला आहे. हा पूल उभारण्यासाठी 2 लाख 70 हजार युआन (जवळपास 28.09 लाख रुपये) एवढा खर्च करण्यात आला आहे.

  • शांघायमधील Wisdom Innovation Parkमध्ये हा ब्रिज बांधण्यात आला आहे. चीनच्या 3D प्रिंटिंग म्युझिअमव्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्सवर काम करणाऱ्या टॉप हायटेक कंपनीचं कार्यालयदेखील या पार्कमध्ये आहे. पुलावर पडणाऱ्या वजनाची नोंद ठेवण्यासाठी विशेष असे तंत्रज्ञानदेखील येथे उपलब्ध आहे. 3 डी तंत्रज्ञानाच्या आधारावर ब्रिज बांधण्यात आल्याने याचा खर्च 33 टक्के कमी झाला आहे.

  • Tsinghua Universityचे प्राध्यापक सू बिगुओ यांनी ब्रिजचा आराखडा तयार केला आहे. या ब्रिजची निर्मिती करण्यासाठी पॉलिथिलीन फायबर काँक्रिटचा वापर करण्यात आला आहे.

  • प्रोफेसर सू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3डी प्रिंटिंगच्या मदतीनं ब्रिजची निर्मिती केल्यास कामगारांची गरज कमी प्रमाणात लागते. यासोबत खूपच कमी कालावधीत ब्रिजची निर्मिती केली जाऊ शकते. आगामी काळात चीनमध्ये बऱ्याच गोष्टींची निर्मिती करण्यासाठी थ्री डी प्रिटिंग तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

  • १८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

  • १८८६: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

  • १९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

जन्म 

  • १७३७: अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८०९)

  • १८४३: अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१)

  • १८६०: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९०४)

  • १८६६: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)

  • १९२२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

  • १९२६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ – ऑक्सफर्ड, इंग्लंड)

  • १९५१: वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज अँडी रॉबर्टस यांचा जन्म.

  • १९७०: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९३४: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ - वॉर्क्लॉ, पोलंड)

  • १९६३: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.

  • १९६३: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७४)

  • १९९५: रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक रुपेश कुमार यांचे निधन.

  • २०००: शिवसेना नेते पांडुरंग सावळाराम तथा काका वडके यांचे निधन.

  • २००१: महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राम मेघे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.